सिंगुआ विद्यापीठ, बीजिंग

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – सिंगुआ विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. राजधानी बीजिंगमध्ये स्थित असलेले हे विद्यापीठ जागतिक स्तरावर अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान या विषयांतील संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. सिंगुआ विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पंधराव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९११ साली झालेली आहे. सिंगुआ विद्यापीठ हे गेली कित्येक वर्षे चीनमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. सिंगुआ विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ असून चीनी सरकारच्या ‘सी-९  लीग’ हा एक महत्त्वाचा सदस्य आहे. ‘सेल्फ डिसिप्लिन अ‍ॅण्ड सोशल कमिटमेंट’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

सिंगुआ विद्यापीठ एकूण ९८० एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. सिंगुआचा मध्यवर्ती कॅम्पस हा बीजिंग शहराच्या उत्तर-पश्चिम भागातील हैडीयान जिल्ह्य़ामध्ये स्थित आहे. आज सिंगुआमध्ये तीन हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. जवळपास छत्तीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. यांपैकी सरासरी साडेतीन हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ११० वेगवेगळ्या देशांमधून येथे दरवर्षी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी येतात.

अभ्यासक्रम – सिंगुआ विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. हे सर्व अभ्यासक्रम चिनी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठामध्ये एकूण वीस महाविद्यालये आणि ५७ प्रमुख विभाग कार्यरत आहेत. यामध्ये मेडिसिन, विज्ञान, औषध आणि दंतचिकित्सा, आरेखन आणि पर्यावरण, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, संगणन आणि संगीत, फाइन आर्ट्स, फॉरेस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, पब्लिक हेल्थ, आर्किटेक्चर, नìसग, नाटय़ आणि व्यवस्थापन इत्यादी प्रमुख विभागांचा समावेश आहे. विद्यापीठातील या विभागांतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. सिंगुआ विद्यापीठामधील या विभागांच्या माध्यमातून एकूण ५१ पदवी अभ्यासक्रम, १३९ पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि १०७ पीएचडी अभ्यासक्रम विद्यापीठाकडून चालवले जातात. यावरूनच चिनी विद्यापीठांमध्ये संशोधनाला दिल्या जात असलेल्या प्राधान्याची कल्पना येते. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठाने विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वा संस्थांबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा – सिंगुआ विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच इंटरनेटसहित इतर सर्व अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेल्या ‘द झीजिंग इंटरनॅशनल स्टुडंट्स अपार्टमेंट’ या वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये जवळपास दोन हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या निवासाची उत्तम सोय होऊ शकते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाशिवाय इतरत्रसुद्धा राहू शकतात, मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृतरीत्या मदत करणारी व्यवस्था नाही. शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चिनी शासनाच्या शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत.

वैशिष्टय़ – चीनमधील राजकीय क्षेत्रातील अनेक चेहरे हे सिंगुआ विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. चीनचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतलेले आहेत. विद्यापीठाने चीनमधील अनेक प्राध्यापक, उद्योजक आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. संशोधनासाठी हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे. विद्यापीठाकडून संशोधन क्षेत्रावर प्रचंड गुंतवणूक केली जाते. आतापर्यंत या विद्यापीठाच्या दोन विद्यार्थी वा प्राध्यापकांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.

संकेतस्थळ  http://www.tsinghua.edu.cn/publish/newthuen/