नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबाद येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण विकासविषयक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१३ वर्षांतील सत्रासाठी प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्यानुसार अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पाश्र्वभूमी – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबाद ही राष्ट्रीय स्तरावर स्थायी स्वरूपातील ‘ग्रामीण विकास’ या विषयावर दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे. संस्थेतर्फे एक वर्ष कालावधीच्या या पदविका अभ्यासक्रमामध्ये सहामाही स्वरूपातील दोन सत्रांचा समावेश आहे.
शैक्षणिक अर्हता – अर्जदार विद्यार्थी कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान असायला हवे.
निवड प्रक्रिया – अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेच्या आधारे या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमाचे सत्र जानेवारी २०१३ पासून सुरू होईल.
अर्ज व माहितीपत्रक – अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटातील अर्जदारांनी ५०० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी ३०० रु.चा) ‘एनआयआरडी डीईसी-पीजीडी-एमआरडी’ च्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संस्थेच्या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. ०४०-२४००८५८५ वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http://www.nird.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०११.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना ग्रामीण विकासविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.