MS Dhoni reaches the RCB dressing room for tea : आयपीएल २०२४ च्या हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्साठीचे चार पैकी तीन संघ निश्चित झाले असून शेवटचा संघ सीएसके आणि आरसीबी सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. या दोन्ही संघांतील सामना १८ मे रोजी खेळला जाणार आहे. हा चेन्नई-बंगळुरू सामना एमएस धोनी विरुद्ध विराट कोहली म्हणूनही पाहिला जात आहे. या शानदार सामन्यापूर्वी एमएस धोनीने आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी सामना होणार आहे. प्लेऑफचा चौथा संघ कोण असेल हे केवळ या सामन्यावरच ठरेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या संघातील लढतीकडे लागल्या आहेत. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुरुवारी नेटमध्ये सराव केला. या सराव दरम्यानच एमएस धोनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. आरसीबी संघाने धोनीचे चहापानाने स्वागत केले. धोनी कपमध्ये चहा घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ आरसीबीने शेअर केला आहे.
एमएस धोनीच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. आरसीबीचे चाहते देखील लिहित आहेत की ते त्यांच्या आवडत्या संघाचे चाहते असले तरी त्यांचे एमएस धोनीवर तितकेच प्रेम आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामना ठरवेल की प्लेऑफमधील चौथा संघ कोणता असेल. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना हा सामना किमान १८ धावांनी जिंकावा लागेल किंवा १८.१ षटकात लक्ष्य गाठावे लागेल. त्याचबरोबर चेन्नई संघ हा सामना फक्त जिंकूनच चेन्नई प्लेऑफ्समध्ये पोहोचेल. हे आकडे अशा परिस्थितीचे आहेत जेव्हा प्रथम फलंदाजी करणारा संघ २०० धावा करतो.
हेही वाचा – SRH vs GT : सामना आटोपल्यानंतर काव्या मारनने घेतली केन विल्यमसनची गळाभेट, VIDEO होतोय व्हायरल
एका जागेसाठी तीन संघांत शर्यत –
आता चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स हे तीन संघ प्लेऑफसाठी उरलेले एक स्थान पटकावण्यासाठी शर्यतीत आहेत. हैदराबादचे आता १३ सामन्यांतून १५ गुण आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणताही संघ १५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकत नाही. या स्थितीत सनरायझर्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. १३ सामन्यांनंतर चेन्नईचे १४ गुण आहेत. १८ मे रोजी संघाचा सामना बंगळुरूशी होणार आहे. बंगळुरू आणि लखनऊचे प्रत्येकी १२ गुण आहेत. तथापि, लखनऊचा नेट रन रेट खूपच नकारात्मक आहे आणि त्याची भरपाई करणे त्यांच्यासाठी कठीण होईल. अशा स्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना नॉकआऊट मानला जात आहे.