डॉ नंदू मुलमुले

‘आपल्या मनासारखं कसं कधीच झालं नाही?…’ असं म्हणून निष्क्रिय व्हायचं? की ‘आहे तो काळ उत्तम जगू या,’ म्हणत वाटचाल करायची? हे प्रत्येकावर आहे. मालूआजींनी आपल्या तापट नवऱ्याला बदलण्याचे प्रयत्न जन्मभर केले. पण त्याच प्रयत्नांत त्यांना स्वत:चं उर्वरित आयुष्य कसं जगायचं हे उमगलं. सोबतीचं बळ असंही असतं!

Loksatta chaturang Women World Issues of Menstrual Leave
स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
representation, women,
स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
no alt text set
सांधा बदलताना: वैष्णव जन…
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल
loksatta chaturang girl friend creative rival
माझी मैत्रीण : ‘Y’ची मैत्रीण ‘X’!
women, women Unwanted Touch, unwanted touch to women body in crowded place, unwanted touch to women body, patriarchy society, patriarchy society in women life, women article,
‘भय’भूती : पायात बांधलेला भयाचा दोरा!

पिंपरकर आजोबा गेल्याच्या तिसऱ्याच दिवशी मालूआजी आपले नेहमीचे कापडी बूट घालून रोजच्याप्रमाणे भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडल्या, तेव्हा वेटाळातल्या काहींना आश्चर्याचा सौम्य धक्का बसला. काहींना ते निष्कारण आगाऊपणाचं वाटलं. मात्र जे आजींना जवळून ओळखणारे होते, त्यांना काहीसं बरंच वाटलं. या वयात टिकवलेल्या त्यांच्या उत्साहाचं ते उत्तम लक्षण वाटलं.

हेही वाचा : शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

‘‘काय आजी? फिरायला?…’’ लठ्ठपणामुळे दोन्ही गुडघे धरून बसलेल्या, अजिबात व्यायामबियाम न करणाऱ्या सुधामावशींनी टोकलंच. त्यांच्या मुलानं नुकतीच त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. ‘दीड लाखाला वाटी पडली,’ हे साऱ्या आळीला माहीत झालं होतं! खरंतर त्यांना ‘तिसऱ्याच दिवशी?’ असं विचारायचं होतं, पण मालूआजींच्या दमदार चालीमुळे ते म्हणायची हिम्मतच झाली नाही! ‘‘काय करणार घरी बसून? आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यावी… म्हणजे मुलांवर आपल्या आजाराचा भार नको!’’ मालूआजींनी क्षणभरही न थांबता सुधामावशींचं तोंड बंद केलं आणि त्या नेहमीप्रमाणे झपझप चालू लागल्या.

मालूताईंचं लग्न होऊन त्या सासरी आल्या, तो काळ असेल साठीचा. पोष्टात नोकरी करणारा जावई मिळाला, यातच आई-वडील खूश होते! ‘संसार उत्तम झाला’ म्हणण्यापेक्षा मालूताईंनी तो केला, असं म्हणणं अधिक सयुक्तिक. याचं कारण नवऱ्याचा तापट स्वभाव. जिथे पिंपरकर घराण्यानंही त्याच्या स्वभावाचा चांगलाच ताप भोगला होता, तिथे नव्यानं घरात आलेल्या नवरीचं काय?

हेही वाचा :स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

सासू-सासऱ्यांचा स्वभाव शांत होता, एवढाच मालूताईंना दिलासा. ‘मुलानं आपल्या जमदग्नी आजोबांचा वारसा घेतला,’ असं सासऱ्यांचं मत. काही गुण एक पिढी ओलांडून जातात म्हणे. याचा अर्थ आपला नातू एखाद्वेळी संतापी निघेल, मात्र पोरं शांत असतील, एवढाच बोध मालूताईंनी या चर्चेतून घेतला! पण ज्याच्याबरोबर सारं आयुष्य काढायचं आहे त्या सहचराचं काय?… ‘मनानं दादा चांगला आहे हो! फक्त कधी कधी रागात आला, की आपण चांगले आहोत हे विसरून जातो,’ असं नणंद म्हणे. आता या वाक्यातून नेमका काय अर्थ काढायचा त्याच जाणोत! ‘चावतो आमचा कुत्रा. पण दात खूप स्वच्छ असतात बरं का त्याचे!’ असं म्हटल्यासारखंच हेही! स्वच्छ दातांनी काय जखमा होत नाहीत? की त्या जखमा सुगंधी असतात?…

सुरुवातीला कशाकशानं नवऱ्याचा पारा चढतो, हे समजून घेण्यात काही वर्षं गेली. नंतर तो कशानं उतरतो, हे शोधून काढण्यात गेली. वस्तू जागच्या जागी सापडल्या नाहीत की तो रागावतो, वेळेवर पान वाढलं नाही की संतापतो, जेवणात रोज गरम कढी हवी, ती नसली की उखडतो, संध्याकाळी घरी आल्यावर बायको कुणी शेजारीण घेऊन गप्पा मारत बसलेली दिसली की त्याचा पारा चढतो… एक ना दोन. नवऱ्याला शांत ठेवणं आणि संसार करणं या कसरतीत जवळपास सारं क्रियाशील आयुष्य निघून गेलं.

दरम्यान, मुलांना वाढवणं, वडिलांच्या स्वभावाची सावली त्यांच्यावर पडू नये याची काळजी घेणं, हेही जरुरी. अशा ‘हिटलरी’ घरात मुलं एकतर विझून जातात किंवा बंडखोर होतात. मात्र वडिलांचा स्वभाव समजून घेणं, त्यांच्याविषयी मुलांच्या मनात अप्रीती निर्माण होऊ न देणं, ते करत असलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणं, या संस्कारांच्या परीक्षेत मालूताई उतरल्या. दोन्ही मुलं तशी शांत स्वभावाची निघाली. आपलं शिक्षण पूर्ण करून संसाराला लागली. थोरला शिकला त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला, तर धाकटा केंद्र शासनाच्या नोकरीत दूर शिमल्याला निघून गेला.

हेही वाचा :सांदीत सापडलेले : सुट्टी!

घरात थोरली सून आली. आता तरी नवऱ्याचा स्वभाव शांत होईल असं मालूताईंना वाटलं, पण माणसाचा स्वभाव शरीराला त्वचा चिकटून असावी तसा चिकटलेला असतो. वयानं तो सौम्य होतो, म्हणण्यापेक्षा तो सहन करून घेणारे घटत गेले की तो व्यक्त करायला माणसं उरत नाहीत हे अधिक सत्य! विळीला धार उरली नाही, की ती बोथट होऊन काहीच चिरलं जाऊ नये आणि निरुपद्रवी होऊन ती कोपऱ्यात पडून राहावी तसं झालं होतं. मुलं आपल्या व्यापात अडकली. त्यात सून नोकरी करणारी असल्यानं तरुण पिढी व्यग्र होऊन गेली. हक्काची ऐकून घेणारी उरली बायको!

मात्र नवरा निवृत्त झाला, आजोबा झाला, मालूताई ‘मालूआजी’ झाल्या, त्यासरशी त्यांनी आपल्या आयुष्याची घडी नव्यानं बसवायला सुरुवात केली. साधारण चाळिशीतच त्यांना पहाटे उठून फिरायला जायची सवय लागली होती, ती पुढे त्यांनी सातत्यानं जपली होती. अगदी मुलांची लग्नं लागली त्या दिवशीही त्या मंगल कार्यालयाभोवती अर्धा तास फिरून आल्या होत्या. नवऱ्याकडून त्याबद्दल बोलणीही खाल्ली होती, कारण एरवी त्यांचं फिरणं आटपेस्तोवर ढाराढूर झोपणारा नवरा त्या दिवशी लवकर उठून बसला होता.

नवरा निवृत्त झाला, सून आली आणि घराचे अग्रक्रम बदलले. सर्वसाधारण कुटुंबांत सूत्रं मुलाच्या हाती जाणं आणि ज्येष्ठांनी व्यवस्थापनात मानद सल्लागार होऊन राहणं अभिप्रेत. पिंपरकर घराण्यात मात्र आजोबांनी नातू येईपर्यंत कारभार हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र लवकरच घरची आणि बाहेरची कामं करण्याची धावपळ आपल्याला जमत नाही, हे त्यांच्याही लक्षात आलं. मग त्यांनी नाईलाजानं शस्त्रं खाली ठेवली. मालूआजींनी सूज्ञपणे, ज्याला एकेकाळी ‘कमरेच्या किल्ल्या हवाली करणे’ म्हणायचे, ते काम केलं. सहजतेनं सारे अधिकार सुनेच्या हवाली करून टाकले. स्वयंपाकघरात लुडबुड न करणं, फक्त गरज असल्यास आणि मागितल्यास मदत करणं, हे पहिलं सूत्र. कारण संघर्षाची पहिली ठिणगी स्वयंपाकघरातल्या लायटरनं उडते हे अनेक घरांत त्यांनी पाहिलं होतं. काही गोष्टींकडे कानाडोळा करणं घरातल्या शांतीच्या दृष्टीनं इष्ट, हे मालूआजी ओळखून होत्या. वय वाढतं तसं ऐकायला कमी येणं आणि दृष्टी अधू होणं, ही निसर्गाची योजना याचसाठी!

हेही वाचा : माझी मैत्रीण : जिवाभावाची…

साधारण सकाळी सहाला त्या घराबाहेर पडत. दोनएक किलोमीटर अंतरावर पालिकेच्या बगिचात जात. तिथे गोल फिरून हिरवळीवर बसत. इतर बायकाही येऊन टेकत. मालूआजी त्यांच्याशी आपणहून बोलत, ओळख काढत. गप्पा मारत. एकेकींची सुखदु:खं ऐकून घेत. नुसतं गाऱ्हाणं ऐकून घेणंही त्यांच्या मनाला शांत करतं, हे आजींना माहीत होतं. होता होता एक वर्तुळ तयार झालं. फिरता फिरता आधी लोकांच्या चेहऱ्यावर जे परके भाव असायचे, त्याची जागा स्मितहास्यानं घेतली. हसरी माणसं सुंदर दिसतात, वयापेक्षा तरुण दिसतात, असं मालूआजींचं निरीक्षण. हसणं, हात हलवणं, म्हणजे एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेणं. काहींना बरं वाटायला एवढंही पुरेसं असतं.

भ्रमणध्वनी क्रमांकांची देवाणघेवाण झाली. व्हॉट्सअॅप समूह तयार झाला. काही जणी आपल्या नवऱ्यासोबत येत, तेही समूहात सहभागी झाले. समूहातल्या सदस्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. काही तरी उपक्रम हाती घ्यावा असं वातावरण तयार झालं. मालूआजींनी ‘हास्य क्लब’ची कल्पना मांडली. एकदोघींनी ती उचलून धरली. काही ‘हो ला हो’ म्हणून तयार झाले. एकाला त्याचा चांगला अनुभव होता, त्याला प्रमुख करण्यात आलं. माणसं उत्साहानं येऊ लागली.

आता मालूआजींना घरी परतायला अंमळ उशीर होऊ लागला, पण सारं व्यवस्थापन सुनेच्या हाती दिल्यानं त्यांना चिंता नव्हती. चिंता होती ती फक्त नवऱ्याची! आता तरी त्यानं आपल्या शिस्तीच्या चौकटीला तिलांजली देऊन बाहेर यावं, लोकांत सामील व्हावं, जगात फक्त आपणच हुशार आहोत ही धारणा सोडून द्यावी, इतरांचं ऐकावं, अशा अनेक इच्छा. आकांक्षा नव्हे! इच्छा आर्जव करते, आकांक्षा मानगुटीवर बसते!

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!

नवऱ्याला तिथे येण्यास उद्याुक्त करणं, त्यासाठी पहाटे किमान सहाला उठण्यास सांगणं… तसंही दोघांची झोप कमी झाली होती. नवरा आता रिकामा आहे, तर पहाटे पाचला उठून बसतो… पण चूळ भरून पुन्हा झोपतो. म्हणजे तसा जागाच असतो, लोळतो. साडेसात-आठपर्यंत उठत नाही. तयार व्हायला नऊ. कधी तरी साडेनऊ-दहाला फिरायला बाहेर पडणार! ‘मॉर्निंग वॉक’ घेण्याची ही काय वेळ आहे? मालूआजींना ते खटकायचं. त्यांनी खूप आग्रह केल्यावर अखेर पहाटे उठून चहा घेऊनच बाहेर पडण्याच्या अटीवर नवरा तयार झाला. सकाळी सकाळी उत्साहानं जमलेला समूह, त्यात बायकोचा पुढाकार, त्याहून आश्चर्याचं म्हणजे त्याचे पोस्टात काही काळ वरिष्ठ असलेले वाघ साहेब योगाच्या रांगेत उभे. ते पाहून तो चकित झाला. पूर्वी जबरदस्तीनं हसणाऱ्यांची खिल्ली उडवणारा नवरा समूहाच्या मानसिकतेनं हास्यमंडळात सामील झाला. दुसऱ्या दिवसापासून नियमित दोघं जाऊ लागले. ओळखपाळख झाली, सकाळचे तास दोन तास छान जाऊ लागले. नव्यानं परिचय झालेले लोक कार्यक्रमानिमित्त बोलावू लागले. कुणाचा मुलगा बँकेत, कुणाचा शेअर मार्केटमध्ये, कुणाची सून महापालिकेत, विविध क्षेत्रांतील कुटुंबीयांचा परिचय झाला. त्यातून एकमेकांची काही कामं सहज झाली…

हळूहळू मालूआजींच्या नवऱ्याच्या स्वभावात बदल होऊ लागला. हेकटपणा काहीसा कमी झाला. नवऱ्याचा मधुमेह त्यामुळेच काहीसा आटोक्यात आला खरा, पण व्हायची ती गुंतागुंत थोडी पुढे ढकलली गेली एवढंच. एके दिवशी मेंदूत रक्तस्राव झाला आणि तातडीनं इस्पितळात न्यावं लागलं. अखेरच्या दिवसांत मात्र आजोबांनी बायकोजवळ मन मोकळं केलं. तिच्या नेकीनं संसार करण्याचं, नियमित चालण्याच्या संकल्पाचं कौतुक केलं. आपण काळजी आधीपासून घ्यायला हवी होती, हे कबूल केलं. ‘तू खंड पडू देऊ नकोस, आपली वाट चालत राहा,’ सांगितलं.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!

पिंपरकर आजोबा गेले त्याचा आज तिसरा दिवस. आदल्या दिवशी वादळी पाऊस झाला होता. रात्रभर वीज नव्हती. मालूआजी पहाटेच उठल्या, त्यांनी आपले कापडी बूट चढवले, भिंतीवर लावलेल्या नवऱ्याच्या फोटोला नमस्कार केला आणि त्या नेहमीप्रमाणे झपाझप चालू लागल्या. त्यावेळी फिकट तांबडं सूर्यबिंब दिसू लागलं होतं. रात्रीच्या वादळाचा मागमूसही नव्हता. निसर्गानं आपला क्रम चुकवला नव्हता… आणि मालूआजींनीही!

nmmulmule@gmail.com