युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील बर्कले शहरामधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-बर्कले (यूसीबी) हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले अठ्ठाविसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. यूसीबी बर्कले हे एक शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १८६८ साली झाली. let there be light हे यूसीबी बर्कलेचे ब्रीदवाक्य आहे. विद्यापीठात सर्व विद्याशाखांमधील मिळून एकूण १८४ शैक्षणिक व संशोधन विभाग आहेत. यूसीबीमध्ये सध्या सर्व शाखांमधील साडेतीनशे अभ्यासक्रम उपलब्ध असून चाळीस हजारांपेक्षाही अधिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

यूसीबी बर्कले विद्यापीठात एकूण १०६ पदवी अभ्यासक्रम, तर ८८ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. येथील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. दोन्ही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे मुख्यत्वे संशोधन अभ्यासक्रम आहेत. याशिवाय विद्यापीठाकडून संशोधनावर आधारित एकूण ९७ डॉक्टरल अभ्यासक्रम व ३१ प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज विद्यार्थ्यांच्या शिक्षण-संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यूसीबीमधील १८४ शैक्षणिक व संशोधन विभाग मुख्य चौदा कॉलेज आणि स्कूल्समध्ये संघटित करण्यात आले आहेत. केमिस्ट्री, इंजिनीअिरग, एन्व्हायर्नमेंटल डिझाइन, कॉलेज ऑफ लेटर्स अ‍ॅण्ड सायन्सेस, एज्युकेशन, नॅचरल रिसोस्रेस, बिझनेस, जर्नलिझम, पब्लिक पॉलिसी, लॉ, इन्फॉम्रेशन, पब्लिक हेल्थ आणि सोशल वेल्फेअर. विद्यापीठातील या चौदा स्कूल्स आणि कॉलेजेसच्या अंतर्गत सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठाचे मेडिकल स्कूल नसल्याने यूसीबी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्कोच्या साहाय्याने एक संयुक्त वैद्यकीय विभाग चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांचे क्लासरूम, ऑनलाइन आणि समर सेशन असे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना यूसीबीमधील कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक पाश्र्वभूमीसह सॅट व टोफेल या दोन परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जीआरई आणि टोफेल या प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सुविधा

यूसीबी बर्कलेमधील विद्यार्थीजीवन हे विज्ञान, कला, विद्वत्ता आणि क्रीडा यांचे एक सुरेख मिश्रण आहे. येथे येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हे वेगवेगळ्या देशांमधून आणि सामाजिक-आर्थिक पाश्र्वभूमीतून आलेले असतात, परंतु एकत्रितपणे त्यांनी एक वेगवान आणि गतिशील समुदाय तयार केला आहे जो निश्चितच शिक्षण-संशोधनाच्या माध्यमातून एक चांगले जग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यूसीबी बर्कलेकडून शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती आणि शैक्षणिक शुल्कामध्ये सूट यांसारख्या विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा बहाल केल्या जातात. यामध्ये युनिव्हर्सिटी हेल्थ सर्व्हिसेस, बर्कले वेलनेस लेटर, विद्यापीठ परिसरातच डोळ्यांचा दवाखाना आदी आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. तसेच कॅम्पस पोलीस, लैंगिक छळ आणि हिंसेविषयी शैक्षणिक जागृती करणारे केंद्र, आपत्तीनिवारण केंद्र आणि पर्यावरण संरक्षण विभाग इ. आस्थापनांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या परिसरात कॅल डायिनग आणि बर्कले हाऊसिंग या नावाने भोजन व निवासाच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कॅल रेंटल्स, कॅम्पस कॅफेज यांसारख्या अतिरिक्त सोयीही विद्यापीठाने परिसरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या दाव्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यूसीबी बर्कलेचे विद्यार्थी-प्राध्यापक गुणोत्तर हे १७.८ :१ इतके आहे. विद्यार्थ्यांच्या विविध विषयांतील समस्या सुलभ होण्यासाठी ‘एड-एक्स’ व ‘व्हिडीओ क्लासरूम’सारखे पर्यायसुद्धा विद्यापीठाने निवडले आहेत.

वैशिष्टय़

यूसीबीच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये जगभरातील अनेक दिग्गज्जांचा समावेश आहे. आतापर्यंत विद्यापीठाने १०७ नोबेल पारितोषिक विजेते आणि २०७ ऑलिम्पिक पदक विजेते तयार केले आहेत. यासहित यूसीबी बर्कलेमधील कित्येक माजी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील टय़ुरिंग, मॅकआर्थर, पुलित्झर, वूल्फ इत्यादी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या विद्यापीठातील आठ कार्यरत प्राध्यापक नोबेल पुरस्कार विजेते आहेत.

संकेतस्थळ  https://www.berkeley.edu/