थ्री चीअर्स

मुलांसाठी आनंदाचं वातावरण पालक आणि शिक्षकांनी करायला हवं

मुलाने आयत्या वेळी गृहपाठ सांगितल्यावर चिडचिड, कटकट न करता श्रुतीने वेगळा मार्ग शोधला, त्यामुळे अनिशनेही शांत चित्ताने शाळेत कविता म्हटली. मुलांसाठी आनंदाचं वातावरण पालक आणि शिक्षकांनी करायला हवं.. श्रुतीला मी त्यासाठी  थ्री चीअर्स केलं.

आज मी एक घडलेला किस्सा वा गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीची- श्रुतीची. श्रुती ही ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राहणारी भारतीय (मराठी नव्हे) युवती. काही वर्षांपूर्वी मी तिच्याकडे, तिच्याच आग्रहाखातर आठवडाभर पाहुणचार घ्यायला गेले होते. श्रुती माझ्याहून बरीच लहान, पण सिडनीत एक कोर्स आम्ही एकत्र केला होता आणि तेव्हापासनं आमची घट्ट मैत्री झाली. श्रुती जन्मली आणि वाढली ऑस्ट्रेलियात. तिचं कुटुंब छोटंसंच – ती, तिचा नवरा अक्षय, मुलगा अनिश आणि मुलगी अनन्या. मी तिच्याकडे गेले तेव्हा अनिश चौथीत शिकत होता. अनन्या अगदीच लहान म्हणजे एक वर्षांची. त्यामुळे श्रुती सकाळचा चार तासांचा पार्ट टाइम जॉब करत होती. ज्यांची मुलं सकाळी शाळेत जातात त्या आयांची (कोणत्याही देशात का असेना) कशी धावपळ होते हे मी सांगायला नको. श्रुतीचीही अशीच धावपळ मी सोमवारपासून पाहत होते.. कोणतीही मदत किंवा सल्ल्याची लुडबुड न करता. (हो, आपल्याला वाटतं आपण मदत करतोय, पण बरेच वेळा त्या गडबडीच्या क्षणी तो त्रासच असतो!). अनिशला वेळेत उठवणं, शॉवरला पाठवणं, त्या त्या दिवसाचा युनिफॉर्म काढून ठेवणं, रिसेस आणि लंच असे दोन दोन (वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे) डबे भरणं, धुतलेले सॉक्स काढून ठेवणं, सीरियल- दूध टेबलावर ठेवणं वगैरे करताना सकाळचे साडेआठ वाजत. नऊच्या आत त्याला शाळेत सोडलं की हुश्श!

त्या दिवशी बुधवार होता. अनिश नेहमीप्रमाणे उठून शॉवरला गेला. युनिफॉर्म घालून किचनमध्ये येताना तो कसल्या तरी विचारात दिसला. मग एकदम तो श्रुतीला म्हणाला (सगळा संवाद इंग्रजीत), ‘‘मॉम, आय फरगॉट टू टेल यू बट.. टीचरने अभ्यासक्रमात नसलेल्या एखाद्या कवितेबद्दल काही तरी अभ्यास करायला सांगितलाय. मला डिटेल्स आठवत नाहीत.’’ श्रुती उडालीच. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य, भय, चिडचिडेपणा, निस्तेजपणा अशा सगळ्या भावछटा येऊन गेल्या. ती म्हणाली, (सौम्य शब्दांत पण हताशपणे) ‘‘अनिश, हे तू मला आता- शेवटच्या क्षणी सांगतोयस?’’ पण लगेचच श्रुतीने स्वत:ला सावरलं, कारण व्हॉटसअ‍ॅपवरून इतर आयांशी बोलण्याइतकाही तिच्याकडे वेळ नव्हता. (किंवा त्यामध्ये तिनं वेळ वाया घालवला नाही असंही आपण म्हणू शकतो!). श्रुती अनिशला एवढंच म्हणाली, ‘‘तू हे तयार केलेले सँडविचेस डब्यात भरशील का? सीरियलही खाऊन घे.’’ तिला कळेचना की कवितेबद्दल नक्की काय करायचंय? पाठ म्हणून दाखवायची आहे की नुसतीच वाचून कवीबद्दल सांगायचंय की एखाद्या कवितेचं रसग्रहण करायचंय? ती विचारत पडली. पण मग लगेचच तिनं स्वत:ला सावरलं. आतून कागद, पेन आणले आणि अनिशला कळेल अशा अक्षरांत सात-आठ ओळी लिहिल्या. तसंच कवीचं नावही लिहिलं. हे सर्व लिहिताना श्रुतीचा मूड पालटला. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. (अनिश आणि मी हे शांतपणे पाहात होतो). लिहिणं पूर्ण झाल्यावर तिनं अनिशला स्टडीत नेलं (अजून निघायला पाच-दहा मिनिटे वेळ होता.) व त्याला ती कविता अगदी सावकाश दोनदा वाचून दाखवली, त्या कवीचे नाव आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती सांगितली व ती कविता परत एकदा वाचून दाखवली. थोडक्यात अर्थही सांगितला. नंतर श्रुती, अनिश, अनन्या व मी असे चौघे जण अनिशला त्याच्या शाळेत सोडून आलो. श्रुतीने मला घडलेली हकीकत सविस्तर सांगितली. मी तिला विचारलं, ‘‘कोणती कविता सांगितलीस?’’ ती म्हणाली ‘‘वर्डस्वर्थची एक कविता चटकन आठवली, ती लिहिली.’’ मी विचारले, ‘‘सॉलिटरी रीपर का?’’ श्रुती म्हणाली, ‘‘एक्झ्ॉक्टली!’’ मग आम्ही दोघींनीही कोरसमध्ये ‘बीहोल्ड हर सिंगल इन द फिल्ड, यॉन सॉलिटरी लॅस’पासून.. ‘द म्युझिक इन माय हार्ट आय बोअर, लाँग आफ्टर इट वॉज हर्ड नो मोअर’पर्यंत म्हटली. मी श्रुतीला विचारलं, ‘‘ही कविता अनिशसाठी खूपच मोठी आणि जड नाही का?’’ श्रुती म्हणाली, तिलाही तसंच वाटलं, त्यामुळे तिनं त्याला केवळ पहिलं एकच कडवं लिहून दिलं व तसं टीचरना सांगायला सांगितलं. असो. हा सकाळचा प्रसंग इथे संपला.

त्यानंतर अनन्याला डे-केअरमध्ये सोडून आम्ही बाहेर गेलो. गप्पा आणि शॉपिंगमध्ये सकाळचा प्रसंग विसरूनही गेलो. दुपारी अनिशला शाळेतून घेतलं. कारपूलिंगमुळे त्याच्या अजून दोन मित्रांनाही घेतलं. त्यातला एक तन्वीर, भारतीय होता. गाडीमध्ये तो श्रुतीला म्हणाला, ‘‘आँटी, अनिशची एक गंमत सांगू का?’’ श्रुती म्हणाली, ‘‘हो सांग.’’ तन्वीर म्हणाला, ‘‘आज वर्गात अनिशने (चक्क) एक कविता म्हणून दाखवली. पेपर न बघताच, त्यानं ती रिसाइट केली. टीचरना ती खूप आवडली.’’ श्रुती व मी उडालोच. श्रुती म्हणाली, ‘‘होय अनिश? आपली सकाळची कविता? तू पाठ  केलीस? आय अ‍ॅम सोऽऽऽ प्राउड ऑफ यू डियर!’’ तिनं पुढे विचारलं, ‘‘हे तू कसं केलंस? त्यावर अनिश (अगदी शांतपणे) म्हणाला, ‘‘रिसेसमध्ये प्रथम मी त्या कवितेबद्दल, तू सांगितल्याप्रमाणे विचार केला आणि मग चार-पाच वेळा ती कविता वाचली. मग माझ्या ती लक्षात राहिली. रिसेसनंतर लगेचच माझा नंबर होता, त्यामुळं हातातला पेपर न बघताच मी ती पाठ म्हणून दाखवली. त्यानंतर कवीचं नाव आणि कवितेचा थोडासा अर्थ सांगितला. पण मॉम, उरलेली कविता आपण शिकू या का?’’ श्रुतीनं हसून, उत्साहानं ‘येस शुअर’ म्हटलं.

इथे हा किस्सा वा गोष्ट संपली. या गोष्टीने आम्हा दोघींनाही खूप आनंद झालाच, पण माझ्या मनात विचार सुरू झाले ते असे :  चौथीच्या इंग्लिशच्या टीचरनी त्यांचा विषय शिकवताना कवितेला (चक्क) प्राधान्य दिलं होतं. एवढंच नव्हे तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एखाद्या कवितेबद्दल काही तरी अभ्यास करायला सांगितला होता (त्यामध्ये कवीचे नाव, जशी जमेल तशी त्या कवीसंबंधीची माहिती, कविता वाचणं अगर म्हणणं, कवितेचा जसा जमेल तसा अर्थ सांगणं इत्यादी गोष्टी अपेक्षित होत्या). गंमत म्हणजे ‘गुगल’ गुरुजींची मदत घ्यायची नव्हती. त्याऐवजी वाचनालयाची मदत जरूर घ्यावी अशी सूचना होती.

साप्ताहिक रजेत याबद्दल अनिश सांगायला विसरला. त्याला आयत्या वेळेस त्याची आठवण झाली व त्याबद्दल त्याने आईला सांगताच आई थोडीशी गांगरली, पण चिडली नाही. तिने शांतपणे विचार केला व आठवेल तसा कवितेचा काही भाग त्याला लिहून दिला व त्याचे स्पष्टीकरण दिले.

अनिशवर या सर्वाचा योग्य तो परिणाम झाल्याने रिसेसच्या वेळेत त्यानं कवितेवर (त्याच्या परीने) चिंतन/मनन केलं. लहान मुलांची स्मरणशक्ती जात्याच चांगली असल्यानं कवितेची चार-पाच पारायणे केल्यावर ती कविता त्याच्या लक्षात राहिली व त्याप्रमाणे त्यानं ती म्हणून दाखवली आणि टीचरची शाबासकी मिळवली. (इथे चिंतनाचा/मननाचा व स्मरणशक्तीचा योग्य समन्वय दिसून येतो.)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिशला ‘काव्य’ या साहित्य प्रकाराबद्दल समज आली आणि त्यासंबंधीची आवड होण्यास मदत झाली.

श्रुतीने अनिशच्या समस्येवर (हो, त्या सकाळी अनिशची आणि श्रुतीचीही ती समस्याच होती.) रिअ‍ॅक्ट न होता रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे तिच्या आणि अनिशच्याही मनावरचा ताण तर नाहीसा झालाच, पण उलट श्रुतीला वर्डस्वर्थच्या कवितेच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला (स्वत:च्या स्मरणशक्तीचे कौतुकही वाटले असेल!) आणि तो आनंद तिला अनिशबरोबर लुटता आला. हे करण्याऐवजी जर तिने ‘हे काय टीचरचं नवंच फॅड! आम्हाला अगोदरच कामं कमी की काय आणि त्यामध्ये हे नसतं काहीबाही! हल्ली या शाळेत ऊठसूट असं काही तरी करायला सांगतात. मी काही आता ऐकणार नाही. पेरेंट-टीचर मीटिंगमध्ये याबद्दल सांगितलंच पाहिजे आणि टीचरची कम्प्लेंट केलीच पाहिजे’ असा विचार केला असता तर तिला आपण किती सजग पालक आहोत असं (कदाचित) वाटलं असतं! हे विचार माझ्या मनात चालू असतानाच श्रुतीने माझ्यासमोर गरम कॉफीचा कप आणून ठेवला. मी तिला तीनदा ‘थँक्यू’ म्हणाले. पहिला कॉफीसाठी, दुसरा तिनं मला काय शिकवलं यासाठी आणि तिसरा अनिशने मला काय शिकवलं त्यासाठी!

कट् टू इंडिया : ही परदेशातली घटना असली तरी आपल्याकडेही असा चाकोरीबाहेरचा विचार करणारे शिक्षक आहेत. (आणि श्रुतीसारखे पालकही आहेत.) यासंबंधात नामदेव माळी यांच्या ‘शाळाभेट’ या पुस्तकाची आठवण होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या गुणी शिक्षकांचं वेगळ्या वळणाचं, मुलं ‘घडवण्याचं’ मोलाचं कार्य त्यामध्ये दिसून येतं. (‘चतुरंग’मध्ये लिहिणाऱ्या रती भोसेकर, रेणू गावस्कर याही याच पठडीतल्या.) मुलांची मनं कोवळी असतात. त्यांना वेगळ्या पद्धतीने विचाराला उद्युक्त केल्यानं त्यांचा विषयातला आनंद वाढतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विशेष म्हणजे काही पालकांचे ग्रुप्सही शिक्षकांच्या मदतीने त्यांच्या पाल्यांच्या जीवनात असं आनंदाचं वातावरण तयार करतात. असं घरातून आणि शाळेतून उत्साहाचं वातावरण असेल तर मुलांची मनं आनंदी राहतील आणि त्यांच्या कुटुंबातल्या सर्वाच्याच शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यावर याचा सुंदर परिणाम होईल.

नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने, मुलांमध्ये असा रस घेणाऱ्या, त्यांचं जीवन अर्थपूर्ण करणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि त्यांच्या पालकांना मनापासून सलाम!

health.myright@gmail.com

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three cheers

Next Story
‘सेले’ब्रेशन
ताज्या बातम्या