कोणी तरी महात्मा येऊन आपल्याला मार्गदर्शन करेल याची आपण वाट बघण्याची गरज नाही. तुमच्या आणि माझ्या अंतरंगातला तो प्रेमाचा परमेश्वर, तो अंतर्मुख होण्याची आणि उरलेलं आयुष्य विश्वस्त म्हणून जगायला शिकण्याची प्रेरणा देईल. आपण आपले वेगळे गांधी येतील म्हणून वाट बघत बसण्याची गरज नाही. हा काळ बदलून टाकायला बरेचसे छोटे-छोटे महात्मा पुरेसे होतील.
कधी कधी मित्र मला खोचकपणे विचारतात, ‘स्त्रीची जागा ही घरात असते असं तुला म्हणायचंय का?’ मी त्यांना उत्तर देतो, ‘अर्थात!’ आणि पुढे म्हणतो, ‘आणि पुरुषाचीसुद्धा.’ प्रत्येकाचीच जागा घरात आहे. कामाची जागा ही नेहमीच दुसरी जागा असली पाहिजे. लोकांनी खूप काम करायला हवं या गोष्टीला माझा विरोध नाहीच, पण प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचं हे तुमच्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. प्रेमळ घराच्या उणिवेइतकं दु:खदायक दुसरं काहीही नाही. जिथे प्रेम असतं, जिथे आई-वडील एकमेकांच्या गरजांचा विचार आधी करतात, जिथे मुलांना घरी येण्याची इतकी ओढ वाटते ते घरी जायला किती वेळ हे बघत असतात. ज्या तरुण मुलांना घराकडे परतायला लावणारं प्रेम मिळत नाही त्यांची अवस्था पुढे काय होते ते आपल्याला ठाऊकच आहे. त्यांच्या आई-वडिलांचं प्रेम पैसे मिळवण्यात, मालमत्तेचा साठा करण्यात, पुढे जाण्यात आणि स्वत: मजा मारण्यात अडकलेलं असतं. या सगळ्या उद्योगांमुळे त्यांना प्रेम करायला वेळच शिल्लक राहत नाही, त्याचं जीवन प्रेमाला स्पर्शही करू शकत नाही.
भौतिक ध्येयांचा हेतू आता साध्य झालेला आहे, पण त्या भौतिक गोष्टींचा उपभोग घेण्यासाठीसुद्धा आपल्याला आता अंतर्गत ध्येयांच्या नवीन संचाची गरज पडणार आहे. आज किती तरी लोक एकाकीपणात, निराशेने, स्वार्थीपणाने, मनात दुजाभाव, राग आणि भीती बाळगत जगत आहेत. अशा प्रकारचे नवे रोग जर अंधारयुगीन प्लेगसारख्या रोगांची जागा घेणार असतील, तर अंधार युगातील रोग्यांच्या साथींवर आपण मात केल्याचा अभिमान बाळगण्याचे काहीच कारण नाही. मला असं वाटतं की, माईस्टर एखार्टना आज कुणी तरी सांगावंच की ते अंधार युगातले आहेत. ते सेंट तेरेसाच्या शब्दांत ताडकन उत्तर देतील, ‘अंधार? मी तर कायम अशा प्रकाशात राहतोय की जिथे रात्र होतच नाही.’ बाकी आपण सगळे, गीतेत सांगितल्याप्रमाणे, मध्यरात्रीच्या अंधारात डोळे मिटून गोलगोल फिरतोय आणि त्या अंधारालाच दिवस म्हणतोय.
तुमच्या मनात याबद्दल काही शंका असेल, तर आजचं सकाळचं वर्तमानपत्र- (तसंतर) कोणत्याही दिवसाचं वर्तमानपत्र चालेल – थोडय़ाशा त्रयस्थपणे विसाव्या शतकाबद्दल, जागतिक युद्धांच्या या अणुयुगाबद्दल भविष्यातील पिढय़ा काय म्हणतील असं तुम्हाला वाटतं? आपण नक्कीच खूप मोठी प्रगती केलेली आहे : वैद्यकशास्त्रात, अनुवंशशास्त्रात, अवकाशप्रवासात, संपर्क-साधनसामग्रीत आणि अशाच अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये. पण जिथे जीवनावश्यक गोष्टींचा प्रश्न येतो त्याबाबतीत मात्र आपल्या समाजाने फारशी प्रगती केलीय असं मला वाटत नाही, किंबहुना अजिबातच प्रगती केलेली नाही.
संस्कृतीच्या पुढच्या टप्प्यावर आता आपल्याला मार्गदर्शनासाठी महात्म्यांची गरज भासणार आहे. महात्मे हे पुरोगामी असतात, लोकांपुढे आदर्श ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्याची कुवत त्यांच्यात असते. सेंट फ्रँसिस किंवा महात्मा गांधींसारखा एखादा पुरुष, मदर तेरेसासारखी एखादी स्त्री आपल्याला आपलं ध्येय ठरवण्यासाठी मदत करायला पुरेशी असतात. वैयक्तिक इच्छा-आकांक्षांच्या धुक्यामुळे हे ध्येय धूसर झालेलं असतं. भगवद्गीतेत भगवंताने आपल्याला वचन दिलेलं आहे की प्रत्येक युगात, आपल्याला जीवनाचा अर्थ काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी तो अनंत मर्त्य मानवी अवतार धारण करेल. पण कोणी तरी येऊन आपल्याला मार्गदर्शन करावं याची आपण वाट बघण्याची गरज नाही. तुमच्या आणि माझ्या अंतरंगातला तो प्रेमाचा परमेश्वर, तो अनंत, तुम्हाला आणि मला, आपल्यासारख्या सामान्य माणसांना, अंतर्मुख होण्याची आणि उरलेलं आयुष्य विश्वस्त म्हणून जगायला शिकण्याची प्रेरणा देईल. आपण आपले वेगळे गांधी येतील म्हणून वाट बघत बसण्याची गरज नाही. हा काळ बदलून टाकायला बरेचसे छोटे-छोटे महात्मा पुरेसे होतील.
आपण हे वळण घेत नाही, तोपर्यंत आपली संस्कृती भवसागरामध्ये भरकटत राहील. डोळ्यांसमोर काही तरी ध्येय असेल, तरच क्षणिक प्रसंगांना अर्थ येतो. कारण तरच ते प्रसंग चपखल बसू शकतील अशी संदर्भाची चौकट आपल्याजवळ असते. आपल्या समकालीन समाजाचा संदर्भाच्या चौकटींवर विश्वास नाही. आपल्यासमोर खरी काही दिशाच नाही. पैसा मिळवणं हे काही ध्येय म्हणता येणार नाही. तसंच मालमत्ता जमा करणं हेही. यापूर्वी इतिहासात कधी धनसंपत्ती आणि मालमत्ता मिळवणं हे आजच्या इतक्या लोकांच्या आवाक्यात होतं असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे माणूस आजच्याइतका एकाकी, उद्विग्न, निराश, भविष्याविषयी असुरक्षित, रागीट, हिंसक किंवा घाबरलेला असा कधी होता का याबद्दलही मी साशंक आहे आणि ही गोष्ट फक्त या देशापुरतीच मर्यादित नाही, तर सगळ्या जगालाच लागू आहे.
महात्म्यांनी दिलेलं या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आणि प्रामाणिक आहे: ‘शाश्वत काय आणि अशाश्वत काय ते ओळखायला शिका. तुम्ही दररोज ज्या गोष्टी करता त्यामध्ये तुमचं आरोग्य सुधारणाऱ्या, टिकाऊ असं संरक्षण देणाऱ्या आणि नातेसंबंध अधिक गहिरे करणाऱ्या- थोडक्यात म्हणजे भविष्यकाळात समाजाच्या आणि जगाच्या हितासाठी उपयोगी पडतील अशा गोष्टींची निवड करत चला. यातच तुमचं सुख, तुमचा उद्धार, तुमचं भविष्य दडलेलं आहे.’
ऑगस्टिन आपल्याला बजावून सांगतो, ‘हृदयाच्या ज्या डोळ्यातून आपल्याला परमेश्वराचं दर्शन होतं, त्याची निगराणी करणं हे आपल्या जीवनातलं एकमेव कर्तव्य आहे.’ उत्क्रांतीची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वत:च्याच हातात आहे. प्रेमाचा परमेश्वर आपल्या आतच आहे; आध्यात्मिक उत्क्रांतीची साधनं आपल्याजवळच आहेत.
माझी आध्यात्मिक गुरू म्हणत असे, की या महान आव्हानांना तोंड देण्यात अयशस्वी होणं म्हणजे सरळसरळ बेजबाबदारपणा आहे. तुम्ही एक परिपूर्ण माणूस व्हा, अशी मागणी तुमच्याकडे कोणी करत नाहीये, तुम्ही फक्त तुम्हाला स्वत:च्या विकासासाठी जेवढं जास्तीत जास्त करणं शक्य आहे तेवढं करत राहा. एवढंही आपण करू शकलो नाही, तर चांगलं जीवन जगण्यासाठी जो हातभार आपण लावू शकू तेवढाही लावायची आपली तयारी नाही असा त्याचा अर्थ होईल. आध्यात्मिक जीवन हे जबाबदार जीवन असतं. माझ्यावर फक्त माझीच नाही तर तुमची सर्वाचीही जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वावर माझी जबाबदारी आहे.
माझ्या असं लक्षात आलंय की आज किती तरी चांगले लोक एकाकीपणात आणि कंटाळवाणेपणात जीवनाचा अर्थ शोधत बसलेले असतात. हा त्यांचा वेळ आणि त्यांची शक्ती ते त्यांच्या शहरा-रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर लोकांसाठी काही तरी काम करण्यात किंवा घरातून पळून जाणाऱ्या तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यात किंवा दर महिन्याला मिळणारे अपुरे पैसे अन्नावर खर्च करावेत की घर गरम करण्यासाठी वापरावेत, असा प्रश्न पडणाऱ्या निराधार वृद्धांना मदत करण्यासारख्या एखाद्या सत्कृत्याकडे का लावत नाहीत? या प्रश्नाचं बहुतेक लोकांनी दिलेलं उत्तर अतिशय करुण आहे: गोष्टी बळकावण्याच्या आणि, ‘प्रथम क्रमांकाचा ध्यास असलेल्या’ या धर्मामध्ये बंधुभावाच्या भावनेला जागाच नाहीये. आपली संवेदनशीलता तो मारून टाकतो आणि एकाकीपणाच्या आणि दुजाभावाच्या अधिकाधिक उंच भिंती उभ्या करतो..
आणि हे सगळे आपलेच लोक आहेत, आपल्याबरोबरच राहणारे आहेत; मग आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत राहणाऱ्या गरीब लोकांचा, रात्री काही न खाता झोपणाऱ्या आणि सकाळी उठल्यावर आणखी एक भयानक दिवस उजाडला म्हणून घाबरणाऱ्या लाखो छोटय़ा मुलांचा विचार करणं हे किती कठीण आहे. महात्मे ज्या प्रेमाबद्दल बोलतात, ते तुमच्या अंतरंगात एकदा जागृत झालं की स्वत:साठी जरूर तेवढय़ाच गोष्टी ठेवून बाकीच्या गरजू लोकांना देऊन टाकण्यात किती आनंद आहे, याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. मग तुम्हाला, गरजू लोकांना मदत करण्यासाठी दिवसाचा थोडा तरी वेळ, तुमची थोडीशी शक्ती आणि थोडंसं धन खर्च करण्याची इच्छा होऊ लागेल. ‘सर्वामध्ये वसती करणाऱ्या त्या दिव्य अस्तित्वाला मी माझ्याजवळ जे काही आहे ते आणि मला स्वत:लाही अर्पून टाकतो.’
सेंट तेरेसा म्हणते, याप्रमाणे तुम्हाला जेव्हा जीवनाची आणि प्रत्येक प्राण्याच्या हिताची काळजी वाटू लागते, तेव्हा तीच तुमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात असते आणि तोच शेवटही असतो.
नेहमी चिंतनात मग्न राहणाऱ्या माणसाच्या विचारांचा कृतीमध्ये विस्तार होतो आणि या मुळांपासून फुटलेल्या वृक्षाला सुंदर आणि सुवासिक फुलं येतात. ही फुलं फक्त देवाच्या प्रेमळ वृक्षावरच फुलू शकतात आणि फक्त त्याच्यासाठीच फुलतात, त्यात त्यांचा काहीही स्वार्थ नसतो; आणि या फुलांचा सुवास सगळ्यांना आनंद देण्यासाठी सगळीकडे दरवळत असतो..
ज्या व्यक्तींना जीवनाचा आध्यात्मिक पाया ठाऊक असतो अशा व्यक्तींपासून सदसद्विवेकबुद्धीने केलेल्या कृत्यांचा आदर्श उत्स्फूर्तपणे वाहत असतो. जेव्हा आपण जाणिवेच्या सर्वोच्च पातळीवर जगत असतो, जेव्हा आपलं जीवन हे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्राण्यासाठी आशीर्वाद ठरतं, तेव्हाच हे घडतं. तेव्हाच आपण खरं नि:स्वार्थी जीवन जगत असतो. तेव्हा आपण वैयक्तिक फायद्याचा किंवा आनंदाचा विचार कधीच करत नाही तर वैश्विक उन्नती आणि शांती यांचाच विचार करतो. कारण भव्यतम अशी ही अंतिम ध्येये देखील शेवटी शासनावर, सरकारांवर अवलंबून नसून तुमच्या-माझ्यासारख्या छोटय़ा लोकांच्या नि:स्वार्थी प्रयत्नांवरच अवलंबून असतात. एखाद्याचं मन मित्रत्वाच्या भावनेने वळवलं, तर त्याचा परिणाम दीर्घकाळापर्यंत टिकतो. माणसांना शिकवणं शक्य आहे; माणसाचा विकास होणं हे नेहमीच शक्य असतं,गांधीजींनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे,‘अध्यात्माच्या क्षेत्रात एक जरी माणूस यशस्वी झाला.’ तरी त्याच्या यशात सगळ्या जगाला वाटा मिळतो.’
पुरातन हिंदू आध्यात्मिक ग्रंथातील एक सुंदर प्रार्थना नेहमी माझ्या मनात निनादात असते: ‘सर्वे पि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दु:खमाप्नुयात्।’ कारण आपण सर्व जण एकच आहोत आणि सर्वाच्या आनंदातच आपल्याला आपला आनंदही सापडणार आहे. ही प्रार्थना तुम्हा सर्वाना तुमच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरो.
(‘मनावर विजय’ या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वैशाली जोशी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार