· फंड घराणे – फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड
· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड
· फंड कधी लॉन्च झाला ? – १ डिसेंबर 1993
· एन. ए. व्ही. (३० नोव्हेंबर २०२३ रोजी) ग्रोथ पर्याय – ७७९ रुपये प्रति युनिट
· फंड मालमत्ता – ६६६५ कोटी रुपये.
· फंड मॅनेजर्स – वेंकटेश संजीव, आर जानकीराम, आनंद राधाकृष्णन, संदीप मनम
फंडाची स्थिरता
· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ४५.९%
· स्टॅंडर्ड डिव्हिएशन ४.२४%
· बीटा रेशो ०.९०%
पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.
स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी 12% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.
हेही वाचा… Money Mantra: अर्थव्यवस्थेचा ‘मॅक्रो’ विस्तार, जीएसटीतील उत्पन्न मासिक १.६८ लाख कोटींवर
बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.
शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.
फंडाचा दीर्घकालीन रिटर्न
जानेवारी १९९७ ला दरमहा १०००० रुपयाची एस.आय.पी. या फंडात सुरू केली असती तर ३१ ऑक्टोबर २०२३ अखेरीस तुमचे पैसे वार्षिक १७.६१% या दराने वाढून ५ कोटी ७१ लाख इतके झाले असते.
गुंतवणूक पद्धती
इक्विटी शेअर्समधील आकाराने मोठे असलेल्या म्हणजेच ‘लार्ज कॅप’ कंपन्यांच्या शेअर्समध्येच हा फंड गुंतवणूक करतो. या फंड योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण गुंतवणुकीपैकी कमीत कमी 80 टक्के गुंतवणूक ही ‘लार्ज कॅप’ कंपन्यांमध्येच केली जाते. या फंडाची तुलना निफ्टी १०० या निर्देशांकाशी करणे योग्य आहे.
आढावा पोर्टफोलिओचा
फंडाचे नाव सुचित करते त्याप्रमाणे ‘ब्लूचिप’ अर्थात बिझनेस मॉडेल स्थिर असलेल्या आघाडीच्या शंभर कंपन्यांमधूनच या पोर्टफोलिओची बांधणी केली जाणे अपेक्षित आहे.
ऑक्टोबर अखेरीस फंडाचा पोर्टफोलिओ विचारात घेतला तर पोर्टफोलिओमध्ये एकूण ४१ शेअर्स असून, एकूण गुंतवणुकीपैकी ३०% गुंतवणूक बँकिंग क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये केलेली आहे. त्या खालोखाल माहिती तंत्रज्ञान- सॉफ्टवेअर ९.८२%, वाहन निर्मिती ९.६६%, पेट्रोलियम उत्पादने ६.१८%, विमा ४.६२% ,फार्मा ४.३४% या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आहे. याच बरोबरीने बांधकाम, लॉजिस्टिक्स, लोहपोलाद, एफ.एम.सी.जी. अशा सर्वच क्षेत्रात या फंडाने गुंतवणूक केली आहे. या फंडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॉग्निजंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्प, फ्रेशवर्क इनकॉर्प या दोन अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश पोर्टफोलिओमध्ये केला गेला आहे. बँकिंग क्षेत्र विचारात घेतल्यास एच.डी.एफ.सी. बँक एकूण पोर्टफोलिओच्या ९.५०% असून त्या खालोखाल आय.सी.आय.सी.आय. बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि ॲक्सिस बँक यांचा समावेश आहे. गेल्या दशकभराच्या काळात उदयास आलेल्या क्षेत्रांमध्ये या फंडाची गुंतवणूक दिसून येते. वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील इंटरग्लोब एव्हिएशन, दिल्लीव्हरी लिमिटेड, झोमॅटो, एसबीआय कार्ड अँड पेमेंट या कंपन्यांचाही समावेश फंड मॅनेजरने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला आहे.
प्रत्येक म्युच्युअल फंड योजना एका ठराविक कालावधीमध्ये दाखवलेल्या रिटर्न्स वरूनच जोखायची नसते तर किमान १५ ते २० वर्षाच्या वार्षिक सरासरी परताव्यावरून फंडाच्या स्थिरतेचा अंदाज येतो.
गेल्या पाच वर्षातील फंडाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत फंडाने सर्वोत्तम म्हणजेच २६ टक्के परतावा दिला आहे. तर याच वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२० या कालावधीत फंडाने – २८.४८% असा परतावा दिला आहे.
३० नोव्हेंबर २०२३ अखेरीस फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)
· एक वर्ष – ९.५६ %
· दोन वर्षे – ६.३६ %
· तीन वर्षे – १६.५७ %
· पाच वर्षे – १२.२६ %
· दहा वर्षे – १२.६१ %
· फंड सुरु झाल्यापासून – १९.०९ %
नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.