scorecardresearch

Premium

सलग चौथ्यांदा व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका

रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुरूप रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

RBI, home loan, Shaktikanta Das, repo rate
व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुरूप रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बॅंकेने सलग चौथ्या द्विमाही पतधोरणात व्याजदराबाबत ‘जैसे थे’ भूमिका कायम ठेवली आहे. मात्र महागाई वाढीचा धोका कायम असून रोखांच्या विक्रीतून बाजारातील रोकडतरलता कमी करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी दिले. पतधोरण समितीच्या सहाही सदस्यांनी एकमताने दर-स्थिरतेचा हा कौल दिला.

softbank sells another 2 percent stake in paytm for rs 950 crore
पेटीएमने UPI व्यवहार करता? रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय, नवी अपडेट काय?
PF interest rate
आनंदाची बातमी : पीएफ व्याजदर ८.२५ टक्क्यांवर, देशभरातील ६.८ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा
Paytm Payments Bank, PPBL, Reserve Bank of India, RBI
विश्लेषण : पेटीएम पेमेंट बँकेचे काय चुकले? नव्या जमान्याच्या ‘पेमेंट बँकां’चे मरण अटळ आहे?
Prime Minister Narendra Modi believes that billions will be invested in the energy sector in the future
भविष्यात ऊर्जाक्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

उच्च महागाई दर हा आर्थिक स्थिरता आणि शाश्वत वाढीसाठी मोठा धोका आहे, म्हणूनच मध्यवर्ती बँकेने महागाई दर ४ टक्के पातळीवर आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही दास म्हणाले. दुसऱ्या तिमाहीत महागाई वाढली असूनही, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी आपला महागाईचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. वार्षिक किरकोळ महागाई दर जुलैमधील ७.४४ टक्के या १५ महिन्यांच्या उच्चांकावरून ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के असा नरमला आहे. मात्र गाभा चलनवाढीचा दर (अन्न आणि इंधन वगळून किरकोळ महागाई दर) ५ टक्क्यांच्या खाली घसरत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

महागाई कमी करण्याचे पाऊल म्हणून, अतिरिक्त रोकडतरलता कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात रोखे विक्रीसाठी उतरण्याचा विचार करू शकते, असे दास म्हणाले. मात्र या रोखे विक्रीसंबंधाने नेमके वेळापत्रक आणि रोखेविक्रीचे प्रमाण त्यांनी सांगितले. ही बाब त्या त्या वेळेच्या तरलतेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे दास यांनी स्पष्ट केले.

विकास वेगाचा अंदाज कायम

विद्यमान वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाजही रिझर्व्ह बँकेने ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला आहे. अनियमित पाऊस आणि त्या परिणामी पेरण्या उशिरा झाल्याने खरिपाच्या उत्पादनावर आणि किमतींवर परिणाम झाला आहे. म्हणून अन्नधान्य महागाई दर दोन अंकी पातळीवर कायम आहे. याबरोबरच काही ठिकाणी झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे पुरेसा जलसाठा नसल्याने त्याचा रब्बी पिकांवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत देखील मोठी अस्थिरता दिसून आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आत्मसंतुष्टतेला थारा न देता दक्ष राहणे काळजी गरज आहे, असे दास म्हणाले.

बाह्य घटकांपासून आव्हान

भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हानात्मक जागतिक वातावरणात प्रगतीपर मार्गक्रमण सुरू आहे. देशांतर्गत पातळीवरील मजबूत आर्थिक स्थिरतेमुळे ती जागतिक पातळीवर विकासाची नवे इंजिन बनण्यास तयार आहे. एकीकडे अर्थवृद्धी रुळावर आली असताना, काही खाद्यपदार्थांच्या किमती भडकल्याने जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये चलनवाढीचा घसरलेला कल तात्पुरता खंडित झाला होता, असे दास यांनी नमूद केले. प्रलंबित भू-राजकीय तणाव आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर अस्थिर ऊर्जा आणि खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ ही महागाईच्या दृष्टिकोनात अनिश्चितता निर्माण करतात. मात्र चलनवाढीबद्दल मध्यवर्ती बँक जागरूक आहे. तसेच आता महागाई दराचे लक्ष्य हे २ ते ६ टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे नसून ते ४ टक्क्यांवर आणण्याचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi keeps repo rate unchanged at 6 5 print eco news asj

First published on: 07-10-2023 at 10:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×