|| रोहिणी शहा

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सहा पेपर व ८०० गुण अशी रचना करण्यात आली आहे. यातील पेपर एक अणि दोन हे प्रत्येकी १०० गुणांसाठी भाषा विषयाचे पेपर आहेत. पेपर तीन ते सहा हे सामान्य अध्ययन १ ते ४ असे विहित केलेले आहेत. भाषा विषयांबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे. या तसेच पुढील लेखांमध्ये सामान्य अध्ययन पेपर एकबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य अध्ययन पेपर एकमध्ये इतिहास, भूगोल व कृषी अशा तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचे विभाजन इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोल आणि भूगोल व कृषी अशा तीन भागांत करण्यात आले आहे. या घटकांची व्याप्ती आणि गुण त्याच उतरत्या क्रमाने ठरविण्यात आले आहेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास इतिहास घटकावर ६० गुणांचे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोल घटकावर ५५ गुणांचे तर भूगोल व कृषी घटकावर ३५ गुणांचे प्रश्न विचारण्यात आले आहेत, हे लक्षात येते.

बहुपर्यायी प्रश्नपद्धतीसाठी अभ्यासक्रमाचे बारकाईने विश्लेषण करून अभ्यास पद्धत ठरविणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारण्यात आलेल्या मुद्दय़ांबाबत नेमकी माहिती असावी लागते आणि तिचा संदर्भही माहीत असावा लागतो, तरच आत्मविश्वासाने प्रश्न सोडविणे शक्य होते. पेपर एकच्या सर्व घटकांसाठी विश्लेषणावर आधारित अभासपद्धतीबाबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल. अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि अभ्यासाच्या सोयीसाठी विभाजन कशा प्रकारे करता येईल ते पाहू.

भूगोल व कृषी

या घटक विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले मुद्दे हे वस्तुनिष्ठ नसून संकल्पनात्मक आहेत. त्यामुळे दिलेल्या संकल्पना किंवा पारंपरिक मुद्दय़ांचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. बहुपर्यायी प्रश्नांसाठी नेमका अभ्यासक्रम दिलेला असेल तर अभ्यासाची मर्यादा ठरविता येते, मात्र ढोबळ मुद्दे समाविष्ट असतील तर अशी मर्यादारेषा शोधणे अवघड ठरते. त्या दृष्टीने कृषी घटकाचा अभ्यास मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका समोर ठेवून करायला हवा.

या घटकाचे विभाजन अभ्यासक्रमात नमूद उपघटकांमध्येच करावे.

१. कृषी पारिस्थितीकी         २. हवामान         ३. मृदा      ४. जल व्यवस्थापन

मात्र त्या त्या शीर्षकाखाली असलेले मुद्दे जास्त सुसंबद्ध असलेल्या उपघटकामध्ये संदर्भासाठी वापरणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ‘शेतीमधील पाण्याची आवश्यकता’ हा ‘हवामान’ उपघटकातील मुद्दा ‘पाणी व्यवस्थापन’ उपघटकातील ‘सिंचन पद्धती’ आणि ‘मृदा’ उपघटकातील ‘लाभक्षेत्र आधारावर मृदा संवर्धन’ या मुद्दय़ांशी संबंधित आहे. त्यांचा एकमेकांच्या संदर्भाने अभ्यास केल्यास बहुविधानी प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

कृषी विषयाच्या प्राकृतिक आणि भौगोलिक पलूंचा समावेश या पेपरमध्ये तर आर्थिक पलूंचा समावेश पेपर चारमध्ये करण्यात आलेला आहे. पेपर चारमधील भाग या पेपरबरोबरच अभ्यासल्यास सलगतेमुळे सोपा होईल. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून शेतीचा विचार करताना आर्थिक संकल्पनांचा संदर्भ मात्र घेणे आवश्यक ठरेल.

इतिहास

इतिहास घटक विषयाचे चार मुख्य भागांत विभाजन करता येईल.

१. सन १८१८ ते १८५७ पर्यंतचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास.

२. १८५७ पासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास

३. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सामाजिक, आर्थिक इतिहास, राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्यांमधील ठळक राजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संबंध

४. महाराष्ट्राची प्राचीन ते आधुनिक कालखंडामधील सांस्कृतिक परंपरा

या विषयातील नऊ उपघटक या चार विभागांमध्ये समाविष्ट करून त्यांचा एकत्रित अभ्यास करणे व्यवहार्य आणि सोपे आहे. तसेच तर्कसंगत आणि सुसंबद्ध अभ्यास शक्य झाल्याने वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांची तयारीही चांगल्या तऱ्हेने होईल.

भूगोल

अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेल्या सहा मुद्दय़ांमध्येच या घटकाचे विभाजन करून अभ्यास केल्यास व्यवहार्य ठरेल.

१. प्राकृतिक भूगोल

२. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

३. महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल

४. पर्यावरणीय भूगोल

५. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह लोकसंख्या भूगोल

६. दूरसंवेदन

यातील १, ४ आणि ६ या मुद्दय़ांची व्याप्ती विस्तृत आहे. त्यांमध्ये महाराष्ट्राचा विचार वेगळ्याने नाही तर जग किंवा भारताचा भाग म्हणून करायचा आहे. मुद्दा क्र. २ आणि ३ फक्त महाराष्ट्राशी संबंधित आहेत. मुद्दा क्र. ५ हा महाराष्ट्राचा संदर्भ ठेवून संकल्पनात्मक अभ्यासाचा विषय आहे.