मीठ कामगारांसाठी वरदान ठरलेली पवनचक्की
पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाडीकिनारी असलेले मिठाचे पांढरेशुभ्र डोंगर आपलं लक्ष वेधून घेतात. काही वेळा मिठाच्या या डोंगरांवरून इतक्या जास्त प्रमाणात प्रकाश परावर्तीत होतो की त्याच्याकडे बघताना डोळ्यांना त्रास होतो. पण हे मीठ मिळवण्यासाठी अनेक कामगार रणरणत्या वैशाख वणव्यात मेहनत करत असतात. अंगाची लाही लाही करणारे उष्ण खारे वारे आणि क्षारयुक्त पाण्यात बुडालेले पाय अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीत हे कामगार मीठ मिळवण्यासाठी कष्ट उपसत असतात. साधारणपणे ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात मीठ उत्पादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि मग साधारण सहा महिने हे काम चालतं.
मीठ उत्पादनामध्ये संपूर्ण जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. साधारणपणे १५७ लाख टन इतकं मीठ दरवर्षी आपल्या देशात तयार होतं. यापकी सुमारे ७० टक्के मीठ हे केवळ गुजरात राज्यातून तयार केलं जातं. त्यातही सर्वात जास्त मिठाचं उत्पादन कच्छच्या रणात होतं. देशात तयार होणाऱ्या एकूण मिठापकी सुमारे २५ टक्के मीठ कच्छच्या मिठागरांमधून मिळतं. या मिठागरांमध्ये आगारीया समाजातील लोक काम करतात. जवळपास ५५ हजार कामगार तिथे मीठ उत्पादनाचं काम करत आहेत. मिठागरांमध्ये काम करणाऱ्या या कामगारांची आíथक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. एक टन मीठ तयार झालं की एका कामगाराला ८० ते १०० रुपये मजुरी मिळते. अत्यंत विपरीत परिस्थितीत काम करून फक्त नाममात्र मोबदला त्यांच्या वाटय़ाला येतो!
आíथक परिस्थिती वाईट असल्याने हे कामगार मीठ मिळवण्याची सगळी कामं कोणत्याही यंत्राशिवाय स्वत:च्या हातांनीच करतात. या कामांमध्ये मुख्य काम असतं ते खाडीचं किंवा जमिनीतलं खारं पाणी जमिनीवर केलेल्या वाफ्यामध्ये साठवणं आणि त्यानंतर या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करणं. यासाठी अजूनही अनेक ठिकाणी शेकडो र्वष चालत आलेल्या पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. काही ठिकाणी वाफ्यामध्ये खारं पाणी जमा करण्यासाठी डिझेलवर चालणारे पंप वापरले जातात. पण डिझेल परवडत नसल्याने अशा पंपांची संख्या मोजकीच आहे.  
इथल्या पाण्यात असलेल्या क्षारांचं प्रमाण इतकं जास्त आहे की, समुद्रात असलेल्या पाण्यापेक्षा हे पाणी तब्बल १० पट जास्त खारट आहे. इथे दिवसाचं तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं, तर रात्री याच्या अगदी उलट परिस्थिती. इथे रात्रीचं तापमान पाच अंश सेल्सिअस असतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक कामगार इथे मीठ मिळवण्याचं काम करतात. समुद्रावरून वाहणारे खारट वारे, प्रचंड ऊन आणि हात-पाय सतत खाऱ्या पाण्यात बुडलेले अशा परिस्थितीत या मिठागरांमध्ये वर्षांनुवष्रे काम केल्याने या कामगारांच्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम होतात. त्यांचे हात-पाय काडीसारखे कडक होतात. सतत क्षारयुक्त पाण्यात राहिल्याने या कामगारांचे पाय तर इतके कडक होतात की, मृत कामगारांचे पाय अंत्यविधीत जळत नाहीत. मग अंत्यविधी झाल्यावर पायाचे उरलेले अवशेष नातेवाईक गोळा करतात आणि खड्डयामध्ये पुरतात.. अशी परिस्थिती. पण, ही परिस्थिती थोडय़ाफार प्रमाणात सुधारण्यासाठी आसाममधल्या दोन व्यक्तींनी केलेली नवनिर्मिती कारणीभूत ठरली आहे.
मेहेतर हुसेन आणि मुश्ताक अहमद या बंधूंनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाची दोन एकर जमीन होती. शेतीला लागणारं पाणी विहिरीमधून मिळण्याची सोयही होती. फक्त समस्या ही होती की, विहिरीतलं पाणी काढायचं कसं? हाताने पाणी काढून शेतीला द्यायचं तर दोन एकरावर पसरलेल्या जमिनीला पाणी देण्यासाठी कष्ट आणि वेळ दोन्हीही जास्त लागणार! विहिरीवर पंप बसवणं परवडणारं नव्हतं. मग मेहेतर आणि मुश्ताक या बंधूंनी एक शक्कल लढवली. परिसरात सहज व स्वस्तामध्ये उपलब्ध असलेली साधनसामग्री आणि त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा त्यांनी याकामी उपयोग करून घ्यायचं ठरवलं. या दोघांनी स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणावर असलेले बांबू, बांबूच्या पट्टया, वाहनांचे जुने टायर्स, हातपंपात (हापशी) वापरली जाणारी तरफ आणि भंगारातल्या लोखंडी पट्टय़ा यांचा वापर करून गावातल्या सुताराच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर एक मोठी पवनचक्की तयार केली. या पवनचक्कीचा सांगाडा बांबूचा होता आणि पातळ टिनच्या पत्र्यापासून बनवलेली पंख्याची पाती बांबूच्या फ्रेममध्ये बसवली होती. मेहेतर आणि मुश्ताक यांचा प्रयोग यशस्वी झाला. ही पवनचक्की विहिरीवर बसवल्यामुळे शेतीला पाणी देणं सहज शक्य झालं. ही पवनचक्की तयार करण्यासाठी बांबूचा जास्तीत जास्त वापर केला गेल्यामुळे केवळ साडेचार हजार रुपये इतक्या कमी किमतीमध्ये ही पवनचक्की तयार झाली. बाजारात उपलब्ध असणाऱ्या पवनचक्कीची किंमत ६० हजार रुपये इतकी होती. म्हणजेच मेहतर आणि मुश्ताक यांनी तयार केलेली पवनचक्की ग्रामीण भागातही सहजपणे परवडेल अशी होती. नेमकी हीच गोष्ट अहमदाबाद इथल्या नॅशनल इनोव्हेशन फाउंण्डेशन या संस्थेच्या लक्षात आली. आपल्या दैनंदिन जीवनातल्या समस्या दूर करण्यासाठी गावोगावी असलेले धडपडे ‘संशोधक’ शोधायचे आणि त्यांच्या संशोधनाच्या प्रसारासाठी आíथक साहाय्य करायचे, या संशोधनाचं उत्पादन सुरू करण्यासाठी मदत करायची अशा उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने नॅशनल इनोव्हेशन फाउंण्डेशन ही संस्था सुरू करण्यात आली आहे.
नॅशनल इनोव्हेशन फाउंण्डेशन संस्थेने अशा प्रकारच्या पवनचक्क्या तयार करण्यासाठी मेहेतर आणि मुश्ताक यांना वर्कशॉप उभारण्यासाठी आíथक साहाय्य केलं. मग या पवनचक्क्या देशाच्या पूर्वेकडील टोकाला असलेल्या आसामातून थेट पचिमेकडच्या टोकाला असलेल्या कच्छच्या रणात पोहोचल्या. २००८ साली या पवनचक्क्यांची चाचणी घेण्यात आली आणि मिठागरांमध्ये त्या किती उपयुक्त आहेत, हे तपासण्यात आलं. याकामी नॅशनल इनोव्हेशन फाउंण्डेशनच्या बरोबरीने गुजरात ग्रासरूट ऑगमेंटेशन नेटवर्क (GIAN) या संस्थेनेही पुढाकार घेतला.
मिठागर परिसरात ताशी १४ किलोमीटर या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात या पवनचक्क्या व्यवस्थित कार्यरत राहतात का, याची खात्री करून घेण्यात आली. ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असेल तर एका तासात १४७५ लिटर खारं पाणी या पवनचक्कीच्या मदतीने वाफ्यात साठवलं जातं, असं आढळून आलं. मेहेतर आणि मुश्ताक बंधूंनी तयार केलेल्या अशा पवनचक्क्यांचं जाळं पचिम किनारपट्टीवर उभारण्याची सूचना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने केली आहे.   
आज अशा सुमारे ५० पवनचक्क्या गुजरातमधील मिठागरांमध्ये कार्यरत आहेत. या पवनचक्क्यांच्या मदतीने खाडीतलं किंवा जमिनीखाली असलेलं खारट पाणी उपसून वाफ्यांमध्ये साठवता येतं. पाणी साठवण्याचा वेग या पवनचक्क्यांमुळे खूपच वाढला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, मीठ कामगारांना त्यासाठी आपले हात-पाय खाऱ्या पाण्यात बुडवावे लागत नाहीत. थोडक्यात, महंमद मेहेतर हुसेन आणि मुश्ताक अहमद यांनी तयार केलेल्या अतिशय स्वस्त आणि मस्त पवनचक्कीमुळे या मीठ कामगारांचं दु:ख बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
hemantlagvankar@gmail.com