मुंबई : केंद्राने अलीकडेच नवीन विद्युत वाहन (ई-व्ही) धोरणाच्या घोषणेतून टेस्लासह जागतिक वाहन निर्मात्यांना खुले आमंत्रण दिले असताना, बुधवारी चीनच्या एमजी मोटरशी जेएसडब्ल्यू समूहाने भागीदारीची घोषणा करीत या आखाड्यात नवीन स्पर्धक म्हणून उडी घेतली. येत्या सप्टेंबरपासून दर तीन-सहा महिन्यांत नवीन ऊर्जेवर आधारित मोटारी भारताच्या तसेच निर्यात बाजारपेठेसाठी दाखल करण्याचे या संयुक्त कंपनीचे नियोजन आहे.
गुजरातमधील हलोल येथील उत्पादन प्रकल्पातून ‘जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रा. लि.’ असे नामकरण करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीकडून अनोख्या ‘प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल’ची निर्मिती केली जाणार आहे. अर्थात विद्युत शक्तीसह, हायड्रोजन इंधन अशा संकरासह अपारंपरिक ऊर्जेवर आधारित चालणाऱ्या मोटारी आणण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

हलोल उत्पादन प्रकल्पाची सध्याची क्षमता प्रति वर्ष एक लाख मोटारींची असून, ती लवकरच तीन लाख मोटारींवर नेण्याची रूपरेषा आखण्यात आली आहे, असे जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाच्या सुकाणू समितीचे सदस्य पार्थ जिंदल यांनी नमूद केले. २०३० पर्यंत १० लाख मोटारींच्या विक्रीसह, ई-व्ही बाजारपेठेत ३० टक्के हिस्सेदारी मिळवण्याचे कंपनीने महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राखले असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>बँकाच्या कर्जवसुली प्रक्रियेला गती; ‘सरफेसी कायद्या’त दुरूस्तीचे केंद्राचे पाऊल, लघुसंदेश, ई-मेललाही कायदेशीर नोटीस म्हणून वैधता

भारताच्या ई-व्ही क्षेत्रात कधी काळी ‘मारुती’ने घडवून आणली तशी मोठी उलथापालथ घडवण्याचा आमचा निर्धार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’सह, शाश्वत वाहतूक उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याची कटिबद्धता या भागीदारीतून अधोरेखित केली गेली आहे. – सज्जन जिंदल, अध्यक्ष, जेएसडब्ल्यू समूह

(नावीन्यपूर्ण आणि प्रीमियम धाटणीच्या शुद्ध ई-कारच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती दर्शवणार ‘सायबरस्टर’च्या अनावरणासह, जेएसडब्ल्यू समूहाने एमजी मोटरशी भागीदारीत संयुक्त कंपनीची बुधवारी मुंबईत घोषणा केली, याप्रसंगी जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल, एमजी मोटर इंडियाचे मानद मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव छाबा आणि पार्थ जिंदल.)