News Flash

पुस्तकं आयुष्य बदलवणारी.. इतिहास घडविणारी..

शब्दांच्याच माध्यमातून पुस्तकं आपल्याला किती आणि काय-काय देतात ते सांगायला शब्दच अपुरे वाटतात.

सुमारे नव्वद वर्षांपासून लिहिल्या गेलेल्या अनेक नामवंत लेखिकांच्या पुस्तकांतील वास्तव दुर्दैवाने आजही कायम आहे, बदललं आहे ते म्हणजे अनेक स्त्रिया लिहित्या झाल्या.. यंदाच्या ‘जागतिक ग्रंथ दिना’निमित्त (२३ एप्रिल) म्हणूनच हा खास धांडोळा, स्त्रियांनी लिहिलेल्या, आयुष्य बदलवणाऱ्या, इतिहास घडविणाऱ्या जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या पुस्तकांचा..

मीना वैशंपायन

..अशी ही पुस्तकं!

वाचू लागलो, तर कुठून कुठे घेऊन जातात,

मग केवळ गोष्टी, कविता राहात नाहीत त्या.

कशी कोण जाणे, कुठली तरी किल्ली फिरते,

आणि

कोणत्या काळात, कोणत्या जगात,

कोणत्या प्रश्नांसोबत,

गतकाळातल्याही आधीच्या काळात,

कधी मृत्यूनंतरच्या काळात,

आपल्या मनात किती खोलखोल, आणि तरी

आपल्यापासून किती तरी दूरवर

घेऊन जातात ही पुस्तकं.

कधी कधी कळणंही अवघड

(ख्यातनाम हिंदी कवी विष्णू खरे यांच्या ‘हसरत’ या कवितेतील काही ओळींचा भावानुवाद)

पुस्तकांची ही अशी जादूई शक्ती प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवतो. शब्दांच्याच माध्यमातून पुस्तकं आपल्याला किती आणि काय-काय देतात ते सांगायला शब्दच अपुरे वाटतात. मानवी संस्कृतीने साध्य केलेल्या, आपलं जीवन संपन्न करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये पुस्तकांची निर्मिती करण्याची संकल्पना, त्यामागचा विचार फार मोलाचा आहे. आपल्याला उत्तमोत्तम विचार देणारी, भिन्नभिन्न काळ, समाज, संस्कृती यामधील दुवा ठरणारी पुस्तकं, कधी आपली आयुष्यं बदलण्याची, परिवर्तन घडविण्याची प्रेरणा अनेकांना देत असतात.

गेल्या वर्षीच्या ‘जागतिक ग्रंथ दिना’चं (२३ एप्रिल) घोषवाक्य होतं, ‘वाचन हा माझा हक्क आहे.’ यंदाचं घोषवाक्य आहे, एकमेकांना गोष्टी सांगा, (साहित्यामधून) संवाद साधा. यानिमित्तानं, गेल्या पन्नासेक वर्षांत, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रकाशित झालेल्या, टिकून राहिलेल्या, जगावर, समाजावर प्रभाव टाकणाऱ्या, परिणाम केलेल्या, चच्रेत असणाऱ्या, स्त्रीलिखित पुस्तकांसंबंधी निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात. एकविसाव्या शतकाच्या या दीड दशकात अनेक लक्षणीय पुस्तकं आली आहेत; पण त्यांचा प्रभाव व त्यांची लोकप्रियता यात गल्लत न करता, तो प्रभाव तात्कालिक आहे की खोलवरचा आहे हे कळायला थोडा काळ जाऊ दिला पाहिजे. अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांमधून, सर्वेक्षणासारख्या औपचारिक किंवा गटवार चर्चासारख्या अनौपचारिक साधनांद्वारे हा परिणाम जोखला जातो. त्यांची मदत घेत मला महत्त्वाची वाटणारी, स्त्रीलिखित व सर्वाधिक प्रभावी अशी दहाएक पुस्तके मी निवडली आहेत. आताचा तरुण पिढीतील वाचकही ती पुस्तके आवर्जून वाचतो. जागतिक पातळीवर (आवडलं नाही तरी) इंग्रजीचाच अपरिहार्य वापर व प्रसार आज सर्व क्षेत्रांत, तसाच ग्रंथव्यवहारातही आहे. या निवडीत ती मर्यादा होतीच.

आधुनिक जगात बहुतेक सर्व क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करत, सक्षमतेनं आपला ठसा उमटवत असणाऱ्या स्त्रीला या टप्प्यापर्यंत येण्यासाठी स्त्रीमुक्तिवादाची चळवळ उभी करावी लागली. स्त्रीजागृती करण्यासाठी अभ्यासपूर्ण वैचारिक लेखन करण्याची गरज आहे हे लक्षात येताच, ललित व ललितेतर लेखनही अनेकींनी केले. त्या लेखनाचा प्रभाव सर्व समाजावरच झाला.

यात पहिलं नाव घेतलं जातं ते व्हर्जिनिंया वूल्फ हिच्या ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ या पुस्तकाचं. कालदृष्टय़ा आधीचं (१९३०) पुस्तक असूनही आज ते कालबाह्य़ वाटत नाही. तिच्या कादंबऱ्या, त्यातील प्रयोगशीलतेसाठी जशा वाखाणल्या जातात, तसंच तिचं वैचारिक लेखन त्यातील चिंतनशीलता, व्यासंग, लालित्य, सडेतोडपणा व कळकळ यासाठी वाचलं जातं. ‘अ रूम.’मध्ये तिनं स्त्रियांच्या तोवरच्या लेखनकर्तृत्वाचा शोध घेत, त्यांच्यातील लेखनगुणांना पुरेसा वाव का मिळाला नाही, याची अपारंपरिक पद्धतीनं, काहीशा उपरोधिक शैलीत चिकित्सा केली आहे. कोणतंही सर्जन, निर्मिती होण्यासाठी मनाची एकाग्रता होणं आवश्यक असतं. बाईला त्यासाठी तिचा अवकाश मिळाला पाहिजे आणि तेवढी मनाची स्वस्थता व आर्थिक स्थर्य पाहिजे, असं तिचं प्रतिपादन आहे. शीर्षकात म्हटलेली खोली ही प्रतीकात्मक आहे. (अमृता प्रीतम यांनी नंतर मांडलेली ‘चौथा कमरा’ ही कल्पना याच्याशीच जुळणारी आहे.) हे लेखन स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून लिहिले नव्हते, पण स्त्रिया व लेखन यासंबंधीची तिची मते पटल्याने त्या पुस्तकाचे स्वागत झाले. तिच्या अभिजात शैलीचाही त्यात वाटा होता.

व्हर्जिनियाच्या मते, स्त्रीच्या अंगी विविध क्षमता असल्या तरी त्यांचा परिपोष करण्याएवढी सवड त्यांना नसते. तिचं घर सर्वच गोष्टींमध्ये तिच्यावर अवलंबून असतं. घर सांभाळताना तिला मानसिक एकाग्रता साधणं कठीण असतं. पुरुषांसारखी अभ्यासिका, ग्रंथालयं तिला उपलब्ध होऊ शकत नाहीत. (त्या काळात पाश्चात्त्य देशांतही स्त्रियांनी शिक्षणासाठी बाहेर जाणं समाजमान्य नव्हतं.) आज बऱ्याच ठिकाणी अजूनही केवळ मुलांच्या शिक्षणाला मिळणारं प्राधान्य पाहून, तपशील बदलले तरी दृष्टिकोनात फरक होत नाही का, असा प्रश्न उभा राहतो. व्हर्जिनिया म्हणते, ‘‘कविता, कथा यांच्यापलीकडे स्त्रिया लेखन करत नाहीत, त्या चांगल्या चरित्रकार, इतिहासलेखिका होऊ शकत नाहीत. लेखनाचे हे प्रांत केवळ पुरुषांचे आहेत, त्या चांगल्या लेखिका नसतात, अशीच समाजाची समजूत आहे. ती फारच चुकीची आहे.’’ स्त्रियांना पुरेसा वेळ व अवकाश मिळाला तर त्याही उत्तम लेखन करू शकतील, असा आशावाद तिनं व्यक्त केला आहे. स्त्रीवादी चळवळीला व स्त्रियांना नवा विचार देणाऱ्या या पुस्तकाने पुढे स्त्रियांना लिहितंही केलं. अगदी अलीकडे २०१० मध्ये, एका तरुण, होतकरू लेखिकेने आपण या पुस्तकामुळे प्रभावित झाल्याची नोंद आपल्या ब्लॉगवर केलेली दिसते.

स्त्रीसंबंधी अगदी मूलभूत स्वरूपाचं, ऐतिहासिक मोलाचं लेखन केलं ते व्हर्जिनियानंतर वीसेक वर्षांनी.. सीमॉन द बोव्हुआर या फ्रेंच बंडखोर लेखिकेनं. ‘द सेकंड सेक्स’ (१९५३) या पुस्तकाने बरीच खळबळ माजली. अनेकांना प्रेरक ठरलेला हा ग्रंथराज सीमॉनने अवघ्या दोन वर्षांत लिहिला असला तरी त्यामागे दहा-बारा वर्षांचं चिंतन होतं. ‘मला माझाच शोध घ्यावासा वाटला, पण मी म्हणजे कोण हे ठरवताना आधी स्त्री म्हणजे नेमकं काय असा स्वत:लाच प्रश्न विचारायला हवा’, हे जाणवून ती म्हणते, ‘समाजानं किती प्रकारांनी स्त्रीला छळलंय, तिचे प्रश्न जाणून तरी कुठे घेतले आहेत? स्त्री म्हणजे केवळ एक गर्भाशय असंच तर मानलं जातं. स्त्री जन्माला येत नाही, ती समाजाकडून, पुरुषांकडून ठाकूनठोकून स्त्री म्हणून घडवली जाते.’

स्त्रियांसंबंधी तोवर लिहिलं गेलेलं सारं काही अभ्यासून तिनं गतकाळातील स्त्रीजीवनाची मांडणी तर केलीच, पण शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून, मानसशास्त्राच्या दृष्टीने बाई कशी असते हे शास्त्राधारे मांडलं. आधीच्या पुरुष साहित्यकारांनी स्त्रीला कोणत्या रूपात पाहिलं, तिचं चित्रण कसं केलं याचाही विचार मांडला. याचबरोबर स्त्रीत्व म्हणजे काय, तिच्या मर्यादा कोणत्या, याचा विचार करत तिनं एक प्रकारे स्त्रियांना व समाजालाही धोक्याचा इशारा देत म्हटलं, ‘स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवायला हवंच, पण ते मिळवताना आपले नातेसंबंध, आपले लैंगिक संबंध, आपल्या जोडीदाराबरोबरचं आपलं जीवन यांची परिमाणं बदलतील आणि ते आव्हान आपण पेललं पाहिजे याचा विचार करायला हवा. विशेषत: आर्थिक स्वातंत्र्याचा विचार काळजीपूर्वक करायला हवा.’ व्हर्जिनियाने मांडलेला आर्थिक स्थर्याचा मुद्दा तिने पुढे नेला.

‘मुली व मुलगे यांना लहानपणापासून समाजाकडून वेगळी वागणूक दिली जाते, मुलींच्या हालचालींवर, कपडय़ांवर अनेक बंधने घातली जातात, त्यामुळे तिच्याकडून सामाजिक अपेक्षा वाढत जातात.’ तिने केलेल्या अशा अनेक विधानांवर खूप टीकाही झाली. या साऱ्यांपेक्षा आपण वेगळ्या आहोत, आपल्याला स्त्री म्हणून कोणताही त्रास नाही, असं म्हणत तिनं या प्रश्नाकडे अभ्यास म्हणून पाहिल्यामुळे लिखाण अभ्यासपूर्ण झालं खरं, पण त्यातील तिची त्रयस्थ, अलिप्त वृत्ती लोकांना खटकली. मात्र ५०-६० वर्षांपूर्वीच्या या पायाभूत पुस्तकाचं मोल वर्तमानातील अभ्यासकांना व जाणकारांना आहे.

‘स्त्रिया या समाजाकडून घडवल्या जातात’ या सीमॉनच्या म्हणण्याची पुष्टी करणारं आणि स्त्रियांना त्यांच्या गृहिणीपदावरून गदगदा हलवून बाहेरच्या जगात आणणारं पुस्तक होतं,

बेटी फ्रीडन या अमेरिकन पत्रकार, कार्यकर्तीचं ‘द फेमिनाइन मिस्टीक’ – (१९६३). कोणताही विशेष बंडखोर विचार न मांडणारं हे पुस्तक त्या काळातील अमेरिकन स्त्रीजीवनावर प्रभाव टाकणारं तर होतंच, पण फार लोकप्रियही होतं. त्याचं कारण होतं, त्या बंडखोर पुस्तकाने घराघरांत मिळवलेला प्रवेश! बेटी फ्रीडनने स्त्रियांविषयी जो विचार मांडला होता तो त्यापूर्वी अभ्यासकांनी, विद्वानांनी मांडलेला होता; पण त्यांचे विचार ज्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक होतं त्यांच्यापर्यंत ते पोचले नाहीत आणि पोचले ते संदिग्धपणे वा त्रुटित स्वरूपात; पण बेटीचं पुस्तक नावापासूनच आकर्षक होतं. बाईपणाचं कोणतं गूढ यात सांगितलंय अशी उत्सुकता होती. बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकन स्त्रियांची आयुष्यं त्या वेळी नवरा, मुलं याभोवती फिरत होती. गृहिणीपदाची कर्तव्यं निभावताना, चोवीस तास कामात अडकलेली, तर कधी पतीबरोबर बाहुली म्हणून मिरवत राहणारी स्त्री घुसमटत होती. तिचा जीव कोंडला होता. या स्त्रियांपर्यंत हे पुस्तक पोचलं, त्याची जाहिरात तोंडीच होत गेली. ‘स्त्रियांच्या या समस्येला नाव नाही, निश्चित रूप नाही,’ असं बेटी म्हणते. त्याच प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या स्त्रियांवर त्याचा जबरदस्त प्रभाव पडला. या पुस्तकाने स्त्रियांच्या मनातल्या कोंडमाऱ्याला, खदखदीला वाचा फुटली. स्त्रीवादाला एक सांस्कृतिक चालना मिळाली.

या पुस्तकाने सामाजिक समानतेचं एक संघटित ध्येय दिलं. याशिवाय कष्टकरी वर्गातील स्त्री-पुरुषांचा संघर्ष, समान वेतनाचा प्रश्न, कृष्णवर्णीय किंवा ज्यू यांच्याशी निगडित वांशिक संघर्ष यासाठी मार्ग दाखवण्याचा नकळत प्रयत्न झाला, असे अभ्यासकांनी दाखवले आहे.

आपल्या पुस्तकातील दोनेक प्रकरणांची प्रेरणा मला सीमॉनच्या लेखनाने दिली, अशी कबुली देताना बेटीने आपण हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला हेच अधोरेखित केले आहे.

या अत्यंत परिणामकारक पुस्तकाने प्रेरित होऊन, २५ वर्षांनंतर या दिशेने झालेला प्रयत्न म्हणजे नाओमी वुल्फ या अमेरिकन पत्रकार, लेखिकेचं ‘द ब्युटी मिथ’ (१९९१) हे पुस्तक.

आपल्या पुस्तकातील दोनेक प्रकरणांची प्रेरणा मला सीमॉनच्या लेखनाने दिली, अशी कबुली देताना बेटीने आपण हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला हेच अधोरेखित केले आहे.

या अत्यंत परिणामकारक पुस्तकाने प्रेरित होऊन, २५ वर्षांनंतर या दिशेने झालेला प्रयत्न म्हणजे नाओमी वुल्फ या अमेरिकन पत्रकार, लेखिकेचं ‘द ब्युटी मिथ’ (१९९१) हे पुस्तक. या पुस्तकाचे उपशीर्षक होते, ‘सौंदर्यकल्पनांचा स्त्रीविरोधात होणारा वापर.’ स्त्रीदेह कसा असावा याच्या कल्पना पुरुषांनी ठरवायच्या आणि स्त्रियांनी आपल्या शरीरस्वास्थ्याचा विचार न करता त्या अमलात आणण्यासाठी, जिवापाड, आटोकाट धडपड करायची हे वर्षांनुवर्षे अनुभवलेले सत्य. पुरुषाच्या इच्छेप्रमाणे स्त्रीने सौंदर्याच्या या दंतकथेत गुंतले पाहिजे व कायम तसे राहिले पाहिजे हे त्यांच्या मनावर इतके बिंबलेले दिसते, की अलीकडे त्यापायी त्या आपल्या समानतेच्या मूळ संघर्षांलाही विसरल्या आहेत.

प्रसारमाध्यमे व फॅशनउद्योग यांच्या या बाबतीतील हिकमतींचा अनुभव रोज घेत असूनही बहुतेक स्त्रिया त्या जाहिरातींना बळी पडतात. यामुळे स्त्रियांचे आरोग्य वेगवेगळ्या प्रकारे धोक्यात येते, पण त्याची फिकीर त्या करत नाहीत. यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो त्यांना त्यांचे अग्रक्रम ठरवता येत नाहीत, पण ऐकणार कोण? आपण सौंदर्य प्रसाधनांशिवाय राहणे किंवा समाजातील प्रचलित कल्पनांप्रमाणे न वागणे म्हणजे आपली सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात घालणेच आहे, अशी स्त्रियांची ठाम समजूत आहे. नाओमीच्या मतानुसार आजवर स्त्रियांनी संघर्षपूर्वक अनेक कायदेशीर व व्यावहारिक अडथळे उल्लंघले, पण त्याहून अधिक कठोर, हिंस्र अशा बाजारू सौंदर्यकल्पनांच्या अडथळ्यांवर मात्र त्या मात करू शकत नाहीत. मग त्यानुसार अनावश्यक अशा प्लॅस्टिक सर्जरी करून घेणं असो किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहून नवनवीन दुखण्यांना निमंत्रण देणं असो. हे सारं केवळ अमेरिकेत नाही तर जगभर कमी-अधिक प्रमाणात तसेच आहे.

नाओमी म्हणते, ‘जरा समंजस स्त्रियांच्या मनात अशी भावना आहे की, आज खूप स्त्रियांना पूर्वीच्या मानाने खूप पसा, सत्ता, संधी आणि अनुकूल कायदे यांचा लाभ मिळतो. आमच्या आज्या स्वतंत्र नव्हत्या, पण त्यांना जेवढं स्वास्थ्य होतं तेवढं शरीरस्वास्थ्यही आम्हाला नाही.’ या पुस्तकाने स्त्रिया प्रभावित झाल्या खऱ्या, पण त्या अंतर्मुख झाल्या तर पुस्तकाचं सार्थक!

ही सारी वैचारिक पुस्तके स्त्रीवादाशी निगडित आहेत हे पाहून वाटेल की, लेखिकांची प्रभावी पुस्तके म्हणजे केवळ स्त्री-मुक्ती चळवळ. खरं म्हणजे त्या काळाची आत्यंतिक गरज म्हणून अशी पुस्तके पोटतिडिकीने लिहिली गेली, आणि त्यामुळेच ती परिणामकारक ठरली. जागेच्या मर्यादेमुळे यात मेरी मॅकार्थी, जम्रेन ग्रिअरसारख्या इतर विचारवंत, आक्रमक स्त्रीवादी लेखिकांचे लेखन विचारात घेतले नाही. मात्र स्त्रीच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा व तर्कशुद्ध सद्धांतिक मांडणीचा आविष्कार करणाऱ्या रशियन-अमेरिकन कादंबरीकार आयन रॅण्ड हिच्याशिवाय पुढे जाता येत नाही. आयन रॅण्डने आपल्या ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ व ‘फाऊन्टनहेड’ या कादंबऱ्यांचे लेखन आपले तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केला. मानवी मेंदूची तर्कशक्ती व वस्तुनिष्ठतावाद यांना प्रमाण मानणाऱ्या आयनने कायमच व्यक्तीला आयुष्याचे केंद्र मानले. व्यक्ती व तिचं यश, व्यक्तित्व यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. स्वतबद्दल उत्तुंग कल्पना असावी, भव्य स्वप्नं असावीत आणि त्यासाठी कितीही संकटं आली तरी आपण आदर्श जीवन जगावं अशी तिची धारणा होती.

‘अ‍ॅटलास श्रग्ड’मध्ये मानवी मनाच्या पायाभूत भूमिकेचं चित्रण ती करते. यातून तिने प्रस्थापित समाजातील अनेक परंपरा निरुपयोगी ठरवल्या. धर्मपालन, नीती-अनीती, चांगले-वाईट, त्याग आणि स्वार्थ या साया कल्पनांच्या रूढ व्याख्यांना मोडीत काढत तिने आपल्या नवीन व्याख्या तयार करीत एका आदर्शवादाची स्थापना केली. कोणत्याही प्रकारच्या कनिष्ठ दर्जाशी तडजोड करणे तिला मान्य नव्हते. आपले तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तिला कादंबरीलेखन हाच मार्ग योग्य वाटला. तिच्या कादंबऱ्यांनी विविध उद्योगपती, उच्चपदस्थ यांना प्रभावित केले. वेगळे सिद्धांत लोकांच्या पचनी पडले नाहीत, तरी कादंबरी म्हणून त्या(ती) वाचल्या(ली) गेल्या(ली). तिने अनेक लेख लिहून, चर्चासत्रांमधून आपले म्हणणे मांडले. किती तरी अनुयायी तिला मिळाले पण ते सिद्धांत व्यवहारात उतरवणे सामान्यांना कठीण होते. तत्त्वचिंतक कादंबरीकार म्हणून तिचे स्थान वादातीत राहिले.

दोन महायुद्धे, कृष्णवर्णीयांची वसाहतकालीन आयुष्यं, त्यांच्या मनावरील न पुसले जाणारे ठसे, गौरवर्णीयांचे वर्णविद्वेष, वर्गभेद या सगळ्यांची कलात्मक चित्रणे आफ्रिकन-अमेरिकन व युरोपियन साहित्यात खूप मोठय़ा प्रमाणावर झालेली आहेत. यातील अनेक लेखिकांनी आपल्या ललित साहित्यातून वा आत्मचरित्रातून फार स्पष्टपणे आपल्यावरील अन्याय, आपला झालेला छळ यांना वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे या चित्रणांमध्ये आक्रस्ताळेपणा वा स्वत:ची कीव अभावानेच आढळते. नायजेरियन लेखिका चिमामान्डा न्गोजी अदिची हिच्या स्थलांतरित मुलीसंबंधीची ‘अमेरिकाना’, किंवा नायजेरियन यादवी युद्धासंबंधित ‘हाफ ऑफ अ यलो सन’, ‘पर्पल हिबिस्कस’ या कादंबऱ्या, अलिस वॉकर हिची ‘कलर पर्पल’ यांचीही नोंद घ्यायला हवी.

या सर्वात कवयित्री व आत्मचरित्रकार माया अन्जेलू हिच्या कविता व सप्तखंडात्मक आत्मचरित्र फारच प्रभावी आहे. आय नो व्हाय द केज्ड बर्ड सिंग्ज (१९६९) हा आत्मचरित्राचा पहिला भाग हृदयद्रावक आहे. तिसऱ्या वर्षांपासून ते वयाच्या सोळाव्या वर्षी मूल होण्यापर्यंतचं, क्षणोक्षणी कसोटी पाहणारं मायाचं आयुष्य व तिचा अस्तित्वसंघर्ष अकल्पनीय वाटतो. आयुष्यानं सारंच नाकारलेली माया, व्यक्तिमत्त्वातला कणखरपणा आणि साहित्यावरचं अनावर प्रेम यामुळे कशी तरली त्याची ही कहाणी आहे. प्रौढ माया व किशोरी माया अशा दोन व्यक्तित्वांची गुंफण करत हे आत्मचरित्र पुढे जात राहतं. अपमान, अत्याचार, मृत्यूची सतत असणारी छाया, या सर्वातून दिसणारी तिची जीवननिष्ठा आणि आयुष्याबद्दलची सकारात्मक भावना यामुळे तिच्याबद्दल वाचकाच्या मनात आदर निर्माण होतो व त्याच्यावर खोलवर परिणाम होतो. तिच्या या लेखनाचे कौतुक सर्वानी, – गौरवर्णीय व कृष्णवर्णीय यांनी केलं हे विशेष. आफ्रिकन-अमेरिकन संस्कृतीतील हे लेखन अपरिहार्य आहे. पॉल डनबार यांच्या कवितेची ओळ शीर्षकरूपाने वापरत पिंजऱ्यातील बंदिस्त पक्ष्याचं रूपक तिने सर्वत्र सार्थपणे वापरले आहे.

गुलामगिरीच्या कालखंडात कृष्णवर्णीयांना सोसाव्या लागलेल्या शारीरिक छळाच्या खुणा, कालांतराने पुसट झाल्या असतील, पण मनाच्या जखमा भरून आल्या नाहीत. वेगवेगळ्या भयगंडांनी ते पछाडलेले राहिले. त्यातून मग कोणतीही अघोरी कृत्ये करण्याची त्यांची मानसिकता व त्यातून उद्भवणारे प्रश्न या साहित्यात मोठय़ा प्रमाणावर दिसतात. मात्र त्या लेखनाला कलात्मकतेची जोड मिळते तेव्हा ते ‘अक्षर वाङ्मय’ होते.

 

नोबेल पुरस्कार विजेती पहिली कृष्णवर्णीय लेखिका टोनी मॉरिसन हिच्या ‘बिलव्हेड’ या कादंबरीत भूतकाळ व वर्तमानकाळ यातील झोक्यांचा खेळ, तिने वापरलेल्या प्रतिमा, तिची शैली यांनी वाचकांवर मोठाच परिणाम केला. आपल्यासारखं गुलामीचं आयुष्य आपल्या मुलांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून त्यांना मारून टाकणारी व आयुष्यभर ते दुख वागवणारी सेथी आपल्या मनातून जातच नाही. असंख्य जीवनं उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या गुलामगिरीच्या भयानक आघाताचं चित्र आणि त्या दडपल्या गेलेल्या आठवणींचं ओझं आपण विसरू शकत नाही. टोनी म्हणते, ‘‘अगणित लोकांनी सहन केलेल्या यातनांचं जगाला विस्मरण होऊ नये, म्हणून ही अक्षरांची स्मारके आपण उभारली आहेत.’’ या भूमिकेचा लोकांवर अधिक परिणाम झाला आहे.

या आफ्रिकन-अमेरिकन साहित्याबरोबरच हार्पर ली यांच्या ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ या वेधक कादंबरीचा परिणाम विशेष झालेला दिसतो. एका गौरवर्णीय लेखिकेने ज्या संवेदनशीलतेने वंशभेद आणि वर्णसंकर या विषवल्लींच्या परिणामाबद्दल लिहिलेय ते फार परिणामकारक आहे. लहान मुलांच्या कोमल भावनांवर प्रौढांकडून होणारे मानसिक अत्याचार आणि त्यामुळे नष्ट होणारे त्यांचे बाल्य आणि निष्पापपण, शहाण्या माणसांनी ठरवून या वर्णभेदाविरुद्ध लढा देणे, त्यातील ताण या साऱ्याचे स्पष्ट, संयत, प्रसंगी उपरोधिक चित्रण यामुळे या कादंबरीने अभिजात साहित्यात स्थान मिळवले. ‘ली’च्या चित्रमय शैलीने, नर्मविनोदाने, तिने हाताळलेल्या वर्गभेद, लिंगभेद या विषयांची आवश्यकता पटल्याने हे पुस्तक अनेक शाळांमध्येही शिकवले जावे असा निर्णय झाला. अमेरिकेत नागरी हक्कांसंबंधीची चळवळ जेव्हा भरात होती तेव्हा ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यामुळे माणूस आपले पूर्वग्रह सोडून, न्यायासाठी, माणुसकी जपण्यासाठी लढा देऊ शकतो, असा संदेश देणाऱ्या या पुस्तकाने वाचकांना, इतर लेखकांनाही प्रेरणा मिळाली.

इतिहासात नेहमीच असे दिसते की, अनेक कायदे करून किंवा जुलूम-जबरदस्तीने जे साध्य होत नाही, ते कलेच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून साध्य होते. इथे लेखण्या बंदुकांऐवजी परिणामकारक ठरतात. त्यामुळे होणारा परिणाम हा अधिक टिकाऊ व मन:पूर्वक असतो. तो विधायकतेकडे, परिवर्तनाकडे घेऊन जातो. दुसऱ्या महायुद्धातील नाझी छळछावण्या, ज्यूंचे शिरकाण या विषयी आपण पुष्कळ वाचले-ऐकले-पाहिलेले असते. तरीही ‘डायरी ऑफ अ यंग गर्ल-अ‍ॅन फ्रॅन्क’ आपण विसरू शकत नाही. त्यातील निरागसता, लोक, परिसर याबद्दलची तिची निरीक्षणे, वयात येणाऱ्या मुलीची भावांदोलने, तिच्यावर ओढवलेला प्रसंग आणि तिचा करुण अंत याचा चटका कुणाही वाचकाला लागतो. मोठय़ा प्रमाणावर वाचल्या गेलेल्या, वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या यादीत या डायरीचे स्थान अजूनही वरचे आहे.

अ‍ॅन फ्रॅन्कच्या डायरीप्रमाणेच लहान वयात तालिबानींच्या हातून जिच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण सुदैवाने जिचा जीव वाचला, त्या मलाला युसुफझाई हिच्या ‘आय अ‍ॅम मलाला’ या  पुस्तकावरही लोकांच्या पसंतीची मोहोर उमटली. शिक्षणासाठी, विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी जिने इतक्या लहान वयात प्रयत्न केले तिला नोबेल शांतता पुरस्कार तर मिळालाच, पण लोकांनी मन:पूर्वक दाद दिली. तिचे इवलेसे आयुष्य किती तरी भयानक घटनांनी भरलेले, पण तिचे धाडसही तेवढेच आश्चर्यकारक आणि तिची समजूतही मोठय़ांना अनुकरणीय. अ‍ॅन फ्रॅन्क आणि मलाला वयाने साधारण सारख्या, दोघींवर जिवावरचे प्रसंग आले. अ‍ॅनने तर या जगाचा निरोपच घेतला. पण जाण्यापूर्वी तिने म्हटले, ‘हे सगळं घडलं तरीही माझी खात्री आहे की लोक मनाने चांगलेच असतात.’ मलालादेखील अतिशय सकारात्मक विचार करते आणि समाजहितासाठी प्रयत्न करते. किशोरवयीन मुलांची ही प्रगल्भता थक्क करणारी आहे.

लहान मुलांवर व मोठय़ांवरही मोठा प्रभाव पडलेल्या पुस्तकांत आज हॅरी पॉटरच्या सर्व कादंबऱ्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आणि होगार्ट या जादूच्या शाळेने, हॅरीसकट सगळ्या व्यक्तिरेखांनी लोकांना वेड लावले. मुलांना एका वेगळ्या विश्वाची सफर घडवताना वापरलेली विलक्षण सर्जक कल्पनाशक्ती, अद्भुताचा वापर, चांगल्या-वाईटाचा संघर्ष व चांगल्याचा जय असं सारं जे. के. रोलिंगने यात गतिमान केलं आहे. मुलं त्या अद्भुत विश्वात रमली नसती तरच नवल! मुलांवर एवढा प्रभाव पाडणाऱ्या या पुस्तकांच्या प्रसारात जाहिरातकला व माध्यमं यांचा प्रचंड वाटा आहे हे खरंच ! तरीही पुस्तकं घेण्यासाठी मुलांनी रांगा लावाव्यात आणि पुस्तक संपेपर्यंत खाली ठेवू नयेत हे किती आशादायी व आनंददायकही!

आधुनिक जगातील जगण्याचा बदललेला पोत, अनेक पातळींवर चाललेली द्वेषमूलक हिंसा, समाजाची अधिकाधिक आत्मकेंद्रितता, स्वार्थाचा परमावधी आणि एकीकडे आपल्या अचाट बुद्धीने माणूस करत असलेल्या चांगल्या-वाईट करामती अशा कोलाहलात वर निर्देशलेल्या पुस्तकांसारखी पुस्तकं मनाला शांतवतात. त्यांचीच खरी सोबत वाटते. मग तत्त्वज्ञ कवी इमर्सन म्हणतो ते पटतं की, ‘काही पुस्तकं तुम्हाला मोकळं सोडतात आणि काही तुम्हाला स्वतंत्र करतात.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:14 am

Web Title: article on world book day
Next Stories
1 गर्भावस्थेतील आहार
2 हा भारत माझा (?)
3 स्वत:मधला माणूस शोधताना