‘मित्र’ म्हणावा इतकी ती जवळची मैत्रीण झाली, तरीदेखील प्रत्येक गोष्टीचा एक स्त्री म्हणून वेगळा दृष्टिकोन असू शकतो ही समज तिच्यामुळेच आली. अमुक व्यक्ती स्त्रीलिंगी असल्यानं तिची एक वेगळी ‘स्पेस’ असते, याची उमज आली. त्याचा उपयोग बहिणीला, इतर मैत्रिणींना, बायकोला समजून घेण्यात झाला. डॉक्टर म्हणून घडतानाच्या काळात ‘ती’ आयुष्यात आल्यानं जी समृद्धी मिळाली, जी आजतागायत चालू आहे…

‘माझी मैत्रीण’ या सदरासाठी लेख लिहायचं ठरवल्यावर ज्यांच्याबद्दल लिहिता येईल अशी पाच-सात नावं लागलीच डोळ्यापुढे आली. ‘हिच्याबद्दल लिहिलं तर तिला राग येईल का?’ असंही लगेच वाटलं. बरं, आता पार पन्नाशी जवळ येतानाही, ‘त्या मैत्रिणींना काय वाटेल?’ अशी भावना/ प्रश्न यावा याची मौज वाटली. आपल्याच आत, खोल नेणिवेत कुठल्या कुठल्या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या असतात आणि वेळ येताच कशा वर येतात हे गूढ वाटेल इतकं चमत्कारिक आहे. त्यामुळेच कदाचित जिच्यापर्यंत हा लेख पोहोचणार नाही आणि पोहोचला तरी समजणार नाही अशा मैत्रिणीची निवड माझ्या नेणिवेनं केली असावी.

‘न्यू इंग्लिश स्कूल’ या अट्टल मराठी/ सेमी-इंग्रजी केवळ मुलांच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर थेट ‘फर्ग्युसन’मधलं अकरावी-बारावी, हा त्या काळात बालमनाला बसलेला सांस्कृतिक धक्का होता. नाही म्हणायला नववी-दहावीला लावलेल्या क्लासमध्ये मुली होत्या, पण त्या काळी बव्हंशी मित्रपक्ष-शत्रुपक्ष अशी ती विभागणी असे. ‘अहिल्यादेवी’, ‘रेणुकास्वरूप’, ‘कन्या प्रशाले’तून येणारा शत्रुपक्ष, तर ‘रमणबाग’, ‘भावे हायस्कूल’, ‘नूमवि’ आदीतून येणारा मित्रपक्ष! तो काळ असा होता, की शत्रुपक्षाशी बोलणं हीच गुलबकावलीचं फूल मिळण्याइतकी दुर्मीळ गोष्ट असे. अर्थात त्यांच्याशी बोलणारी मुलं होती, पण इतर सगळा समूह त्यांच्याकडे परग्रहवासीयांप्रमाणे बघत असे.

हेही वाचा >>> ‘भय’भूती : भयाच्या अनंत मिती!

कॉलेज भलेही ‘फर्ग्युसन’असलं, तरीही कॉलेज सुरू झाल्यावर पहिल्या दहा-पंधरा दिवसांतच तिथेही ‘टिपिकल’ मध्यमवर्गीय मानसिकतेची मराठी मुलं चाळणीतून खडे एकत्र व्हावेत तशी एकत्र आलीच! सबब अकरावी-बारावी मैत्रिणीविनाच गेली. आपणही मुलींशी बोलू शकतो आणि चक्क मित्रही होऊ शकतो, हा साक्षात्कार ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षी झाला. कॉलेजची आमची केवळ दुसरीच बॅच! मी प्रवेश घेतल्यानंतरच्या पाच-सहा महिन्यांतच आम्ही विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटविरोधात जणू एक युद्ध पुकारलं आणि वर्षभरातच कॉलेज बंद पाडलं! चक्क कॉलेजच बंद पाडणाऱ्या निखाऱ्यांना आपल्या ओच्यात कोण बांधून घेणार? पुन्हा तीन महिने विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करून झाल्यावर अखेर चार-पाच वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आम्हाला शोषून घेतलं गेलं. त्या अनिश्चिततेच्या, कठीण काळात झालेली मैत्री, बंध पंचवीस वर्षांनंतरही, अजूनही तितकेच मजबूत आहेत. त्यात अर्थातच मित्रही आहेत, मैत्रिणीही.

नंतर आयुर्वेद मानसरोगात ‘एम.डी.’ करायला कोट्टक्कल, केरळात गेलो आणि नमनाला घडाभर तेल झाल्यावर ज्या मैत्रिणीबद्दल मी बोलणार आहे तिची यानंतर दोन वर्षांनी भेट झाली. पंचवीस वर्षांपूर्वी केरळमधल्या आडगावात जशी परिस्थिती असू शकेल तशीच होती. केरळ फिरायला वगैरे जितकं आकर्षक, तितकंच तिथे राहायला (तेव्हा) नकोसं होतं. ‘यू.जी.’ कॉलेज अतिशय जुनं असलं तरी ‘पी.जी.’ची आमची कॉलेजसाठी पहिलीच बॅच! त्यात केवळ तिघे केरळबाहेरचे विद्यार्थी. त्यामुळे एकुणात कॉलेजमध्ये अर्थातच केरळी लोकांचा वरचष्मा होता. आपण मराठी लोक पाहुणचार करण्यासाठी चांगले आहोत, हा शोध आम्हा तिकडच्या मराठी विद्यार्थ्यांना तेव्हा लागला! विविध कारणांनी तीन वर्षांत समस्त नॉन-केरलाइट्सची वजनं घटली/ काही ना काही त्रास झाले. आमच्या ‘एचओडी’ला हिंदीचा गंध नव्हता आणि दोन इंग्रजी वाक्यं बोलून ते लागलीच मल्याळम्कडे वळायचे. त्याचे अनेक किस्से आहेत!

मी शेवटच्या वर्षाला गेलो असता जी बॅच आली, त्यात त्रिवेंद्रमची सुमी होती. शक्यतो पांढऱ्या कपड्यांत वावरणारी सुमी तेव्हा श्री. श्री. रविशंकरांची ‘भक्त’ म्हणावी अशी होती. कॉलेजचे तास संपल्यावर त्यांच्या बॅचची मुलंमुली आणि आम्ही सीनियर्स यांचा चांगला रॅपो होऊ लागला. त्यात विशेषत: सुमीबरोबर महाराष्ट्रातला आयुर्वेद आणि तिथला आयुर्वेद ते फिलॉसॉफी अशा विविध अंगानं गप्पा रंगत.

हेही वाचा >>> मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!

आम्हा नॉन-केरळी लोकांचा हॉस्टेलमध्ये कुणाच्या तरी रूममध्ये जमून रोज संध्याकाळी केरळी लोकांची टवाळी करणे असा कार्यक्रम असायचा. कधी कधी कॉफी कट्ट्यावरही हा विषय चाले. हळूहळू सुमीही त्यात येऊ लागली आणि केरळी लोकांना नावं ठेवण्यातही सामील झाली. या सगळ्या नावं ठेवणं प्रकारात एक केरळी मुलगी हिरिरीनं भाग घेते आहे, ही आमच्यासाठी अर्थातच आश्चर्याची गोष्ट होती. बऱ्याच अंशी पारंपरिकता/ कट्टरपणा जपणाऱ्या केरळात, तेही पंचवीस वर्षांपूर्वी सुमी ही ‘मॉड’ म्हणता येईल अशीच होती. ‘मिल्मा मिल्क बूथ’वर कॉफीवर तासन्तास गप्पा मारायला तिला काहीच वाटायचं नाही. शिक्षकांच्या रागीट नजरा ती स्टेडियमच्या बाहेर लीलया भिरकावून द्यायची. एक-दोन प्रसंग असे आले, की आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या विरोधी मतं मी मांडली. त्यांचा अहंकार दुखावला गेला. तेव्हा ‘तुझी भूमिका बरोबर असून ती तू सोडता कामा नयेस,’ असं सर्वांसमक्ष म्हणणारी सुमीच होती. माझी बाजू घेण्याचा तिला पुढे तिथे असेपर्यंत त्रास सहन करावा लागला. काही कारणांमुळे तिनं ‘एम.डी.’ पूर्ण केलं नाही. तिनं कधीच तसं म्हटलं नाही, पण माझ्या अंदाजे त्यात हे एक कारण असावं. त्रिवेंद्रमला तिच्या घरी तेव्हा दोन-चार वेळेला जाणं झालं. सतत वाचन करणारे तिचे बाबा, हसतमुख आई आणि ‘एम.बी.बी.एस.’च्या शेवटच्या वर्षाला असणारी तिची बहीण यामी सगळ्यांना भेटलो.

केरळमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नावांनाही आम्ही नावं ठेवायचो. ‘सुमी’ तर चांगलंच नाव आहे, पण अनेक नावं ही रँडम बॉक्सेसमधून अक्षरं निवडून एकापुढे एक ठेवल्यासारखी वाटतात. ‘तुझ्या नावाचा अर्थ काय?’ म्हटल्यावर खांदे उडवून तोंडाचा चंबू करणारे अनेक केरळी पाहिले. आम्ही त्याची खिल्ली उडवत हसायला लागलो की मोठमोठ्यानं सुमीही हसण्यात सामील होई. प्रसंगी ती स्वत:हूनच अशी नावं शोधून आमच्यापुढे ठेवी! जीशा, शिबी, सीबी, जोबी, जीशी, जिंशीद, मिसी, वगैरे वगैरे. कॉलेजचा काळ असा असतो, की एखाद्याच्या एक-दोन गोष्टी एकदम पटल्या तरी मैत्री व्हायला वेळ लागत नाही. माणूस घडताना मग मित्र/ मैत्रिणीच्या अनुषंगानंही काहीसा घडतो.

मध्यंतरी घडलेल्या त्या शिक्षकाच्या प्रसंगानंतर सुमी उघडउघड एल्गार पुकारू लागली. लेक्चर्स बुडवणं, उशिरा येणं, प्रोजेक्ट पूर्ण न करणं, इत्यादी गोष्टींनी तिनं तिच्या गाइडला वात आणला होता. त्यात आम्ही एकदा लायब्ररीत अभ्यास करत बसलो असता तिला खुर्चीतून उठताच येईना. खुर्चीसकट उचलून आम्ही तिला कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. स्लिप डिस्क! तीन-चार आठवडे ती अॅडमिट होती. त्या काळात कॉलेजवरून येताना आणि जाताना आणि बऱ्याचदा मध्येही थांबून आम्ही गप्पा, जोक यांचा सिलसिला चालू ठेवला होता.

नव्वद टक्के कॉलेजकुमारांप्रमाणे मीही त्या काळी कविता करायचो. तिचा आग्रह असे, की आधी मराठीत वाचून दाखव आणि मग हिंदीतून अर्थ सांग! कवितेत असणारी, शब्दांनी उत्पन्न होणारी लय तिला अनुभवायची असे.

माझ्या तिथल्या शेवटच्या वर्षी थिसीस लिहायचं काम सुरू होतं. तेव्हा कॉलेज लायब्ररी आणि डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकी एक-एक कॉम्प्युटर होता आणि विद्यार्थी सहा! त्यामुळे कॉम्प्युटर मिळवण्याची मारामारी असायची. त्या काळात सुमीनं कॉम्प्युटर घेतला आणि माझ्या अर्ध्याअधिक थिसीसचं काम तिथूनच पूर्ण झालं. विविध फ्लॉपी डिस्कमध्ये कॉपी करून पंचवीस किमी दूरचा एक प्रिंटर गाठला. अशा थिसीस प्रिंटींगचा, एम्बॉसिंग इत्यादीचा त्याला अनुभव नव्हता. पण त्यानं वेळेत आणि नीट काम पूर्ण केलं. विविध अडचणींचा सामना करत अखेर ओलेता थिसीस घेऊन, शेवटच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता जमा केला! या अटीतटीच्या काळात बरोबर सुमी होती म्हणून माझा निभाव लागला.

अनेक ठिकाणी भाषेच्या अडचणीत सुमीची मदत व्हायची. मानसरोगात रोगाचं निदान करण्यासाठी ‘हिस्ट्री टेकिंग’ला अनन्यसाधारण महत्त्व असतं. निदान करण्यात आणि नंतरही रुग्णाबरोबर संवाद अत्यावश्यक असतो. मानसरोगात रक्ताच्या किंवा इतरही तपासण्या फारशा उपयोगी ठरत नाहीत. खेड्यापाड्यांतून येणारे आणि ग्रामीण मल्याळी भाषा बोलणारे रुग्ण आले की माझ्यासाठी सुमीच तारणहार होती. तिची इंग्रजीबरोबर हिंदीही चांगली होती. त्यामुळे गप्पाटप्पा करायला भाषेची अडचण आली नाही.

अनेक मल्याळी लेखक, कवी, दिग्दर्शक, अभिनेते यांची ओळख त्यांच्या कामातून सुमीनं करून दिली. ‘ऑथेन्टिक’ मल्याळी डिशेस खाऊ घातल्या, तिकडच्या तिच्या मित्रमैत्रिणींची ओळख करून दिली. केरळमधलं माझं शेवटचं वर्षं सुमीमुळे खूपच सुसह्य झालं आणि शिवाय आधीच्या दोन्ही वर्षांना पुरून उरलं! केरळच्या ज्या काही माझ्या चांगल्या आठवणी आहेत त्यात शेवटच्या वर्षाचा सिंहाचा वाटा आहे.

‘मित्र’ म्हणाव्यात अशा ज्या मैत्रिणी झाल्या, त्यातली सुमी अग्रगण्य म्हणता येईल. तरीदेखील प्रत्येक गोष्टीचा एक स्त्री म्हणून वेगळा दृष्टिकोन असू शकतो ही नकळत समज सुमीमुळे आली. अमुक व्यक्ती ही स्त्रीलिंगी असल्यानं तिची एक वेगळी ‘स्पेस’ असते, एक वेगळा पैलू असतो, याची उमज आली. त्याचा उपयोग बहिणीला समजून घेण्यात, इतर मैत्रिणींना, बायकोला समजून घेण्यात झाला असावा असं आता वाटतं. तिथे असताना आणि तिचा एक ‘स्त्री-मित्र’ म्हणून आणि शिवाय एक स्थानिक म्हणून असा डबल खंदा सपोर्ट असल्यामुळे माझा आत्मविश्वास इतर नॉन-केरळी विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त होता. जग जिंकणं काही फारसं अवघड नाही याची खात्रीच तेव्हा झाली होती! एक व्यक्ती म्हणून घडायला आपले सगळेच सगेसोयरे हातभार लावतात. आयुष्याच्या त्या फेजमध्ये सुमी आल्यामुळे एका अर्थी समृद्धी मिळाली, जी आजतागायत चालू आहे.

तिच्याच वर्गात असणारा, बागपथ, हरियाणाहून आलेला विनय चौधरी, सुमी आणि मी असा आमचा ग्रुप बनला. आजही दिल्लीला गेलो की विनयची आणि केरळमध्ये गेलो की सुमीची भेट होतेच. केरळमधल्या कुठल्याही कामाला माझी ‘सुमी हैं ना!’ ही खात्रीची भावना असते.

सुमी सध्या कोचीच्या एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर आहे. अजूनही भेट झाली, फोन झाले आणि ‘तुझं एमडी कधी पूर्ण करणार?’ असा प्रश्न विचारला की, ‘देखेंगे… करेंगे…’ म्हणते आणि हसून विषय बदलते.

dr.rangnekar@gmail.com