पाश्चात्त्य देशांमधील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये ग्रंथालयांची एक समृद्ध पंरपरा आहे. या ग्रंथालयांच्या महत्तेमुळेच आपल्याकडच्या अनेक विद्यार्थ्यांना पाश्चात्त्य विद्यापीठांचे, तेथील शिक्षणपद्धतीचे आकर्षण असते. परंतु, आपल्याकडेही अनेक विद्यापीठांमधील ग्रंथालये समृद्ध असून त्यांनी देशातील ज्ञान व माहितीच्या देवाण-घेवाणीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. मुंबईमध्ये तर अनेक महाविद्यालयांची ग्रंथालये प्रसिद्ध आहेत. यातील अनेक महाविद्यालये त्यांच्या भव्य इमारती, कॅम्पस, विविध प्रकारचे अभ्यासक्रम यांसाठी जशी ओळखली जातात, तशीच त्यांच्या ग्रंथालयांमुळेही ओळखली जातात. त्याचा हा आढावा

महाविद्यालयातील ग्रंथालये हा अनेकांच्या आस्थेचा विषय असतो. अनेक जण तर त्या त्या महाविद्यालयाचे ग्रंथालय किती समृद्ध आहे, यावरून तिथे प्रवेश घ्यायचा की नाही ते ठरवत असतात. विविध प्रकारच्या पुस्तकांनी समृद्ध असणारे ग्रंथालय हे प्रत्येक महाविद्यालयाचा अविभाज्य भागच असते. महाविद्यालयात संपूर्ण वर्षभर रेलचेल असणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण ग्रंथालय असते. कारण परीक्षा, अभ्यास असो-नसो विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वाचा तिथे नेहमीच वावर असतो. महाविद्यालयांतील अभ्यासू विद्यार्थ्यांबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थीही ग्रंथालयांमध्ये अभ्यासासाठी येत असतात. ग्रंथालयांमधील पुस्तकांनी भरलेली कपाटे, ग्रंथांची आकर्षक रचना, त्यांच्याविषयीचे माहितीकार्ड, विविध विषयांवरची नियतकालिके , वाचकांसाठी बैठकीची व्यवस्था हे सर्व वाचनप्रेमी विद्यार्थ्यांना हवेहवेसे वातावरण असते.
मुंबईतील अनेक महाविद्यालयांमधील ग्रंथालये ज्ञान व माहितीच्या साठय़ाने समृद्ध आहेत. काही महाविद्यालयांमधील ग्रंथालयात अभ्यासक्रमांच्या संदर्भ पुस्तकांबरोबरच साहित्य, तत्त्वज्ञान, कला, इतिहास आदी विषयांवरची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. काही ठिकाणी १०० ते १५० वर्षे जुन्या दुर्मीळ ग्रंथांचा, हस्तलिखितांचाही संग्रह पाहायला मिळतो. विद्यार्थीही अभ्यासासाठी ग्रंथालयांचा उपयोग करीत असतात. विविध विषयांतील ज्ञानगंगेचा प्रवाह येथील पुस्तकांमधूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. यातील अनेक महाविद्यालयांमध्ये जाणीवपूर्वक जगभरातील उत्तमोत्तम पुस्तके , नियतकालिके ग्रंथालयांसाठी खरेदी केली जातात. नाही म्हणायला सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानाचाही प्रभाव या ग्रंथालयांवर पडू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रंथालयांकडे असलेल्या दुर्मीळ पुस्तकांसह इतर महत्त्वाच्या ग्रंथांचेही डिजिटायझेशन केले जाऊ लागले आहे. तसेच पुस्तकांच्या नोंदी, आवक-जावक आदी अनेक गोष्टींचे संगणकीकरण केले जात आहे. विविध विषयांवरची ई-पुस्तके, ऑनलाइन नियतकालिके, माहितीपट, लघुपटांच्या सिडी आदी डिजिटल अभ्यास साहित्यही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय या ग्रंथालयांकडून वर्षभर वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी आठवडय़ातील किंवा महिन्यातील वाचल्या गेलेल्या पुस्तकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यापासून ते प्रदर्शने भरवण्यापर्यंत विविध उपक्रम राबवले जात असतात. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून अभ्यासक्रम संपेपर्यंत विद्यार्थी सतत ग्रंथालयांशी जोडलेले असतात.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

कीर्ती महाविद्यालय, दादर
मुंबईतील अनेक जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या दादर येथील कीर्ती महाविद्यालयाचे ग्रंथालयही तेथील पुस्तकांच्या समृद्धतेमुळे प्रसिद्ध आहे. या ग्रंथालयाला सुमारे साठ वर्षांची परंपरा आहे. सध्या ग्रंथालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत आदी भाषांमधील तब्बल १ लाख ८ हजार पुस्तके आहेत. विविध विषयांवरची ३२ नियतकालिकेही ग्रंथालयात येत असतात. याशिवाय ग्रंथालयात अनेक जुन्या पोथ्या, मोडी लिपीतील हस्तलिखितांचाही संग्रह आहे. ब्रेल लिपीतील शब्दकोशही ग्रंथालयाकडे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे नाटय़विषयक लेखन करणारे कृ. रा. सावंत यांनी त्यांच्याकडील सुमारे ४५० पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली आहेत. यात नाटय़विषयक अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत. या पुस्तकांचा उपयोग नाटय़विषयक संशोधन करणाऱ्या, नाटकांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असतो. येथे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एक समूह आहे. या विद्यार्थ्यांकडून तसेच प्राध्यापकांकडून नवीन पुस्तके ग्रंथालयाला सुचवली जात असतात. त्यामुळे दरवर्षी ग्रंथालयात विविध विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तके नव्याने दाखल होत असतात. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची व ग्रंथांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथालयाकडून तीनदिवसीय पुस्तक प्रदर्शन भरवले जाते. याशिवाय वर्षभरात लेखक, विचारवंतांच्या जन्मदिवशी व पुण्यतिथीला त्यांनी लिहिलेल्या व त्यांच्याविषयीच्या पुस्तकांचे खुले प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात येत असते. तसेच महाविद्यालयात एखाद्या विषयावर परिषद किंवा परिसंवाद असल्यास त्याच्याशी संबंधित पुस्तकांचेही प्रदर्शन भरवण्यात येत असते. त्यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांना ग्रंथालयात असणाऱ्या विविध विषयांच्या पुस्तकांची ओळख होत असते. याशिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालयाकडून ‘निरंतर अभ्यास उपक्रम’ हा उपक्रमही राबवला जातो.

आदर्श महाविद्यालय, बदलापूर
बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयाचे ग्रंथालय व तिथे वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न हे महाविद्यालयाच्या नावाप्रमाणेच आदर्श म्हणावेत असे आहेत. १९९५ साली महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून येथे ग्रंथालयाचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रंथालयात सध्या २० हजार ८३६ पुस्तके असून यासह ८५ नियतकालिके, सुमारे २५०च्या वर अभ्यासक्रमाच्या सीडी आणि २७ नकाशेही आहेत. सध्या ई-पुस्तके, ई-नियतकालिकेही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय अनेक दुर्मीळ पुस्तकेही येथे अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. श्रीधर केतकर यांचे ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’, वि.भा. देशपांडे यांचे ‘मराठी नाटय़कोश’, सिद्धेश्वर शास्त्री यांचे ‘प्राचीन भारतीय स्थलकोश’ आदी अनेक पुस्तकांनी ग्रंथालय समृद्ध आहे. विशेष म्हणजे एका शब्दाचा अर्थ सोळा भाषांमध्ये सांगणारे प्रा. नरवणे यांचे १९५८ साली प्रकाशित झालेले ‘भारतीय व्यवहार कोश’ हे पुस्तकही ग्रंथालयाच्या संग्रही आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेगवेगळ्या परिषदांमध्ये सादर केलेले शोधनिबंधही येथे अभ्यसासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही आहे. येथे विद्यार्थी वाचनासाठी येऊ शकतात. विशेष म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह बाहेरील विद्यार्थी व संशोधकांनाही ग्रंथालयातील पुस्तके मिळू शकतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयाकडून पुस्तक परिक्षणे, पुस्तक प्रदर्शन, वृत्तपत्रातील लेखांवर चर्चा असे निरनिराळे उपक्रमही राबवले जात असतात. सुट्टीमध्येही विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा उपयोग करता यावा यासाठी सुट्टीच्या काळात ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले जाते. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी अनेक पुस्तके येथे असल्याने या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सुट्टीमध्ये ग्रंथालायाचा उपयोग करीत असतात.

मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड
मुलुंड येथील मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाची स्थापना १९७० मध्ये झाली आहे. आतापर्यंत येथे सुमारे ५६ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. याशिवाय विविध विषयांवरची ४६ नियतकालिकेही ग्रंथालयात येत असतात. महाविद्यालयात वाणिज्य विषयक अभ्यासक्रमच प्रामुख्याने शिकविले जात असल्याने ग्रंथालयात अर्थशास्त्र, वित्त, व्यवस्थापन आदी वाणिज्य विषयक पुस्तकांची संख्या जास्त आहे. तरी साहित्य विषयकही अनेक पुस्तके येथे आहेत. सुमारे ३०० विद्यार्थी बसू शकतील असा वाचन कक्ष येथे आहे. विद्यार्थीही येथे मोठय़ा संख्येने अभ्यासासाठी येत असतात. विविध अभ्यासक्रमांच्या पाठय़पुस्तकांबरोबरच प्रत्येक विषयाचे अनेक संदर्भ ग्रंथ, विषयकोश, शब्दकोश, विश्वकोश ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बदलत्या काळाबरोबर ग्रंथालयानेही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या ज्ञानसाठय़ात भरच टाकली आहे. डिजिटल स्वरूपात अनेक पुस्तके ग्रंथालयाच्या संग्रही आहेत. याशिवाय ‘पिरिऑडिकल कंटेंट सव्‍‌र्हिस’ ही अनोखी सेवाही ग्रंथालयाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यात विविध नियतकालिकांमधील उपयुक्त लेखांना संगणकीकृत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवले जाते. या लेखांची, त्यांच्यातील महत्त्वाच्या शब्दांची, संज्ञांची डिजिटल नोंदणी केल्याने वाचकाला कधीही हवी ती माहिती येथून मिळू शकते.
याशिवाय महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ग्रंथालय विभागाची माहिती देण्यात आली असून यात विविध विषयांची नियतकालिके, विषय पत्रिका, वर्तमानपत्रे आदी अभ्यास साहित्याच्या वेबलिंक्स उपलब्ध करून देण्यात आल्याोहेत. ग्रंथालयाकडून संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा तसेच प्रवेश परीक्षांबाबत येथे मार्गदर्शन करण्यासाठी काही उपक्रमही राबवण्यात येत असतात.