निदान दहा र्वष झाली असतील त्या गोष्टीला. एक दिवस आमच्या सरूबाई दुपारच्या कामाला येताना बरोबर आपल्या लहान बहिणीलाही घेऊन आल्या. बहीण सुमारे चाळीस-पंचेचाळीसची आणि तशी सुखवस्तू वाटत होती.

‘‘हिच्या दोन्ही मुलांची लग्नं हाईत वैशाखात, कापडाचोपडाच्या खरेदीला आल्येत ही दोघं इकडे.’’ सरूबाई म्हणाल्या. मी बघतच राहिले. ‘‘मुलीसाठीही शोधतोय, जमलं तर तिचंही करून देऊ यंदाच. पाहुणीने स्वत:च पुस्ती जोडली. मी चांगलीच गोंधळले. ‘हिला एवढी मोठी मुलं?’ सरूबाईचं काम आटपेपर्यंत मी दोघींसाठी चहा केला. आता सरूबाईंनाही गप्पा मारण्यासाठी थोडी फुरसत मिळाली. न राहवून मी म्हणाले, ‘‘वाटत नाही हो तुमच्याकडे पाहून, तुम्हाला एवढी मोठी मुलं असतील असं.’’ त्यावर दोघीही खळखळून हसल्या आणि हळूहळू गप्पागप्पांतून सगळं काही उलगडत गेलं.

सरूबाईंना दोन बहिणी, मोठय़ा सरूबाई; लग्न करून इकडे शहरात आल्या राहायला, आणि त्यांच्यानंतरची उषा, तिला गावातलाच नवरा मिळाला. घरची थोडीशी शेती, लहानशी नोकरी असलेल्या नवऱ्यासह उषा सुखानं नांदत होती. तिच्या लग्नाला दहा र्वष झाली होती, तिचा मोठा मुलगा सात वर्षांचा तर लहान मुलगा पाच वर्षांचा होता, उषा तिसऱ्यांदा आई होणार होती. दोघांनाही मुलीची हौस होती, मुलगी झाली, पण बाळंतपणात उषा गेली. या धक्क्याने उषाचे आई-वडील, नवरा सगळेच पार कोसळले.  तीनही मुलं आता आपल्या आजोळी राहू लागली. घरात गरिबी होती, पण मायेने पैशांची कसर भरून निघत होती. मूळचाच कष्टाळू असलेला उषाचा नवरा अधिकाधिक कष्ट करून, पैसे मिळवून सासरवाडीच्या आधाराने राहत होता. उषाची आई घर सांभाळून तीनही नातवंडांना वाढवत होती. उषाची लहान बहीण आशाची त्यांना या सर्व कामात खूप मदत होत होती. आशा आता नववीत गेली होती, पण या सगळ्या उलथापालथीत आशाची शाळा आपोआपच बंद झाली होते. नवजात लहान भाची तर आशामावशीशिवाय क्षणभरही राहत नसे. दोन्ही मुलांचा अभ्यास मावशीने घेतल्याशिवाय होत नसे.  असं होता होता तीन र्वष गेली, मुलं मोठी होत होती. लहानग्या आशानं सगळ्या घरालाच जणू सावरून धरलं होतं. आता दुसरं लग्न करण्यासाठी नातेवाईक, गावकऱ्यांनी उषाच्या नवऱ्यामागे लकडा लावण्याचा सपाटा लावला. पण मुलांना सावत्र आई आणण्याच्या कल्पनेने उषाचा नवरा धास्तावला होता. मुलांचे हाल होतील या कल्पनेने तो व्याकूळ झाला होता.

एक दिवस उषाच्या नवऱ्याने सासू-सासऱ्यांजवळ मोठय़ा धाडसाने आपल्या मनातला विचार बोलून दाखवला. ‘‘उषाच्या पश्चात माझ्या तीनही मुलांना आणि मलाही तुम्हीच आधार दिला आहात. मुलांना आशाचा खूप लळा लागला आहे. सावत्र आईच्या हातात मुलांना सोपवण्यास माझं मन धजावत नाही. आता मला या घरापासून दूर लोटू नका. मला दुसरीकडे सोयरीक करायची नाही. आशा माझ्यापेक्षा सोळा वर्षांनी लहान असली तरीही माझं लग्न तिच्याशी करून द्या, नाही तर मी लग्नच करणार नाही.’’ एका दमात तो हे सगळं बोलला आणि  मुलीला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागला.

आता निर्णय आशालाच घ्यायचा होता. तिला कुणीच सक्ती करीत नव्हतं, तिने थोडा वेळ विचार करून निर्णय दिला. लग्नाला होकार दिला, पण फक्त एका अटीवर, तिने घातलेली अट अगदी थक्क करणारी होती. ती म्हणाली, ‘‘इतके दिवस मावशी म्हणून मी माझ्या भाचरांचं प्रेमानं केलं आहेच, आता आई या नात्यानं करणार. पण आता ही मुलं हीच माझं सर्वस्व आहेत. मी मला स्वत:ला मूल होऊ देणार नाही. लग्न झाल्यावर मी लगेचच तशी शस्त्रक्रिया करवून घेईन, हे तुम्हाला सर्वाना मान्य असेल तरच हे लग्न होईल.’’ सगळ्यांसाठी हे अनपेक्षित होतं. सुरुवातीला सर्वानाच हा क्षणिक भावनावेग वाटला, उद्वेग वाटला, पण आशा तिच्या मुद्दय़ावर ठाम राहिली. मावश्या, काकू तिला समजावू लागल्या, ‘‘अगं आपलं असं एक तरी हवं.’’ तेव्हा ती चांगलीच चिडली. म्हणाली, ‘‘ते होईल ते माझं, मग ही तिघं कोणाची? हाच भेदभाव मला नको आहे.’’ दोन-तीन महिन्यांतच आशाचं लग्न झालं आणि बोलल्याप्रमाणे तिने शस्त्रक्रियाही करवून घेतली, कोणालाही न जुमानता.

जेमतेम वीस-एकवीस वर्षांची आशा आपल्या तीनही मुलांना घेऊन नवऱ्याबरोबर तिच्या हक्काच्या घरी राहायला गेली. तिने संसार- मुलं- नवरा- शेती- गुरंढोरं यात स्वत:ला झोकून दिलं. आई- पत्नी- गृहिणी सगळ्या भूमिका तिने उत्तमरीत्या निभावल्या. अशीच वीस-बावीस र्वष गेली. दोन्ही मुलं शेतकी कॉलेज शिकून आली. घरच्या शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यांनी चांगला जम बसविला. मुलगीही शेवटच्या वर्षांत शिकत होती. त्यांचं पंचकोनी कुटुंब एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होतं. तिच्या चेहऱ्यावरचा कर्तव्यपूर्तीचा, कृतकृत्यतेचा- समाधानाचा भाव बरंच काही सांगत होता. आशा स्वत: अल्पशिक्षित होती, पण जीवनाचा खरा अर्थ तिलाच कळला होता. कोणतंही अवडंबर न माजवता तिने केवढा मोठा त्याग अगदी सहजपणे केला होता. भाचरंडांवरच्या मायेत तिने स्वत:चं आईपण फुलवलं होतं. माझ्या मनात आलं, हीच तर खरी ‘जिवती’. तिला पाटावर बसवून तिची ओटी भरली आणि भावी आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

– शोभा फणसे

phanseshobha21@gmail.com