scorecardresearch

गेले लिहायचे राहून.. : संशयाचा फायदा

मानवी बुद्धीची विचार करण्याची प्रक्रिया हा या तत्त्वाचा पाया आहे. कोणतीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा पुराव्यांची गरज असते.

|| –  मृदुला भाटकर

प्रत्येक घटनाक्रम आपल्याला जसा दिसतो, वाटतो तसा प्रत्यक्षात असतोच असं नाही. काही वेळा एखाद्या महत्त्वाच्या दुव्याकडे आपलं सपशेल दुर्लक्ष झालेलं असतं, तर पुष्कळदा पूर्वग्रहांच्या अडसरामुळे समोर असलेला पुरावाही दिसेनासा होतो. अशा स्थितीतही आपण कित्येकदा त्या विशिष्ट स्थितीत सापडलेल्या व्यक्तींचा, नात्यांचा निवाडा करताना ‘हा बरोबर- तो चुकला’ अशी मतं बनवून टाकतो! न्यायदानात मात्र अचूक अनुमानापर्यंत पोहोचण्यासाठी पुरावांच्या सर्व साखळय़ा पक्क्या लागतात. अन्यथा ‘संशयाचा फायदा’ द्यावा लागतो.

जेव्हा गुन्हेगार सुटतात, तेव्हा संशयाचा फायदा हे एक महत्त्वाचं कारण असतं. त्याचा राग येतो सर्वसामान्य नागरिकाला. ही कोणती न्यायव्यवस्था? सर्रास व्यक्त केली जाणारी ही प्रतिक्रिया न्यायसंस्था कायम झेलत राहते.

हा संशयाचा फायदा कशासाठी आणि का द्यायचा, याचं उत्तर सोपं आहे. मानवी बुद्धीची विचार करण्याची प्रक्रिया हा या तत्त्वाचा पाया आहे. कोणतीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा पुराव्यांची गरज असते. अपुऱ्या पुराव्याच्या आधारे केलेला विचार आणि घेतलेला निर्णय हा चुकीचा, म्हणजेच अन्यायकारक ठरतो. दिवाणी खटल्यातला पुरावा आणि फौजदारी खटल्यात लागणाऱ्या पुराव्यांचं स्वरूप भिन्न असतं.

माझे एक प्राध्यापक मित्र आणि एक तरुण उद्योजक परेश देसाई यांची भेट एका कॉफीशॉपमध्ये सकाळी अकरा वाजता ठरलेली होती. प्राध्यापक पासष्ठीचे होते. त्यांनी परेशला कधी पाहिलेलं नव्हतं. पहिल्यांदाच दोघं भेटणार होते. प्राध्यापक नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेआधी, दहा वाजून चाळीस मिनिटांनी तिथे हजर झाले. परेश खूप व्यग्र असणारा, कॉर्पोरेट सेक्टरमधला चाळीस-पंचेचाळिशीचा तरुण आहे, एवढीच माहिती त्यांना होती. ते आत आले, जरा कोपऱ्यातलंच टेबल पाहू लागले, तर कोपऱ्यात त्यांना एक चाळिशीचा चुणचुणीत तरुण एका वयस्कर स्त्रीबरोबर बसलेला दिसला. त्याच्यासमोर लॅपटॉप उघडलेला होता आणि त्या स्त्रीबरोबर काहीतरी बरंच गहन बोलता बोलता तो भराभर टाइप करत होता. त्या तरुणानं त्यांना ते आत आल्या आल्या पाहिलं आणि आदरार्थी लवून ओळखीचं हसला. त्यांना वाटलं, की हा परेश त्यांच्यापेक्षाही वेळेचा पक्का दिसतोय. आधीची व्यावसायिक भेट पण त्यानं इथेच ठेवलेली दिसतेय.

त्यांनी स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी विचारलं, ‘‘परेश?’’ तो चटकन अर्धवट उभं राहून ‘हो’ म्हणाला. त्यांना वाटलं, की आपण वीस मिनिटं आधी येऊन त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणणं बरोबर नाही. अकरा वाजताची आपली वेळ आहे. ते म्हणाले, ‘‘यू बेटर कंटिन्यू.. मीच जरा बरी जागा शोधायला आधी आलोय.’’ ते एक टेबल सोडून पलीकडे बसले, स्वत:साठी कॉफी मागवली.

‘‘परेश तुम्हाला कॉफी?’’

‘‘नको सर, आम्ही आत्ताच संपवली. हे आता काम संपवतोय.’’

‘‘ओह, कंटिन्यू!’’ प्राध्यापकांना या तरुण पिढीचं फारच कौतुक होतं. सगळी मुलं कशी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वेळेचं नियोजन करतात. यशस्वी होण्याचं भान असलेली ही पिढी आहे. आता अकरा वाजता परेश त्याची पहिली मीटिंग संपवून आपल्याबरोबर मीटिंग सुरू करेल, वा! इतक्यात त्यांची कॉफी आली आणि त्यांनी बरोबर आणलेलं पुस्तक उघडलं.

अकरा वाजले. परेश पलीकडे बोलण्यात मग्न. पण प्राध्यापकांकडे पाहून हसला. आता तीन मिनिटं प्राध्यापक वाट बघणार होते. मग मात्र आपणच परेशला सांगायला हवं, असं त्यांनी ठरवलं. तेवढय़ात समोरून एक स्मार्ट, हसरा तरुण टेबलाशी उभा राहिला.

‘‘गुड मॉर्निग, मी परेश!’’ असं म्हणत तो समोरच्या खुर्चीत बसला.

प्राध्यापक अवाक! त्यांनी पलीकडच्या परेशकडे पाहिलं तर तोही त्यांच्याकडेच पाहात होता. त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी समोरच्या परेशला विचारलं, ‘‘परेश देसाई?’’

‘‘येस सर’’

त्यांनी पलीकडच्या परेशकडे प्रश्नांकित चेहऱ्यानं पाहिलं. तो म्हणाला, ‘‘सर, मी परेश नाईक.’’

‘‘अरे, पण मला तुम्ही तर हसून ओळख दिलीत?’’

‘‘सर, मी तुमचा १५ वर्षांपूर्वीचा विद्यार्थी. मला नवल वाटलंच, की माझं नाव अजूनही तुमच्या लक्षात आहे!’’

‘‘हो का, नावात गोंधळ झाला. मी पूर्ण नाव नाही विचारलं तुला. अरे, आजकाल नुसती नावानंच हाक मारायची असते ना! म्हटलं आपणही तसंच करावं. सॉरी!’’

हा होता गैरसमज आणि त्यातून घडलेला लहानसा विनोद. पण हा का झाला? तर पूर्ण माहिती न दिल्यामुळे. तसंच तपासकामाचं असतं. सगळे पुरावे गोळा करावे लागतात. एखादा दुवा जरी नसेल, तर ती पुराव्याची साखळी अर्धवट राहते. कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुराव्याची साखळी संपूर्ण असावी लागते. काही गृहीतकांवर आपण घटनांची साखळी तयार करतो आणि अनुमानावर विश्वास ठेवतो. परंतु गृहीतकच जर अपूर्ण किंवा चुकीचं असेल, तर अनुमान बरोबर नसतं. तर्कशास्त्रात विचार करण्याच्या पद्धतीत होणाऱ्या गमती सुंदर पद्धतीनं मांडलेल्या आहेत. त्याला ‘फॅलसी’ म्हणतात. त्यामुळे विचारांच्या मांडणीत गफलत होऊन उत्तर चुकतं. आपल्या दैनंदिन घटनांचा क्रम, त्यांचा विचार असाच कधी कधी चुकतो आणि होतो तो गैरसमज. हा गैरसमज कायद्यातही पुराव्याची छाननी करताना होऊ शकतो. त्यातून होऊ शकणारा निवाडा चुकू शकतो. मग त्या वेळेस कायदेशीर तत्त्वाचा आधार घेतला जातो, त्यालाच म्हणतात संशयाचा फायदा. खात्री, गैरसमज आणि संशयाचा फायदा हे एकमेकांत गुंतलेले धागे आहेत. अर्थात जिथे पुरावा पुरेसा खात्रीशीर असतो तिथे न्यायाधीश नि:संदेह निर्णय देतच असतात. रोजच!

आपल्या डोक्यातल्या घट्ट असलेल्या ठोकताळय़ांचा फार मोठा अडसर असतो. ज्याला इंग्रजीमध्ये ‘स्टीरिओ टाइप’ म्हणतात. त्यानुसार आपण वेगवेगळे चष्मे घालतो.

१+१ = २ एवढंच डोक्यात घट्ट असलं, की

अर्धा+अर्धा+अर्धा+अर्धा = २ किंवा ३-१ = २ हे काही पटत नाही. पण अशी अनेक समीकरणं, ज्याचं उत्तर दोन आहे, अशी अस्तित्वात असतात. म्हणून न्यायाधीशाला खटला ऐकताना कायम स्वत:चं मन हे कोऱ्या पाटीसारखं ठेवावं लागतं. त्यावर घटना मांडल्या जातात, वकील लिहीत जातात. मग त्यातलं खरं ते ठेवायचं आणि खोटं ते पुसायचं. पण खरं स्पष्ट दिसत नसेल, उमटलं नसेल किंवा लिहिलंच नसेल, तेव्हा खात्री झाली असं न म्हणता संशयाचा फायदा देणं आवश्यक.

माझ्या बाबतीत घडलेली एक मजेदार

घटना. मी १७ वर्षांची असेन त्या वेळी. सायकलवरून पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावर ‘पवार क्वॉर्टर्स’ इमारत कुठाय ते शोधतेय. बरोबर दुपारी ४ वाजताची चित्रकार बापू देऊस्करांनी वेळ दिलेली. बापू वेळेचे फारच पक्के. शिवाय त्यांना पहिल्यांदाच भेटणार होते. दोन फेऱ्या मारून झाल्या. रस्त्यावरच्या तीन लोकांना विचारलं. तरी ‘पवार क्वॉर्टर्स’ काही मिळेना. तेव्हा फोन नव्हता. तिथल्याच गल्लीत आत ‘स्नेहबंध सोसायटी’मध्ये त्या वेळी बापू राहायचे. मी त्या भर उन्हात वैतागून एका गल्लीच्या तोंडाशी फूटपाथवर दमून उभी राहिले. ‘जाऊ दे, आता घरीच जावं. हा पत्ता काही बरोबर नाही.’ असा विचार करत असतानाच समोरच्या इमारतीच्या गॅलरीत आलेल्या बाईनं फराफरा तिच्या दोन वाळत घातलेल्या साडय़ा ओढल्या, तर खाली भिंतीवर इमारतीचं नाव लिहिलं होतं- पवार क्वॉर्टर्स!

म्हणजे पुरावा तर होता, पण झाकलेला. जर तिनं त्या साडय़ा तिथून काढल्या नसत्या, तर मी घरी निघून गेले असते, कारण माझा गैरसमज झाला असता, की मला नीट पत्ता सांगितला नाही. आणि बापूंनी मला आरोपी करून मनातल्या मनात शिक्षा दिली असती! पण पुरावा झाकलेला असतो कधी कधी..

‘काकतालीन्य न्याय’ हेसुद्धा गैरसमजाचं कारण असतं. कावळा बसला हेच फक्त फांदी तुटण्याचं कारण असतं असं नाही. कदाचित ती फांदी वाळलेली असेल किंवा मोडायला आली असेल, अथवा नेमका तेव्हाच सोसाटय़ाचा वारा येतो, त्याच वेळी कावळा बसतो अन् फांदी तुटते. तर काही इतर कारणंही असू शकतात. या सर्व शक्याशक्यतेच्या वेगवेगळय़ा पातळय़ा पार करून जी सुसंगत साखळी तयार होते तीच गुन्हेगाराला शासन देण्यासाठी आवश्यक असते. अन्यथा संशयाचा फायदा द्यावा लागतो. आपल्याला दैनंदिन आयुष्यात कितीतरी वेळा हे योगायोगाचे अनुभव येतच असतात आणि त्यातून होत राहणाऱ्या कितीतरी समज-गैरसमजांवर आपण बांधत राहतो एक विचारांची साखळी. ती कदाचित आपल्याला त्या व्यक्ती वा घटनेच्या संदर्भात चुकीच्या निर्णयाच्या दिशेनं नेते. कधी कधी समांतर विचारधारेतून (‘लॅटरल थिंकिंग’नं) प्रश्न उलगडला जातो आणि प्रश्नाचं नेमकं उत्तर मिळू शकतं.

साधारणत: माणूस हा दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवणारा प्राणी आहे. आपल्यासमोर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं स्वरूप आपल्याला वाटतं तसंच आहे का, किंवा समोरच्या व्यक्तीबद्दलचं मत खरं आहे की एवढय़ात नको मत बनवायला? अजून थोडा वेळ घ्यायला हवा, असा विचार येतो, तो संशय! स्वत:च्या निष्कर्षांवर आपण जेव्हा प्रश्नचिन्ह उभं करतो, तो संशय! निर्णय घेण्यासाठी आणखी काही गोष्टी हव्या आहेत असं वाटणं, तिथे उभा राहतो संशय! ‘चोर समजून संन्याशाला सुळी’ ही म्हण आपल्याला गैरसमजाबद्दल सांगते. साप म्हणून आपणही दोरीला घाबरलोय!

धोब्यानं घेतलेल्या सीतेच्या चारित्र्यावरील शंकेमुळे रामानं सीतेला दूर केलं. सीतेला संशयाचा फायदा नाही दिला. रामानं वास्तविक सीतेच्या पावित्र्याची खात्री असूनही राजधर्म म्हणून आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा म्हणून अरण्यात पाठवलं. तरीही तो व्यक्त केलेला संशय ‘रामायणा’त अधोरेखित झाला.

आपल्यापैकी प्रत्येकजण न्यायाधीश असतो. घटना घडल्या, बघितल्या की त्याचं प्रत्येक माणसाचं स्वतंत्र असं आकलन आणि अनुमान असतं. आपल्या भावनेच्या फूटपट्टीनं दुसऱ्याचं मोजमाप होतं. या प्रक्रियेत नसलेल्या गोष्टी अस्तित्वात येतात अन् असलेल्या गोष्टी दिसत नाहीत किंवा झाकल्या जातात. कोणत्याही अचूक अनुमानापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांच्या सगळय़ा साखळय़ा पक्क्या हव्यात. दैनंदिन आयुष्यात एखाद्या मित्राला, नात्याला गैरसमजामुळे ‘डिलिट’ करून परत ‘अ‍ॅड’ करणं, अशा बेरजा-वजाबाक्या आपण करत असतो. एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकून दोषी ठरवणं किंवा हा बरोबर-तो चुकला असे निवाडे करणं, हेही सोपं नसतंच, पण ते आपण करत राहतो. आपण कधी अचूक असतो, तर कधी सपशेल चूक.

न्यायदानात मात्र चूक परवडण्यासारखी नसते. कारण यात सतत दुसऱ्या व्यक्तींच्या मालमत्ता, नातेसंबंध, स्वातंत्र्य या गोष्टी पणाला लागलेल्या असतात. न्यायाधीश हा काही देव नाही, तर साक्षीपुराव्यांच्या डोळय़ांमधून घटना बघण्याची, माणूस वाचण्याची वेगळीच दृष्टी त्याला मिळते, त्यामुळे तो निवाडा करू शकतो. पण गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तर्कसंगती आणि पुरावा याची योग्य ती सांगड घालूनच निर्णय द्यावा लागतो. ‘संशय’ म्हणजे पुराव्याच्या सत्यतेबद्दलची किंवा काही पुरावे नसल्याची शंका उत्पन्न होणं, यामुळे साखळी तुटते. काही दुवे कमकुवत होतात वा निसटतात. तेव्हा संशयाचा फायदा देणं अपरिहार्य. त्यामध्ये जसं दोन्ही बाजूंच्या कायदे-पुराव्यांचं भान ठेवावं लागतं, तसंच माणूस म्हणूनही त्या सर्व घटनेकडे, पुराव्यांकडे पाहणं तितकंच गरजेचं असतं.

प्रत्येक माणसात असतोच एक न्यायाधीश पण ठेवावा लागतो जिवंत  न्यायाधीशातला माणूस!

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author mridula bhatkar gele lihayche rahun article the benefit of the doubt akp

ताज्या बातम्या