डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

एक पोषणतज्ज्ञ म्हणून स्त्रियांच्या आहारविषयक दुजाभावावरचा अभ्यास करत असता लक्षात आले की, आपल्या समाजात कुपोषित मुलीचे मूल हे सत्य आहे पण ते पिढय़ान्पिढय़ा बाई म्हणून चालत आलेले आणि वाढत गेलेले कुपोषण आहे.  गर्भावस्था, मुलगा होईपर्यंत लादली गेलेली बाळंतपणे यामुळे आधीच कुपोषित निपजलेली बाई अधिकाधिक कुपोषित होते आणि लवकर मरते किंवा चाळिशीत अ‍ॅनिमियासारख्या आजारांची शिकार होते. बाईने कमी खायचे, उपासमार करून घ्यायची हा संस्कारच केला जातो.

Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

ऐका आई बाई

जरा कान देवून ऐका॥धृ॥

मला वर्षे झाली सहा

आणि घरात आला तान्हा

त्याला म्हणे सांभाळ

माझ्या शाळंला लागले तिथेच टाळं॥१।

मला वर्ष झाली आठ

अन् बापानी पाहिली- दारूची वाट

पुरेना पसा अडका

म्हनं लेकी काम धाम बघ

तिथं माझं बालपण हरपलं ॥२॥

मला वर्ष झाली बारा

अन् मामाचा झाला दौरा

म्हनं लेकीला उजवून टाका।

अन् तू त्याचे ऐकूनी-

कुचक्या पायावरी, मांडव गं घातला॥३॥

मला वर्ष झाली चौदा

अन् तुझ्या लेकीची गं आई- उजवली कूस।

तू कौतिक करविलं

साऱ्या गावाला बोलाविलं-

अशक्तलेकीचं पांगळं पोर-

सगळ्या गावानं बघितलं॥४॥

मला वर्ष झाली सोळा

अन् माझ्या तिरडी भोवती

तोच गांव झालाय गोळा।

एका खांद्याला हो बाप-

दारुडा उभा राहिना नीट

दुसऱ्या खांद्याला माझा नवरा-

त्याचा नशेनं केलाय कचरा

चौथ्याला माझे पांगळे पोर-

वेडय़ा-बागडय़ाला-

कशाचाच नाही घोर॥५॥

लेक सोन्याच्या पावलाने येते गं जगात

पण म्हणती अवदसा आली घरात।

तिच्या छळाला गं बाई, जन्मताच सुरुवात।

सोळाव्या वर्षीच दावते,

आई तिला स्मशानाची वाट

राधा म्हणे जगा,

अशा आईला प्रकाश तू दाखव ॥६॥

हे गाणे वस्त्यांतील/ खेडेगावातील मुली बघून सुचले. एकदा उच्चशिक्षित/ मध्यमवर्गीय बायकांच्या प्रशिक्षणात वापरले. २४-२५ पासून ५५-६० वयापर्यंतच्या स्त्रिया अतिशय भावनावश झाल्या. काही जणी तर स्फुंदून-स्फुंदून रडत होत्या. हा अनुभव नंतर विविध सामाजिक स्तरांतील स्त्रियांबाबत आला. हे त्यांचे आयुष्य नव्हे. सुखासुखी फारसा दुजाभाव न होता वाढलेल्या, तरीही हा परिणाम का होत असेल? कुठेतरी बाई म्हणून माझ्यावर नक्कीच अन्याय होतो! खूप जखमा असतात. त्या अशा चेतवल्या जातात.

झोपडपट्टय़ांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हाचे एक दृश्य मनावर कोरले गेले आहे. ६-७ वर्षांची मुलगी, चड्डीवर आईचे ढगळ-पोलके, कडेवर भाऊ, डोक्यावर हंडा. आई कामाला जाते, तिचा संसार ही चिमुकली करते. गंमत म्हणून जेवायला येऊ का विचारले तर ‘हो झुणका भाकर देईन’ म्हणाली. ज्या वयात आपण आपल्या घरातील लाडोबांना देवघरातील दिव्यापासूनसुद्धा जपतो त्या वयात ही मुलगी चूल पेटवत होती. आई फक्त भाकऱ्या करून जात होती. तीही शेवटी लहानपणापासून दुर्लक्षित, कुपोषित, बाईपण भोगायचे बाळकडू मिळालेली. तिलाच काय तिच्या सात पिढय़ांना बालपण म्हणजे काय हे माहीत नाही तर ती तिच्या लेकींना काय देणार?

अशा मुली आपल्या इथे घरोघरी आहेत. संपूर्ण नाही तरी घरच्या कामाची जबाबदारी मुलीचीच असते. मुलाला त्यापासून अलगद दूर ठेवले जाते. हे अकाली आलेले बाईपण/ आईपण खूप विचित्र गोष्टी पुढे आणते. एका प्रकरणात ४-५ भावंडांना आई-वडील रोज भीक मागण्यासाठी सोडत. सगळ्यांत मोठी ताई १२-१३ वर्षांची, तीन भावंडे आईच्या मायेने सांभाळत होती. पहिल्या वेळेस सुटका करायला गेल्यावर पळून गेली. दारुडय़ा बाबांच्या जेवणाची आणि आईच्या आजारपणाची ‘गृहिणी’ म्हणून तिला चिंता होती. दुसऱ्या वेळेस तिला आणि तिच्या भावंडाना अनाथाश्रमात दाखल केले. कचरापेटीतून फेकून दिलेले अन्न ती शोधत होती. अनाथाश्रमात तिला भेटायला गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसले. ते कसले ते तिच्यातली आई बोलली, ‘‘पहिल्यांदाच ताजे गरम-गरम अन्न भावंडांना भरवता आले.’’ तुला काय हवे असे विचारल्यावर शाळा शिकायची म्हणाली.

मुलगी नकोशीच असते. प्रत्येक बाबतीत दुजाभाव होतो. किंबहुना मुलगी जन्माला आली तर आईचेही खाण्या-पिण्याचे हाल केले जातात हे वास्तव आहे. यामुळे मुलीला पुरेसे पोषण मिळणे जन्मापासूनच अशक्य होऊन बसते. एक पोषणतज्ज्ञ म्हणून स्त्रियांच्या आहारविषयक दुजाभावावरचा अभ्यास करत असता लक्षात आले की, आपल्या समाजात कुपोषित मुलीचे मूल हे सत्य आहे पण ते पिढय़ान्पिढय़ा बाई म्हणून चालत आलेले आणि वाढत गेलेले कुपोषण आहे. बाईचे पोट चुलीत, पण त्या चुलीत जाळायला हाडेही त्या बाईचीच! गर्भावस्था, मुलगा होईपर्यंत लादली गेलेली बाळंतपणे यामुळे आधीच कुपोषित निपजलेली बाई अधिकाधिक कुपोषित होते आणि लवकर मरते किंवा चाळिशीत अ‍ॅनिमियासारख्या आजारांची शिकार होते. बाईने कमी खायचे, उपासमार करून घ्यायची हा संस्कार केला जातो.

आमच्या गंमत-शाळेची राहती सहल होती. मुलांना भरपूर नाष्टा, दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था केली होती. मी एका मुलीबरोबर पायरीवर बसून आधीच्या गटाची जेवणे संपण्याची वाट पाहात होते. मुलीला म्हटले, ‘‘भूक लागली असेल ना! यांचे झाले की जेवू हं!’’ तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि ती जे बोलली ते ऐकून मी इतकी अांतर्बाह्य़ हादरले की आजही हे लिहिताना अंगावर काटा येतो आहे. तिने मला विचारले, ‘‘ताई परत जेवायचे?’’ मला काही कळले नाही. म्हटले, ‘‘आपण कुठे जेवलो?’’ तर म्हणाली, ‘‘सकाळी जेवलो ना! मुलींनासुद्धा तुम्ही दुसऱ्यांदा जेवायला देणार का?’’ यावर अधिक भाष्याची गरज नाही.

एवढा दुजाभाव आई कशी करू शकते? पण तिला का दोष द्या? तिच्या दृष्टीने हीच योग्य पद्धत असते व ती मुलीला बाई म्हणून जगण्यासाठी तयार करत असते. म्हणूनच १० वर्षांची-अंगावर चटक्याच्या खुणा, पाठीवर चाबकाचे फटके असलेली पिंकी, सिगारेटचे चटके, गळ्यावर आवळल्याच्या खुणा, अशा मालकाच्या अत्याचारातून सोडवलेल्या बालकामगार, आईबापांच्या छळातून सोडवलेल्या मुली याबाबत तक्रार नाही म्हणतात आणि मुलगी म्हणून हे सहन करायचेच असते असे उलटे आम्हालाच शिकवतात.

काहीही मुकाटय़ाने सहन करायचे असे एकदा ठरले की, भोग्य वस्तू म्हणून तिचा वापर होणे समाजालाही सोपे जाते. मी जुव्हेनाईल कोर्टावर मॅजिस्ट्रेट म्हणून काम करीत असताना अशी एक मुलगी कोर्टासमोर आली जिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. गुन्हेगार सरळ-सरळ आरोप मान्य करीत होते. पण ती मुलगी मात्र काही झाले नाही म्हणाली. खासगीत सगळे कबूल केलेले, पण तुझी आणि घराण्याची अब्रू जाईल असे घरच्यांनी सांगितलेले. ती मुले सुटली, पुन्हा असा गुन्हा करायला मोकळी झाली. पुढेही शोषित मुली त्यांना सोडवणार होत्याच!

जन्मत: नकोशा, वाढवताना दुजाभाव आणि सतत मुलगी म्हणून अन्याय करायचा आणि मग जबाबदारी झटकण्यासाठी बालविवाह लावून द्यायचा हे काही नवीन नाही. अशा अनेक केसेस चाइल्डलाइन निस्तरते. यामध्ये त्या मुलीचे भले होते आहे, पुण्याचे काम आहे म्हणत पोलीस/ वकील कायद्याच्या पळवाटा सांगतात. शाळा वयाचे खोटे दाखले देतात. काही वर्षांपूर्वी पुण्यातील नगरसेवक आणि आमदारांनी सामूहिक बालविवाहाचे आयोजन केल्याची केस सर्वश्रुतच आहे. बाराव्या वर्षी लग्न, चौदाव्या वर्षी आई आणि पस्तिशीतील आजी हे दृष्य आजही विरळा नाही.

अशीच एक नकोशी गंमत-शाळेत होती, आईचा संसार सांभाळणारी. तिला आम्ही शाळेत घातले पण बाई मंदबुद्धी म्हणून काढून टाकायच्या. गंमत-शाळेतही तिला फारसे काही समजायचे नाही. तिचे नाव ठेवायची तसदीही घेतलेली नव्हती. कोणीतरी माई म्हणायला सुरुवात केली तेच नाव पडले. तिचा चेहरा न विसरण्यासारखा, संपूर्णत: भावनाशून्य. असा मानवी चेहरा मी पहिल्यांदाच पाहिला. ती कशालाच कोणतीच प्रतिक्रिया का देत नाही याचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की अशा प्रतिक्रिया चेहऱ्यावर उमटायला, देहबोलीतून सांगायला मुलांना स्टिम्युलेशन लागते, उत्तेजना यावी लागते. जे आपण मूल जन्मत:च त्याच्याशी संवाद साधत/ कृतीतून करत असतो. हो म्हणताना मान विशिष्ट प्रकारे हलविणे, नाही म्हणताना मानेने/ हाताने विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया देणे हा सामाजिकीकरणाचा भाग आहे. पण निव्वळ जीव आहे म्हणून वाढत आहे अशा मुलीला हे कधी मिळालेच नव्हते. गंमत-शाळेत यायला लागल्यावर ज्या दिवशी ती मुलगी प्रथम हसली, समजून-उमजून हसली, समाधानाने हसली, त्या दिवशी वर्णनातीत असा पुरस्कार मला मिळाल्यासारखे वाटले. ती मंदबुद्धी नव्हतीच. शाळेतही तिने प्रगती केली पण तिच्या बाईपणाने तिचा घात केला आणि सुरक्षिततेच्या नावाखाली तिचा माझ्या नकळत बालविवाह तिच्या आईने लावून दिला.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com