मुंबई : पिंपामागे पुन्हा ९० डॉलरपुढे भडकलेल्या खनिज तेलाच्या दराच्या परिणामी जागतिक बाजारातील नकारात्मकतेची छाया स्थानिक बाजारावरही शुक्रवारी पडलेली दिसून आली. बरोबरीने रिझर्व्ह बँकेने व्याजदरासंबंधी स्थिती कायम ठेवल्याने शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने किरकोळ वाढ नोंदवली. तरी त्याची दिवसअखेर ७४,२४८ अंशांची बंद पातळी नवीन सार्वकालिक उच्चांकी ठरली.

रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय व्याजदर-निर्धारण समितीने शुक्रवारी सलग सातव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. एप्रिल ते जूनदरम्यान तापमान वाढीचा अंदाज पाहता अन्नधान्याच्या महागाईबाबत मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त केली आहे. त्या परिणामी सेन्सेक्स २०.५९ अंशांनी (०.०३ टक्के) वाढून ७४,२४८.२२ अंशांवर स्थिरावला. निर्देशांक ७४,३६१.११ या सत्रांगर्तत उच्चांकी शिखर ते ७३,९४६.९२ या नीचांकादरम्यान संपूर्ण दिवसभर हिंदोळे घेत असल्याचे आढळून आले. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ०.९५ अंशांच्या किरकोळ घसरणीसह २२,५१३.७० या पातळीवर बंद झाला. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २८ समभाग घसरणीसह बंद झाले.

हेही वाचा >>>पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!

रिझर्व्ह बँकेचा निर्णय जरी अपेक्षेच्या विपरित आला नसला तरी, अन्नधान्याच्या महागाईबद्दलची चिंता आणि उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना नकारात्मक बनल्या. दुसरीकडे कडाडलेल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि आखातातील तणावामुळे जागतिक बाजारातही नरमाई होती.

रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारी केलेल्या अन्य महत्त्वाच्या घोषणांमुळे बँका व वित्तीय समभागांनी मात्र चांगली मागणी मिळविली. सेन्सेक्समध्ये कोटक बँक सर्वाधिक २.०९ टक्के, वाढली, त्यानंतर बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक समभागांतही चांगली खरेदी झाली. एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या आणि अन्य बँकेतर वित्तीय सेवा समभागांनीही दमदार मूल्यवृद्धी नोंदवली.