स्वाती केतकर- पंडित

जि.प. शाळा पांढरीवस्ती, ता. चांदवड, जिल्हा नाशिक  येथील विद्यार्थी पटसंख्या अगदी कमी आहे, पण आत्मविश्वास भरपूर. ‘डिझाइन फॉर चेंज इंडिया’  या स्पर्धेत प्रकल्प सादर करून त्यांनी राष्ट्रीयस्तरावरील १०० शाळांमध्ये ४५वे स्थान मिळवले आहे. यामागची प्रेरणा आहेत, त्यांच्या शिक्षिका वैशाली सूर्यवंशी.

बारावीनंतर डीएड करून वैशाली सूर्यवंशी नाशिक महापालिकेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. २००३ साली नाशिक पालिकेच्या आडगाव या शाळेत त्यांनी साधारण ५ वर्षे काम केले. पालिकेची शाळा म्हणजे अभ्यासाचा आनंदच, या समजुतीला वैशालींनी खोटे ठरवले आणि पहिल्यांदाच त्या शाळेतला एक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकला.

यानंतर काही  कारणांमुळे वैशाली यांनी महापालिकेच्या शाळांतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बदली करून घेतली.  २००७ साली त्यांची बदली झाली जि.प. शाळा मोरेनगर. ता. बागलाण, जि. नाशिक येथे. या शाळेत आधीच तीन शिक्षिका होत्या. आता चौथी शिक्षकही स्त्रीच आहे म्हटल्यावर गावकऱ्यांना वाटले, शाळेचे काही खरे नाही. या बायका मिळून काय मुले घडवणार?ह्ण त्यामुळेच त्यांनी वैशालीताईंना रुजू होण्यासाठीच विरोध केला. पण आज बदली झाल्यानंतरसुद्धा याच त्याच शाळेतून वैशाली यांना स्नेहसंमेलनासाठी आग्रहाचे बोलावणे येते.  गावकऱ्यांच्या शंकांना आत्मविश्वासात बदलण्याचे बळ वैशाली यांनी मिळवले आपल्या शैक्षणिक प्रयोगांतून.

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची भरपूर तयारी करून घेत वैशालीताईंनी शाळेतील तब्बल सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणून दाखवले आणि गावकऱ्यांचा विश्वास हळूहळू बसू लागला.

हा सारा भाग आदिवासीबहुल. त्यामुळे आदिवासी मुले, सालगडय़ांची मुले आणि गावातील मुले अशी सगळ्या प्रकारची सरमिसळ विद्यार्थीवर्गात होती. त्यांची सामाजिक परिस्थिती एकमेकांपासून अगदी भिन्न मग साऱ्यांना एका समान सूत्रात आणण्यासाठी वैशालींनी सण-उत्सवांचाच आधार घ्यायचे ठरवले. वर्षांतील प्रत्येक सण त्यांनी वेगळ्या प्रकारे साजरा केला. अगदी रूढ सणांसोबत आदिवासी समाजातील सणही साजरे केले. अंधश्रद्धा बाजूला ठेवत नव्या वैज्ञानिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून तो सण साजरा करण्याचे त्यांनी ठरवले. उदा. वटपौर्णिमेच्या दिवशी झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व सांगितले गेले तर नवरात्रातील चक्रीपूजेच्या उत्सवातून स्त्रीसबलीकरण आणि शिक्षणाचा आगळा संदेश दिला गेला. चक्रीपूजा हा त्या भागातील महत्त्वाचा सण. परंतु देवीची ही पूजा केवळ घरातील पुरुष करतात, अशी प्रथा. शाळेमध्ये मात्र या सणामध्ये पूजेचा मान विद्यार्थिनींना दिला गेला. तसेच देवीसोबतच पुस्तके, शैक्षणिक साहित्य, सावित्रीबाई फुले यांसारख्या आधुनिक देवता तिथे विराजमान झाल्या होत्या. वैशाली म्हणतात, ‘या सण-उत्सवांतून आम्ही, शाळा गावातल्या महिलांशी थेट जोडले गेलो. शिवाय या सणांच्या निमित्ताने गरीब घरांतल्या अनेक मुलांना पारंपरिक पदार्थ चाखायला मिळाले.’ हीच गोष्ट होती, नाताळ सणाची. या सणाला येणारा सांताबाबा मुलांसाठी खाऊ खेळणी आणतो. पण मोरेनगरच्या शाळेतला सांताक्लॉज मात्र स्वच्छतेचे देणे घेऊन आला होता. कारण शाळेतील गरीब विद्यार्थ्यांकडे साबण, नेलकटर, आरसा, कंगवा अशा साध्या साध्या गोष्टी नसत. त्या वस्तूंची भेट त्यांना मिळाली, स्वच्छतेच्या सांताक्लॉजकडून.

आदिवासी भागातील अनेक मुलींची शाळा पाचवी-सहावीनंतर बंद होई आणि त्या दहावीत जायच्या आत त्यांची लग्नही करून दिली जात. अनेक शेतमजूर, आदिवासी स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा, त्रासाचा प्रतिकार कसा करावा, याची काहीच माहिती नसे. आपल्यासाठी कुणी उभे राहू शकेल, हेही त्यांना माहिती नसे. हे त्यांना माहिती करून देण्यासाठीच वैशालीताईंच्या पुढाकाराने गावात निर्भया पथकह्ण उभारले गेले. त्यातून जनजागृती करण्यात आली आणि अनेकींना आधार मिळाला. गावकऱ्यांसाठी हे उपक्रम राबवत असताना शाळेतही वैशालींनी विविध उपक्रम सुरूच ठेवले होते. कार्यानुभव हा तसा दुर्लक्षित विषय पण वैशालीताईंचा मात्र त्यावर विशेष भर आहे. कागद हा रोजच्या कचऱ्यातील महत्त्वाचा भाग. पण कचऱ्यात जाणाऱ्या या कागदाला कलेमध्ये बदलले वैशालीताई आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी. कागद भिजवून त्याच्या लगद्यापासून निरनिराळ्या वस्तू बनवल्या गेल्या. त्याचसोबत कागदी बाहुल्या, शैक्षणिक साहित्य तयार झाले. बोलक्या बाहुल्यांच्या प्रयोगातून अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजू लागल्या. दिवाळीसाठी किल्ले, आकाशकंदील बनवणे विद्यार्थ्यांच्या आवडीचे. त्यामुळे नेहमीचा आकाशकंदील बनवतानाच शैक्षणिक आकाशकंदील बनवला तर, अशी कल्पना वैशाली आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सुचली. मग अनेक संकल्पना त्यांच्या संज्ञांसह, अर्थासह शैक्षणिक आकाशकंदिलात सजल्या. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणासाठी प्रतिकूल वातावरण होते.  त्यामुळे त्यांना भाषा, गणित समजून येण्यासाठी वैशालींनी शक्कल लढवली. अक्षरे, शब्द, संख्या यांची छोटी कार्डे तयार केली आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला, ड्रेसला आणि चक्क चपलेलासुद्धा ही कार्डे लावली जायची. त्यामुळे फक्त शाळेतच नव्हे तर घरी गेल्यावरही हा अभ्यास मुलांच्या डोळ्यासमोरच राहायचा.

याचसोबत शाळेने प्रभावीपणे राबवलेली आणखी एक योजना म्हणजे पिगी बँक. वैशाली यांच्या सहशिक्षकाच्या कल्पनेतून ही बँक साकारली होती. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांची एक छोटीशी बचत बँक असायची. नातेवाईकांनी खाऊला, बक्षीस म्हणून दिलेले पैसे विद्यार्थी या बँकेत साठवत आणि मग शैक्षणिक साहित्य किंवा इतर गरजांवर खर्च करत. एकदा एका आदिवासी विद्यार्थ्यांची आई आजारी होती. तिच्या औषधासाठी घरात पैसा नसताना त्याने आपल्या बचत बँकेत साठवलेले तब्बल १०० रु. ऐनवेळी उपयोगी पडले. त्याच्या आईला उपचार मिळाले. याच शाळेतील एका मुलीच्या हृदयाला छिद्र होते. तिचे वडील हमाल तर आई मोलमजुरी करणारी. तिच्यासाठी गावकऱ्यांकडून मदत गोळा केली गेली तेव्हा शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याही बचत बँकेतले पैसे आपल्या मैत्रिणीसाठी दिले होते.  विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी गोळा करण्याची सवय असते. त्यांना परिसरातील रंगीबेरंगी दगड गोळा करायला लावून वैशाली यांनी त्या दगडापासून विविध कलाकृती तयार करून घेतल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली.

मोरेनगर  शाळेतील ११ वर्षांच्या सेवेनंतर  वैशालीची बदली झाली,   सध्या गेले एक वर्ष वैशाली चांदवड तालुक्यातीलच जि.प. शाळा पांढरी वस्ती येथे कार्यरत आहेत. या शाळेत पटसंख्या केवळ १७ होती. जी आता १९ आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन वैशाली यांनी डिझाइन फॉर चेंज इंडियाह्ण या प्रकल्पामध्ये धडक मारली आहे. त्यात एखाद्या समस्येवर विद्यार्थ्यांना स्वत: उत्तर शोधायचे असते. या विद्यार्थ्यांनी कचऱ्याच्या समस्येवर  प्रभावी उपाय सांगणारा प्रकल्प सादर केला आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर ४५वा क्रमांक मिळाला आहे. एकूणच पटसंख्या कमी असली तरी वैशाली सूर्यवंशी यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.