मीनाक्षी म्हात्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नॉर्दर्न लाइट्स’चा प्रकाशाचा विविधरंगी खेळ पाहणं हे इतर पर्यटनस्थळांना भेटी देण्यापेक्षा वेगळं आहे. हा प्रकाश कधी दिसणार, दिसणार की नाही, ही अनिश्चितता कायम असते. संयमाची कसोटी लागलेली असताना एकदम वावटळीसारखा, वेगवेगळे आकार घेत प्रकाशाचा झोत पुढे जाताना दिसतो, तेव्हा त्या दृश्याचं मोल आगळंच असतं!

नॉर्दर्न लाइट्स’ या प्रकाराबद्दल फार वर्षांपूर्वी माहिती झाली, तेव्हापासून, ते पहायला जायचं स्वप्न मनाच्या खोलवरच्या कप्प्यात मी जपलं होतं. विशिष्ट ठिकाणी रात्री क्षितिजावर दिसणारा हा विविधरंगी प्रकाशाचा खेळ. पण कधी नॉर्वे, कधी रशिया, तर कधी आणखी वेगळा देश, जिथे नॉर्दर्न लाइट्स् दिसतात, तिथे ती वेळ साधून जायचं काही ना काही कारणानं राहून जात होतं. आयुष्याची सरणारी वर्षं वाकुल्या दाखवत होती. हे स्वप्न, स्वप्नच राहतं की काय, असंही वाटायला लागलं होतं. मात्र या वर्षी मुलानं अलास्का सहलीचा घाट घातला आणि मी तिथे जायची तयारी सुरू केली.

हेही वाचा…तिचा पिलामधी जीव…

सतत प्रवासाची सवय असल्यानं कोणत्याही हवामानाला वापरता येतील असे कपडे माझ्याकडे आहेतच, असा माझा गोड गैरसमज! प्रत्यक्षात स्नोबूट्स् ते चांगल्या दर्जाच्या कानटोपीपर्यंत सर्व खरेदी नव्यानं करावी लागली. नातीच्या शाळेच्या ‘स्प्रिंगब्रेक’ची संधी साधून आमचं कुटुंब अलास्कामधल्या ‘फेअरबँक्स’ला पोचलं. विमानतळाच्या बाहेर आलो, तर समोर सगळीकडे नुसता बर्फ! प्रचंड वारा आणि थंडीनं अक्षरश: दातखीळ बसण्याची वेळ आली. दिवसा ही परिस्थिती, तर नॉर्दर्न लाइट्स पाहायला रात्रीच्या थंडीत काय होईल, याची कल्पनाच करवेना! आम्ही एकूण तीन रात्री हे लाइटस् पाहण्याचा प्रयत्न करणार होतो. मात्र ते अमुक रात्री दिसतीलच याची काही खात्री नसते. तरी या वर्षी गेल्या वीस वर्षांपेक्षा सर्वांत जास्त प्रमाणात नॉर्दर्न लाइटस् दिसण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे आशेचा हिंदोळा उंच उंच जात होता. जिथे प्रकाशाचा कवडसाही येणार नाही अशा ठिकाणी आपलं नशिब अजमावायला रात्री जावं लागतं. पाऊस, बर्फवृष्टी, वारा, कधी आणि किती प्रमाणात सुरू होईल, यावर थंडीचं प्रमाण कमी-जास्त. आपल्यासारख्या सतत गरम, दमट हवेत राहणाऱ्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी! पण ‘मागणी तसा पुरवठा’ हा ‘फंडा’ जगभर असतो. त्यामुळे इथेही सुखसोई निर्माण झाल्या नसत्या तरच नवल! शहरापासून दूर शक्य तेवढ्या मोकळ्या जागेत स्थानिक लोकांनी काही लाकडी केबिन्स तयार केल्या आहेत. त्या ऊबदार तर असतातच पण, चिप्स, कोक, कॉफी वगैरेचा पाहुणचारही होतो. सोफासेट, टेबल-खुर्च्या, टीव्ही असतो. लहानमोठ्यांसाठी बैठे खेळ असतात. नव्यानं येणाऱ्या प्रत्येक गटाचं स्वागत करून तिथला अटेंडंट प्राथमिक माहिती देत होता. तिथे ‘वायफाय’ आहे, या बातमीनं सर्वांना हायसं वाटत होतं. त्यामुळे अर्थातच येणारा प्रत्येक जण आधी आपापला मोबाइल वायफायशी जोडून मोबाइलमध्ये तल्लीन होत. आम्ही बऱ्याचदा बाहेर जाऊन आकाशाकडे आशाळभूतपणे पहायचो… पण सारं कसं शांत शांत होतं. अटेंडंट वारंवार बाहेर जाऊन आत येताना दारापाशी जोरजोरात बूट आपटून त्यावरचा बर्फ झटकायचा. लगेच सर्वांच्या माना दाराकडे वळायच्या. त्यानं तोंडातल्या तोंडात काही पुटपुटून नकारार्थी मान हलवली, की साऱ्या माना पुन्हा मोबाइलमध्ये! वाट पाहण्याशिवाय आमच्याजवळ तरी पर्याय काय होता! म्हणता म्हणता दोन वाजले. आमची वेळही संपली. आता लाइट्स दिसण्याची शक्यता नसल्याचं जाहीर झालं आणि आम्ही झोपाळलेल्या डोळ्यांनी, निराश मनानं बाहेर पडलो. हॉटेलवर परतताना माझा मुलगा ‘दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी बुकिंग आहे, तिथे लाइट्स दिसतील,’ असं काहीबाही सांगून समजूत घालत होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पाऊस आणि बर्फ पडायला सुरुवात झाली. आकाश पूर्ण ढगाळ होतं. आज नॉर्दर्न लाइट्स जाऊ दे, विजांचा चमचमाटच दिसण्याची शक्यता होती. फारशी आशा न ठेवता ठरल्या स्थळी पोहोचलो. ही केबिन एका गोठलेल्या तळ्यावर उभी होती. गाडीतून बाहेर पडण्यासाठी अंदाजानं पाय खाली टाकला, तर पायच घसरायला लागला. काचेसारखा चकचकीत घट्ट झालेला बर्फ! गाडी थोड्या भुसभुशीत बर्फाजवळ नेल्यावर कसेबसे चालत केबिनमध्ये शिरलो. आत एका विशिष्ट प्रकारच्या शेगडीत लाकडांचे ढलपे घालून केबिन उबदार केली होती. खाण्यापिण्याची सोय तर होतीच, पण एका बाजूला बर्फात छोटे छोटे चौकोनी खळगे केले होते. नॉर्दर्न लाईट्स दिसण्याची वाट पाहताना गळानं मासे पकडण्याची सोय! असा काही मासेमारीचा अनुभव घेता येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही पकडलेले मासे तिथेच शिजवून ‘डिनर’मध्ये दिले जाणार होते. हा अटेंडंट बडबड्या होता. गोठलेल्या तळ्यावर केबिन कशी उभी करतात हे त्यानं स्वत:हूनच सांगितलं. हिवाळ्यात तळं गोठायला लागलं, की साधारण चार इंचांचा थर झाल्यावर लाकडी केबिन तिथे उभी करतात. तळं अधिकाधिक गोठत जातं, तशी ही केबिन पाय घट्ट रोवून उभी राहते.

हेही वाचा…सांधा बदलताना: भान हरवलेल्यांचं भान!

मजा अशी, की या निर्जन ठिकाणीही वायफाय कनेक्शन होतं! नॉर्दर्न लाइट्स केव्हा दिसतील या शक्यता वर्तवणाऱ्या अ‍ॅप्सविषयी कळलं. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान ते दिसण्याची शक्यता होती. एकीकडे आमची मासेमारी चालू होती आणि गळाला खरोखरच मासे लागत होते! थोडे मासे पकडल्यावर अटेंडंटनं ते स्वच्छ करून, मसाले लावून शिजवण्याची तयारी सुरू केली. आम्ही आळीपाळीनं बाहेर जाऊन आकाशात काही दिसतंय का, ते पाहात होतोच, पण मिट्ट काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हतं. आता पाऊस मात्र थांबला होता. तळलेले मासे, सॅलड, सॉस, ब्रेड, चिप्स, अशा पदार्थांनी सजलेल्या प्लेटस् प्रत्येकाच्या हातात आल्या. आमचं लक्ष मात्र आता फक्त लाइट्स कधी दिसणार, किंबहुना दिसणार का, याकडे होतं. अचानक अटेंडंटनं केबिनचं दार उघडून आम्हाला बाहेर बोलावलं… हिरव्या रंगाचे प्रकाशझोत समोर दिसत होते. पाहीपर्यंत एखाद्या वावटळीसारखा भिरभिरत, वेगवेगळे आकार घेत, मोठा झोत सरसरत पुढे पुढे निघून गेला… काही सेकंदांचा खेळ! पण दिग्मूढ व्हायला झालं. परत क्षितिजाजवळ हिरवट रंगाची उधळण. काय पाहू आणि किती पाहू, असं म्हणेपर्यंत हळूहळू सगळीकडे धूसर अंधार पसरला. जादूचा खेळ संपला होता बहुतेक. पण ‘आणखी हवं’ची आस तिथून पाय काढू देईना. इतक्या थोड्या वेळात त्या नजाऱ्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत.

तिसरा दिवस, नवी जागा. थोड्याफार फरकानं पहिल्या दिवसासारखंच. मात्र धोधो पाऊस. अ‍ॅपच्या माहितीनुसार आज लाइट्स दिसण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. तरीही आशा अमर असते! चिवटपणे दोन वाजेपर्यंत थांबलो… शेवटी परतलो. पण आज मात्र लाइट्स दिसले नाहीत तरी मन खट्टू झालं नाही. आदल्या रात्री पाहिलेल्या जादुई दृश्याची आठवण कायम मनात राहणार होती!

हेही वाचा…कुटुंब सांधणारी न्यायसंस्था…

एक स्वीडिश सिनेमा पाहताना या लाइट्सचा जरा वेगळा संदर्भ सापडला. त्या गोष्टीत एक छोटा मुलगा त्याचं लाडकं रेनडिअरचं पिल्लू कुणीतरी मारून टाकल्यानं व्याकुळ झालाय. अंगणातल्या बर्फावर लोळण घेतोय. त्याच वेळी त्याचं लक्ष आकाशात झगमगणाऱ्या नॉर्दर्न लाइट्सकडे जातं. त्या प्रकाशाला उद्देशून तो जोरजोरात काहीबाही गाणं म्हणू लागतो. त्याची आजी दाराशी येऊन म्हणते, ‘‘अरे, त्या प्रकाशाला काही बोलू नकोस. आपल्या पूर्वजांचे आत्मे त्याच्याबरोबर फिरत असतात.’’
तो छोटा भाबडेपणानं आजीला विचारतो, ‘‘मग माझं रेनडिअरचं पिल्लूपण त्या नॉर्दर्न लाइट्सबरोबर फिरत असेल का?’’ आजी त्याला आश्वस्त करत म्हणते, ‘‘या जगात जन्मून गेलेला प्रत्येक आत्मा त्यांच्याबरोबर फिरत असतो…’’ आणि छोट्याची समजूत पटते.

हेही वाचा…स्त्री विश्व : स्त्रीचं ‘बार्बी’ शरीर

कोण जाणे, पण ते पाहून वाटलं, जगातला कोणताही देश, कोणताही समाज असो, निसर्गाशी भावनिक नातं जोडण्याची उमज मानवाच्या मनात उपजतच असावी!

meenadinesh19@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaturang article chasing the northern lights an unforgettable alaska trip psg