द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख  – हाँगकाँगमधील द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग (एचकेयू) म्हणजेच हाँगकाँग विद्यापीठ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पंचविसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हे विद्यापीठ शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. १८८७ साली स्थापन झालेल्या हाँगकाँग कॉलेज ऑफ मेडिसिन फॉर चायनीज या महाविद्यालयाचे १९११ साली ‘द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ असे नामांतरण करून या विद्यापीठाची वीट रोवली गेली. तत्कालीन आशिया खंडामध्ये ब्रिटिशांनी अनेक विद्यापीठांची स्थापना केली. त्यापैकी पूर्व आशियामध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेले हे पहिले विद्यापीठ आहे. virtue and wisdom हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दहा शैक्षणिक व संशोधन विभाग चालवले जातात. जगभरातील बुद्धिवंत विद्यार्थी येथे त्यांच्या उच्चशिक्षणासाठी दाखल होतात. विद्यापीठाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि मानसिकतेचा संशोधनात कुशल असलेला अध्यापकवर्ग आहे. एचकेयूमध्ये जवळपास तीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी आपले शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत, तर जवळपास दोन हजार प्राध्यापक-संशोधक वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत आहेत.

अभ्यासक्रम – एचकेयूतील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमातील मेजर्स, मायनर्स आणि इलेक्टिव्ह्ज निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन किंवा तीन वर्षांचे आहेत. दोन्ही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे मुख्यत्वे संशोधन अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठातील सर्वच दहा शैक्षणिक-संशोधन विभागांचे अध्यापन-संशोधन हे इंग्रजीमध्ये चालते. आर्किटेक्चर, आर्ट्स, डेंटिस्ट्री, सायन्सेस, बिझिनेस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, इंजिनीअरिंग, लॉ, मेडिसिन, सोशल सायन्सेस या दहा स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, एमफील, पीएचडी, सर्टििफकेट प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असे नानाविध पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी सॅट तर पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई / जीमॅट आणि टोफेल या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. एचकेयू विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विभागाअंतर्गत रियल इस्टेट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन, अर्बन प्लॅनिंग अ‍ॅण्ड डिझाइन, लँडस्केप आर्किटेक्चर आणि आर्किटेक्चरल कन्झव्‍‌र्हेशन इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो. आर्ट्स विभागाअंतर्गत भाषांमध्ये चिनी, इंग्रजी या भाषा, बौद्ध संस्कृतीचा अभ्यास, आधुनिक भाषा आणि संस्कृती, इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, संगीत, राज्यशास्त्र, ग्लोबल पॉलिसी, पब्लिक पॉलिसी इत्यादी विषय येतात. इंजिनीअरिंगअंतर्गत विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चिरग सिस्टम्स इंजिनीअरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग इत्यादी विषयांचा अभ्यास करतात.

सुविधा – एचकेयूकडून विविध स्वरूपांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वतीने हाँगकाँग पीएचडी फेलोशिप्स, युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप्स (यूपीएफ), पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप्स (पीजीएस), अ‍ॅकॅडेमिक अ‍ॅवॉर्ड, टय़ुशन वेव्हर, कार्यशाळेसाठी विशेष आर्थिक आणि प्रवास भत्ता इत्यादी वेगवेगळ्या माध्यमांतून आर्थिक मदत विद्यार्थ्यांना बहाल केली जाते. विद्यापीठाने परिसरातील वसतिगृहांच्या सुविधेबरोबरच ऑफ कॅम्पस हाउसिंग, टेम्पररी अकोमोडेशन, नॉन हॉल हाउसिंग इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या निवासी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कॅफेटेरिया, रेस्टॉरंट, पाश्चिमात्य खाद्यपदार्थापासून ते व्हेज-नॉनव्हेज खाद्यपदार्थाच्या सुविधा विद्यापीठाने आपल्या परिसरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या परिसराबाहेर विद्यार्थ्यांना भारतीय खाद्यपदार्थही मिळू शकतात. तसेच एचकेयूकडून क्रीडा, आरोग्य, हेल्थ इन्शुरन्स, ग्रंथालय इत्यादी सुविधा विद्यार्थ्यांना बहाल केल्या जातात.

वैशिष्टय़

हाँगकाँग विद्यापीठामध्ये संशोधनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम चालते. मध्यंतरी सर्वत्र पसरलेल्या ‘सार्स’ नावाच्या श्वसनाच्या विकारावर या विद्यापीठामध्ये प्रचंड संशोधन केले गेले होते. त्या वेळी या विकाराला जबाबदार असणाऱ्या ‘कोरोव्हायरस’ या विषाणूला यशस्वीरीत्या ओळखून त्याबद्दल पुढील संशोधन करणारा जगातील पहिला संघ हा एचकेयूमधील शास्त्रज्ञांचा होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारी आशिया खंडातील एक महत्त्वाची संस्था असे या विद्यापीठाचे अनेकदा वर्णन केले जाते. जे सार्थही आहे.

संकेतस्थळ –  https://www.hku.hk/