निसर्गरक्षण, संवर्धन यासाठी प्रसंगी स्वत:चं आयुष्यही पणाला लावण्याची जिद्द मनात निर्माण होते ती निसर्गाशी जेव्हा तुमचं अतूट नातं असतं तेव्हा. किंकरीदेवी असो किंवा थिम्मक्का या सगळ्या जणींचा निसर्गाशी सुरू असलेला संवाद कधी खंडित झाला नाही. त्यामुळेच त्या कायम निसर्गाशी जोडलेल्या राहिल्या आणि त्यातूनच त्यांना निसर्गसंवर्धनाची प्रेरणा मिळाली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने या प्रेरणादायी व्यक्तित्वांविषयी.

वर्ष : १९९५, स्थान : बीजिंग कार्यक्रम : चवथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद, अमेरिकेची (तत्कालीन) फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन आणि म्यानमारच्या आंग सान स्यू की यांच्या उपस्थितीत या परिषदेचा आरंभ करताना दीपप्रज्वलन केले ते एका अशिक्षित भारतीय स्त्रीनं. कोण होती ती आणि या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिला कसे स्थान मिळाले होते? ती होती भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील शिरमूर जिल्ह्य़ातील किंकरीदेवी. शाळेची पायरीही चढू न शकल्याने लिहा-वाचायला न शिकलेल्या आणि सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या या स्त्रीनं जगाला दाखवून दिलं होतं की, जर तुमच्यात हिंमत असेल आणि तुमचा निश्चय पक्का असेल तर तुम्ही कितीही मोठय़ा आव्हानाचा मुकाबला करू शकता.

nagpur crime news, nagpur sexual assault marathi news
नवविवाहितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ
scrub typhus introduction diagnosis of scrub typhus threat of scrub typhus
Health Special: दुर्लक्षित पण महत्त्वाचा आजार ‘स्क्रब टायफस’ आहे तरी काय? उपचार काय कराल? 
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…

एका दलित शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी शामुराम या वेठबिगाराशी विवाहबद्ध झालेल्या किंकरीदेवीचे आपल्या परिसरातील निसर्गाशी, शेतमळ्यांशी आणि पहाडांशी घट्ट नातं जुळलेलं होतं. पतिनिधनानंतर उदरनिर्वाहासाठी वयाच्या २२ व्या वर्षी हातात झाडू धरावा लागलेल्या किंकरीदेवीला आपल्या भोवतालच्या परिसरात घडणारे (खरं तर मानवी हस्तक्षेपामुळे घडवले जाणारे) बदल जाणवत होते. तेव्हा हिमाचलमधल्या पहाडांकडे चुनखडीच्या खाणींसाठी खाणमालकांची वक्र नजर वळली होती आणि हिमालयातील अस्थिर भूकवचाचा विचार न करता पहाड खोदून तिजोऱ्या भरायला सुरुवात झाली होती. या बेफाम खाणकामामुळे भूस्खलनाचे प्रकार वाढू लागले होते, जमिनीवरचे झाडांचे हिरवे छत्र तुटू लागल्याने जमिनीची धूप वेगाने होऊ लागली होती आणि त्यामुळे पहाडातील शेतीवर दुष्परिणाम होऊ लागले होते. निसर्गाचा हा विनाश पाहून किंकरीदेवी अस्वस्थ झाली आणि तिने याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली.

आपण एक कामगार आहोत, आपल्याला लिहिता-वाचताही येत नाही, आपण या मुजोर खाणमालकांविरुद्ध कसा लढा देऊ शकू, असा विचारही तिच्या मनात आला नाही. तिला मदत मिळाली ती ‘पीपल्स अ‍ॅक्शन फॉर पीपल इन नीड’ या स्थानिक ‘एनजीओ’ची आणि शिमल्याच्या उच्च न्यायालयामध्ये एकाच वेळी ४८ खाणमालकांविरुद्ध जनहितार्थ खटला दाखल करण्यात आला. मात्र सत्तेशी लागेबांधे असलेल्या खाणमालकांनी किंकरीदेवी हे सारं केवळ पैसे उकळण्यासाठी करतेय आणि आम्ही निसर्गाची हानी करत नाही, असा दावा केला. न्यायालयात जेव्हा खटला सुनावणीसाठी येईना, तारखांवर तारखा पडू लागल्या तेव्हा न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी किंकरीदेवीने न्यायालयाबाहेर आमरण उपोषण आरंभले आणि तब्बल १९ दिवसांनंतर न्यायालयाने किंकरीदेवीच्या केसची दखल घेतली, तोपर्यंत किंकरीदेवीचे नाव केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले होते. किंकरीदेवीने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तात्काळ हिमाचलमधील खाणकामावर स्थगिती आणली आणि संपूर्ण हिमाचल प्रदेशात पहाडांमध्ये ब्लास्टिंग करण्यावर ब्लँकेट बॅन आणला. निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या किंकरीदेवीने निसर्गसंवर्धनाची आपली जबाबदारी पार पाडली होती. मात्र गोष्ट इथेच थांबली नाही. काही वर्षांनंतर खाणमालक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले आणि १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावत उच्च न्यायालयाच्याच निर्णयावर शिक्कामोर्बत केलं. हा विजय होता एका निसर्गसंवादी व्यक्तिमत्त्वाचा. आपल्या परिसरातील निसर्ग वाचवण्यासाठी किंकरीदेवीनं दिलेला लढा तत्कालीन अमेरिकेची फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांच्या कानावर गेला आणि त्यांनी चीनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला किंकरीदेवीला आमंत्रित केलं, तिची गोष्ट सांगण्यासाठी आणि जगभरातील स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी. आज किंकरीदेवी या जगात नाही, पण तिने निसर्गरक्षणासाठी दिलेली झुंज एक कायमचं उदाहरण ठरली आहे.

निसर्गरक्षण, संवर्धन यासाठी प्रसंगी स्वत:चं आयुष्यही पणाला लावण्याची जिद्द मनात निर्माण होते ती निसर्गाशी जेव्हा तुमचं अतूट नातं असतं तेव्हा. निसर्गाशी असलेला संवाद जर सुरूच राहिला तर निसर्गाबरोबरचं हे नातंही कायम राहातं. गेल्या काही वर्षांमध्ये (का दशकांमध्ये?) आपला हा निसर्गाबरोबरचा संवादच जाणता-अजाणता कमी कमी होत गेला आहे आणि त्याचेच दुष्परिणाम जगभरात बघायला मिळत आहेत. म्हणूनच युनेस्कोने या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे सूत्र ‘कनेक्टिंग पीपल टू नेचर’ हे ठरवलं आहे. आज प्रगतीच्या महामार्गावर तुफान वेगानं घोडदौड करणाऱ्या आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवी क्षितिजे ओलांडणाऱ्या माणसाचा हात निसर्गाच्या हातातून निसटू लागला आहे. जर वेळीच ही पकड पुन्हा पूर्वीसारखी घट्ट केली नाही, तर भविष्यात माणसाकडे कसलाच आधार नसेल. विकासासाठी माणसाने पृथ्वीच्या पोटातली खनिजे ओरबाडली, महासागरांचं पाणी गढूळ केलं, नद्यांमधली वाळू उपसली, हिरव्यागार झाडांचं छत्र नष्ट करून सिमेंट कॉन्क्रीटची शहरं वसवली, हवेतील प्रदूषणाची पातळी कमालीची वाढवून ठेवली, जीवसृष्टीतील अनेक घटक कधी जाणीवपूर्वक कधी अज्ञानाने समूळ नामशेष केले. या सगळ्याचा परिणाम काय? तर जगाचे तापमान वाढू लागले, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला, नद्यांना अचानक पूर येऊ  लागले आणि पावसाचे चक्र बिघडले. ही वसुंधरा, त्यावरील अवघी सृष्टी ही आपली मालमत्ता नाही, तर ती पुढच्या पिढीची ठेव आहे आणि तिची किमान जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे हेच आपण विसरलो, त्यामुळेच पुन्हा एकदा निसर्गाशी सुसंवाद साधण्याची, निसर्गाबरोबरचं नातं घट्ट करण्याची आवश्यकता जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्गाशी संवाद साधायचा म्हणजे नेमकं करायचं तरी काय? वर्षांतून फक्त चार दिवशी जंगलात जायचं का? पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण करून मोकळं व्हायचं? शहरातल्या चिमण्यांची संख्या कमी होतेय म्हणून फक्त काळजी व्यक्त करायची? निसर्गाबरोबरचं नातं इतक्या वरवरच्या गोष्टींनी जुळत नाही. निसर्गाशी संवाद साधायचा म्हणजे तुमच्या रोजच्या जगण्याला निसर्गाशी जोडून, जुळवून घ्यायचं. कधी काळी आपल्या सगळ्यांचं जगणं तसंच तर होतं की. निसर्गातल्या ऋतुचक्राचे बदल आपल्याला भोवतालच्या झाडांमधून, त्यांना येणाऱ्या फुलाफळांमधून कळत असत, उन्हाळा-हिवाळा-पावसाळा हे तिन्ही ऋतू हवामानातील बदलामुळे ठळकपणे वेगळे जाणवायचे. कोणतीही गोष्ट टाकाऊ  नसते यावर आपला विश्वास होता आणि आज जे सर्वाना ओरडून ओरडून सांगावं लागतंय – रिडय़ूस- रियूज- रिसायकल ती आपली जीवनशैली होती. वाण्याकडून आलेल्या कागदाच्या पुडीतील धान्य निवडल्यावर त्यातील कण्या, पाखड चिमण्यासांठी दाराबाहेर टाकल्या जायच्या, त्या कागदाची घडी करून रद्दीच्या ढिगात जायची आणि दोरा गुंडाळून ठेवला जायचा. ही साधी, सरळ जीवनशैली मागे टाकताना आपण बरंच काही गमावलं आहे. निसर्गाशी नातं जुळण्यासाठी आपण या निसर्गाचाच एक भाग आहोत आणि या निसर्गाची व्यवस्था आपण पाळणार आहोत, ही भावना मनात रुजावी लागते. ही भावना मनात रुजलेली असेल तर आपोआप भोवतालच्या निसर्गाबाबत, पर्यावरणाच्या संदर्भात मनात काळजी, आस्था निर्माण होते. मग आपल्या परिसरात विकासकामांच्या बहाण्याने तोडली जाणारी झाडं, दूषित केले जाणारे तलाव, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याबाबत केवळ बघ्याची भूमिका न घेता, काही तरी ठोस पावलं उचलण्याची प्रेरणा मिळते. यातूनच निसर्गसंवर्धन, संरक्षण यात सहभाग सुरू होतो. हा सहभाग घ्यायचा म्हणजे केवळ मोर्चे काढायचे वा आंदोलनं करायची असं नव्हे. प्लॅस्टिकचा वापर टाळून, पावसाचे पाणी साठवून, घरातील पाण्याचा गैरवापर टाळून, कचऱ्याचे वर्गीकरण करूनही आपण निसर्गसंवर्धनाला हातभार लावू शकतो.

आपली पारंपरिक भारतीय जीवनशैली निसर्गसंबद्धच होती (आहे!). घरासमोरच्या झाडांना शिंपण करून दिवस सुरू व्हायचा आणि रात्री गोठय़ातल्या जनावरांना वैरण घालून तो संपायचा. ती कृषी जीवनशैली जशीच्या तशी सध्याच्या नागरी जीवनात अनुसरणं शक्य नाही; पण भोवतालच्या निसर्गाशी नातं टिकवणं मात्र नक्कीच शक्य आहे. भारतातील पर्यावरण संवर्धनाचा, निसर्गरक्षणाचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांनी ही जबाबदारी (अक्षरश:) प्राणपणानं बजावलेली आहे. याचं सणसणीत उदाहरण म्हणजे राजस्थानच्या इतिहासातील बिष्णोई हत्याकांड. जोधपूरचे महाराज अभयसिंग यांच्या नव्या राजवाडय़ासाठी लाकडं हवीत म्हणून बिष्णोईंच्या खेजराली गावात झाडं तोडण्यासाठी आलेल्या सैनिकांना अडवण्यासाठी गावातले लोक पुढे सरसावले आणि खेजडीच्या वृक्षांना मिठय़ा मारून उभे राहिले तेव्हा त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. सैनिकांच्या तलवारीखाली अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले आणि निसर्गसंरक्षणाच्या गाथेतील एक बलिदान पर्व लिहिलं गेलं. अमृतादेवीचा कित्ता गिरवला तो गढवालमधील गौरीदेवीने. १९७४ मध्ये गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराची माणसं आली, तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसानभरपाईच्या बहाण्यानं चमोलीला नेण्यात आलं होतं. गावात फक्त स्त्रिया होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेल्या गौरीदेवीनं पुढाकार घेतला आणि इतर स्त्रियांना बरोबर घेऊन झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ सुरू केलं. रात्रभर त्या स्त्रिया झाडांना चिपकून उभ्या राहिल्या आणि देशभरातील स्त्रियांना एक नवा आदर्श मिळाला.

भारतातील पर्यावरणस्नेही स्त्रियांच्या यादीतील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे कर्नाटकातील थिम्मक्का. नॅशनल सिटिझन अ‍ॅवॉर्डने गौरवलेल्या थिम्मक्काला ‘साळुमरदा’ (झाडांची रांग) या टोपणनावानेच ओळखतात. हुळिकळ गावातल्या थिम्मक्काने आपल्या पतीच्या चिक्कय्याच्या मदतीने भोवतालच्या चार किलोमीटरच्या परिसरात एकूण ३८४ वडाची झाडे लावून ती जगवली आहेत. पोटी मूलबाळ नसलेल्या थिम्मक्काने या झाडांची काळजी स्वत:च्या मुलांसारखीच घेतली, प्रसंगी चार चार किलोमीटरवरून पाणी आणून घातले. आज हुळीकळ ते कुडूर हा महामार्ग थिम्मक्काने लावलेल्या वटवृक्षांच्या छायेखाली झाकला गेलेला आहे. २०१६ मध्ये ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील शंभर प्रभावशाली आणि प्रेरणादायी स्त्रियांच्या यादीत थिम्मक्काचा समावेश केला होता.

किंकरीदेवी असो किंवा थिम्मक्का या सगळ्या जणींचा निसर्गाशी सुरू असलेला संवाद कधी खंडित झाला नाही. त्यामुळेच त्या कायम निसर्गाशी जोडलेल्या राहिल्या आणि त्यातूनच त्यांना निसर्गसंवर्धनाची प्रेरणा मिळाली. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निसर्गाबरोबरचा संवाद कायम राखायचा निश्चय केला आणि निसर्गाबरोबरचं नातं अधिक घट्ट केलं तर त्यात सर्वात जास्त फायदा आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढय़ांचा आहे हे निश्चित.

मकरंद जोशी   

makarandvj@gmail.com