सेन्ट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, भावनगर    

गुजरातमधील भावनगर येथे असलेली सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएसएमसीआरआय) म्हणजेच केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था. मीठ व सागरी रसायने या विषयामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९५४ साली झाली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे हीदेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संस्थेविषयी :-

सन १९४०च्या सुरुवातीस तत्कालीन सरकारने देशातील मिठाचे उत्पादन आणि उपयोग तपासण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावरून त्यावेळी सर्वप्रथम मिठाच्या बाबतीत विपुल संशोधन होण्याची आवश्यकता जाणवली. नंतर मग वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेकडून (सीएसआयआर), मान्यता प्राप्त झाल्यानंतर डॉ. भटनागर यांच्या अध्यक्षतेखालीच पुन्हा एक संशोधन समिती -‘ सॉल्ट रिसर्च कमिटी’ स्थापन केली गेली. काही कालावधीनंतर हीच समिती डॉ. माता प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ‘हेवी केमिकल्स कमिटी’ या नावाने पुनरुज्जीवित करण्यात आली. एप्रिल १९४८मध्ये, भारत सरकारने भारतातील मीठ उद्योग स्वत:च्या पायावर उभा राहावा व त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पी. ए. नारियलवाला यांच्या अध्यक्षतेखाली एका सॉल्ट एक्स्पर्ट कमिटीची स्थापना केली. भारतातील अनेक मिठांच्या खाणींचा व एकूणच मीठ उद्योगाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर मिठाची गुणवत्ता सुधारण्यासाठी समितीने ठरावीक निष्कर्ष काढले. त्यातील प्रमुख निष्कर्ष म्हणजे संशोधनाकडे अधिक लक्ष केंद्रित करणे, मिठाचे उत्पादन होणाऱ्या क्षेत्रांत मिठाचे नमुना कारखाने तयार करणे, हे कारखाने लघु उद्योगांसाठी प्रात्यक्षिक म्हणून काम करतील अशी सोय करणे आणि गुणवत्ता सुधारणा आणि उत्पन्न सुधारण्याच्या पद्धती तपासण्यासाठी संशोधन केंद्रांची स्थापना करणे हे होय. या सूचनेनुसार तेव्हा सेंट्रल सॉल्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटची (आताची सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट) स्थापना करण्यात आली. दि. १० एप्रिल, १९५४ रोजी या संशोधन संस्थेचे उद्घाटन देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले.

संशोधनातील योगदान 

सीएसएमसीआरआय ही सॉल्ट अँड मरीन केमिकल्समध्ये संशोधन करणारी संस्था आहे. भावनगरमधील असलेले केंद्र ही या संशोधन संस्थेची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू आहे. कारण जवळच असलेल्या राजस्थानमधील मीठ उत्पादनाचे विविध स्रोत, जवळपासच्या मंडीतील मिठाच्या खाणी, कच्छचे आखात आणि सुमारे ३५०० मैलांच्या किनारपट्टीची उपलब्धता इत्यादी बाबी संस्थेच्या संशोधनातील प्रयत्नांना अजून मजबूत करतात. कदाचित या सर्व जमून आलेल्या गोष्टींमुळे जगभरातील मीठ उत्पादक देशांमध्ये भारत आज एक प्रमुख मीठ उत्पादक आहे. मिठाचे महत्त्व तर सर्वज्ञात आहे. अन्नपदार्थामधील एक अपरिहार्य घटक असण्याबरोबरच सोडा अ‍ॅश, कॉस्टिक सोडा आणि क्लोरीन यांसारख्या अनेक जड रसायनांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा कच्चा माल म्हणून मिठाचा वापर केला जातो. तर माशांचे संगोपन, मांस पॅकिंग, दुग्ध उत्पादने आणि खाद्यपदार्थाचे कॅनिंग इत्यादी फूड प्रोसेसिंग उद्योगांमध्ये मिठाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.

या नेहमीच्या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य दिले आहे आणि इतर शाखांमधील मुलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच सीएसएमसीआरआयमध्ये मिठाशी व सागरी क्षेत्राशी संबंधित सॉल्ट अँड मरीन केमिकल्स, इनऑर्गनिक मटेरियल्स अँड कॅटॅलिसीस, इलेक्ट्रो मेम्ब्रेन प्रोसेस, मरीन बायोटेक्नॉलॉजी अँड इकोलॉजी, रिव्हर्स ओस्मोसीस इंजिनीअरिंग, वेस्टलँड रिसर्च इत्यादी विषयांत दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण संशोधन चाललेले असते. रिव्हर्स ओस्मोसीस इंजिनीअरिंग शाखेच्या माध्यमातून संस्थेने समुद्रातील खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर करणाऱ्या डीसॅलीनेशन प्रकल्पांची स्थापना केलेली आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएसएमसीआरआयने विद्यार्थ्यांसाठी पदवी, पदविका, पदव्युत्तर व पीएचडी या प्रत्येक स्तरावर स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार सीएसएमसीआरआयमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. सीएसएमसीआरआय भारतातील अनेक विद्यापीठांशी मूलभूत विज्ञानातील व इतर आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी किंवा तत्सम अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. दरवर्षी उरकफ वा वॅउ च्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी सीएसएमसीआरआयमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. थोडक्यात शेकडो विद्यार्थी त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी किंवा त्यापुढील स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

संपर्क

सेन्ट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, जिजूभाई बधेका मार्ग, भावनगर, गुजरात-३६४००२.

दूरध्वनी  ०२७८ -२५ ६७७६० / २५६८९२३.

इमेल – http://www.csmcri.org/,

संकेतस्थळ – http://www.csmcri.org/

itsprathamesh@gmail.com