News Flash

सृजनाच्या नव्या वाटा : शाळेची सृजन वाट..

‘शाळेचा दर्जा बघायचा असेल तर तिथली टॉयलेट्सही बघावी नि ठरवावं.’ असं कुणीसं म्हटलंय

(संग्रहित छायाचित्र)

रेणू दांडेकर

मी वर्षभर ओळख करून दिलेल्या देशभरातील शाळांबद्दल वाचून अनेकांनी तिथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. शाळांतील प्रयोग म्हणजे काय? शिक्षणात वेगळं, मूलभूत काय करता येतं? प्रत्येक रचनेला वैचारिक पाया कसा असावा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या शाळा देतात. असे असेल तर किती वेगळे घडते, हेही समजते. या सदरातील शेवटच्या लेखात हे आवर्जून नोंदवावेसे वाटते, की या प्रतिक्रियांनी मला देशभरातील दुर्गम भाग पालथे घालत केलेल्या शाळाफि रस्तीचे सार्थक झाल्यासारखे वाटले..

‘शाळेचा दर्जा बघायचा असेल तर तिथली टॉयलेट्सही बघावी नि ठरवावं.’ असं कुणीसं म्हटलंय. ‘दिगंतर’ या शाळेमध्ये पाऊल ठेवलं नि त्यांनी यावर केलेलं काम पाहून मी अक्षरश: अचंबित झाले होते. मुख्य म्हणजे हे स्वच्छतेचे काम तेथे शिकणारी मुलं करतात. आपणहून करतात. का करायचं हे मोठय़ा वर्गातली मुलं स्वत:च्या अनुभवातून समजावून देतात नि ही गोष्ट इथले शिक्षक अभिमानाने सांगतात. गेले वर्षभर मी देशभरातील दुर्गम भाग पालथे घालत अशा अनोख्या शाळांना भेटी देत असंख्य अनुभव गोळा केले. ते ‘सृजनाच्या नव्या वाटा’ या सदरातून वाचकांपर्यंत पोहोचले आणि चांगल्या प्रतिक्रिया तर मिळाल्याच, पण लोकांना वेगळ्या वाटेवर नेता आलं याचं समाधानही मिळालं.

या शाळा चालवणाऱ्यांचा त्यातील प्रत्येक मुलाशी संबंध, संपर्क आहे. शाळाचालकांची दहशत कुणाही मुलामध्ये दिसली नाही. उलट शाळेतल्या मुलांचा गराडाच त्यांच्याभोवती दिसला. अनेक ठिकाणी निवासव्यवस्था अगदी साधी आहे. ‘पूवीधाम’ला मी राहिले. तिथल्या मुलीने मला राहायची खोली दाखवली. तिथे चटई, शाल आणि पाण्याचा तांब्या, एक रॅक, एवढेच होते. विशेष म्हणजे, इथली सगळी मुलं खूप आनंदात होती. आपल्याला कोणी मारेल, शिक्षा करेल, ओरडेल, अशी भीती मुलांमध्ये अजिबात जाणवली नाही. याचा अर्थ त्या-त्या वयातला व्रात्यपणा मुलं करत असूनही त्यांना समजून घेणं वेगळं होतं. मी पाहिलेल्या या शाळांमध्ये गणवेशाची सक्ती नव्हती (‘लक्ष्मी आश्रम’, ‘शांतिनिकेतन’ वगळता). तरीही मुलं टापटीप होती. आज शिक्षणाचे माध्यम, बोर्ड, दप्तराचे ओझे, परदेशी संचार, पाश्चात्त्यांचे कौतुक नि अनुकरण यात अडकलेल्यांनी या सर्व शाळा आवर्जून पाहाव्यात अशा. त्यांचा शिक्षणाविषयीचा मनातला गोंधळ खूप कमी होईल. अर्थात हेही नमूद करायला हवं की या सगळ्याच शाळांतील सगळ्याच गोष्टी पटतील असे नाही. परंतु त्यांच्या त्यांच्यासाठी जे योग्य वाटतं ते त्यांनी केलं आहे. मुलांचं हित हेच त्यामागे आहे. शेवटी हे प्रयोग आहेत, जे वर्षांनुवर्ष करत आहेत त्यांना नवीन गोष्टी हाती लागल्या आहेत. काही गोष्टी तशा झाल्या तर आपल्या येथील शिक्षण व्यवस्थेतही खूप फरक पडेल असं नक्की वाटतं. उदा. पाठय़पुस्तकातून बाहेर पडणं, साधननिर्मिती, कमीत कमी खर्चात शिक्षण, शिकण्याची पद्धत, रुक्ष गृहपाठ टाळणे, स्वातंत्र्याचा अर्थ, अभ्यासूपणा, समर्पण..

यादी खूप वाढेल).

कुणीतरी परदेशात जातं, तिथल्या ‘ज्ञानरचनावादा’सारख्या पद्धतीचा अनेकदा नको इतका गाजावाजा होतो. तंत्रज्ञानामुळे ‘डाऊनलोड’ जितकं सोपं झालंय, तितकंच ‘फॉरवर्ड’ही! यात आपण स्वत:ला गुंडाळत नेतोय. शिवाय ज्यांच्या रोजच्या जगण्यात प्रत्यक्ष मुलांशी संबंध नाही त्यांनीच सगळं तयार केलेलं व्यवस्थेला स्वीकारावं लागलंय. त्याच्या विरुद्ध मी पाहिलेल्या सर्व शाळा आहेत, म्हणून या अनोख्या शाळेतील प्रत्येक मुलाला घडायची संधी आहे. सगळा वर्ग म्हणजे एक चेहरा नाही, प्रत्येक चेहऱ्याला स्वत:चे व्यक्तिमत्त्व आहे. कसा का होईना, इथल्या प्रत्येकावर विचार करण्याची जबाबदारी आहे नि आपण विचार करायचा असतो, हे इथल्या प्रत्येकाला माहीत आहे. व्यवहार म्हणून आर्थिक गणिताचा विचार केला जात असेलही. पण कामाच्या बाबतीत आर्थिक गणित जाणवले नाही. दुसरी बाजू इथे संस्था वा शाळाचालक कुणाला राबवून घेत नाहीत. ‘गरज नोकरीची’ असं इथलं स्वरूप नाही. ज्याला नवीन-वेगळे-स्वतंत्र-मनासारखे काम करायचेय तो येतो, टिकतो. झेपत नसेल तर बाजूला होतो. मग ‘पाटय़ा टाकण्याचा’ प्रश्नच निर्माण होत नाही. भरमसाट अनुदानही मिळत नाही. त्यामुळे काटकसर, वाचवणं इथे आहे. तरीही सगळं किती सुंदर, मुलांसाठी उपयोगी आहे, हे जाणवतं.

या सदराचं नेमकं स्वरूप ठरलं तरी मला लिहिताना साशंकता होती. जानेवारीत या सदराची भूमिका मांडणारा पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि लगेचच प्रतिसाद येऊ लागला. जे वेगळा विचार करतात, वेगळं काही करू इच्छितात, त्यांचे ईमेल आले. कऱ्हाडहून एक फोन आला, ‘आमच्या अंध मित्रांना हे लेख आवडतात. त्यांना मी वाचून दाखवतो.’ तेव्हा खरंच समाधान वाटलं. जो हेतू होता, तो काही प्रमाणात साध्य होतोय, याचा आनंद होताच. हेतू होता एक नवी दिशा मिळण्याचा. हेतू होता मरगळ झटकली जावी हा. हेतू ‘असंही करता येतं’ असा शिक्षणक्षेत्रातील प्रयोगशील लोकांमध्ये आत्मविश्वास यावा हा. म्हणूनच सदराचे नाव मला अचानक सुचले, ‘सृजनाच्या नव्या वाटा’. आणि ही ओळखच झाली माझी. नुकताच ‘पुलोत्सव कृतज्ञता पुरस्कार’ मला जाहीर झाला. त्याचं जे पत्र आलं, त्यात माझा परिचय देताना शेवटची ओळ ‘लोकसत्ता’मध्ये अनोख्या शाळांचा परिचय करून देणारी ‘सृजनाच्या नव्या वाटा’ ही यांची लेखमाला मार्गदर्शक आहे.’ या शब्दांत.

आजही जेव्हा अगदी खेडय़ापाडय़ातूनही कुणी फोन नंबर मिळवून कळवतं, विचारतं ‘खरंच अस्तित्वात आहेत का हो अशा शाळा?’ ‘अशा शाळा आपल्याकडे कुठे आहेत?’ ‘कसं पोचायचं तिथपर्यंत?’ ‘तुम्ही  कशा पोचलात तिथे?’ ही उत्सुकता मला आनंद देते. मन हळूच विचारतं, ‘हे विचारणाऱ्यांत शिक्षक किती?’ अनेक उपक्रम सतत ग्रुपवर टाकणाऱ्या शिक्षकांच्या गटावर मी या लेखमालेतला एक लेख टाकला. पण कुणाचाच प्रतिसाद नाही आला. थोडं वाईट वाटलं. मीच मला समजावलं, ही मंडळी वेगवेगळे उपक्रम करतायत. त्यांना सापडू देत त्यांच्या वाटा..इतरांचे मात्र लेख वाचल्या-वाचल्या अगदी नियमित इ-मेल येत होतेच.

त्या त्या शाळेचा पत्ता, संपर्क नंबर, मेल आयडी लेखात दिल्यामुळे अनेकांना त्या-त्या शाळांशी संपर्क साधता आला. अनेकांनी आपल्या पत्रातून ‘आपण असं करू शकतो का?  अशा सगळ्याच शाळा का नाहीत?’ असे मनापासून वाटणारे प्रश्न विचारले. अनेकांनी या शाळांचा परिचय करून दिल्याबद्दल मनोमन आभार मानले. अनेक पालकांचे फोन आले. अनुकरण करण्यालायक अनेक गोष्टी ते करून पाहू लागले. अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकं, शिक्षकांची उदासीनता, शाळांचं स्वरूप, यांनी निराश झालेल्या मंडळींना या शाळा भेटींनी नक्कीच नवी उमेद दिली.

कुणी आपल्या पत्रात म्हणतं, ‘आपली लेखणी आम्हाला ज्ञानरचनावादी आणि वैभवशाली वैचारिक वारसा निर्माण करणारी बनवते.’ तर दुसरं कुणी लिहितं, ‘या लेखामुळे नवीन गोष्टी समजल्या,’ ‘द गुड हार्वेस्ट स्कूल’बद्दल वाचून, ‘मुळात शेती हा प्राथमिक शिक्षणाचा भाग होऊ शकतो हेच विस्मयकारक आहे. ही चळवळ अजून फोफावली पाहिजे.’ असा एक प्रतिसाद आला. ‘‘अशा शाळांची माहिती तुम्ही कशी गोळा करता? प्रत्यक्ष भेट देता का?’ अशीही शंका एकाने विचारली. त्यावर ‘मी प्रत्यक्ष तिथे जाते,’ असे उत्तर होकारार्थी कळवल्यावर त्यांना खूप आनंद झाला. काही शासकीय यंत्रणेतील अधिकारी व्यक्तींचे ईमेल आले. त्यात त्यांनी महत्त्वाच्या विषयाकडे लोकांचे लक्ष वेधल्याबद्दल आभार मानले.

‘‘समाजात घडणाऱ्या वेगळ्या गोष्टींबद्दल लोकांना आदर आहे, नि चाकोरीला माणसं कंटाळलीत.’’ अशी मतं वाचून मला आनंद झाला. एका पालकाने विचारलं, ‘‘माझी नऊ वर्षांची मुलगी आहे. मी सध्याच्या शाळेत तिचे शुल्क भरू शकत नाही. मला अशी शाळा सुचवा, जिथे ती इतर अ‍ॅक्टिव्हिटिज करत शिकेल.’’ एखादी डॉक्टर आई आपल्या पाच वर्षांच्या मुलीबद्दल जागरूकतेने विचारते, ‘‘इमली महुआसारखी शाळा आपल्याकडे आहे का? सध्याची शिक्षणपद्धती, मूल्यमापन मनाला पटत नाही.’’ एखादा कॉम्रेड कळवतो, ‘‘लेखातील शाळेतले उपक्रम सर्व शाळांत राबवण्याची गरज आहे. सरकारचे शैक्षणिक धोरण शिक्षणाचे बाजारीकरण व्हायला कारणीभूत आहे.’’ असे मेल वाचताना मला मानसिक आधार मिळत होता. अनेकांना खूप काही करायचं मनात आहे, पण कसं करावं हा प्रश्न आहे. त्यांना या लेखांनी उभारी मिळाली. एक मित्र आपल्या मेलमध्ये म्हणतो, ‘‘तुमच्या बाबतीत अपेक्षा उंचावल्या आहेत. लिहित्या व्हा, लिहित्या राहा.’’ कुणा मानसिक समुपदेशक, गिर्यारोहकाचाही सविस्तर मेल वाचताना कळलं, ते शिक्षकही आहेत नि अनेक शिक्षकांना हे लेख प्रेरणादायी वाटत आहेत. हे वाचून खूप आनंद झाला. कुणी झोपडपट्टीत काम करणारी मैत्रीण कळवते, ‘‘या शाळांमधील शिकवणं मला अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जातं.’’

मुलांचे हक्क आणि संरक्षण यावर काम करणाऱ्या एका संस्थेत काम केलेले आणि समाजकार्याचे शिक्षण घेतलेले मित्र कळवतात, ‘‘शिक्षण क्षेत्रात काम करताना मला नवीन दिशा, रणनीती, टीमवर्क, समस्या आणि उपाय यांकडे कसे जावे हे लेख वाचून समजले. मुख्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात किती दर्जेदार, चांगले आणि निरंतर काम सुरू आहे हे समजले.’’ हे मित्र सुरुवातीपासूनच प्रत्येक लेख वाचत होते. ‘पाठोभवन’वरचा लेख वाचून एक अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक मित्र लिहितात, ‘‘आपल्या लेखामुळे निसर्गाच्या छायेत वाढणारं ‘पाठोभवन’ उलगडलं.’’ अनेक जण म्हणतात, ‘‘आम्ही लेख वाचून तिथे जाऊन पोचलोही.’’ कुणा कन्स्ट्रक्टिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकही ‘बोध शिक्षा समिती’वरील लेख वाचून प्रभावित होतात.

ही काही नमुन्यादाखल प्रतिक्रियांची जुळणी केली. मला विशेष हे वाटलं, की ज्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, स्वयंसेवी संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, आदिवासी शाळांचं काम पाहणाऱ्या शासकीय व्यक्ती, पालक, समाजातील शिक्षणप्रेमी, अशा किती तरी जणांचा यात समावेश आहे.

या लेखमालेमुळे या शाळा सर्वदूर पोचल्या. प्रयोग म्हणजे काय? शिक्षणात वेगळं, मूलभूत काय करता येतं? प्रत्येक रचनेला वैचारिक पाया कसा असावा? चाकोरीतल्या अनेक गोष्टी पूर्णपणे कशा बदलता येतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या शाळा देतात. खरंतर पुस्तकं, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम, श्रममूल्ये, शिक्षा, गृहपाठ, शिक्षक, हे कसे असावे याचा अभ्यास या शाळांनी केला आहे. असे असेल तर किती वेगळे घडते, हेही समजते. म्हणूनच प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास, संकलन व्हायला हवे. यातूनच प्रत्येकाला आपल्याला काय करता येईल याचे उत्तर मिळेल. ‘सृजनाच्या नव्या वाटा’ शोधण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’ची ऋणी आहे. आणि मुळात वेगळा विचार करून यातील प्रवासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या रमेशभाई कचुरिया यांचीही ऋ णी आहे. वाचकापर्यंत पोचवायचं श्रेय जसं ‘लोकसत्ता’ला, तसंच त्यांनाही.

कशी असावी शाळा? त्यातलं शिकवणं आणि शिकणं? कसं असावं या मुलांचं जगणं? शिक्षकानं किती नि कसं विकसित असावं? या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या या सर्व शाळा. कोणकोणते अनुभव मुलांना देता येतील? याचा सतत ध्यास घेणाऱ्या या शाळा. निसर्ग किती जिवंत ठेवू शकतो शाळांना? याचं प्रत्यंतर देणाऱ्या या शाळा. त्यांच्यातील उणिवांकडे दुर्लक्ष करून मला या शाळा ‘सृजनाच्या नव्या वाटा’ वाटतात..त्याचे जास्तीत जास्त अनुकरण व्हावे, हीच या निमित्ताने इच्छा.

(सदर समाप्त)

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:23 am

Web Title: way for school creation renu dandekar abn 97
Next Stories
1 आव्हान पालकत्वाचे : सिंहावलोकन
2 वेध भवतालाचा : वाळूत उमटत जाणारे ठसे..
3 नात्यांची उकल : चालू राहणारा नात्यांचा निरंतर शोध..
Just Now!
X