लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून आगामी व्याजदर कपातीच्या संकेताच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात उत्साहाचे वातावरण होते. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सत्रात १ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवली. अमेरिकी बाजारात देखील तेजीचे वातावरण असून एसअँडपी ५००ने सर्वकालीन उच्चांक गाठला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि नॅस्डॅक कंपोझिटनेही विक्रमी पातळी गाठली.

दिवसअखेर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३९.५० अंशांची वधारून ७२,६४१.१९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७८०.७७ अंशांची कमाई करत ७२,८८२.४६ सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १७२.८५ अंशांची वाढ झाली आणि तो २२,०११.९५ पातळीवर स्थिरावला.

महागाई दीर्घकालीन उद्दिष्टापेक्षा जास्त राहूनही फेडरल रिझर्व्हने यावर्षी तीनदा व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने जागतिक बाजारपेठेत आशावाद निर्माण झाला आणि त्याचे सकारात्मक पडसाद देशांतर्गत बाजारावर उमटले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>‘ई-व्ही’ आखाड्यात नवीन स्पर्धक; जेएसडब्ल्यू समूहाची चीनच्या एमजी मोटरशी भागीदारी

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्र आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे भरती एअरटेल, मारुती, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंटच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात २,५९९.१९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

गुंतवणूकदार श्रीमंतीत ५.७२ लाख कोटींची भर

जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरणामुळे देशांतर्गत भांडवली बाजारांनी देखील तेजी दर्शवत १ टक्क्यांची वाढ नोंदवली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल गुरुवारच्या एका सत्रात ५.७२ लाख कोटींनी वधारून ३७९.८५ लाख कोटींवर पोहोचले. अमेरिकी मध्यवर्ती बँकेने विद्यमान वर्षात तीनदा व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उत्साह संचारला आहे.

सेन्सेक्स ७२,६४१.१९ ५३९.५० ( ०.७५%)

निफ्टी २२,०११.९५ १७२.८५ ( ०.७९%)

डॉलर ८३.१३ -६

तेल ८५.८८ -०.०८