-अजय वाळिंबे
एनडीआर ऑटो कम्पोनंट्स लिमिटेड
(बीएसई कोड ५४३२१४)
प्रवर्तक: रोहित रेलान समूह
बाजारभाव: रु. ६१५/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: वाहनांचे सुटे भाग, सीट्स
भरणा झालेले भागभांडवल: रु. ११.९८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक – ७३.९५
परदेशी गुंतवणूकदार – ०.०१
बॅंक्स/म्युच्युअल फंड/सरकार – ००
इतर/जनता – २६.०४
पुस्तकी मूल्य: रु. १८३
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २७.२
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १९.५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई) : १६.६
बीटा : ०.९
बाजार भांडवल: ७३९ कोटी रुपये (मायक्रो स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५९९/२१५
एनडीआर ऑटो कम्पोनंट्स लिमिटेड म्हणजे शारदा मोटर्सची पूर्वीची उपकंपनी होय. २०१९ मध्ये, शारदा मोटर्सने संपूर्ण ‘ऑटोमोबाइल सीटिंग बिझनेस’ विलग करून एनडीआर ऑटो कम्पोनंट्स लिमिटेडकडे व्यवसाय हस्तांतरित केला. विलगीकरणानंतर शारदा मोटर्सने भारत सीट्स लिमिटेड (२८.६ टक्के हिस्सा), टोयोटा बोशोकू रेलान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (५० टक्के हिस्सा) आणि टोयो शारदा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (५० टक्के हिस्सा) यामध्ये केलेली गुंतवणूक एनडीआर ऑटो कम्पोनंट्स लिमिटेडकडे हस्तांतरित केली. एनडीआर ऑटो चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी आसन सांगाडा (सीट फ्रेम) आणि ट्रिम्स तसेच चारचाकी वाहनांच्या आसनांशी निगडित इतर उपकरणे उत्पादित करते. एनडीआर ऑटो ही रोहित रेलान समूहाचा एक भाग म्हणून २०१९ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली.
आणखी वाचा-बाजाराचा तंत्र-कल : सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…
कंपनी प्रवासी वाहनांसाठी आसने, दुचाकींसाठी आसन सांगाडा आणि सीट कव्हर, प्रवासी वाहनांसाठी फ्लोअर कार्पेट्स, बॉडी सीलिंग उत्पादने आदी तयार करते. कंपनी मारुती सुझुकीसाठी मूळ उपकरणे निर्माता (ओईएम) असून एकूण ११ विविध श्रेणींसाठी उत्पादने घेते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, सुझुकी मोटरसायकल, टोयोटा, बेलसोनिका, भारत सीट्स लिमिटेडचा समावेश आहे. कंपनी सुझुकी मोटरसायकलसाठी ८ लाख आसनांचा पुरवठा करते. कंपनीचे तीन उत्पादन प्रकल्प असून, हरियाणात शीट मेटल प्रकल्प आणि ट्रिम प्रकल्प तर कर्नाटकमध्ये फॅब्रिक प्रकल्प आहे. त्याची वार्षिक क्षमता ११ लाख आसनांची आहे. सहयोगी कंपनी भारत सीट्सचा चौथा प्रकल्प गुजरातमध्ये मारुती सुझुकीच्या प्रकल्पाजवळ नुकताच सुरू झाला आहे.
आणखी वाचा- TATA समूहाच्या ‘या’ १२ शेअर्सनी कमावला प्रचंड नफा, ६ महिन्यांत दिला १५० टक्क्यांपर्यंतचा परतावा
गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आणि भागधारकांना एकास एक (१:१) प्रमाणात बक्षीस समभाग दिला. यंदाच्या जून २०२३ अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने १२७.६३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत उलाढाल १०१ टक्क्यांनी वाढली असून निव्वळ नफादेखील तब्बल १०३ टक्क्यांनी वधारला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनी आपली उत्पादन क्षमता मजबूत करण्यावर भर देत आहे. तसेच नवीन उत्पादन विकासनावर आणि देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. वाहन क्षेत्रातील उत्पादनांची वाढती मागणी पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. एक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेली ही मायक्रो कॅप कंपनी एक आकर्षक खरेदी ठरू शकते.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.
stocksandwealth@gmail.com