समाजाचा व्यापक विचार करून साथीच्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी, समाज-आरोग्य संवाद साधण्यासाठी, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी, आरोग्यपूर्ण सवयींची रुजवात करण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे सोयीचे होऊ शकते, हे गेल्या काही वर्षांपासून नव्याने जगाला उमजते आहे. केवळ विकसित देशांमध्येच नव्हे तर कित्येक विकसनशील किंवा गरीब देशांमध्येही तंत्रज्ञानाचे वेगवेगळे आयाम सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी पडताळून पाहिले जात आहेत.

‘‘लवकरच ‘गुगल’ कंपनीच्या एका जीवशास्त्र संशोधन विभागाद्वारे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील फ्रेस्ने जिल्ह्यत वीस दशलक्ष जीवाणू-बाधित डास सोडण्यात येणार आहेत. या डासांची पैदास एका रोबोपासून केली गेली आहे’’, असे सांगितल्यास आपल्याला त्यात काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता वाटेल, नाही का? पण असे मुळीच नाही! हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातला एक अनोखा प्रयोग आहे.

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका

गेली कित्येक दशके जगभरातील अनेक देशांमध्ये अक्षरश: हैदोस घालत असणाऱ्या हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या साथींवर विजय मिळवण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. इडीस इजिप्ती या डासाची मादी हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या या तीनही रोगांची साथ पसरवण्यास कारणीभूत असते. ‘गुगल’तर्फे केल्या जाणाऱ्या प्रयोगामध्ये सोडल्या जाणाऱ्या जीवाणूबाधित डासांचे केवळ नरच फ्रेस्ने या जिल्ह्यत सोडले जातील. नर डास माणसाला चावत नाहीत त्यामुळे ते मानवी आरोग्याला घातक ठरणार नाहीत, परंतु या डासांमुळे इडीस इजिप्तीची पुढची पिढी प्रजननक्षमता गमावून बसलेली असेल. म्हणजेच पुढच्या काही वर्षांमध्ये हिवताप, चिकुनगुन्या आणि डेंग्यू या रोगांना समूळ नष्ट करू शकण्याच्या मोठय़ा शक्यता आरोग्य तंत्रज्ञानाच्या या विस्मयचकित करणाऱ्या संशोधनामुळे निर्माण झाल्या आहेत. मानवी चेहरा नसलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीने फार काही साध्य करता येणार नाही, हे जाणल्यामुळे आज तंत्रज्ञान क्षेत्रातील कित्येक कंपन्या तंत्रज्ञानाला मानवाभिमुख करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर आणि शल्यविशारद यांच्या हातामध्ये तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे त्यामानाने पटकन पोहोचले. परंतु समाजाचा व्यापक विचार करून साथीच्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी, समाज-आरोग्य संवाद साधण्यासाठी, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी, आरोग्यपूर्ण सवयींची रुजवात करण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे सोयीचे होऊ शकते, हे गेल्या काही वर्षांपासून नव्याने जगाला उमजते आहे. केवळ विकसित देशांमध्येच नव्हे तर कित्येक विकसनशील किंवा गरीब देशांमध्येही तंत्रज्ञानाचे वेगवेगळे आयाम सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी पडताळून पाहिले जात आहेत. मानवनिर्मित यंत्रे आज मानवजातीचे आरोग्याचे तंत्र सांभाळण्यास मदत करीत आहेत!

यातील सगळ्यात मोठी भूमिका बजावणारे यंत्र आहे खिशात मावणारा लहानसा भ्रमणध्वनी अर्थात मोबाइल फोन! आज जगातील प्रत्येक दोन पैकी एका व्यक्तीच्या हातात किमान एक भ्रमणध्वनी आहे, असा अंदाज आहे. अर्थात, विकसित देशांपेक्षा विकसनशील देशांमध्ये भ्रमणध्वनी असणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. परंतु वाढत्या संख्येने विकसनशील देशातील लोक भ्रमणध्वनी घेत आहेत. एका अर्थाने दुर्दैवाची गोष्ट अशी की जगातील कित्येक दुर्गम भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचलेली नाही, परंतु भ्रमणध्वनीचे जाळे मात्र पोहोचलेले आहे.

एकाच प्रकारच्या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्याचे संदेश पोहोचवणे, आरोग्यपूर्ण सवयींची आठवण करून देणे, आजाराचे निदान करणे, रुग्णांशी संवाद साधणे, गरजूंना आरोग्यसेवेशी क्षणात जोडून देणे, एखाद्या प्रदेशात फोफावणाऱ्या साथीवर बारीक लक्ष ठेवणे अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे भ्रमणध्वनीद्वारे केली जातात. आंतरजाल, ‘स्मार्टफोन’, कल्पकतेने निर्माण केलेली विविध ‘अ‍ॅप्स’ यांचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आता मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटना तसेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थांच्या मते ‘मोबाइल हेल्थ अ‍ॅप्स’ आफ्रिकेतील सामाजिक आरोग्य क्षेत्राचा जणू चेहरामोहरा बदलून टाकत आहेत. लहान बाळांमध्ये एचआयव्हीचे त्वरित निदान करणे, मधुमेह असलेल्या व्यक्तींना आहार आणि व्यायाम यासंबंधीचे संदेश पोहोचवणे, गर्भवती स्त्रियांना योग्य त्या आरोग्य यंत्रणेशी जोडून देणे, आरोग्य सेवकांना माहिती संकलन करण्यास मदत करणे अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे घाना, केनिया, नायजेरिया, मोझांबिक अशा वेगवेगळ्या देशांतील दुर्गम भागांमध्ये मोबाइल हेल्थ अ‍ॅपद्वारे केली जात आहेत.

आरोग्याचे निदान, त्याकरता आवश्यक चाचणी आणि उपचार या तीन गोष्टींना एरवी लागणारा वेळ तंत्रज्ञानामुळे किती झपाटय़ाने कमी झाला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीनमधील तयार केला गेलेलं एक खास प्रकारच्या भ्रमणध्वनीचे जाळे. चीनमध्ये दरवर्षी साधारणत: तीन दशलक्ष लोकांचा हृदयविकाराने प्राण जातो. चीनमधील दुर्गम खेडय़ांमध्ये आजही आरोग्यसेवेची वानवा आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन तेथील दोन कंपन्या आणि एक आरोग्यसंस्था यांनी एकत्र येऊन एक अनोखा भ्रमणध्वनी तयार केला. हा भ्रमणध्वनी माणसाचा ३० सेकंदांचा हृदयाचा आलेख काढून ती माहिती कॉल सेंटरला पाठवतो. चाळीस डॉक्टरांची २४ तास सेवा असलेल्या मोठय़ा आरोग्याच्या जाळ्यापर्यंत ही माहिती क्षणात पोहोचते. हृदयविकार तज्ज्ञ हे आलेख वाचतात आणि आरोग्यास धोका असणाऱ्या रुग्णांना ताबडतोब सल्ला देऊन योग्य त्या आरोग्ययंत्रणेकडे जाण्यास सुचवतात. हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा त्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्या व्यक्तींना या सेवेमुळे वेळीच उपचार घेणे सोपे जाते.

दुसरे उदाहरण आहे, रवांडा देशात नुकत्याच यशस्वी पद्धतीने राबवल्या गेलेल्या ‘वैद्यकीय ड्रोन’चे. रवांडाच्या दुर्गम भागांमध्येसुद्धा चांगल्या प्रतीच्या रक्तपेढय़ा नाहीत. एखाद्या खेडय़ात रक्त किंवा इतर जीवनावश्यक घटक कमी पडत असेल, तर ते मिळवण्यासाठी कित्येक तास किंवा दिवस वाट पाहावी लागते. परंतु ड्रोनच्या प्रकल्पाद्वारे त्यांनी अशी यंत्रणा तयार केली ज्यामुळे जीवनावश्यक घटक केवळ फोनद्वारे संदेश (एस.एम.एस.) लिहून मागवता येऊ लागला. पुढच्या पंधरा मिनिटात ड्रोनला बांधलेले पॅरॅशूट जीवनावश्यक गोष्टी घेऊन रुग्णालयाच्या दाराशी हजर होते. या ड्रोन सेवेमार्फत जीवनावश्यक औषधे आणि घटक वेळेत मिळाल्याने लाखो रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे तंत्रज्ञानाचे केवढे मोठे यश आहे!

भारतातही मिश्किन इंगवले आणि अभिषेक सेन या तरुणांनी तयार केलेल्या ‘टच बी’ हे लहानसे यंत्र मोलाचे कार्य करीत आहे. भारतात गर्भवती महिलांच्या मृत्यूला शरीरात लोहाचे प्रमाण कमी असणे मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य केंद्रावर जायला सवड नसते, त्यामुळे या रोगाचे निदान होत नाही आणि महिलांना मोठय़ा धोक्यास सामोरे जावे लागते. मिश्किनला आणि त्याच्या सहकाऱ्यांना ही बाब खटकली. त्यांनी ‘बायोसेन्स’ ही कंपनी स्थापन करून कमी किमतीत आणि कमी वेळात या रोगाचे निदान करू शकेल असे यंत्र बनवण्याचे ठरवले. अनेक प्रयत्नांनंतर ‘टच बी’ या यंत्राचा जन्म झाला. शरीरात सुई टोचून रक्त न घेता, केवळ एका बोटाला लावायच्या चिमटय़ासदृश यंत्राने लोहाच्या कमतरतेचे निदान होऊ  शकते.

ही सर्व अचंबित करणारी उदाहरणे आपल्याला याची जाणीव करून देतात की माणसाला आता केवळ दीर्घ आयुष्य नको आहे तर उत्तम प्रतीचे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य हवे आहे. केवळ एकेका माणसाचा बेटासारखा विचार न करता संपूर्ण मानवजातीचा विचार केला तरच उत्तम प्रतीच्या आयुष्याची आणि आरोग्याची आस पूर्ण होऊ शकते आणि याकरिता तंत्रज्ञानाचा वापर साहाय्यक म्हणून करता यायला हवा. अर्थात, मानवी भावना, इंद्रिये आणि विवेक आरोग्याची गुंतागुंत ज्याप्रकारे समजून घेतील, तशी यंत्रे घेऊ  शकतील, याची खात्री नाहीच. मलेरिया रोखण्यासाठी कृत्रिम पैदास केलेले डास मदत करतील, औषधे पोहोचत नाहीत त्या ठिकाणी ती ड्रोन पोहोचवेल, एकेकटय़ा जगणाऱ्या वृद्धांना रोजच्या आयुष्यात रोबो आधार देईल, दूरवरच्या खेडय़ातल्या स्त्रीला गोळी घेण्याची आठवण ‘मोबाइल अ‍ॅप’ नक्कीच करेल; पण याचा अर्थ तंत्रज्ञान आरोग्यसेवकांची भूमिका पूर्णपणे बजावेल, असा मात्र नाही.

युवल हरारी या इस्राइली लेखकाने ‘होमो डय़ूअस’ या पुस्तकात मानवी भविष्याविषयी एक भीती व्यक्त केली आहे. तो म्हणतो की ‘‘भविष्यात माणूसच स्वत:ला ‘तंत्रज्ञानाच्या जाळ्याने जोडलेली एक जैव-रासायनिक यंत्रणा’ म्हणून वागवू लागेल, माणूस म्हणून नव्हे..’’ युवल हरारी याची ही भीती खरी ठरू न देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

जपानमधील वृद्धांसाठीचा वैद्यकीय रोबो.

मुक्ता गुंडी सागर अत्रे gundiatre@gmail.com