मुंबई : सप्ताहअखेर प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती-तंत्रज्ञान आणि आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुलीला गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिल्याने प्रमुख निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आणि ते नकारात्मक पातळीवर बंद झाले. मात्र निफ्टीने प्रथमच २३,००० अंशांच्या पातळीला स्पर्श केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी त्यासंबंधी आशावादाने सलग दुसऱ्या दिवशी बाजारात उच्चांकी तेजी होती. मात्र सत्राअंतर्गत प्रचंड अस्थिरतेने बाजाराला घेरल्याचे, परिणामी प्रमुख निर्देशांकांतही चढ-उतार दिसून आले. सध्या अंतिम टप्प्यांत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७.६५ टक्क्यांची किरकोळ घसरण झाली आणि तो ७५,४१०.३९ अंशांवर स्थिरावला. त्याने दिवसभरात २१८.४६ अंशांची कमाई करत ७५,६३६.५० ही ऐतिहासिक पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टीने प्रथमच २३,००० अंशांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. सत्राच्या सुरुवातीच्या व्यवहारात त्यात ५८.७५ अंशांची भर पडली आणि त्याने २३,०२६.४० हे सर्वोच्च शिखर गाठले. मात्र पुढे नफावसुलीने १०.५५ अंशांच्या घसरणीसह तो पुन्हा २३,००० अंशांच्या खाली येत २२,९५७.१० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरी प्रक्रियेसाठी मुदतवाढीची ‘एनसीएलटी’कडे मागणी

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीबाबत अनिश्चिततेमुळे जागतिक भांडवली बाजारात निरुत्साहाचे वातावरण आहे. तेथील बेरोजगारीचे दावे अपेक्षेपेक्षा अधिक घटले असून कंपन्यांची आर्थिक कामगिरी उत्तम राहिली आहे. मात्र असे असूनही फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे पाऊल उचलले जाण्याबाबत ठोस संकेत नाहीत. दरम्यान देशांतर्गत आघाडीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे बाजारात तेजीमय वातावरण कायम आहे. त्या परिणामी लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांनी नवीन उच्चांक गाठला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये टेक महिंद्र, एशियन पेंट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, महिंद्र अँड महिंद्र, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील आणि आयटीसीच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली, तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांचे समभाग वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या माहितीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४,६७०.९५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ७५,४१०.३९ -७.६५ (०.०१%)

निफ्टी २२,९५७.१० -१०.५५ (०.०५%)

डॉलर ८३.११ – १८

तेल ८०.७७ -०.७३