डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

लैंगिक शिक्षण उपक्रमांमध्ये पौगंडावस्थेतील संप्रेरकामुळे होणाऱ्या भावनिक बाबींची चर्चा संपूर्णत: दुर्लक्षलेली असते. मुलग्यांना जास्त प्रश्न पडतात. कारण या वयात मुलं शारीरिकदृष्टय़ाही वाढतात. काही वेळा मुलग्यांना माझे शरीर असे का व आपल्यात विकृती आहे का याचा ताण येतो. जाहिरात, चित्रपट, मासिकातील चित्रे बघून उत्तेजना-इरेक्शन/ स्वप्नदोषासारखे परिणाम होतात. मुलींकडे बघण्याची नजर गुलाबी होते,  हे काय झाले हेच कळत नाही व मुलं खूप घाबरतात.. काही गोष्टी अजिबात माहीत नसल्याचा, अज्ञानाचा ताण त्यांच्यावर येतो.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

पौगंडावस्थेतील मुलांना खूप संभ्रम असतात. शरीरात होणारे बदल, भावनिक बदल यामुळे मनात कल्लोळ माजतो. पण आपल्या या विषयातील ‘गप्प बसा’ संस्कृतीमुळे कोणाला विचारायचे, कसे बोलायचे यामुळे आणखीनच गोंधळ उडतो. पूर्वीच्या काळात या विषयावर काहीच बोलले जात नव्हते. आता लैंगिक शिक्षण दिले जावे हे सर्वदूर मान्य झाले आहे. मात्र या लैंगिक शिक्षणाचे स्वरूप मुलांच्या या संभ्रमावस्थेला उतारा होत नाही आहे हे आमच्याकडे येणारे फोन, आमच्या शाळांतील बालसेना किंवा मुलांची विषयांतर्गत शिबिरे घेताना येणारे प्रश्न यावरून स्पष्ट दिसते.

एका उत्कृष्ट शाळेत जाणारी एक मुलगी माझ्याबरोबर तिच्या आईसह एका अशाच शिबिराला आली. त्यानंतर तिची व तिच्यापेक्षाही तिच्या आईची प्रतिक्रिया फार बोलकी होती. बाईच्या शरीरात कशी रचना असते, पाळी येते म्हणजे नेमके काय होते हे सगळे आता नेमके समजले म्हणाल्या. तिच्या शाळेतील सेक्स एज्युकेशनसाठी बोलाविलेल्या तज्ज्ञाने मॉडेल्स/चित्रफिती वापरून उत्तम निरूपण केले होते. पण त्याची प्रतिक्रियास्वरूप या विषयावर काही नको, झायगोट्स/ स्परमॅटोझोआ/ओव्ह्य़ूलेशन हे शब्द कानात घोंघावताहेत, असं ती  म्हणाली.

मी शाळेत असताना हा विषय शिकवायची पद्धत नव्हती. पण आधुनिक विचारांच्या आमच्या वर्गशिक्षिकेने त्याला हात घातला. उत्साहात शेजारीच असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातून प्रत्यक्ष स्त्री-पुरुषाचे अवयव मॉडेल म्हणून आणले, फॉरमॅलिनमुळे रंग बदललेले व वास येणारे! ते बघून ३४ मुली बेशुद्ध पडल्या, २३ जणींना उलटी झाली, तर सगळ्यांच्याच मनात जी किळस बसली की बास! मला केव्हा काय आणि का होणार आहे याला उत्तर हवे असते. अशा लैंगिक शिक्षण उपक्रमांमध्ये पौगंडावस्थेतील संप्रेरकामुळे होणाऱ्या भावनिक बाबींची चर्चा संपूर्णत: दुर्लक्षलेली असते. आमच्याकडे मुलांचे जे घाबरून प्रश्न येतात किंवा त्या प्रश्नांवर अवैध मार्गाने उत्तर शोधून त्याचा परिणाम निस्तरायला प्रश्न येतात, त्याचे हेच कारण असते. काय नेमके विचारतात मुले? मुलग्यांना जास्त प्रश्न पडतात. या वयात मुलगे शारीरिकदृष्टय़ाही वाढतात. त्यामुळे एका मुलाची उंची वाढलेली व आवाज बदललेला, कुणाला तरी मिशीची खूण दिसू लागलेली, तर कोणी तरी अजून लहान मुलासारखेच दिसणारे. मुलांना असे का व आपल्यात विकृती आहे का याचा ताण येतो व आता माझे काय होईल, मी असाच राहणार का म्हणून फोन करतात. जाहिरातीतील चित्रे बघून उत्तेजना-इरेक्शन/स्वप्नदोषासारखे परिणाम होतात. हे काय झाले हेच कळत नाही व मुले खूप घाबरतात. गरम-गरम वाटतंय, कानातून वाफा येतात असेही सांगतात. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाचा प्रोमो टी.व्ही.वर यायचा. त्यात बिकिनीतील बाई अतिशय उत्तेजकरीत्या ओलेत्याने पाण्यातून बाहेर येत असे. ते पाहून वरील प्रकारचे खूप फोन येत असत. ‘‘यावर उपाय म्हणून मित्रांनी सांगितले म्हणून हस्तमथुन करतो.’’ ‘‘कितीवेळा केलेले चालते?’’. ‘‘दुसरा मित्र म्हणाला की यामुळे तू नपुंसक होशील’’, ‘‘असे होतेय म्हणून मित्रांनी लालबत्ती भागात नेले. एड्स होईल का?’’ असेही फोन यायचे. या सर्व मुलांना वयात येताना शरीरात काय-काय होते, त्यामुळे कसे-कसे वाटते, यावर सकारात्मक उपाययोजना काय हे सांगितले की हुश्श्य वाटते. शांत होतात. आयुष्यातल्या चांगल्या-वाईट घटना सांगण्यासाठी मित्रत्वाने फोन करतात.

हे वास्तव पालकांपर्यंत पोचवण्याचा व बापांनो, मुलांशी बोला हे सांगण्याचा मी जीव तोडून व्याख्यानातून, पालक-सभांतून, लेखांमधून प्रयत्न करते. कित्येक जागृत आया तुम्हीतरी आमच्या नवऱ्यांना हे पटवा अशी गळही घालतात. पण बापलोक तयारच नसतात. आम्ही नाही का वाढलो म्हणतात. आजचे जग हे इंटरनेट, स्मार्टफोन इत्यादीमुळे खूप विस्तारले आहे. मुले अनेक गोष्टींना लहान वयात सामोरे जात आहेत, पाहात आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

या वयात संप्रेरकांमुळे वर्तणूक मजेशीर होऊन जाते. एकूणच भावना खूप टोकदार होतात. चटकन राग येतो, अपमान होतो, त्यातच लैंगिक शिक्षणात लिंगभाव (जेंडर) संस्कार केले जात नाहीत. त्यामुळे रागावर ताबा नाही, मुलींचे वाटणारे आकर्षण, समाजाने पोसलेला पुरुषी अहंभाव यामुळे जर प्रेमात (?) मुलगी नाही म्हणाली तर तिच्यावर चटकन हल्ला केला जातो. हे वय स्वप्नाळू असते. स्त्री-पुरुष परस्पर आकर्षण असते. छान दिसावेसे वाटते आणि नेमके तेव्हाच मुरुमे येणे, जाडी वाढणे, आवाज फुटणे असे प्रकार होतात व मुलांना ताण येतो. यावरही उपाय आम्हाला विचारतात. एका मुलीने फोन केला की मत्रिणी जाडीवरून चिडवायच्या म्हणून तिने जेवणच बंद कले. खूप अशक्तपणा आला म्हणून पालक डॉक्टरांकडे नेत आहेत. हे सगळे लपवून केल्यामुळे ती घाबरली होती.

अयोग्य लैंगिक शिक्षणामुळे विचित्र प्रश्न पुढे येतात. सगळ्यात जास्त येणारा प्रश्न म्हणजे मुला-मुलींनी हात धरला तर बाळ होते का? किस केले तर बाळ होते का? खूप गोड गुलाबी चष्मे घातलेली मुले असतात या वयाची.

एकदा रेल्वे स्टेशनवर रात्री २ जोडय़ा आढळल्या. वय १२-१४ वर्ष. प्रेम आहे. लग्न करायचे, काम द्या म्हणाली. २ दिवसांची उपाशी होती. जेवल्यावर मुलांची ताटे मुलींनी उचलली-धुतली. तद्दन फिल्मी प्रकार होता. कुठपर्यंत नाते गेले आहे हे मुलींना खासगीत विचारले. इतक्या निरागस होत्या की काय विचारते हेही त्यांना कळत नव्हते. मुलग्यांना विचारले तर ‘‘आमचे खरे प्रेम आहे. असे कसे करू..’’ वगैरे परत हिरोटाईप उत्तरे. त्यांच्या आईवडिलांना बोलावून घेतले. आईपण फिल्मी! सुंदर केसांच्या प्रेमात पडला म्हणून आपल्या मुलीचे लांबसडक केस त्या बाईने कापून गोटा केला. मुलगा आमच्याकडे यायचा. तिचा तुमच्या रेकॉर्डवरचा फोटो द्या, त्या आठवणींवर जगेन वगैरे डायलॉग टाकायचा.

मी अनेक ठिकाणी पौगंडावस्थेतील मुला-मुलींशी बोलायला जाते. नंबर देऊन येते. डोंगराच्या कुशीला असलेल्या खेडेगावातील एका मुलीने फोन केला की तिच्या बॉयफ्रेंडने तिला फसवले आहे. वय १२-१४. बॉयफ्रेंडचे २५-२६. प्रेम झाले, लग्न झाले. कुठे  देवळात. भटजी, होम यज्ञ, हार, मंगळसूत्र नाही. मग? ‘‘मांग में सिंदूर भरा.’’ फोटोपण नाही. हनिमून मात्र लगेच. अशा फिल्मी गुलाबी नजरांचे काय करायचे? बरेचदा मुले फोन करतात. अमुक-तमुक मुलगी आवडते, फ्रेंडशिप मागू का

लव्हशिप? असा सल्ला विचारतात. प्रेम म्हणजे काय, का आवडते असे विचारले की बहुतेक वेळेला ही अमुक-तमुक हिरोईनसारखी दिसते असे उत्तर असते. याहीपेक्षा एकदम तेवीस मुली आवडतात. कुणाचे स्माईल माधुरी दीक्षितसारखे, कोण ऐश्वर्यासारखी असे उत्तर येते. आता इतक्या सगळ्या मुली एकदम आवडतात, तर आमच्यात काही दोष आहे का? टेन्शन आले आहे, असेही पुढे विचारतात. मुलींच्याबाबतीतही हे असते. वेगवेगळे हिरोज, वेगवेगळ्या मुलांत दिसल्यामुळे संभ्रमावस्था असते. तुमचा दोष नाही. वयात येताना होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलांमुळे हे होते आहे असे पटवून द्यावे लागते. पण लव्हशिप प्रकरण तिथे संपत नाही. आवडणारी मुलगी नाही म्हणाली तर सहन होत नाही. ‘‘वो मेरी नहीं तो किसीकी भी नही’’, असे आणखी फिल्मी डायलॉग ऐकवले जातात. खूप हसू आले तरी पुढील गंभीर प्रसंग टाळण्यासाठी समुपदेशन करावेच लागते. कारण ‘मेरी नही तो..’ची पुढची पायरी असते ‘‘ती अशी कशी नाही म्हणू शकते. मी तिच्यावर अ‍ॅसिड टाकेन/मारून टाकेन वगैरे.’’ नकार पचविण्याची कला शिकविण्यात आपण समाज म्हणून नक्कीच कमी पडत आहोत. शिवाय स्त्रीने पुरुषाला नाकारणे हा स्त्री-पुरुष समानता न अंगीकारणाऱ्या आपल्या समाजातील पुरुषांचा अहंकार प्रचंड दुखावून जातो. आगीत तेल ओतायला मित्रपरिवार असतो. या वयात मित्रपरिवाराचा पगडा मोठा असतो. नकार मिळालेल्या मित्राची कुचेष्टा होते. एकत्रित सुडाच्या योजना आखल्या जातात. यातून वरीलप्रमाणे हल्ले किंवा सामूहिक बलात्कार, खून यापर्यंत काहीही होऊ शकते. पण हे वय असे आहे की कुठेतरी अजूनही निरागस लहान मूल जिवंत आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन केले तर जितक्या रागाने सुडाच्या गोष्टी होतात तितक्याच निरागसपणे दाखवलेला अन्य मार्गही मान्य होतो. बहुतेक वेळेला अशा मुलांना मी म्हणते- ‘‘तुझे त्या मुलीवर खरे प्रेम आहे ना, मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्रास देतो का?’’ उत्तर येते, ‘‘अजिबात नाही.’’ मग मीही फिल्मी प्रश्न विचारते की, ‘‘ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याच्यासाठी आपण काय वाट्टेल तो त्याग करतो की नाही!’’ आवेशाने उत्तर येते ‘‘हो.’’ बस! पुढे सगळे सोपे असते. आता मी विचारते- ‘‘तिच्यावर तुझे प्रेम आहे पण तिला दुसरा कोणीतरी आवडत असेल याचा मान राखायला नको का?’’ लगेचच आणि हमखास येणारी प्रतिक्रिया म्हणजे ‘‘असा कधी विचारच केला नव्हता.’’ साध्याशा संवादातून असा उताराही मिळून जातो.

एका शाळेत एका मुलाने खूपच मजेशीर प्रश्न विचारला. ‘एका मुलीवर प्रेम आहे. ते फिरतात, सिनेमाला जातात, आता प्रॉब्लेम झाला आहे, कारण तिला किस केल्यामुळे तिच्याशीच लग्न करावे लागेल. पण तिच्यावर प्रेम नाही. अजून दोघीजणींना लग्नाचे वचन दिले आहे. एक दुसऱ्या जातीची आहे म्हणून घरी चालणार नाही आणि दुसरीशी केले तर पहिलीला राग येईल.’’ पण हाही त्याचा प्रश्न नव्हता. तो म्हणाला- ‘‘मला सारख्याच वेगवेळ्या मुली आवडतात. मग मी लग्न कुणाशी करू.’’ हसावे की रडावे अशा प्रसंगी! अर्थात योग्य प्रकारे त्याला समजावले हा भाग निराळा.

एकूणात हे नाजूक वय कुठे पाय ‘घसरेल’ ते सांगता येत नाही. का घसरला ते कळत नाही. हे ऐकताना, वाचताना गोड वाटले तरी या धोक्याच्या वळणांवर मुलांना हात द्यायला हवा आहे. त्याहीपेक्षा त्या रस्त्यावरचे खड्डे दाखवून स्वत:च्या लक्ष्मणरेषा आखण्यासाठी सक्षम करायला हवे आहे. सुंदर जग दाखवणारा गुलाबी चष्मा आंधळे करून कायमचे जायबंदी करत नाही ना याची काळजी घ्यायला हवी आहे.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com