अत्यंत वेगाने विकास पावणाऱ्या जैव-तंत्रज्ञान शास्त्राचा उपयोग वैद्यकशास्त्र, अन्नपदार्थनिर्मिती, औषध उत्पादन, कृषी आणि पर्यावरण संरक्षण आदी विविध क्षेत्रांत होतो. जैव-तंत्रज्ञान विषयाचे विविध अभ्यासक्रम आणि संधींविषयी..

जैव-तंत्रज्ञान हे शास्त्राच्या अनेक विद्याशाखांचे एकत्रीकरण आहे. या सर्व शास्त्रांचा जिवंत पेशींशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करून आणि उपलब्ध असलेल्या साधनांच्या उपयोगाने त्याचे उपयुक्तता मूल्य वाढवणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. या विषयाच्या आवाक्यात केवळ जीवशास्त्र येते, असे नाही तर पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकी हे सर्व विषय या विषयात सामावलेले आहेत.
नवीन प्रकारच्या बीजांची निर्मिती, प्राण्यांच्या प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करून उमद्या प्राण्यांची निर्मिती, विविध प्रकारची जंतुनाशके तयार करणे, अनुवांशिकतेमुळे होणाऱ्या व्याधींवर उपचार शोधून काढणे, औषधांची निर्मिती व उत्पादनामध्ये वाढ करता येण्यासाठी अथवा उत्पादन  प्रक्रिया शीघ्र करण्यासाठी एन्झाइम्सची निर्मिती करून एकूण उत्पादनामध्ये सर्वत्र वाढ करणे या सर्व कामांमध्ये जैव-तंत्रज्ञानाचा वापर होतो. विशेषत: औषधांचे उत्पादन व कृषी क्षेत्रात जैव- तंत्रज्ञानाचा विशेष वापर होतो.
व्यवसाय संधी
पुढील क्षेत्रांमध्ये संशोधन, उत्पादन व पणन विभागातील व्यवसाय संधी उपलब्ध होतात-
औषधे व आरोग्यनिगा : औषधे, रोगनिदान करण्याची साधने, रसायने आणि रोगप्रतिबंधक लस विषयक संशोधनाचा या क्षेत्रात अंतर्भाव होतो. परिणामकारक औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन, उत्पादनाच्या कमी खर्चाच्या व अल्प कालावधीच्या पद्धती विकसित करणे, प्रतिबंधक लसीचे संशोधन व उत्पादन आणि रोगाचे कमी वेळात अचूक निदान करता येईल अशा साधनांची निर्मिती व विकास याविषयीच्या कामात जैव-तंत्रज्ञानाचा वापर होतो.
कृषी व पशुसंगोपन : कृषी उत्पादनात सुधारित जाती-प्रजाती निर्मिती आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न जैव-तंत्रज्ञान तज्ज्ञ करतात. ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर) व सूक्ष्म पद्धतीने वंशवृद्धी (मायक्रो प्रॉपगेशन) याद्वारे आनुवंशिकतेमुळे प्रजननांमध्ये किंवा पिकांमध्ये येणारे दोष नाहीसे करता येतात. प्रजनन पद्धतीमधील सुधारणाद्वारे उत्तम प्रतीची जनावरे तयार करता येतात तर टिश्यू कल्चरचा उपयोग करून पिकांवर पडणाऱ्या किडीला प्रतिकार करू शकतील अशा रोपांची निर्मिती करता येते, जमिनीचा कस कमी झाला तर संभाव्य अनिष्ट परिणामांना टाळू शकतील अशी रोपे निर्माण करता येतात. जैव-तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देतात आणि नैसर्गिक जैविक जंतुनाशकांची निर्मिती व विकास यांवर भर देतात. जैव- तंत्रज्ञानाचा उपयोग आता पुष्पोत्पादन, पशुप्रजनन, पशुआहार, मानवी अन्नपदार्थाच्या निर्मितीसाठी केला जात आहे.
पर्यावरण व उद्योगधंदे : पर्यावरणाशी निगडित जैव-तंत्रज्ञान हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. औद्योगिकीकरणामुळे हवेतील आणि पाण्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणि निर्मूलन यावर जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ संशोधन करतात. ऊर्जानिर्मितीच्या नवीन पद्धती शोधून काढणे, ऊर्जा बचत, रासायनिक प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती व विकास, सौंदर्यप्रसाधने, जनुकीय अभियांत्रिकी अशा अनेक प्रश्नांवर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
कामाचे स्वरूप
जैव-तंत्रज्ञान तज्ज्ञाचे काम हे प्रामुख्याने शास्त्रीय व संशोधन स्वरूपाचे असते. मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे, याकरता संबंधित गोष्टींत सुधारणा करणे हा या क्षेत्रातील कामाचा उद्देश असतो. त्यासाठी या क्षेत्रातील काम उत्पादन, विपणन आणि संशोधन या तीन क्षेत्रांत होताना दिसते.
उत्पादन : टिश्यू कल्चरने निर्माण केलेल्या वनस्पती व फळे यांचे उत्पादन, जैविक प्रक्रियेद्वारे तयार होणाऱ्या अन्नपदार्थाची निर्मिती, रसायने व प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रांमध्ये जैव-तंत्रज्ञान तज्ज्ञ काम करतात. औद्योगिक संयंत्र उभारणे व सुरू करणे यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून निर्णय घेण्याच्या कामात ते मदत करतात.
मार्केटिंग : औषधांची निर्मिती आणि कृषी क्षेत्रात जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेली उत्पादने व उत्पादन प्रक्रिया यांचा प्रसार आणि विक्री करणे.
संशोधन : जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग करून  नव्या गोष्टींची निर्मिती करण्याचे संशोधनकार्य हाती घेतले जाते.
बायो-इन्फॉर्मेटिक्स
जैविक ज्ञानाच्या माहितीचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने व्हावे या हेतूने माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे हे आणखी एक विकसित होणारे क्षेत्र आहे. जैविक तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या ज्ञानाचे जनत होण्यासाठी संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज असते. अनेकदा निर्मितीप्रक्रियेत आवश्यक ठरणारी आकडेमोड संगणकीय माहितीशिवाय अशक्य ठरते. हार्डवेअर कंपन्या डाटा हाताळण्यासाठी लागणारी साधने व उपकरणे उपलब्ध करून देतात. सॉफ्टवेअरच्या उपयोगातून या विस्तृत माहितीची साठवणूक, विश्लेषण आणि आवश्यकतेप्रमाणे वापर शक्य असतो.
प्रवेशप्रक्रिया
या अभ्यासक्रमात पदवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असणाऱ्या काही संस्था व विद्यापीठे आहेत. मात्र या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने पदव्युत्तर पातळीवर होतो. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा कृषीशास्त्र या विषयांमधील विद्यार्थ्यांनी या विषयातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यास ते उत्तम प्रगती करू शकतात. तथापि, औद्योगिक क्षेत्रात अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असलेल्या जैव-तंत्रज्ञान तज्ज्ञांना प्रथम पसंती मिळते.
काही महाविद्यालयांमध्ये जैव-तंत्रज्ञान विषयात बी.एस्सी. आणि बी.टेक्. पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. जैव-तंत्रज्ञान विषयातील एम.एस्सी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी व वैद्यक शाखेच्या ५० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रवेश मिळू शकतो.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जैव- तंत्रज्ञानामध्ये एम.टेक्.च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन उच्च माध्यमिक  (बारावी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
याशिवाय १९ विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या जैव-तंत्रज्ञान विषयातील एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतर्फे सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेतील निकालावर प्रवेश दिला जातो. या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पशुवैद्यक, मत्स्यशास्त्र, औषधनिर्मितीशास्त्र, वैद्यकशास्त्र या विषयातील पदवीधर पात्र असतात.
शिक्षणसंस्था
गुरूनानकदेव युनिव्हर्सिटी, अमृतसर व उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैद्राबाद येथे जैव-तंत्रज्ञान विषयात चार वर्षांचा बी. टेक्. अभ्यासक्रम उपलब्ध आहे. उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आय आय टी दिल्ली व खरगपूर येथे एम.टेक्. अभ्यासक्रम आहे. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये जैव-तंत्रज्ञान विषयात एम.एस्सी. अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परंतु, त्यामध्ये त्यासंबंधित एखाद्या ठराविक शाखेचा विशेष अभ्यास केला जातो. दिल्ली विद्यापीठात वनस्पती जैव-तंत्रज्ञान (प्लान्ट बायो टेक्नॉलॉजी) व जेनेटिक इंजिनीअरिंग या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
व्यवसायाच्या संधी
जैव-तंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन संस्थांमध्ये त्यांना संधी मिळू शकते. औषधे उत्पादन कंपन्यांतर्फे औषध संशोधनासाठी अद्ययावत साधने, उपकरणे निर्मिती प्रकल्प राबवले जातात. लखनौच्या सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये तसेच काही औषध कंपन्यांमध्ये जैव-तंत्रज्ञान अभ्यासकांना, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांना, मॉलिक्युलर बायॉलॉजिस्टना, सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञांना संशोधनाच्या संधी उपलब्ध असतात.
रासायनिक उत्पादन क्षेत्रांत प्रदूषण नियंत्रण कचरा निर्मूलन, ऊर्जा, कृषी अन्नपदार्थावर प्रक्रिया करणारे उद्योगात नियोजन, उत्पादन जैविक प्रक्रियांचे नियंत्रण यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. शासकीय संशोधन संस्था, विद्यापीठे व कंपन्यांच्या संशोधन विकास विभागातही या तज्ज्ञांना नोकरी मिळू शकते. केंद्र सरकारच्या जैव-तंत्रज्ञान विभागात तसेच अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही सायंटिफिक अधिकारी, अध्यापनासाठी प्राध्यापक म्हणून या विषयातील तज्ज्ञांची  भरती केली जाते.
भविष्यातील संधी
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर जगभरात प्रचंड मागणी असलेले जैव-तंत्रज्ञान
हे दुसरे क्षेत्र आहे. मानवी जेनोमचे कोडे माहीत झाल्यावर या निर्णायक
क्षेत्रामध्ये आगेकूच करण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. जैविक तंत्रज्ञानाच्या
क्षेत्राच्या विस्तारप्रक्रियेत युवावर्गाला या क्षेत्रात प्रगतीच्या मोठय़ा संधी
खुणावत आहेत. 

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी