सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

संस्थेची ओळख

राज्यभरात शिक्षण क्षेत्राचा वाढता विस्तार, महाविद्यालयांची वाढती संख्या, विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा, त्या तुलनेमध्ये तत्कालीन विद्यापीठांचे महाविद्यालयांपासूनचे अंतर, विद्यार्थ्यांना-महाविद्यालयांना विद्यापीठांपर्यंत पोहोचण्यामध्ये होत असलेली गैरसोय हे मुद्दे गेल्या काही काळामध्ये सातत्याने चर्चेला येत गेले. त्यातूनच राज्यातील विद्यापीठांचे विभाजन, विद्यापीठांच्या उपकेंद्रांची सुरुवात किंवा अंतिमत: जिल्हानिहाय विद्यापीठांच्या निर्मितीला गती मिळत गेली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राज्यातील विद्यापीठांना असलेला प्रादेशिक चेहरा हा आता जिल्हापातळीवर आला आहे. या टप्प्यांमधील महत्त्वाचा टप्पा ठरलेली संस्था म्हणून आजच्या सोलापूर विद्यापीठाकडे पाहिले जाते. सोलापूर शहराच्या बाहेर पुण्याकडे जाताना केगाव परिसरामध्ये महामार्गाच्या डाव्या बाजूला ज्ञानतीर्थ नगरमध्ये विद्यापीठाचे मुख्य संकुल आहे. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी म्हणून उपलब्ध झालेल्या ५१७ एकरांच्या परिसरापैकी चाळीस एकरांच्या परिसरात विद्यापीठाचे सध्याचे मुख्य संकुल उभारण्यात आले आहे. २२ जुलै, २००४ रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ाच्या उच्चशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोलापूर विद्यापीठाचे हे कार्यक्षेत्र या विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी कोल्हापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा भाग होते. सध्या सोलापूर जिल्ह्य़ामधील १०९ कॉलेजचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्य सोलापूर विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली चालते. विद्यापीठाची स्थापनेपासूनची वाटचाल विचारात घेत ‘नॅक’ने या विद्यापीठाला मूल्यमापनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘बी ग्रेड’ दिली आहे.

संकुल आणि सुविधा

मुख्य संकुलामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना गती देण्याच्या हेतूने स्कूल संकल्पनेचा वापर करून एकूण सहा स्कूल्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेस, स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस आणि स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस यांचा समावेश होतो. त्यासाठी स्वतंत्र इमारतींची व्यवस्था आहे. या संकुलामधील मुख्य ग्रंथालयामध्ये तीस हजारांहून अधिक पुस्तके, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या मदतीने जगभरातील संशोधनविश्वाचा अभ्यास एकाच जागी बसून करण्याची सुविधाही या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक विभागाच्या पातळीवर स्वतंत्र ग्रंथालयांची व्यवस्थाही उभारली आहे. ग्रामीण भागातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच विद्यापीठाचे स्वत:चे अ‍ॅपही आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही उपलब्ध करून दिलेला आहे.

अभ्यासक्रम

मुख्य संकुलातील स्कूल्समध्ये एकूण १८ पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामध्ये १५ एम.एस्सी, एक एमसीए, एक एम.ए, एक एम. कॉम आणि एक एम. एड अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यासोबतच संशोधक विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचे १५ आणि एम. फिलचे तीन अभ्यासक्रम चालविले जातात. तसेच वेगवेगळ्या विषयांशी संबंधित एकूण ५७ प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठामार्फत चालविले जातात. पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांपेक्षा वेगळ्या अभ्यासक्रमांवर असलेला भर आणि तुलनेने नव्या विषयांमध्ये पदव्युत्तर अध्ययन करण्याची संधी हे या अभ्यासक्रमांचे वेगळेपण ठरते. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये अ‍ॅन्शंट इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्किओलोजी, रुरल डेव्हलपमेंट, मास कम्युनिकेशन आणि इकॉनॉमिक्स या चार विषयांमधील एम. ए. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीचे अध्ययन करता येते. स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमधून पॉलिमर  केमिस्ट्री, इंडस्ट्रिअल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री या विशेष विषयांमधील एम. एस्सी अभ्यासक्रम शिकता येतो. याच विभागामध्ये मेडिसिनल केमिस्ट्रीविषयक संशोधनही चालते. स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड अकाऊन्टन्सी आणि बँकिंग या दोन विषयांमधील एम. कॉम. अभ्यासक्रम चालतो. स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसमधून एमसीए अभ्यासक्रमासोबतच कॉम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक्स या तीन विषयांमधील एम. एस्सी अभ्यासक्रमही चालविले जातात. स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसमधून अप्लाइड जिओलॉजी, जिओइन्फर्मेटिक्स आणि इन्व्हायर्न्मेंट सायन्स या तीन विषयांमधील एम. एस्सीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसमध्ये फिजिक्स विषयामध्ये एम. एस्सी. करता येते. त्यामध्ये अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि मटेरिअल सायन्स या दोन विषयांमधील विशेष अभ्यासक्रम शिकण्याची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. याच स्कूलमध्ये एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक्स सायन्स हा अभ्यासक्रमही शिकता येतो. या सर्व स्कूल्समधून विद्यार्थ्यांसाठी नोकरी व रोजगाराच्या सुविधा पुरवण्यासाठीही विद्यापीठ प्रयत्नशील असते.

योगेश बोराटे borateys@gmail.com