scorecardresearch

Premium

Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय? काय कराल? काय टाळाल?

Money Mantra: अनेकदा अनेकांचं निवृत्तीचं गणितच चुकतं. ते टाळण्यासाठी हे रिटायरमेंट प्लानिंग कसं कराल? काय कराल? आणि काय टाळाल?

retirement planning
निवृत्तीची तयारी. रिटायरमेंट प्लानिंग (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पैसे मिळवणे, त्यासाठी नोकरी व्यवसाय करणे हा आपल्या आयुष्याचा कधीही न संपणारा भाग आहे. तरीही प्रत्येकाला एक गोष्ट चुकलेली नाही, ती म्हणजे आपल्याला सर्वांनाच कधीतरी वयाच्या एका टप्प्यावर रिटायरमेंट घ्यावी लागते. काही जणांना वयाच्या पन्नाशीतच रिटायरमेंट घ्यावीशी वाटते तर काहीजणांना ५५ ते ६० हे रिटायर होण्याचं वय वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

आणखी वाचा: मनी मंत्र: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच …

Ashwini Mahangade
“करोनामध्ये मृतदेहाला खांदा देण्याचे काम नानांवर पडले अन्…” अश्विनी महांगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “मयतीसाठी लागणारे लाकूड…”
Priyanka Diwate Interview:
नेटकऱ्यांचं ट्रोलिंग, घरचं टेन्शन; तरीही पूर्ण केलं स्वप्न, मेंटली आणि फिजिकली फिट रहायला जमतं तरी कसं? प्रियांका दिवटे म्हणाली…
Onkar Bhojane Ankita Walawalkar
“ओंकार भोजने आणि तुझं नातं काय?” कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे…”
Priyanka nick
Video: “मला निक जोनसशी लग्न करायचं होतं…”, चाहतीच्या बोलण्यावर प्रियांका चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ चर्चेत

रिटायरमेंट हा तुमचा चॉईस आहे, पण सर्वसाधारणपणे पन्नाशीनंतर रिटायरमेंट वय जवळ यायला लागलं की मग पैसे दिसू लागतात. गरजा बदललेल्या असतात, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती वेगळी असते. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतात त्यासाठी पैसे बाजूला ठेवावेसे वाटतात. आपल्या मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी काहीतरी गुंतवणूक करावी असं आपल्याला वाटतं. एका बाजूने ही स्वप्न तर दुसऱ्या बाजूने खर्चाचं ‘रियल लाइफ’ अशा कात्रीत आपण सापडतो. ज्या प्रमाणात खर्च वाढतायत त्या प्रमाणात आता उत्पन्न वाढणार नाही याची जाणीव झालेली असते आणि तेव्हा रिटायरमेंट प्लानिंग करायला हवं असं जाणवायला लागतं.

आणखी वाचा: Money Mantra: हेल्थकेअर सेक्टरमधल्या गुंतवणूक संधी

नक्की काय असतं रिटायरमेंट प्लानिंग?

दहा वर्षाचा खर्चाचा अंदाज घ्या. ज्या वेळेला तुम्ही रिटायरमेंट प्लानिंग करता त्यावेळी पुढच्या दहा वर्षात तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला खर्चासाठी किती पैसे लागणार आहेत आणि कोणकोणत्या वर्षांमध्ये लागणार आहेत याचा अंदाज घेणे अत्यावश्यक आहे.

आपण एका उदाहरणातून हे समजून घेऊया.

तुमचे वय ४५ ते ५० या दरम्यान असेल आणि तुम्हाला गावाला घर बांधण्यासाठी १५ लाख रुपयांची गरज आहे आणि सात ते दहा वर्षानंतर तुम्ही घर बांधायचे नियोजन करणार आहात. तर त्या १५ लाख रुपयांची तरतूद रिटायरमेंट प्लानिंग मध्ये केली पाहिजे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत कुठेतरी फॉरेन ट्रिप करायची असेल तर त्यासाठी किती पैसे लागतील ? याचा अंदाज तुम्हाला असला पाहिजे.

आणखी वाचा: Money Mantra: सणासुदीला खर्चाचे प्लॅनिंग कसे कराल?

वाचायला हे ‘ऑड’/ विचित्र वाटत असलं तरीही ज्याप्रमाणे एखादा बिझनेस मोठा करताना विविध टप्प्यांवर व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात त्याप्रमाणेच रिटायरमेंट प्लानिंगमध्येसुद्धा आपलं वय आणि आपले निर्णय यांचा घनिष्ठ संबंध असतो. रिटायरमेंट प्लानिंगला सुरुवात करताना तुमच्याकडे किती संपत्ती आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच फारशी बचत केली नसेल, गुंतवणूक केली नसेल तर रिटायरमेंट प्लानला सुरुवात करताना तुम्हाला अडीअडचणी येतील. आणि पटकन वापरता येतील असे पैसे सुरक्षित म्हणून कुठल्यातरी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये ठेवावे लागतात.

दोन मित्रांचे उदाहरण

समजा पन्नाशीच्या आसपास असलेल्या रमेशने आयुष्यभर फार बचत केलेली नसेल आणि रिटायरमेंट प्लान करताना आपले सगळेच पैसे किंवा ७० ते ८० टक्के पैसे इक्विटी शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवले तर हा निर्णय योग्य आहे का? नाही, कारण जर पाच ते सहा वर्षानंतर काही इमर्जन्सी कारणासाठी पैसे लागले आणि नेमका त्याच वेळेला शेअर बाजार पडलेला असेल किंवा त्यावर्षी बाजाराने चांगले रिटर्न्स दिलेले नसतील तर आपण केलेली गुंतवणूक आयत्या वेळेला कामाला येत नाही म्हणून अशा व्यक्तीने रिटायरमेंट प्लानिंगच्या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात बँकांचे फिक्स डिपॉझिट, पोस्टाची गुंतवणूक योजना अशा ठिकाणी पैसे गुंतवलेले असले पाहिजेत, म्हणजे पाच दहा लाख रुपये तुमच्या गाठीशी असायला हवेत. तरच तुम्ही रिस्क घेऊ शकता.

आता उदाहरण घेऊया सुरेशचं, त्याने नोकरीला लागल्यापासूनच थोडे थोडे पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजूला ठेवले होते आणि वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्याच्याकडे १५ लाख रुपये जमले होते. आता पुढच्या दहा वर्षासाठी गुंतवणूक करताना त्याला रिस्क घेणे सोयीचे पडेल. कारण त्याने आपल्या आकस्मिक गरजांसाठीची सोय आधीच करून ठेवली आहे.

मग पैसे कुठे गुंतवाल?

रिटायरमेंट प्लानिंगचे पैसे कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवता येतील आणि त्याची रिस्क नेमकी कशी असते हे समजून घेऊया .
गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये इक्विटी (Equity) आणि डेट (Debt) असे दोन पर्याय असतात यातील ‘इक्विटी’ म्हणजे इक्विटी शेअर्स व त्याच्याशी संबंधित सर्व पर्याय आणि ‘डेट’ म्हणजे ज्यामध्ये व्याजाचा दर ठरलेला असतो असा पर्याय. तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेचा आणि तुमच्या रिटायरमेंट प्लानचा जवळचा संबंध आहे. जर तुम्ही अधिक रिस्क घेऊ शकत असाल तर जास्त पैसे इक्विटी पर्यायांमध्ये गुंतवू शकता आणि अगदी थोडे पैसे डेट पर्यायांमध्ये गुंतवू शकता. जर तुम्हाला कमी जोखीम (Risk) पत्करायची असेल तर इक्विटी कमी आणि डेट अधिक असा पर्याय वापरा.

रिटायरमेंट प्लानिंग प्रत्यक्ष रिटायर होण्याच्या जेवढी जास्त वर्षे अगोदर सुरू कराल तेवढी रिस्क घेण्याची क्षमता वाढेल आणि तुम्हाला इक्विटी शेअर्स म्युच्युअल फंड अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येईल.

गुंतवणुकीसाठी हे सगळे पर्याय उपलब्ध रिटायरमेंट प्लानिंग मध्ये नक्की कोणत्या पर्यायात गुंतवणूक करायची हे ठरवताना वय आणि जोखीम यांचा विचार करावा लागेल. जेवढं वय कमी असेल तेवढाच आपल्याकडे गुंतवणुकीसाठी लॉन्ग टर्मचा कालावधी उपलब्ध असणार आहे.

दीर्घ मुदतीची गुंतवणूक

इक्विटी शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये शेअर बाजारातील घडामोडीनुसार तुमच्या पोर्टफोलिओचे गणित बदलू शकते. तुम्ही एखाद्या कंपनीचे थेट शेअर्स विकत घेतले आहेत किंवा इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत पैसे गुंतवले आहेत तर शेअर मार्केट पडल्यावर किंवा काही महिन्यांसाठी शेअर मार्केट फ्लॅट राहिले तर तुमचे रिटर्न कमी होऊ शकतात. पण हाच धोका दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी नसतो. शेअर बाजारामध्ये थोड्या काळासाठी मंदी आली तरी आपले उद्दिष्ट ‘लॉन्ग टर्म’ असेल तर शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडाचा विचार नक्कीच करावा लागतो. वयाच्या ३५ ते ४० या टप्प्यावर शेअर्स आणि इक्विटी फंडात गुंतवणूक करून पंधरा ते वीस वर्षाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यास बाजारातील अचानकपणे येणाऱ्या चढउतारांचा आपोआपच सामना केला जातो आणि संपत्ती तयार होते.

पन्नाशीनंतर….

जसजसे तुमचे वय वाढू लागेल म्हणजेच पन्नाशीकडे येऊ लागेल तसतसे इक्विटी आणि इक्विटी फंड योजनांतील पैसे कमी करून (म्हणजे आहे ते शेअर्स विकायचे नाहीत, नवीन गुंतवणूक कमी करायची) हळूहळू डिबेंचर, बॉण्ड, सरकारी बँकांमधील फिक्स डिपॉझिट, पोस्टातील गुंतवणुकीच्या योजना यामध्ये थोडे पैसे वाढवायला सुरुवात करा. रिटायरमेंट प्लानिंगमध्ये हमखास मिळणाऱ्या रिटर्न्सना खूपच महत्त्व आहे. आपल्याकडे खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग असायला पाहिजे, म्हणून जसजसे तुम्ही वयाच्या साठीच्या जवळपास याल तसतसे तुमच्या पोर्टफोलिओ २५ ते ३० टक्के गुंतवणुकीचे पर्याय हे फिक्स्ड इन्कम असलेले हवेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे त्यांच्या हाताशी थोडेफार पैसे तरी दर महिन्याला येतात, पण बदललेल्या सरकारी नियमानुसार कदाचित भविष्यात पेन्शन योजना नसली तर आपल्यालाच आपले रिटायरमेंटचे नियोजन करावे लागेल. जे खाजगी क्षेत्रात काम करतात, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग आहे त्यांच्यासाठी स्वतःचे पेन्शन स्वतःलाच तयार करायचे आहे. वयाच्या योग्य टप्प्यावर गुंतवणूक सुरू करणे आणि हाताशी वेळ असताना इक्विटी या पर्यायाचा विचार हे रिटायरमेंट प्लान बनवताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रिटायरमेंट प्लानिंग मध्ये गुंतवणूक कोणत्या पर्यायांमध्ये करायची ते आता लक्षात आलं आहे. प्रत्यक्ष रिटायरमेंट प्लानिंग कोणत्या वयात करायचं हे पुढील लेखात समजून घेऊया.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money mantra what do we mean by retirement planning investment future mmdc vp

First published on: 21-09-2023 at 22:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×