‘इतरांना जे मिळतंय ते आपल्याकडे नाहीये,’ ही भावना सोशल मीडियात अति गुंतणाऱ्या बहुतेकांना जाणवते. प्रथम वाईट वाटणं, मग बाजूला पडल्यासारखं वाटणं आणि मग गडद होणारा एकटेपणा, असा प्रवास काहींच्या बाबतीत दिसतो. पण तरुणाईच्या भाषेत या ‘फियर ऑफ मिसिंग आउट’ला उत्तर देणारा ‘जॉय ऑफ मिसिंग आउट’ही आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र मनाला थोडं वळण लावावं लागेल…

आपण हल्ली दोन जगात जगत आहोत. वास्तव आणि आभासी जग. वास्तव जगात पदोपदी एकटेपणाला कारणीभूत ठरणारे घटक उपस्थित आहेतच, पण आभासी जगातही असं काही आहे का, की ज्यामुळे एकटेपणा येईल?…

devesh chandra thakur on muslim yadav
“मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?
monsoon delayed reason
पाऊस नेमका आहे कुठे? देशभरात मान्सून कधी सक्रिय होणार?
Loksatta editorial NCERT changes in 12th Political Science book a
अग्रलेख: ‘गाळीव’ इतिहासाचे वर्तमान!
loksatta analysis about chatbot and its use created by artificial intelligence
विश्लेषण : चॅटबॉट चक्क भविष्य सांगणार? अमेरिकेत सुरू आहे अद्भुत संशोधन…
Why question the reliability of automated weather stations How true are their predictions
स्वयंचलित हवामान केंद्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का? त्यांचे अंदाज किती खरे?
गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
tempertaure rising in the world
दिल्लीमध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्डब्रेक, जगभरातही हीच परिस्थिती; तापमान आणखी किती वाढणार?
importance of voting rights in a democracy role of elections in democracy zws
लेख : लोकशाहीतील आपली जबाबदारी!

मृणाल आणि समीर यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच बाळाची चाहूल लागली. त्या दोघांची खरं तर तयारी नव्हती. त्यांना भरपूर फिरायचं होतं, एकमेकांबरोबर वेळ घालवायचा होता. पण बाळाच्या चाहुलीनंतर घरात आलेली आनंदाची लाट बघता त्यांनी बाळाला या जगात आणण्याचं ठरवलं. मृणालला आठवा महिना लागला आणि नेमकं त्याच महिन्यात शाळेतल्या तिच्या वर्गाचं ‘रीयुनियन’ आलं. एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत तिला घरातलं कुणीच तिथे जाऊ देणार नव्हतं. जसजसा रीयुनियनचा दिवस जवळ येत होता, तसतशी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरची चिवचिव वाढत चालली होती. कोणत्या रंगाची ‘थीम’, कसला ड्रेस, सांस्कृतिक कार्यक्रमाची चर्चा, गोड भांडणं, वादविवाद, आठवणी, चिडवाचिडवी… मृणाल घरी बसून सगळं अस्वस्थपणे वाचत असायची. रात्री समीर घरी आला, की ती या ना त्या निमित्तानं त्याच्यावर चिडचिड करायची. तिच्या मनात यायचं, या सगळ्याजणी मिळून त्या दिवशी किती मजा करतील… परत कधी होईल रीयुनियन?… या वेळी इतक्या महत्प्रयासानं शाळेतल्या सगळ्यांनी एकत्र वेळ काढला होता. तिच्या खास मैत्रिणींचा ग्रुप आपणहूनच तिची अवस्था समजून घेत होता. पण कुणीच तिला ‘ये ना गं तू पण!’ असा लाडिक आग्रह करत नव्हत्या. तिला एकदा वाटून गेलं, ‘कशाला आपण आताच प्रेग्नंट आहोत!’ वरचेवर ग्रुप चेक करायचा, फोटो बघायचे, कुणी आपल्याबद्दल काही बोलतंय का, ते तपासायचं आणि मग निराश होऊन एकटं, रडवेलं बसून राहायचं, असं चाललं होतं मृणालचं. इन मीन दहा-पंधरा मिनिटं जायची, की हे चक्र परत सुरू व्हायचं.

हेही वाचा…शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

मृणालच्या स्थितीला एकप्रकारे सामाजिक चिंता (social anxiety) म्हणता येईल. पण हल्लीच्या भाषेत त्याला ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आउट) म्हणतात. या ‘फोमो’चा आणि एकटेपणाचा जवळचा सहसंबंध आहे. दुसऱ्यांना जे मिळतंय, दुसऱ्यांच्या आयुष्यात जे चाललंय, ते काहीतरी खूप उत्साहवर्धक (exciting) चालू आहे, पण मी तिथे नाहीये. मला हे मिळत नाहीये… अशा सगळ्या भावनांचा अनुभव यात येतो. ‘फोमो’ला आधुनिक समाजमाध्यमं सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत. सोशल मीडियावर सतत कुणी ना कुणी, काही ना काही तरी पोस्ट करत असतं. त्या पोस्ट बघितल्या, की ‘फोमो’ची जाणीव आणखी तीव्र होते. एरवी कुणाच्या आयुष्यात काय चाललंय, हे पूर्वी फक्त आपल्या परिघातल्या लोकांच्या बाबतीत आपल्याला कळायचं. आता तर इथे भारतातल्या खेड्यातल्या माणसालाही अमेरिकेतलं ‘डिस्नी वर्ल्ड’ पाहायला मिळतं. पण असं काहीबाही दिसत राहिलं की आपल्याला वाटतं, ‘लोक किती एन्जॉय करत आहेत बाहेर! माझ्या आयुष्यात असं काहीच घडत नाहीये.’

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असलेली वृंदा माझ्याकडे आली होती. तिनं सुरुवातीलाच सांगून टाकलं, ‘‘मी तुमच्यासमोर न लाजता सगळं खरं सांगून टाकणार आहे.’’ ती वर्गातली सगळ्यात टॉप रँकची मुलगी होती. अभ्यास करायचा, गुण मिळवायचे, यातच तिचं आतापर्यंतचं सुख होतं. शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत हे चाललं. नंतर मात्र तिला सगळ्यांना बघून असं वाटायला लागलं, की आपण अभ्यासाच्या नादात काहीच ‘एन्जॉय’ केलेलं नाही. सगळेजण पार्टीला चालले, की ती सवयीनं नाही म्हणायची. पण ‘इन्स्टा’वर त्यांचे एक से एक रील्स, फोटो यायचे. तिला हे सगळं बघून खूप अस्वस्थ वाटायचं, की आपण कोणत्याच ग्रुपमध्ये नाही. फक्त अभ्यास करायचा, या नादात ही तरुण वयातली ‘एन्जॉयमेंट’ राहूनच जातीये. सगळेजण नाही का अभ्यास करत?… ते ही मजा घेऊनही अभ्यास करतातच की! मग मीच एकटी इथे का आहे? या अवस्थेत तिच्या हृदयाचे ठोके वाढायचे, घाम यायचा. खूप एकटं वाटून रडू यायचं. अशा परिस्थितीत अभ्यास तरी होईल का?… ना धड अभ्यास, ना धड मजा. तिची ‘फोमो’ तिला फक्त एकटेपणा देऊन जात होती. याच्यात न लाजता सांगायची गोष्ट अशी होती, की तिला वाटायचं रस्त्यात या सगळ्यांची गाडी बंद पडावी, त्यांना पैसे कमी पडावेत, काही तरी व्हावं आणि त्यांची पार्टी रद्द व्हावी. ‘फोमो’शिवाय या भावनेची तिला खूप लाज वाटत होती. आपल्याला मिळत नसेल, तर कुणालाच मिळू नये, हा तिच्या मनातला विचार तिच्याच नजरेतून तिला खाली उतरवत होता. वृंदानं हे सगळं प्रामाणिकपणे मान्य केलं म्हणून, नाही तर इतरांनाही ‘फोमो’मध्ये अशाच प्रकारच्या भावना येत असतात, पण ते मोकळ्या मनानं त्या स्वीकारतीलच असं नाही.

हेही वाचा…स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

बाजारपेठही आता पूर्वीसारखी सरळसाधी राहिलेली नाहीये. कित्येक देशी-विदेशी वस्तूंनी नटलेली आहे; म्हणण्यापेक्षा लबडलेली आहे! अनेकांच्या हातात पैसा खुळखुळतोय. त्यामुळे रोज कुणी ना कुणी तरी काही ना काही नवीन टुमणं काढतं. मुख्य म्हणजे जास्तीत जास्त पिक्सेलचे कॅमेरे आहेत, ते काढलेले फोटो टाकायला सोशल मीडिया आहे. त्यातल्या त्यात हे सगळं करायला प्रत्यक्षपणे पैसा खिशातून जातोय का? (अप्रत्यक्षपणे जातो हे मात्र नक्की.) मग करा बिनधास्त फोटो पोस्ट! बालीला हनिमूनला गेलेल्या जोडप्याचे फोटो पाहिले, की महाबळेश्वरला गेलेल्या जोडप्याला ‘फोमो’ येतो. आपणच एकटे फक्त भारताबाहेर हनिमूनला गेलो नाही का?… आपण आयुष्यभरासाठी काही तरी गमावतोय का? सगळे भेटतील, याविषयी बोलतील, तेव्हा आपल्याला एकटं वाटेल का? आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकणार नाही का? आणि इथे समाजाशी जोडले न जाण्याची भावनाच एकटेपणा देऊन जाते. उद्या बाली सोडून कुणी तरी भारतातल्या एखाद्या खेड्यात टुमदार रिसॉर्टमध्ये हनीमूनला जाईल. तुम्हाला परत वाटेल, ‘अरे, हे खेड्यातलं वातावरण, गावरान मेवा, निसर्ग हे सगळं मी ‘मिस’ केलं का?’ कशाकशाच्या पाठी धावायचं?

एखाद्या लहान मुलानं मस्ती केल्यावर त्याची आई त्याला शिक्षा म्हणून खाली खेळायला जाऊ देत नाही. तो बापडा वरून गॅलरीतून खालच्या मैदानात चाललेली मित्रांची मॅच बघत बसतो. त्यालाही हेच वाटतं, ‘आपण एकटे पडतोय का? सगळे मस्त मजा करत आहेत. आपण आजच्या खेळाला मुकतोय का?’ तो सतरादा गॅलरीत फेऱ्या मारतो, तसंच काहीसं आपल्यातलं मूल ‘फोमो’मध्ये करतं. आपण सतरादा सोशल मीडिया चेक करतो, दुसऱ्यांचा आनंद पाहून स्वत:चा हिरमोड करून घेतो, मला पण हे पाहिजे, असा वेडा हट्ट करत राहतो. या ‘फोमो’मुळे एकटेपणा, अस्वस्थता येऊ द्यायची नसेल, तर आई मुलाला काय सांगेल? ‘शंभर वेळा गॅलरीतून खाली वाकून बघू नकोस वाईट वाटत असेल तर!’ अगदी तसंच आपल्याला सारखा सारखा सोशल मीडिया उघडून पाहाणं बंद करायचं आहे.

‘ये जवानी हैं दिवानी’ चित्रपटात एका प्रसंगात ‘साउंड अँड लाईट शो’ला जायलाच हवं म्हणून सूर्यास्ताचा आनंद घेणं अर्धवट सोडू पाहणाऱ्या रणवीरच्या ‘फोमो’ला दीपिका मार्मिक उत्तर देते- ‘कितना भी ट्राय करलो, कुछ न कुछ तो छुटेगाही, त्यापेक्षा जिथे आहोत तेच नीट एन्जॉय करू या ना!’ इतरांना मिळालेलं सगळं तुम्हाला मिळेलच असं नाही, हे वास्तव स्वीकारल्यावर गोड बातमी अशी असू शकते, की त्यांना न मिळालेलं काही तरी वेगळं तुम्हाला मिळालेलं असेल. पण सोशल मीडियात वाकून बघण्याच्या नादात तुम्ही ते बघतच नाही!

हेही वाचा…सांदीत सापडलेले : सुट्टी!

‘फोमो’ला उत्तर देणारा त्याच भाषेतला हा शब्द म्हणजे ‘जोमो’ (जॉय ऑफ मिसिंग आउट). ‘जोमो’ आपल्याला ‘इथे आणि आता’ (‘हिअर अँड नाऊ’) राहायला शिकवतो. थोडक्यात वर्तमानकाळात राहायला शिकवतो. ‘जोमो’मध्ये ना भूतकाळातल्या गोष्टींचा पश्चात्ताप असतो, ना भविष्यातल्या काळजी असतात. या क्षणाला जे मिळतंय, त्यात आनंद मानण्यात सुख असतं.

काही दिवसांच्या आजारपणातून उठलेल्या मनालीनं खूप आधीच शाळेतल्या मैत्रिणींबरोबर चित्रपटाला जायचं ठरवलेलं होतं. पण नुकत्याच येऊन गेलेल्या आजारपणामुळे तिला काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. पण अशा स्थितीत तिला ‘फोमो’ येईल असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं नव्हतं! मनालीला सध्या सकाळची लवकर उठायची घाई नव्हती. सगळं काही बसल्या जागेवर मिळत होतं. अल्लाउद्दीनचा चिराग मिळाल्यावर जसं मिळालं असतं, अगदी तशा प्रकारे मिळत होतं! त्यामुळे तिला ‘फोमो’ नाही, तर ‘जोमो’ आला होता. चित्रपटाला जाऊ नंतर कधी तरी, पण असा आराम परत मिळेल का सहजासहजी? म्हणून खूश होती ती!

हेही वाचा…माझी मैत्रीण : जिवाभावाची…

‘फोमो’ हा वरवर साधा दिसत असलेला विषय युवावर्गाच्या बरोबरीनं अति प्रमाणात सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाच्या एकटेपणाला आणि अस्वस्थतेला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वेळीच ‘सावध… ऐका पुढल्या हाका!’

trupti.kulshreshtha@gmail.com