येत्या १५ ते २२ मे दरम्यान चंद्रपूर येथील सोमनाथ या ठिकाणी ‘श्रमसंस्कार छावणी’ आयोजित करण्यात आली आहे. समाजकार्यात करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी ही छावणी विशेष उपयुक्त ठरेल. या छावणीत श्रमसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करतानाच सामाजिक विकास आणि परिवर्तनात सक्रिय असलेले विविध कार्यकर्ते शिबिरार्थीशी संवाद साधतील. विविध सामाजिक मुद्दय़ांवरील चर्चासत्रांमधून शिबिरार्थीच्या समाजकार्याविषयीच्या संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होण्यास मदत मिळेल.
युवाशक्तीला नवनिर्मितीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी बाबा आमटे यांनी १९६७ साली मे महिन्यात चंद्रपूर जिह्य़ातील सोमनाथच्या निबिड अरण्यात ‘श्रमसंस्कार छावणी’ सुरू केली. पहिल्याच छावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभरातील हजारेक तरुणतरुणी सोमनाथला दाखल
झाले होते. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी,
डॉ. अनिल अवचट अशा काही सामाजिक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता.  गेली ४७ वष्रे ही छावणी सुरू असून अहमदनगरच्या ‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णीसारखे शेकडो कार्यकत्रे, वंचित घटकांच्या उत्थानासाठी कार्यरत कित्येक संस्था आणि समाजपरिवर्तनाला कारणीभूत भारत-जोडो, अंधश्रद्धा निर्मूलन अशा चळवळी छावणीने आजवर घडवल्या आहेत.
यंदाची छावणी १५ मे ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या छावणीत पहाटे चार वाजता दिनक्रम सुरू होतो. बहुभाषिक प्रेरणागीते गात, श्रमप्रतिष्ठेचे नारे देत तरुणाई साडेपाच वाजता श्रमदानासाठी सज्ज होते. कुदळ, फावडे, पहारी आणि घमेल्यांच्या साहाय्याने चार तास घाम गाळल्यानंतर दुपारी या तरुणाईशी सामाजिक विकास विषयक विविध उपक्रमांमध्ये सहभागी असणारे   कार्यकत्रे संवाद साधतील. सृजनशील संकल्पनांना खतपाणी देणाऱ्या विविध सामाजिक चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.
शेती, जंगल आणि जमिनीशी आपले नाते जुळावे, यासाठी या छावणीदरम्यान विशेष प्रयत्न केले जातात. या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती मिळून तिथे श्रमणारी मने आपोआपच नम्र, अंतर्मुख बनण्यासाठी पोषक वातावरण छावणीत उपलब्ध असते.
ंसहभागासाठी संपर्क:  संयोजक – श्रमसंस्कार छावणी, मु.पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र – ४४२९१४
ई-मेल: somnathcamp@gmail.com
संपर्कासाठी दूरध्वनी: ९६७३५७४१४८ ९६८९८८८३८१