-अजय वाळिंबे
ईपीएल लिमिटेड
(बीएसई कोड ५००१३५)

वेबसाइट: http://www.eplglobal.com
प्रवर्तक: ब्लॅकस्टोन समूह

बाजारभाव: रु. १९०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पॅकेजिंग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६३.६८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५१.५०
परदेशी गुंतवणूकदार ९.८९

बँक्स/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १४.५२
इतर/ जनता २४.०९

पुस्तकी मूल्य: रु. ६३
दर्शनी मूल्य: रु.२/-

लाभांश: २१५%
प्रति समभाग उत्पन्न: रु.८.६

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.२

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.४६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ४.८

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE): १२.२
बीटा : ०.६

बाजार भांडवल: रु.६०३० कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २३६/१५२

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

ईपीएल लिमिटेड म्हणजेच पूर्वाश्रमीची एस्सेल समूहाची ‘एस्सेल प्रोपॅक लिमिटेड’. आज ईपीएल जागतिक स्तरावरील सर्वात मोठी स्पेशालिटी पॅकेजिंग कंपनी आहे. कंपनी विविध उत्पादंनांसाठी लॅमिनेटेड प्लास्टिक ट्यूब बनवते. २०१९ मध्ये ब्लॅकस्टोन समूहाने एस्सेल ग्रुपकडून ही कंपनी ताब्यात घेतली. ब्लॅकस्टोन समूह हा प्रायव्हेट इक्विटी, रिअल इस्टेट, हेज फंड सोल्यूशन्स आणि पत व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांमध्ये जगातील अग्रगण्य गुंतवणूक संस्था आहे. ब्लॅकस्टोनची पॅकेजिंग उद्योगात मोठी गुंतवणूक असून यांत अमेरिकेतील ग्रॅहम पॅकेजिंग, ओवेन्स-इलिनॉइस इन्क, ओहायओ आणि चीनमधील श्याहसिन यांसारख्या विविध कंपन्यांचा समावेश आहे. ईपीएलचे जगभरात ११ देशांमध्ये २१ कारखाने असून कंपनी दरवर्षी सुमारे ८ अब्ज लॅमिनेटेड ट्यूब्सची उत्पादक आहे. कंपनीची लॅमिनेट. लॅमिनेटेड ट्यूब, डिस्पेंसिंग सिस्टमसारखी उत्पादने प्रामुख्याने वैयक्तिक निगा, औषधी, सौंदर्य प्रसाधन, अन्न पोषण आणि मुख निगेच्या क्षेत्रात वापरली जातात. सातत्याच्या संशोधनामुळे कंपनीकडे आज स्वतःची ८९ पेटंट्स आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये पी अँड जी, कोलगेट, युनिलीव्हर, जीएसके, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, डाबर, इमामी, हिमालय, पतंजली यांसारखे बहुराष्ट्रीय आणि भारतीय ग्राहक आहेत. ग्राहकांशी असलेल्या कैक वर्षांच्या नातेसंबंधांमुळे कंपनीला बाजारातील हिस्सा टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.

आणखी वाचा-तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

भारताव्यतिरिक्त ही कंपनी अमेरिका, युरोपसह इतर १० देशांमध्ये आपल्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्यांद्वारे कार्यरत आहे. उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्तारासाठी दोन वर्षांपूर्वी कंपनीने कोरूगेटेड बॉक्स बनवणाऱ्या क्रिएटिव्ह स्टायलो पॅक प्रायव्हेट लिमिटेडला ताब्यात घेतले.

डिसेंबर २०२३ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ९७५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८६.१० कोटीचा नक्त नफा कमावला आहे, गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत तो ३७ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या जगभरात मॉल आणि सुपर मार्केटव्यतिरिक्त ऑनलाइन किंवा ई-व्यापार भरभराटीला आले आहेत. साहजिकच आकर्षक आणि टिकाऊ पॅकेजिंग काळाची गरज बनली आहे. चीन आणि भारतासारख्या देशात तर वाढत्या ग्राहक उपभोगामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत. कंपनीने गुणवत्ता राखून, कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवतानाच, कार्यक्षम भांडवल आणि मार्जिन सुधारणेवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच वाढती मागणी लक्षात घेता ट्यूब उत्पादन दुप्पट करण्याचे तिचे नियोजन आहे. सध्या १९० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी आकर्षक वाटतो.

आणखी वाचा-बाजारातली माणसं- जिद्दी, हरहुन्नरी

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

Stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.