|| डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

प्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य मोठे असते. मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.. तरुणांमधील वाढत्या रेव्ह पार्टी, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या निमित्ताने.

काही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टीवर रेड पडली तेव्हा एक लक्षवेधी एसएमएस आला.

‘ब्रेव्ह’ लोकांच्या पुण्यात आता

‘रेव्ह’ पार्टी नाचत आहे.

विदेशातले बरेच पाप

पुण्यनगरीत साचत आहे.

स्वातंत्र्यानंतर अधोगतीच..

कुठली पायरी चुकली आहे?

सिंहगडाची मान शरमेने

पायथ्यापर्यंत झुकली आहे.

रेव्ह पाटर्य़ासंबंधातील बातम्या हादरवूनच जातात, अंतर्मुख करतात. ही कोणती संस्कृती या देशात येऊ घातली आहे? तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरातील मुले का बहकू लागली आहेत? तरुणाईतून प्रत्येक पिढी जाते. आपआपल्या काळात प्रस्थापितांविरुद्ध विद्रोही होणे हे आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक पिढी करते.. तरीही या प्रमाणात पावले बहकलेली नजरेस आली नव्हती. मग आताच नेमके काय घडते आहे ज्याच्यामुळे असे नासलेले बाल्याचे-तरुणाईचे स्वरूप पुढे येते आहे. वाढत्या रेव्ह पार्टीज, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर काही गोष्टी मुलांसमोर व पालकांसमोर आणाव्याशा वाटतात.

यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आर्थिक बाब. मुलांकडे इतके पैसे येतात कुठून? आले तरी ते स्वत:च्या कमाईचे नाहीत ही जाण त्यांना का नसावी? एकूणच मुले अशी का वागली यापेक्षा आई-वडील कसे वागत आहेत, समाज कोणाला साथ देतो आहे याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे असे वाटते. मुंबईच्या संपूर्ण स्त्रियांच्या कॉलेजातील नन्सनी चालविलेल्या वसतिगृहात मी राहत असताना आमच्या स्वागतासाठी (१९७५ मध्ये) कॉलेजतर्फे डिस्को-पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी खास मुलांना आमंत्रित करण्यात आले होते व मुलींनी जीन्स-टी शर्ट घालावे असा आदेशही देण्यात आला होता. या पार्टीला जायला मी व आणखी एका मराठी मुलीने नकार दिला. अर्थात आम्ही ‘मागास’ ठरलो. पण हे मनोबल आमच्यात आले कोठून? त्याचा पुढे विचार करू.

मुले पार्टीला जातात कदाचित निरागस मनाने- गंमत करायला. पौगंडावस्थेत काहीतरी वेगळे करावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध वागणे यात एक ‘थ्रील’ असते. आपापल्या तारुण्यात प्रत्येकानेच अशा थोडय़ा-फार प्रमाणात केलेले असते. मत्रिणीकडे जाते म्हणून सिनेमाला जाणे, लेक्चर बंक करून उगीचच भटकणे, छत्री असून पावसात भिजणे, मुद्दाम फाटक्या जीन्स घालणे, एकूण मोठय़ांचे नियम मोडणे यात प्रचंड धमाल असते. आजच्या पिढीच्या पुण्यातील आजोबा-पणजोबांनी ‘गुडलक’/‘लकी’मध्ये ऑमलेट-पाव खाण्यानेही घरा-घरात आलेल्या तुफानाच्या गोष्टी आपण ऐकतो. पणजीचे पाचवारी नेसणे किंवा आजीचे सलवार खमीज घालणे हे फाटक्या जीन्सइतकेच एकेकाळी धक्कादायक होते. मग पुढच्या पिढीने चोरून सिगारेट ओढणे हे थ्रील झाले. एकूण ‘प्रस्थापितांच्या विरुद्ध’ हा तरुणाईचा नियम आणि आनंदही.

दुसरा नियम मित्र परिवाराच्या पगडय़ाचा (पीअर प्रेशर/ पीअर अ‍ॅक्सेप्टन्स). प्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्रपरिवाराचे माहात्म्य मोठे असते, तारुण्य-पदार्पणकाळात किंबहुना जास्तच! मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.

विद्रोह, मित्रांची मान्यता यामुळे अशा गोष्टींकडे मुले आकर्षित होतात हे जसे खरे आहे, त्याचप्रमाणे तेथील संगीत, लाइटिंग एकूण वातावरण हे एक प्रकारचे झिंग आणणारे, हवे-हवेसे वाटणारे असते. त्याचे व्यसन सहज लागू शकते. अशीच झिंग इतर गोष्टीतूनसुद्धा येऊ शकते याचे अनुभव पालकांनी दिले तर मुलांना चांगल्या गोष्टींचे व्यसन लावता येईल. डोंगर दऱ्यात फिरणे, गड-कोट धुंडाळणे, धुव्वाधार पावसात भटकणे, सायकिलग, मॅरेथॉन या अशाच बेहोष पण चांगल्या अर्थाने झिंगवणाऱ्या, गुंगवणाऱ्या गोष्टी. कलाविश्व असेच बेभान करू शकते, मग कला शिकणे असो वा त्याचा निव्वळ आस्वाद घेणे. वाचन, व्याख्याने ऐकणे, विविध भाषा शिकणे, कोस्रेस करणे, याबाबत सकारात्मक ईर्षां/ध्यास मुलांच्या मनात तयार करता येतो. आपल्यापेक्षा कमनशिबी लोकांत काम करणे, देशा-परदेशात भ्रमंती करणे, कोणता तरी छंद पिसाटून जोपासणे- कितीतरी प्रकारे नशा करता येते. पण या नशांची दिशा देणारे, लहान वयातच मुलांसमोर हे पर्याय ठेवणारे, चांगल्या व्यसनांची वाट स्वत:च्या वर्तनातून दाखवत, त्यासाठी लहानपणापासून संधी उपलब्ध करून देणारे पालक मात्र हवेत. वयानुरूप बेहोषीची गरज भागेलच त्याबरोबर व्यक्तिमत्त्व बहरून येईल. एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अपंग, दुर्बल घटकातील मुले, अशांबरोबर काम करण्याची पण एक आनंददायी सवय असू शकते. एखाद्या कार्यासाठी चळवळ उभारणे अथवा अशा चळवळीचा भाग बनणे, त्यासाठी अविरत कष्ट करणे याची नशा एकदा चाखून पाहावीच.

संधी देणे, अशा गोष्टींची वाट दाखवणे तर दूर, मुले वरीलपैकी काही करू पाहतील तर अभ्यास, करियर वगैरेच्या नावाखाली त्यांना परावृत्त केले जाते. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, भिकेचे डोहाळे म्हणून अवहेलना केली जाते. ज्याची चवच चाखली नाही त्याची बेहोषी कळणार कशी?

प्रत्यक्ष हे चांगले, ते वाईट सांगणारे पालक ठिकठिकाणी समझोता करताना, आपल्या वर्तणुकीवर पांघरूण घालताना मुले पाहतात. ‘दारू पिणे वाईट पण सोशलसाठी प्यावी लागते/पाजावी लागते,’ मर्यादा सोडून पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे नृत्य वाईट, पण कंपनीच्या पार्टीत चालते. मग मित्रपरिवारात स्टेटससाठी पार्टी का चालत नाही असे मुलांच्या मनात आले तर काय चुकले? पालकांनी स्वत:ची वर्तणूक केलेल्या संस्कारांनुरूप आहे की नाही हे बघणे खूप गरजेचे आहे.

माझी आई अनेक वर्षे जर्मन भाषेची प्रध्यापिका होती. मी स्वत: पदवी/पदव्युत्तर स्तरावर शिकविले आहे. आमच्यासारख्यांचा अनुभव असा की खासकरून उत्तरेकडच्या अशा राज्यातून येणाऱ्या मुली की ज्यांच्याकडे अजूनही मुलगी म्हणून प्रचंड बंधने आहेत, इथे आल्या की एकदम सुटतात. पुन्हा बेडय़ाच अडकवून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मुक्त जगू पाहतात. काही अशा समाजातील महाराष्ट्राबाहेरील मुले-मुली आहेत ज्यांच्या पारंपरिक संस्कृतीनुसार मुला-मुलींनी एकत्र सर्व तऱ्हेचे व्यवहार करणे, धूम्रपान करणे, निषिद्ध नाही. या मुक्त व्यवहाराचे आकर्षण त्यांच्या इतर मित्रमंडळींना वाटणे स्वाभाविक आहे. आपल्या इथले वातावरण मग नको त्या दिशेने बदलते. मराठी मुलींवर इतकी बेडय़ावत बंधने गेल्या २३ पिढय़ा नाहीत. पण आपली लक्ष्मणरेषा आखून घेण्यासाठी पुरेसे सक्षमीकरण त्यांचे झाले आहे असे म्हणता येणार नाही.

या वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती. एकतर पूर्ण मुक्तता देणे- त्यामुळे विद्रोहातील हवाच निघून जाते आणि त्याचबरोबर खड्डय़ांची जाणीव देऊन त्याच्यावर पूल बांधण्यासाठी मुलांचे सक्षमीकरण ही पालकांची जबाबदारी राहते.

रेव्ह पार्टी/पब/हुक्का पार्लर हे प्रकार कॉलसेंटर व आयटी सेक्टरमधील तरुणाईच्या पशांच्या जोरावर चालतात असा आरोप होतो. मात्र या तरुण उन्मेषाला विधायक वळण लावण्याचे अनुकरणीय काम अनेक आयटी कंपन्या सध्या करीत आहेत. या कंपन्यांमधून काहीसे अनिवार्य म्हणून कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांच्या कामात सहभागास उद्युक्त प्रथमत: करण्यात आले. दुर्लक्षित मुलांमध्ये काम, अपंगाना साह्य़ अशा तऱ्हेचे प्रत्यक्ष काम करण्यामधला आनंदाचा शोध या मंडळींना लागला. आता ‘‘आम्ही देतो त्यापेक्षा मिळवतोच जास्त’’ ही या सर्व स्वयंसेवकांची अनुभवसिद्ध भावना झाली आहे. यातून अनेक स्वयंस्फूर्त गट अशा कंपन्यांमधून तयार झाले आहेत. माझ्या संस्थेबरोबर असे २३ गट काम करीत आहेत. फावला वेळ पार्टीला जाण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांच्या कामात घालविणे ते पसंत करतात. अशा कामाची नशा ही त्यात पडल्याशिवाय कळणार नाही, मात्र विधायक मार्ग दाखविणारे पाहिजेत.

नको म्हणण्यापेक्षा इतर मार्गाने संभाव्य व्यसनांना विरोध करता येतो. ‘निषिद्ध ते करणारच’ हा पौगंडावस्थेतील नियम आहे हे लक्षात ठेवून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीवर उपाय शोधले पाहिजेत. सात वाजता घरी परत जायचे म्हटले तर मित्रपरिवार ‘शुभंकरोति म्हणायचे का?’ वगैरे ऐकवणार आहे. पण कारण पटले असेल तर खंबीरपणे अशा चेष्टेला प्रत्युत्तर देता येते हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगते.

पार्टीला खुशाल जा, पण त्या तरल वयात, त्या वातावरणात केवळ मत्रीखातर धरलेल्या हातातून लक्ष्मणरेषा कशा नकळत ओलांडल्या जातात व पुढे कुठे वाटचाल सुरू होते याची माहिती मुलांना हवी. या वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती.

अशा घरगुती/बाहेरील पाटर्य़ामधून कॉलगर्ल रॅकेटपर्यंत पोहोचलेल्या, बलात्काराला बळी पडलेल्या, भावनांवरील ताबा गमावलेल्या अनेक मुलींचा आणि मुलांच्यासुद्धा केसेस ‘चाईल्डलाइन’कडे आहेत. एकूणात बंधने घालून प्रश्न सुटणार नाही तर सक्षमीकरणातून सुटेल. त्यासाठी पालकांची स्वत:ची वर्तणूक, मुलांशी उत्तम संवाद, आश्वस्त आधार आणि चांगल्या-वाईटाची जाण मुरेल असे संस्कार, प्रभावी पर्याय व वेळेला मित्रपरिवाराला न पटणाऱ्या गोष्टींसाठी कोणतीही भीड न बाळगता ‘नाही’ म्हणता येणं हे आवश्यक.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com