डॉ. श्रीराम गीत

मी सीए पास झाल्यावर पाच वर्षे नोकरीत होतो. आता मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी आपण मला काय नेमक्या सूचना सुचवाल?

अधिथ वर्तक

एखाद्या फर्ममध्ये पार्टनर म्हणून दाखल होणे हा यासाठीचा एक रस्ता आहे. नोकरीतील अनुभवाचा त्यातील संपर्कजाळ्याचा फायदा त्या फर्मला करुन देताना फर्मतर्फे येणारी कामे करताना स्वत:चे संपर्क जाळे – नेटवर्क तयार होत जाते. अर्थातच काही वर्षांनंतर स्वत:ची फर्म सुरू करणे शक्य होते.

ज्या ठिकाणी आर्टिकलशिप केली त्यांचेकडे या संदर्भात विचारणा करणे ही एक सोपी सुरुवात असू शकते. पाच वर्षे जिथे नोकरी केली तिथल्या साऱ्यांना त्यांचे इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यासाठीची विनंती करूनसुद्धा सहज पन्नास एक ग्राहक मिळू शकतात. तसेच सीनियर्सकडे त्यांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचारणा करणेही शक्य होते.

एखाद्या संस्थेमध्ये कॉमर्स किंवा फायनान्स संदर्भातील विषय शिकवण्यासाठी मानद प्राध्यापक म्हणून काम मिळाल्यास अनेक व्यक्तीशी संपर्क जाळे वाढत जाते. मोठय़ा सहकारी संस्थांचे ऑडिट मिळवणे हा पण एक रस्ता असू शकतो. जरूर विचार करावा. वेगळ्या विषयावरील असा प्रश्न विचारल्याने त्याचे उत्तर विस्ताराने देत आहे.

मी बीए बीएड करून २०१७ मध्ये खासगी विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून लागलो. शाळेला अनुदान नाही. मी खासगी शिकवण्या घेऊन कसेबसे घर चालवत आहे. राज्यसेवा परीक्षा द्यावे असे वाटते काय करावे यावर मार्गदर्शन करावेत. सध्या माझे वय २८ आहे.

इमरान शेख

इमरान तुझ्यासारखीच अवस्था दुर्दैवाने महाराष्ट्रातील लाखभरापेक्षा जास्त शिक्षकांची आहे. तीही आजची नव्हे तर गेल्या पंधरा वर्षांची आहे. त्यातून चुकूनमाकून बाहेर पडण्याची इच्छा, आकांक्षा, जिद्द धरणारे मोजकेच आहेत. त्यातील तुला दिसलेला रस्ता तितकाच खडतर आहे हे समजून घ्यावेस. राज्यसेवा परीक्षा म्हणण्याऐवजी शिक्षणखात्याशी संबंधित विविध परीक्षा असतात, त्यांची माहिती मिळवावीस. त्यातूनच शिक्षणाधिकारी वा अन्य रस्ते सुरू होतात. तुझे विषय न कळविल्याने अधिक नेमकेपणाने सुचविणे शक्य नाही. खरे तर राज्यसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा आता देणे शक्य होणार नाही. त्याऐवजी दुय्यम सेवांसाठी नक्की यशाची शक्यता आहे. माहिती घेऊन सुरुवात करावीस. काही महिन्यांपूर्वी ही सारी माहिती करिअर वृत्तान्तमध्ये वाचल्याने मला आठवते आहे. नीट विचारांती निर्णय घ्यावा.