जवाहरलाल नेहरू  विद्यापीठ, दिल्ली

देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये सातत्याने वरच्या क्रमांकावर राहणारे विद्यापीठ म्हणून दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विचार केला जातो. केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जाचा पुरेपूर उपयोग करत ‘जेएनयू’ने शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये आणि संशोधनामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थांची क्रमवारी निश्चित करणाऱ्या यंदाच्या नॅशनल इन्स्टिटय़ुशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्येही (एनआयआरएफ) ‘जेएनयू’ देशभरातील विद्यापीठांच्या यादीत दुसरे आले आहे. संस्थेमध्ये कार्यरत एकूण ६५२ प्राध्यापकांपैकी पीएचडी पूर्ण केलेले ५९३ प्राध्यापक हे ‘जेएनयू’चे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. केवळ स्थानिकच नव्हे, तर देशभरातील सर्व राज्यांमधून आणि परदेशांमधूनही विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग ‘जेएनयू’चा प्राधान्याने विचार करतो.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

संस्थेची ओळख – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायद्याच्या आधारे १९६६ साली ‘जेएनयू’ची स्थापना झाली. तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर, १९६९ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आयुष्यात अंगीकारलेली तत्त्वे, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, आंतरराष्ट्रीय समुदायाविषयीची जाणीव आणि समज, वैज्ञानिक दृष्टिकोन या मुद्दय़ांच्या अभ्यासासाठी आणि प्रसारासाठी कार्य करण्याची भूमिका या विद्यापीठाने स्थापनेपासूनच स्वीकारली आहे. राष्ट्रीय पातळीवरील सामाईक प्रवेश परीक्षेच्या आधारे ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करते. देशभरात विविध केंद्रांवरून ही परीक्षा घेतली जाते. एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, एम. व्ही. एस्सी (अ‍ॅनिमल), एम. टेक. बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी देशभरातील जवळपास ५३ विद्यापीठांच्या वतीने प्रवेश परीक्षा घेण्याची जबाबदारीही हे विद्यापीठ पार पाडते. संरक्षण दलांशी निगडित शैक्षणिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांना आणि तेथे चालणाऱ्या अभ्यासक्रमांना, देशभरातील अनेक संशोधन आणि विकास संस्थांनाही या विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.

विभाग –  देशातील इतर विद्यापीठांमधून चालणाऱ्या अभ्यासक्रमांपेक्षा तुलनेने वेगळे विषय निवडून त्याचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन करण्यावर या विद्यापीठाने सातत्याने भर दिला आहे. त्यासाठी या विद्यापीठामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासाला चालना देण्याच्या हेतूने विविध स्कूल्सची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही एका विषयाला वा विद्याशाखेला वाहिलेल्या स्कूल वा केंद्राऐवजी अनेक विषयांच्या अभ्यासासाठी म्हणून स्थापन झालेली स्कूल आणि केंद्र हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. विद्यापीठांतर्गत स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टिम सायन्सेस, स्कूल ऑफ इन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस, स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल अँड इंटिग्रेटिव्ह सायन्सेस, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, स्कूल ऑफ आर्ट्स अँड अ‍ॅस्थेटिक्स या स्कूल्समध्ये कोणतीही उपकेंद्रे नाहीत. तर स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीजमध्ये स्कूलअंतर्गत विविध केंद्रे चालविली जातात. याव्यतिरिक्त ‘जेएनयू’मध्ये सेंटर फॉर लॉ अँड गव्हर्नन्स, स्पेशल सेंटर फॉर नॅनो सायन्सेस, स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिन आणि स्पेशल सेंटर फॉर संस्कृत स्टडीज या संस्थांतर्गत केंद्रांचाही समावेश होतो.

अभ्यासक्रम

विद्यापीठांतर्गत पातळीवर आंतरविद्याशाखीय अभ्यासाला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. त्या अनुषंगाने आपल्या मूळ आवडीच्या विषयाचा अभ्यास करतानाच त्यासाठी पूरक ठरू शकणारे विषय पर्यायी विषय म्हणून शिकण्याची संधी या विद्यापीठात उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांना इतर स्कूल्स वा सेंटर्समध्ये चालविले जाणारे विषय शिकण्यासाठीची आग्रही भूमिका हे विद्यापीठ मांडते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये होणारे कालसुसंगत बदल ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया राहिली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या विविध स्कूल्समधून आणि सेंटर्समधून पदव्युत्तर पातळीवरचे अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठांतर्गत केवळ परकीय भाषांविषयीचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीजअंतर्गत हे अभ्यासक्रम चालतात. उर्वरित सर्व अभ्यासक्रम हे पदव्युत्तर पातळी आणि संशोधनाला वाहिलेले असेच ठरतात. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विशेष विषयामध्ये एम. ए. पॉलिटिक्स ही पदवी घेता येते. जागतिक अर्थकारण हा मूळ विषय घेऊन एम. ए. इकॉनॉमिक्स ही पदवी घेण्याची संधीही हे विद्यापीठ देते. स्पेशल सेंटर फॉर मोलेक्युलर मेडिसिनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना इंटिग्रेडेट एम. एस्सी.- पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. विद्यापीठाच्या अशा एक ना अनेक अभ्यासक्रमांची माहिती विद्यापीठाने आपल्या  http://www.jnu.ac.in/  या वेबसाइटवरून उपलब्ध करून दिलेली आहे.

एक हजार एकरांवर पसरलेल्या आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये या संस्थेने प्रत्येक स्कूलसाठीच्या स्वतंत्र इमारतीमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याच संकुलामध्ये विद्यार्थी- विद्यर्थिनींसाठी मोठय़ा संख्येने स्वतंत्र होस्टेल्सही उभारली आहेत. विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि गरज लक्षात घेता या विद्यापीठामध्ये ग्रंथालयाची प्रशस्त आणि अद्ययावत अशी बहुमजली इमारत उभारण्यात आली आहे. एम. फिल. आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छात्रवृत्तीची योजनाही या विद्यापीठात राबविली जाते. अशा सर्वच कारणांमुळे हे विद्यापीठ सातत्याने विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.

borateys@gmail.com