डॉ श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात खेळाकडे आणि त्यावरील करिअरकडे पाहण्याचा वडिलांचा दृष्टिकोन.

माझ्या वडिलांचे शिक्षण फारसं झालं नव्हतं. ते मनपामध्ये कारकून म्हणून चिकटले होते मॅट्रिक झाल्यावरच. मला मोठ्या तीन बहिणी. दोन खोल्यांचा चाळीतला संसार. आई किरकोळ घरगुती बनवलेले पदार्थ विकून संसाराला मदत करायची. सुदैवाने आणि तिन्ही बहिणी देखण्या असल्यामुळे त्यांची लग्ने पटापट झाली. मुलींच्या शिक्षणाचा व कॉलेजचा खर्च टळला यात आईने आनंदच मानला. मात्र मोठ्या बहिणी ज्यावेळी माहेरी येत त्या वेळेला प्रत्येकीच्या बोलण्यात काहीतरी हुरहुर असे. ती माझ्या लहान वयात कायम कानी पडत असे. लहान असलो तरी कळत्या वयात ते सारे मनावर कायम ठसत गेले.

अचानक हाती आली बॅट

माझ्या मनातली रुखरुख वेगळीच टेनिसच्या बॉलने एखादे फळकुट घेऊन क्रिकेट खेळणे हा आमच्या गल्लीतला साऱ्यांचा आवडता खेळ. तासंतास त्यात रंगून जाणे व गृहपाठ करायचा राहिला म्हणून शिक्षकांची बोलणी खाणे हा माझा एक हातखंडा प्रयोग बऱ्याचदा यशस्वी होत असल्यामुळे माझी मार्कांची गाडी ७० टक्के पलीकडे फारशी कधी गेली नाही. दहावीला काय झाले कुणास ठाऊक पण मी खूप मन लावून अभ्यास केला आणि ८२ टक्के मार्काने पास झालो. घरी आल्यानंतर निकालाचे कौतुक करण्याकरता आईने मला विचारले तुला काय पाहिजे? क्षणाचाही विचार न करता मला नवी कोरी बॅट पाहिजे म्हणून मी हट्ट धरला. बॅटचा हट्ट धरत असताना वडिलांचा पडलेला चेहरा मला लक्षात सुद्धा आला नाही. कारण त्या काळात एका बॅटची किंमत त्यांच्या निम्म्या पगारा एवढी होती. मात्र, आईने तिच्या डब्यातील सारी गंगाजळी वडिलांच्या हातात सुपूर्द केली व त्यात भर घालून दुसऱ्या दिवशी नवी कोरी बॅट माझ्या हाती आली व माझा आनंद खराखुरा निकाल लागल्यासारखा द्विगुणीत झाला. मी मित्रांबरोबर खेळायला निघून गेलो. तोच काळ काय, पण आज सुद्धा ज्याची बॅट त्याची पहिली बॅटिंग ही पद्धत रूढ होती. भरपूर बॉलिंग चोपून, धावांचा पाऊस पाडणे हा माझा छंदच बनला होता. जमेल तसे शिकायचे, पण क्रिकेटर बनायचे अशी स्वप्ने मला रोज रात्री पडत असत. एके दिवशी संध्याकाळी अंधार पडेपर्यंत आमचे मॅच लांबली. पण मॅच मध्ये माझ्या ५२ धावा झाल्या त्याच्या केलेल्या कौतुकातच मी दंग होतो.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : पंजाब नॅशनल बँकेत भरती

विजयाच्या कौतुकात मागे लावलेले तीन स्टंप उपटून दोन हातात घेतले, ते खांद्यावर टाकले आणि मित्रांशी गप्पा मारतच मी घरी पोचलो. आईने विचारले अरे स्टंप आणलेस, पण बॅट कुठेय? मग मात्र ५२ धावा करून जिंकलेली मॅच, मित्रांशी झालेल्या गप्पा यातून मी खाडकन जागा झालो व धावत धावत ग्राउंडवर गेलो. बरोबर एक मित्र होता दोघांनी मिळून सारे ग्राउंड पुन्हा पुन्हा पालथे घातले बॅटचा काही पत्ता नव्हता. माझे क्रिकेटचे स्वप्न त्यादिवशी पूर्णत: भंगले ते कायमचेच.

यथावकाश इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाला मला प्रवेश मिळाला व तो पूर्ण करून मी नोकरीला लागलो. क्रिकेट मात्र बॅट हरवल्यापासून बंद पडले होते. शिक्षण झाले, नोकरी लागली त्याच्या आनंदात मी दंग होतो. सुदैवाने कंपनी व मालक दोन्ही चांगले असल्यामुळे प्रगती होत गेली. एका ओळखीच्या मुलीशी लग्नही झाले. लग्नापर्यंत झालेल्या भेटीगाठीत माझ्या क्रिकेटच्या आवडी बद्दल तिला थोडीशी कल्पना आली होती. त्याला तिची कधीच हरकत नव्हती मात्र माझ्या खेळण्याबद्दल व हरवलेल्या बॅट बद्दल मी कधीही उल्लेख केला नाही. आमचे लग्न झाले, अचानक बाबा हार्ट अटॅकने गेले. सर्वार्थाने घराचा कुटुंब प्रमुख म्हणून माझेवर जबाबदारी आली. पण पुरेसा पगार व बाबांचे आईला मिळणारे पेन्शन यामुळे ओडगस्तीची वेळ फारशी आली नाही. काही वर्ष गेली अन् घरात आलेल्या बाळीचे नाव ठेवण्याचे काम माझ्या खेळाची आवड असलेल्या बहिणीने केले. निशिगंधा हे नाव पक्के झाले तेव्हा तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सुखावून गेला.

हेही वाचा >>> सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ विभागात ४ हजार पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

माझ्या लाडक्या निशीचा जन्म झाला आणि या साऱ्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. त्या वेळेला मुली नुकत्याच क्रिकेटमध्ये नाव कमवायला लागल्या होत्या. डायना एदुलजीचा खेळही मी एकदा ग्राउंड वर समक्ष पाहिला होता. जिगसॉ पझलचे तुकडे आता जुळू लागले होते आणि निशीच्या दुसऱ्या वाढदिवसाला माझी हरवलेली बॅट ‘प्लास्टिकच्या बॅटच्या’, स्वरूपात घरी आली. पुढचा आठ दहा वर्षांचा काळ अक्षरश: मंतरलेला सुवर्णकाळ म्हणता येईल असाच होता. निशी खेळात पुढे पुढे जात होती आणि तिची बॅटिंग बघताना जणू काही मी माझा खेळच आठवत होतो. पण म्हणतात ना स्वप्न फार काळ टिकत नाहीत. जाग आली की ती भंगतातच. तसेच काहीसे झाले. बरगडीची दुखापत झाली आणि निशीचे पण क्रिकेट कायमचे थांबले.

भांडणा नंतरचा ती आणि तिची आई यांच्यातील अबोला गेले पाच वर्षे मला अस्वस्थ करून सोडत असे. यावर कोणताच उपाय हाती नव्हता. मला आणि माझ्या खेळाला समजून घेणारी आई सुद्धा याच काळात देवाकडे गेली होती. मात्र निशीने भोपाळला प्रवेश मिळाल्याचे सांगितल्यानंतर एक सुटकेचा रस्ता हाती आला. तिघांमध्ये किमान संवाद तरी सुरू झाला. पाहता पाहता निशीने केलेली प्रगती आम्हाला दोघांनाही स्वप्नवत वाटावी अशीच आहे. जेव्हा निशीने आईला वाढदिवसाला भेटीचा चेक दिला त्या रात्री मात्र माझ्या हरवलेल्या बॅटची साग्र संगीत गोष्ट मी बायकोला ऐकवली…

असं म्हणतात की १४० कोटीच्या क्रिकेटवेड्या देशामध्ये फक्त १४० जणच खेळतात. पण त्यांना पूरक म्हणून एक लाख चाळीस हजार मदतनीसांची गरज असते. निशी आता यांच्यातील एक टीम लीडर बनली आहे हे निर्विवाद सत्य.