News Flash

वेगळय़ा वाटा : सेलिब्रिटी व्यवस्थापन

सेलिब्रिटी व्यवस्थापकांसोबतच सोशल मीडिया व्यवस्थापकांनाही मागणी वाढली आहे.

 

गौतम ठक्कर

स्वत:ची प्रतिमा सांभाळण्याची गरज प्रत्येकाला असते. समाजात आपली असणारी प्रतिमा आणि पत डागाळणार नाही याची काळजी कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्ती घेत असते. त्यातही ती व्यक्ती जर का लोकप्रिय, प्रसिद्ध असेल तर मग ही त्यांची निकड बनते. प्रसिद्ध व्यक्ती किंवा ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो अशा व्यक्ती या अनेकांसाठी आदर्श असतात. त्यांच्या चाहत्यांची आणि पाठीराख्यांची संख्या मोठी असते. अशा वेळी कष्टाने मिळवलेले समाजातील हे स्थान टिकवणे थोडेसे किचकट काम असते. त्यातही या व्यक्तींच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांना थेट जनसंपर्क ठेवणे कठीण होते म्हणूनच सेलिब्रिटी व्यवस्थापक (managers) या सगळ्या गोष्टी हाताळत असतात. सोशल मीडियाच्या येण्यामुळे चाहत्यांशी आणि पाठीराख्यांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. खेळ, सिनेमा, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते अशा लोकप्रिय व्यक्तींना डिजीटल मीडियाचा मोठाच फायदा झाला आहे. आणि त्यातूनच सेलिब्रिटी  व्यवस्थापकांसोबतच सोशल मीडिया  व्यवस्थापकांनाही मागणी वाढली आहे.

फायदा काय?

प्रसिद्ध व्यक्तींचे सोशल मीडिया अकाऊंट हाताळणे जिकिरीचे काम आहे. गेल्या काही वर्षांत बहुतांश सेलिब्रिटीजनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. पण या व्यासपीठावर उपस्थित असणे आणि कार्यशील म्हणजेच अ‍ॅक्टिव असणे यात फरक आहे. चाहत्यांना सतत काहीतरी नवीन देणे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणे हे सेलिब्रिटीजसाठी महत्त्वाचे असते. एखाद्या ताज्या प्रकरणावर भाष्य करणे, चाहत्यांना किंवा इतर सेलिब्रिटींना प्रतिक्रिया देणे आणि त्याच वेळी या सगळ्यातून स्वत:ची प्रतिमा सांभाळणे सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होत असते.

कामाचे स्वरूप

ज्या सेलिब्रिटीचे अकाउंट हाताळायचे आहे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असणे सेलिब्रिटी व्यवस्थापकासाठी सर्वात महत्त्वाचे असते. तिचे व्यक्तिमत्त्व, देहबोली, बोलण्याची शैली, पाश्र्वभूमी, चालू तसेच ताज्या घडामोडी असा सगळा तपशील माहिती असणे गरजेचे असते. सोशल मीडियावर पोस्ट करणे, नवीन कल्पक उपक्रमांची आखणी करणे, चाहते आणि पाठीराखे गुंतून राहतील यासाठी एखादी वेगळी मोहीम राबवणे, अशा पद्धतीचे काम सेलिब्रिटी अकाउंट मॅनेजर्सचे असते.

पात्रता

सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजीटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे ज्याचे तांत्रिक शिक्षण कुठेही दिले जात नाही. प्रत्यक्षात काम करायला लागल्यावरच या विषयीचे ज्ञान मिळत जाते.

याशिवाय वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठाविषयीचे तांत्रिक ज्ञान असावे लागते. फेसबुक, ट्विटरशिवाय इन्स्टाग्राम, स्नॅचॅटवर असणाऱ्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमधून चाहते आणि पाठीराख्यांशी असणारा संपर्क कसा वाढेल याचा कल्पकतेने विचार करणे अपेक्षित असते. एका नावाजलेल्या व्यक्तीची प्रतिमा सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असते ही बाब लक्षात असू द्या. त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे वापरली जाणारी भाषा आणि त्यातून चाहत्यांपर्यंत जाणारा संदेश फारच महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पोस्ट लिहिताना प्रतिशब्दांचा विचार करणे महत्त्वाचे असते.

अभ्यासक्रम

जनसंपर्क (पब्लिक रिलेशन्स)या विषयाशी संबंधित जे अभ्यासक्रम आहेत तेच अभ्यासक्रम सेलिब्रिटी व्यवस्थापनासाठी लागू होतात. मात्र या अभ्यासक्रमांच्या चौकटीतच अडकून राहू नका. त्या पलीकडे जाऊन व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण करत राहा. त्यातून मिळणारे ज्ञानच अनेक गोष्टी शिकवून जाईल.

  • मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स, मुंबई विद्यापीठ-
  • संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग, दुसरा मजला, हेल्थ सेंटर, कलिना कॅम्पस, मुंबई
  • डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन्स – झेव्हियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स, महापालिका मार्ग, मुंबई
  • डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन्स- वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, एल.एन. रोड, पोदार कॉलेज जवळ, माटुंगा

(लेखक एव्हरीमीडिया टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 12:55 am

Web Title: celebrity management
Next Stories
1 नोकरीची संधी
2 राजीव गांधी योजनेच्या अटी व फायदे
3 यूपीएससीची तयारी : वृत्तीतून वर्तनाकडे..
Just Now!
X