09 March 2021

News Flash

शब्दबोध : केळवण

घरात एखादे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

घरात एखादे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात. मंगलकार्यापूर्वी घरच्या सदस्यांना आप्तस्वकीयांकडून जेवायला, मेजवानीला बोलावले जाते. हेच ते केळवण. यासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. याचा उच्चार गडंगनेर किंवा गडंगणेर असाही होतो. हा बरोबर की चूक हे ठरवण्यापेक्षा त्याच्या अर्थाकडे जरा जाऊ या. गडू आणि नीर यापासून हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. गडगनेर म्हणजे नुसतेच तांब्याभर पाणी नव्हे तर पाहुण्यांसाठी मेजवानी, अशा अर्थाने तो वापरला जातो.

जेवणासाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. केळीचा उगम हा भारतात विशेषत: पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात मानला जातो. मुसा अ‍ॅक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना या प्रजाती, आज आढळणाऱ्या सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी सर्व जातींच्या केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. त्यापैकी मुसा अ‍ॅक्युमिनाटा या मूळ जातीचा उगम दक्षिण-पूर्व आशियात (भारतातील प.घाट आणि ईशान्य भारत) समजला जातो. सुमारे ८-१० हजार वर्षांपूर्वी मानवाने या दोन जातींपासून विविध संकरित जाती निर्माण केल्या. आज जगातील केळीच्या एकूण उत्पादनातील १८ टक्के उत्पादन भारतात होते. केळ्याला संस्कृतमध्ये रंभा आणि कंदल: असे शब्द आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा की, आर्याच्या आगमनापूर्वी कित्येक शतके केळ ही वनस्पती आपल्याला माहिती होती. तिच्या पाना, फुलांचा, फळांचा, तंतूंचा वापर आप करत होतो. तर या केळीपुराणावरून पुन्हा केळवणाकडे वळू. केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे, असाही एक अर्थ आहे. केळीची लागवड केल्यास त्या पिकाची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, हा कदाचित केळवणामागील मूळ उद्देश असावा.

केळवण झालेल्या मुलीला केळवली असे म्हणतात. अशा मुलीला सासरचे वेध लागलेले असतात. इतके दिवस माहेरात गुंतलेले तिचे मन आता सासरी धाव घेऊ लागते. ती माहेराविषयी उदासीन राहू लागते. केळवली नवरीची ही भावावस्था स्वत: ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना ते म्हणतात, केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते, तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो. न मरताच तो आपल्या अंत:करणाला मृत्यूची सूचना देतो. ती ओवी अशी –

ना तरी केळवली नोवरी।

कां संन्यासी जियापरी।

तैसा न मरतां जो करी।

मृत्युसूचना।

ज्ञानदेवांच्या अलौकिक उपमांवर आपण सामान्य काय भाष्य करणार? परंतु त्यांच्या काळात किंबहुना त्याही आधी काही शतके केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ होती एवढे मात्र त्यातून दिसून येतं. मुख्य म्हणजे केळवण हा काही संस्कृतातून पुढे आलेले किंवा संकरित झालेला शब्द नाही. तो अस्सल मराठी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 12:25 am

Web Title: article about word sense 8
Next Stories
1 निर्णयक्षमता आणि पर्याय विश्लेषण
2 भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय सेवा
3 विद्यापीठ विश्व : विद्येचे माहेरघर केम्ब्रिज विद्यापीठ
Just Now!
X