यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे. आता मुलांना खूप प्रकारची माहिती, ती देणारी माध्यमं, क्लासेस उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत स्वत:ची क्षमता ओळखून अभ्यास करा. नेटका अभ्यास हे महत्त्वाचे सूत्र आहे. सगळ्याच गोष्टी एकदम करायला गेलात तर गोंधळ उडू शकतो. म्हणून कशा पद्धतीने आणि नेमकेपणाने कसा अभ्यास करायचा हे आधी ठरवणं गरजेचं आहे, असे मार्गदर्शन केलं आहे मंत्रिमंडळ उपसचिव मृण्मयी जोशी यांनी.

मी आठवी-नववीत असतानाच आयएएस होण्याचं ठरवलं होतं. त्याला कारणीभूत ठरलं ते माझ्या घरचं वातावरण. माझ्या घरी कॉम्पिटेटीव्ह सस्केसरिव्ह्यू मासिकं येत असत. ती वाचणं, त्यातले प्रश्न सोडवणं मला आवडायचं. वर्तमानपत्रं वाचणं हा तर शिरस्ताच होता, त्यामुळे अजूबाजूच्यापरिसरातील, देशातील आणि जगभरातील घडामोडींविषयी माहिती मिळवण्यात रस निर्माण झाला.

मानव्यविद्यांमध्ये विशेष रस

ह्युमॅनिटी अर्थात मानव्यविद्यांमध्ये मला विशेष रस होता. त्यातही राज्यशास्त्र हा आवडीचा विषय. घरातल्या वातावरणामुळे माझ्या मनात सामान्यमाणसांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा यासाठी प्रयत्न करण्याचा संस्कार रुजला होता. त्यातूनच मग एनजीओ, पत्रकारिता किंवा एखादीसरकारी नोकरी करावी का, असे विचार माझ्या मनात होते. सरकारी नोकरीत काम केल्यावर आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि एखादी गोष्ट सचोटीने करण्याचे अधिकारही (अर्थात चांगलं काम करण्यासाठी) मिळतात याची जाणीव लहानपणीच होत गेली ती आईच्या सरकारी नोकरीमुळे. माझी आई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होती. अनेक निवाड्यांविषयी, सच्चेपणाविषयी, न्यायदानाविषयी ती आम्हाला घरी सांगत असे… समाजहित हाच माझ्या आई-वडिलांच्या संस्कारातील महत्त्वाचा घटक होता. घरातूनच मला एक सजग नागरिक बनण्याचा संस्कार मिळाला. त्यामुळे लवकर अगदी आठवीत गेल्यावर मी आयएएस होण्याचं मनाशी पक्कं केलं. त्यासाठी मी त्यावेळच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलाखती वाचत असे. आएएस अधिकारी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेत असे. त्यांच्या कामाची पद्धत, ते कोणत्या प्रकारची कामं करतात वा करू शकतात हे कळत गेलं. सामान्य लोकांचं आयुष्य अधिक सुकर करण्यात आयएएस अधिकारी फार मोठी भूमिका बजावू शकतात हे तेव्हाच जाणवलं आणि आयएएस होण्याची इच्छा अधिकच प्रबळ होत गेली. मानव्यशाखेची आवड असल्यानं दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता

अकरावी-बारावी पासून यूपीएससीसाठी मार्गदर्शक ठरतील असे कोर्स केले. त्यासंबंधीत गोष्टींचे वाचन करायला सुरुवात केली. इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन विषय पदवीसाठी निवडले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लॉसाठी प्रवेश घेतला व त्याचाही अभ्यास सुरू केला. त्याचदरम्यान मी यूपीएससीची परीक्षा दिली.

प्लॅन बी आवश्यकच

मी जरी आयएएस करायचं पक्कं केलं होतं तरी प्लॅन बीसुद्धा तयार होता. समजा जर माझी आयएएससाठी निवड झाली नाही तर कायद्याचं शिक्षण घेऊन त्यात करिअर करायचं असं ठरवलं होतं. माझी आई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होती त्यामुळे कायद्याचं पहिल्यापासूनच आकर्षण होतं. माझ्याकडे प्लॅन सीसुद्धा तयार होता – उच्च शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात काम करायचं.

सामाजिक जाणीव महत्त्वाची

मी कॉलेजमध्ये असतानाच एका वर्तमानपत्रासाठी छोटेछोटे लेख लिहीत असे. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखतींची एक मालिका केली होती. स्वातंत्र्यसैनिकांकडून देशाप्रती असलेलं प्रेम, त्यांनी देश स्वातंत्र्य होण्यासाठी केलेली धडपड या गोष्टी माझ्या मनावर खूप परिणाम करून गेल्या. वर्तमानपत्रात लिखाण करताना खूप लोकांशी भेटीगाठी झाल्या, खूप फिरले… हा अनुभव माझ्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा ठरला असं मला वाटतं.

यशअपयशाचा तोल सांभाळताना

या परीक्षेसाठी मेहनत आणि अभ्यासाचं सातत्य याला पर्याय नाही. तुम्हाला जेव्हा अपयश येतं तेव्हा तुम्हाला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. यामुळे तुमच्या मनावर निराशेचं सावट येतं, पण अशा परिस्थितीतही तुम्ही पुन्हा उभारी घेणं गरजेचं असतं. आपण उत्तीर्ण झालो नाही तरी मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न केले याचं समाधान असावं लागतं आणि तेच तुम्हाला पुन्हा उठून उभं राहण्याची ताकद देणारं ठरतं. मी जेव्हा पहिल्यांदा अनुत्तीर्ण झाले तेव्हा खूप निराश झाले होते. पण या वेळेला मी स्वत:चा शंभर टक्के दिलाय ह्याचे समाधान होते. अपयशातून मी खूप काही शिकलेही. मग नेटाने पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून मी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले.

तणावाचे नियोजन

तणावाचे नियोजन करताना अभ्यासाव्यतिरिक्त खूप चांगल्या गोष्टी असतात- ज्यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो. घरी आल्यावर घर हाच माझ्या आनंदाचा परिघ असतो. मग त्यात आपल्या जवळच्या माणसांशी संवाद साधणं असो, स्वयंपाक असो वा वाचन… असं माझ्या आवडीचं काहीही… मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे ताण हा माझ्यासाठी फार बाऊ करण्याचा विषय नसतोच. तुम्ही तुमच्या आजूबाजूला छान माणसं जोडून ठेवली की आपल्याला ताणाचा थकवा फारसा शिवत नाही असा माझा अनुभव आहे.

अभ्यासाचे महत्त्वाचे सूत्र

आता जरी डिजिटल माध्यमाचा आपल्यावर खूप प्रभाव असला तरी नित्य नियमानं वर्तमानपत्र वाचा असं मी आवर्जून सांगेन. वर्तमानपत्रांचं नियमितपणे वाचन हा दंडक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आखूनच घ्यायला हवा. यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे. आता मुलांना खूप प्रकारची माहिती, ती देणारी माध्यमं, क्लासेस उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत स्वत:ची क्षमता ओळखून अभ्यास करा. नेटका अभ्यास हे महत्त्वाचे सूत्र आहे. कुठल्या विषयाचा अभ्यास नेमकेपणाने कसा करायचा हे ठरवा. सगळ्याच गोष्टी एकदम करायला गेलात तर गोंधळ उडू शकतो. म्हणून कशा पद्धतीने आणि नेमकेपणाने कसा अभ्यास करायचा हे आधी ठरवणं गरजेचं आहे.

तुमची क्षमता जाणून घ्या

आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्ही स्वत:ला ओळखा, तुमची क्षमता जाणून घ्या. तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये काम करणार आहात तीही समजून घ्या. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरीत तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे, त्यातील विविध सेवा आणि पदांची माहिती करून घ्या. कारण तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी असता तेव्हा तुम्ही कायम या पदावर नसता. या पदावर दोन, पाच वा जास्तीत जास्त सात वर्षं असता. परंतु या व्यतिरिक्त कोणती पदं असतात याचीही माहिती करून घ्या. या सेवेत तुम्हाला शहरातल्या आधुनिक सोयीसुविधांमध्ये काम करायला मिळू शकतं किंवा ग्रामीण भागातील अभावग्रस्त भागावही काम करायला लागू शकतं. तर या दोन टोकाच्या परिस्थितीत काम करण्यासाठी तुमची मानसिकता करून घ्या. अनेकदा तुम्हाला वेगळी संस्कृती, भाषा, खाद्यासंस्कृती स्वीकारावी लागते. तिथल्या लोकांशी जुळवून घ्यावं लागतं, त्यांना समजून घ्यावं लागतं. या कारणांमुळे तुम्हाला वैयक्तिक आयुष्यातही खूप तडजोडी कराव्या लागतात, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, मग या सर्वांसाठी आपण तयार आहोत का नाही याचा विचार करा. या सेवांमधील आव्हानं आणि समाधान असं दोन्हीही आहेत.

शिक्षणाची आस कायमच

मला शिक्षणाची लहानपणापासूनच आवड होती. मी खूप हुशार विद्यार्थिनी होते असं नाही, पण अभ्यासात मात्र प्रामणिक होते. मी अभ्यास नियमित आणि काटेकारेपणे करायचे. आजही ती सवय कायम आहे. त्यामुळेच कोझिकोडमध्ये म्युनिसिपल कमिशनर असताना मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून शिष्यवृत्ती मिळवून मास्टर्स इन पब्लिक पॉलिसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमाचा पुढे माझ्या कामात खूप फायदा झाला. कारण थेअरी व प्रॅक्टिस असा दोन्हींचा अनुभव या अभ्याक्रमातून मिळाला. या अभ्याक्रमामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर एखादी व्यवस्था कशी काम करते, तिथल्या लोकांशी आलेला संपर्क याविषयी खूप काही शिकता आलं. एक वेगळा व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मिळाला. या अभ्यासक्रमाचा फायदा मला करिअरमध्ये होत आहे.

शब्दांकन : लता दाभोळकर