27 February 2021

News Flash

पुरुष हृदय ‘बाई’ : तुकडय़ा-तुकडय़ातला पुरुष

 स्त्री ही अशी आहे, पुरुष हा असा आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातला एक धागा त्यांच्या उत्क्रांतीशी जोडलेला असतोच.

(संग्रहित छायाचित्र)

|| उत्पल व बा

utpalvb@gmail.com

आज जो ‘पुरुष’ दिसतो आहे तो मुळातूनच तसा आहे की त्याच्यावर अनेक सामाजिक आवरणं चढली आहेत? याचं उत्तर संमिश्र आहे. पण सामाजिक आवरणं का चढवली गेली आहेत हा मात्र नेमका आणि गंभीर प्रश्न आहे. आणि तिथं हे मान्य करायला हवं की मानवीअस्तित्वाच्या लढय़ापासून आजवर आपण जे जे प्रमुख व्यवस्थात्मक, संकल्पनात्मक टप्पे अनुभवले त्यात पुरुषाचा वाटा मोठा आहे. मला आकळलेला पुरुष हा इतिहास-वर्तमानाचं ओझं घेऊन जगणारा, तुकडय़ा-तुकडय़ातला पुरुष आहे.

‘लिंगाधारित वर्गीकरण’ हा मानव समूहामधील वर्गीकरणाचा एक पूर्णत: जैविक पाया असलेला प्रकार आहे. आर्थिक- सामाजिक- राजकीय वर्गीकरणाचा तिथं संबंध पोहोचत नाही. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष हिंदू, मुस्लीम, पारंपरिक, आधुनिक, लोकशाहीवादी, हुकूमशाहीवादी काहीही असले तरी ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’च राहतात.

‘जेंडर’- लिंगभाव- ही आज एका जागी घट्ट उभी असलेली संकल्पना म्हणून अस्तित्वात नाही. ती एक प्रवाही संकल्पना म्हणून पुढे येते आहे  आणि लिंगविशिष्ट आग्रह, भिन्नलिंगी संबंधांनाच सामाजिक मान्यता या सगळ्याला आव्हान देते आहे. लिंगभाव प्रवाही होण्याच्या काळात ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ ही ठळक विभागणी मला खरं तर काहीशी अपुरी वाटू लागली आहे. पण स्त्री व पुरुष या ‘पुरातन जैविकते’चं संख्यात्मक प्राबल्य लक्षात घेता या प्रमुख विभागणीभोवती एक मोठं सामाजिक चर्चाविश्व फिरत राहिलं आहे.

यातील दुसरा मुद्दा किंवा विभागणीचा दुसरा निकष – पुनरुत्पादनाचा आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या उत्क्रांतीमध्ये लैंगिक पुनरुत्पादन हा कळीचा घटक ठरला आहे. जीवसृष्टीच्या एका आदिम अवस्थेत अलैंगिक पुनरुत्पादन अस्तित्वात होतं. काही सजीवांमध्ये लैंगिक पुनरुत्पादन कसं विकसित झालं हा एक मोठाच अभ्यासविषय आहे. परंतु लैंगिक पुनरुत्पादन सुरू झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष या संकल्पना अस्तित्वात आल्या असं म्हणता येईल. त्यांच्या अस्तित्वावर पुढे समाजव्यवस्थेने अनेक आवरणं अर्थातच चढवली. पण आपण जर आदिम स्वरूपाकडे गेलो तर ते लैंगिक पुनरुत्पादनाशी जोडलेलं आहे, असं दिसेल.

स्त्री ही अशी आहे, पुरुष हा असा आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातला एक धागा त्यांच्या उत्क्रांतीशी जोडलेला असतोच. तो धागा कमी-अधिक प्रमाणात कच्चा-पक्का असू शकतो. पण तो नसतोच असं म्हणणं धाडसाचं आहे. ‘शेवटी तो पुरुषच’, ‘शेवटी त्याने आपला रंग दाखवलाच,’ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याच्या ‘पुरुष असण्याच्या’ काही मूलभूत गुणधर्माकडे निर्देश करत असतो. असे काही गुणधर्म जे सामाजिकतेच्या आवरणाखालून डोकं वर काढत असतात.

‘मला पुरुष कसा दिसतो?’ किंवा ‘मला आकळलेला पुरुष’ या प्रश्नांवर विचार करताना मला सिमॉन द बोवा या प्रख्यात अस्तित्ववादी  स्त्रीवादी विचारवंताच्या प्रसिद्ध विधानाची आठवण होते. (विचारवंत या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप माहीत नाही. बहुधा नसावं. स्त्री-पुरुष विभागणी केवळ जैविक-सामाजिक नाही तर शाब्दिकही आहे. खरं तर भाषेच्या रचनेतून आणि वापरातून ही विभागणी अधिक घट्ट व्हायला मदत झाली आहे, असं म्हणायला वाव आहे. सांस्कृतिक विकासाची बरीच अंगं असतात. हे त्यातलंच एक. असो.) ‘स्त्री ही जन्मत नाही. स्त्री घडवली जाते.’ असं ते विधान आहे. हे विधान इतरही संदर्भात खरं ठरेल. चोर किंवा खुनी जन्मत:च चोर किंवा खुनी असतो की तो तसा ‘घडतो’ असा विचार केला तर बहुतांश उदाहरणात तो ‘घडतो’ असं आपल्याला दिसेल. इथं व्यक्तीला दोषमुक्त करण्याचा उद्देश नसून व्यक्तीतील दोष हे पूर्णपणे त्याचे आहेत की ते विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून निर्माण झाले आहेत हे तपासण्याचा उद्देश आहे. पुरुषांबाबतही हे विधान करता येईल, असं मला वाटतं. आज जो ‘पुरुष’ दिसतो आहे तो मुळातूनच तसा आहे की त्याच्यावर अनेक सामाजिक आवरणं चढली आहेत? याचं उत्तर संमिश्र आहे. पण सामाजिक आवरणं का चढवली गेली आहेत हा मात्र नेमका आणि गंभीर प्रश्न आहे. आणि तिथं हे मान्य करायला हवं की मानवी अस्तित्वाच्या लढय़ापासून आजवर आपण जे जे प्रमुख व्यवस्थात्मक, संकल्पनात्मक टप्पे अनुभवले त्यात पुरुषाचा वाटा मोठा आहे. माणसाच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासाकडे नजर टाकली तर तो पुरुषाने प्रभावित केलेला आहे; किंबहुना पुरुषाने डिझाइन केला आहे, असं आपल्याला दिसेल. मानवी समाजव्यवस्था स्त्रीप्रधान होती व नंतर ती पुरुषप्रधानतेकडे गेली, असं अनेक संशोधक सांगतात. हा स्वतंत्र अभ्यासविषय आहे, परंतु गेल्या काही शतकांचा ज्ञात इतिहास प्रामुख्याने पुरुषांच्या वर्चस्वाची आणि हे वर्चस्व अबाधित राहावं म्हणून झालेल्या संघर्षांची कथा सांगतो.

शेतीचा शोध लागल्यावर अतिरिक्त उत्पादन तयार होऊ लागलं आणि तिथून खासगी मालमत्ता, श्रमविभागणी, समाज वर्गामध्ये विभागला जाणं या गोष्टी घट्ट होऊ लागल्या. या भल्यामोठय़ा प्रवासात पुरुषाची मुख्य भूमिका जनक, संरक्षक, पुरवठादार, नियोजक, संघटक, नियंत्रक अशी राहिली आहे. (यातली ‘नियंत्रक’ ही भूमिका महत्त्वाची आहे. इतर भूमिकांमध्ये स्त्रीदेखील होती, पण परिणामकारक, कळीच्या बाबींवरील नियंत्रण तिच्याकडे नव्हतं.) धर्म, राज्यसंस्था, राष्ट्र या संकल्पना व त्यानुसारच्या व्यवस्थांचं जनकत्वही पुरुषाकडे जातं. आज समाजजीवनाचे विविध आयाम पुरुष प्रभावित राहिले आहेत याचं कारण या ऐतिहासिक वाटचालीत आहे.

पण मग गुणात्मकदृष्टय़ा पाहिलं तर पूर्वीचा- म्हणजे खूप मागे न जाता शंभर-दोनशे वर्षांपूर्वीचा- पुरुष आणि आजचा पुरुष यात काहीच फरक पडला नाही का? तर पडला. तो सकारात्मकही आहे. सामाजिक प्रबोधनाबरोबरच बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे, आर्थिक आघाडीवरील अपरिहार्यतेमुळे घरकामात सहभाग, समताधिष्ठित मूल्यांची जाणीव, एकूण मानसिकेतेमधील बदल याबाबत पुरुषांमध्ये बदल झालेला दिसतो. मात्र त्याच्या ‘डिफॉल्ट सेटिंग’मध्ये नक्की किती फरक पडला आहे हे तपासावं लागेल. यासाठी पुरुषाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला हरकत नाहीच, न्यायाची निकड म्हणून त्याला दोषी ठरवायलाही हरकत नाही; परंतु ‘व्यापक विश्लेषण करताना ‘स्पेसिफिक’ (विशिष्ट) विश्लेषण चुकत नाही ना, किंवा ते राहूनच जात नाही ना हेही तपासणं आवश्यक आहे. आपल्याला जे जे सामाजिक प्रश्न दिसतात, ज्या गोष्टी टोचतात त्यातील काही गोष्टी आजार नसून ‘आजाराची लक्षणं’ असतात. मूळ आजार वेगळा असतो आणि त्याला त्याचा एक इतिहास-भूगोल असतो.

अल्बर्ट आइन्स्टाइनचं एक प्रसिद्ध विधान आहे, ‘प्रश्न ज्या पातळीवर निर्माण झाला आहे त्याच पातळीवर उभं राहून तो सोडवता येत नाही. त्यासाठी ती पातळी सोडून वरच्या पातळीवर जावं लागतं.’ त्यामुळे समाजात, विशेषत: पुरुषांमध्ये, आहे त्याच आर्थिक-राजकीय व्यवस्थेत राहून अधिक टिकाऊ स्वरूपाचे मूल्यात्मक बदल होतील असं मानणं थोडं भाबडेपणाचं होईल. ते अजिबात शक्य नाही असं नाही, पण त्याला एक मर्यादा नक्की आहे. दैनंदिन जगण्यातील अनेक अपरिहार्यतांमध्ये अडकलेला माणूस त्यातून बाहेर पडून शांतपणे सम्यक विचार जोवर करू शकत नाही तोवर मूल्यात्मक बदल संथगतीनेच होतील.

आज माणसाच्या जगण्याचा प्रमुख आयाम आर्थिक आहे. माणसाच्या विचारविश्वाचं पहिलं नियमन आर्थिक चौकट करते. त्यामुळे आर्थिक क्षमता हीच जर अस्तित्वाची मुख्य कसोटी असेल तर इतर गोष्टींकडे लक्ष जाण्याइतपत अवकाशच मिळू शकणार नाही. हेच लग्नासारख्या सामाजिक चौकटीबाबतही म्हणता येईल. स्त्री-पुरुष संबंधांचं समाजमान्य प्रकटीकरण फक्त विवाहातूनच होणार असेल तर ती चौकट दोघांनाही जाचक ठरेल. या चौकटीशिवायचं स्त्री-पुरुष नातं हे अधिक स्वतंत्र, सहज आणि सक्षम असेल.

‘मला आकळलेला पुरुष’ याच्या पोटात ‘कुठल्या चौकटीतला पुरुष’ हे अध्याहृत आहे. माझ्या घरासमोर रस्त्याचं खोदकाम करणारा कंत्राटी मजूर, ड्रेनेज सफाई करणारा आणि ती सफाई दारू प्यायल्याशिवाय करता येत नाही म्हणून दारूची सवय लागलेला कामगार, अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वर चढत गेलेला माझा जवळचा मित्र, साहित्य क्षेत्रात नाव कमावलेला लेखक मित्र, स्त्री चळवळीशी जोडलेला कार्यकर्ता मित्र, मी आजवर जिथं जिथं नोकरी केली तिथले माझे बॉस, माझ्या घरात ज्याने फर्निचरचं काम केलं तो बिहारमधून महाराष्ट्रात आलेला सुतार, अनेक वर्ष सामाजिक-राजकीय क्षेत्रात राहून सत्तेच्या जवळ गेलेला माझ्या परिसरातला राजकारणी, माझ्या घरी फूड डिलिव्हरी किंवा कुरियर डिलिव्हरीसाठी येणारे वीस ते पन्नास अशा वयोगटातील पुरुष, गेली अनेक वर्ष नियमित येणारा पोस्टमन हे सगळे पुरुष मला वेगवेगळी कथा सांगताहेत. (माझ्या घरी धुणं-भांडी करणाऱ्या मावशीदेखील मला एक कथा सांगतात. स्वतंत्रपणे मला हे सगळे जण कळतात, त्यांच्या अडचणी, त्यांच्यातील फरक आणि साम्यस्थळे कळतात. पण मला सर्वाधिक अस्वस्थ करते ती ज्या व्यवस्थेने हे एकत्र बांधले गेले आहेत (आणि जी बहुतांशी पुरुषांनीच लावली आहे) ती व्यवस्था. मला असं दिसतं की, ही व्यवस्था स्त्री आणि पुरुष घडवते आहे आणि या व्यवस्थेच्या चौकटीचं प्रतिबिंब त्यांच्या वर्तनावर, व्यक्तिमत्त्वावर पडतं आहे.

आज पुरुष हा एक ‘स्त्री प्रश्न’ असला तरी पुरुषाचेही प्रश्न आहेतच. मुद्दा ‘वेटेज’चा आहे आणि त्यावरूनच प्रश्नाचं गांभीर्य ठरत असतं हे बरोबर. मुद्दा असा की, सामाजिक इतिहास आणि वर्तमान असंख्य ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’च्या परिणामांमधून आकारास येत असतं. म्हणूनच ते समजून घ्यायचं तर सरसकटीकरण टाळून ‘स्पेसिफिक’वर बोलावं लागेल. लक्षणांवर मर्यादित चर्चा करून आजारावर अधिक चर्चा करावी लागेल.

आज मला आकळलेला पुरुष हा इतिहास-वर्तमानाचं ओझं घेऊन जगणारा, तुकडय़ा-तुकडय़ातला पुरुष आहे. त्याला एकसंध करायचं तर आपल्याला एकत्रितपणे पुरुषविशिष्ट वृत्तीसह आजच्या व्यवस्थेवरही काम करावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:25 am

Web Title: men in pieces chaturang article purush hruday bai abn 97
Next Stories
1 चित्रकर्ती : कामगार ते कलाकार
2 कथा दालन : व्हॅनिला आइस्क्रीम
3 महामोहजाल : ऑनलाइन जगाचा धोका
Just Now!
X