ऑगस्ट महिन्यात दिल्लीस्थित एमिटी विधि महाविद्यालयातील सुशांत रोहिला या विद्यार्थ्यांने परीक्षेत अपयश आल्याच्या कारणाने आत्महत्या केली. ‘मी मानसिकदृष्टय़ा दुर्बल झालो आहे आणि परीक्षेत अपयश आले तर मी आत्महत्या करीन,’ अशा आशयाचे पत्र आपल्या प्राध्यापकांना पाठविले होते. मात्र प्राध्यापकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या तणावात त्याने आत्महत्या केली. भारतात परीक्षांच्या निकालानंतर ताणामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. परीक्षेत नापास झालो तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होईल, मी स्पर्धेत मागे राहील अशा अनेक विचारांमुळे परीक्षेच्या दिवसांत मुलांना धड दोन वेळेचे जेवणही जात नाही. परीक्षेबाबत मनात इतकी भीती असते मात्र ती व्यक्त व्हायला महाविद्यालयात कोणी ऐकून घेणारे नसते आणि कुटुंबीयांना सांगणे शक्य होत नाही. अशा वेळी मनाची अस्वस्थता व्यक्त करायला संधीच नसते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील किंवा विचारातील नेमकी अडचण शिक्षकांपर्यंत पोहोचत नाही. काही महाविद्यालयातील शिक्षक आवर्जून विद्यार्थ्यांशी चर्चा करतात, त्यांचे प्रश्न समजावून घेतात. दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा महाविद्यालयात समुपदेशक केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण मानसिक आरोग्य चांगले असेल तर मुले अभ्यास आणि करिअरच्या स्पर्धेत तग धरून राहू शकतात.

camp04महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक केंद्र सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि विद्यापीठाने हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविण्याची गरज आहे. आमच्या महाविद्यालयात आठवडय़ातील दोन दिवस समुपदेशक केंद्र सुरू असते आणि त्या दोन दिवशी समुपदेशकाला उसंत मिळत नाही. म्हणजेच मुलांचा ओघ कायम असतो. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मुलांनाही ताण असतो. दरवेळी महाविद्यालयातील जीवन अतिशय सरळ सोपे असेलच असे नाही. मुलांना अभ्यासाबरोबरच अनेक ताण असतो. आमच्या महाविद्यालयातील समुपदेशन केंद्रातील अनुभवानुसार ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कौटुंबिक तणाव असतो. घरातील आई-बाबांमधील वाद मुलांच्या मनावर आणि अनुषंगाने अभ्यासावर परिणाम होत असतो. किशोरवयीन वयात नवं आभाळ खुणावत असते आणि त्याच वेळी चुकीच्या सवयी लागण्याची शक्यताही असते. अशा वेळी अधिक वेळ महाविद्यालयात घालविणाऱ्या मुलांना योग्य-अयोग्य सांगणाऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मात्र त्याचबरोबर मुलांनीही जागृत राहण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे समुपदेशन केंद्र असले तरी अनेक विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती नाही. वर्गातही मुलांना याबद्दल सांगितले जाते. शिक्षकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. पूर्वी शिक्षकांना मुलांची परिस्थिती माहिती होती मात्र आता शिक्षकांवर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आणि पेपर तपासण्याचे इतके दडपण असते की सुट्टय़ा सांभाळून अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षकांची धांदल उडते. विद्यार्थ्यांबद्दल विचार करताना शिक्षक, सुसंवाद, अभ्यासाचे दडपण या सर्व पातळीवर विचार होण्याची आवश्यकता आहे. 

– प्रा. नीता ताटके,  डी. जी. रुपारेल महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग

camp06दिल्लीतील सुशांत रोहिला याची आत्महत्या आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. त्या विद्यार्थ्यांच्या वर्गातील हजेरी कमी असल्यामुळे त्याला परीक्षेला बसू दिले नाही. तर प्राचार्याना पत्र लिहिल्यानंतरही त्याची हाक कोणी ऐकली नाही आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. प्राचार्यानी सुशांतचे पत्र आल्यावर त्याच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला नाही. विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्याची या वेळी गरज होती, मात्र यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टय़ा अडचणी असतील तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. मुलांना अभ्यासाबाबत काही अडचणी असू शकतात. अनेकांच्या घरातील वातावरण चांगले नसल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होत असतो. अशा वेळी शिक्षकांनी हे जाणून घेण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी या घटनांचा निवाडा न्यायालयात करून चालणार नाही. शिक्षकांनी वैयक्तिक पातळीवर काही बदल करण्याची आवश्यकता आहे.  

– शामिम मोदी, टाटा सामाजिक संशोधन केंद्र

camp05आमच्या विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे वर्ग घेतले जातात. त्याबरोबरच अनेक मानसशास्त्रीय चाचण्याही घेतल्या जातात. मुलांच्या मदतीसाठी आसरा, आय कॉल अशा अनेक हेल्पलाइनची मदत घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले जातात. मात्र विभागात कायम मदत करणारे समुपदेशन केंद्र नसून मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी या हेल्पलाइनची मदत घेतली जाते. समाज बदलत आहे, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, मात्र आता मुलांना समजून घेण्यासाठी घरात आजी-आजोबा नसतात. त्यात पालक दिवसभर नोकरीवर असल्यामुळे मुलांशी संवाद करायला कोणी नसते. यातूनच मुलांमधील एकलकोंडी स्वभाव वाढीस लागतो. मुलांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जवळ कोणी उपलब्ध नाही. त्यामुळे सध्याच्या मुलांमधील मानसशास्त्रीय बदलाचा विचार करून त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात समुपदेशन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याबरोबरीने शिक्षक आणि मुलांमध्ये सुसंवाद होणे आवश्यक आहे. शिक्षकांबद्दल मुलांच्या मनात भीतीपेक्षा आदर असणे आवश्यक आहे.

– डॉ. उमेश भरते, मानसशास्त्र विभाग (मुंबई विद्यापीठ)