‘विशेष’ मुलांच्या पालकांच्या ओंजळीत, काही आनंदाचे, तणावरहित क्षण अर्पण करून त्यांना दोन-तीन तासांचा तरी निखळ आनंद उपभोगता यावा हीच ‘सलाम सेवेला’ या कार्यक्रमामागची अशोक मुळे यांची कल्पना होती. या कार्यक्रमाला नामवंतांनीही आपली उपस्थिती लावून सामाजिक बांधिलकी व्यक्त केली, मात्र पालक म्हणून आम्हालाही एक वेगळी दृष्टी मिळाली..

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे अंतरात’ या पंक्ती शब्दश: खऱ्या ठरवणारा सत्यानुभव मी अगदी अलीकडेच अनुभवला. तो सत्यानुभव एवढय़ासाठीच कारण तुमच्या-आमच्यासारख्याच एका व्यक्तीने आपली असामान्य कल्पना सत्यात आणली होती. त्या रंगकर्मीचा हा एक यशस्वी प्रयोगच होता. अन्य माणसांना, ज्यांना याबद्दल काहीच कल्पना नाही, त्यांना हा एखाद्या कलाकाराच्या घरातील मंगल कार्याचा सोहळाच वाटला असता. पण आमच्यासारख्या पालकांसाठी तो एक आनंदसोहळाच ठरला, कायम मनाच्या कप्प्यात ठेवून द्यावा असा..
त्याची सुरुवात महिनाभरापूर्वी झाली. खरं तर माझं आयुष्यदेखील घडय़ाळाच्या काटय़ाला जोडलं गेलेलं. त्यातच शाळेतली नोकरी म्हणजे परीक्षा, निकाल शिवाय इतर पुस्तकांची कामं, दोन्ही मुलींचे प्रोजेक्ट्स वगैरे सुरूच होती. एके दिवशी अशोक मुळेकाकांचा फोन आला. त्यांना मला एका कार्यक्रमाला बोलवायचं होतं आणि झालंच तर मदतही हवी होती.. बोलता बोलता त्यांनी एका कार्यक्रमाची रूपरेषा मला सांगितली आणि माझ्यासमोर एका वेगळ्याच दृष्टिकोनातला कार्यक्रम आकार घेऊ लागला. विशेष मुलांच्या पालकांसाठीचा हा एक आगळा वेगळा, महत्त्वाचा, मौलिक कार्यक्रम असल्याचं लक्षात आलं. मी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं कबूल केलं आणि कार्यक्रमाशी संबंधितांना फोन करणं सुरू केलं. मुळेकाकांनी सांगितलेल्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजेच त्या कार्यक्रमाची रूपरेषा, ठिकाण, वेळ वगैरे सगळी माहिती म्हणजे जणू तोंडी कार्यक्रमपत्रिकाच प्रत्येकाला सुपूर्द केली. अर्थातच याला प्रत्येकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. काकांना तो प्रतिसाद सांगितला. त्यानंतरच्या काकांच्या उत्साहाला दाद द्यावी तेवढी कमीच होती.
माझ्या ‘विशेष’ मुलीला २००६ मध्ये ‘राष्ट्रपती पदक’ मिळाल्यानंतर ते अगदी या २०१६ (८ मार्च महिला दिनी) दूरदर्शनचा ‘प्रेरणा पुरस्कार’ म्हणजे मुलीच्या हस्ते आईचा सत्कार या कालच्या कार्यक्रमापर्यंतची ‘मनालीची आई’ ही भूमिका मला इतर सर्व भूमिकांपेक्षा जास्त भावली. ती माझी ओळख मला थेट माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत घेऊन गेली होती आणि नेमकं हेच (विशेष मुलांचे पालक) मुळेकाकांच्या कार्यक्रमाचं सूत्र होतं.. ‘विशेष’ मुलांच्या पालकांच्या ओंजळीत, काही आनंदाचे क्षण अर्पण करून त्यांना दोन-तीन तासांचा तरी निखळ आनंद उपभोगता यावा हीच त्यांची कल्पना होती. अतिशय सुंदर कल्पना होती ही, कारण आज ‘विशेष’ – मुलांनी कितीही प्रगती केली, तरी आम्हा पालकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी असं कुठलंच ठोस उत्तर नसतं, किंबहुना आम्ही, समस्त पालक मंडळी, अंतापर्यंत सुख आणि दु:ख यांना साधण्याचाच प्रयत्न करीत असतो, मुळेकाकांनी नेमकं तेच हेरलं. चोवीस तासांच्या वेळापत्रकातील तीन तास प्रत्येक मुलाच्या माता-पित्यांनी आपल्या पिलांना बरोबर न घेता, कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा. सारं काही विसरून जायचा प्रयत्न करायचा.. हे ठरलं.
प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस उजाडला. दादर-माटुंगा कल्चरल सेंटरचं मिनी थिएटर पालकांनी गच्च भरलं होतं. जवळजवळ दीडशे ते दोनशे पालकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. मुख्य म्हणजे ठाण्यातील ‘जागृती पालक संघटना’, ‘गॉड्स गिफ्ट’, ‘चैतन्य संस्था’ यांना निमंत्रित केलं होतं. त्या संस्थांतील मुलांचे पालक तर आले होतेच त्याशिवाय या संस्थांव्यतिरिक्त इतर विशेष मुलांचे पालकदेखील आवर्जून आले होते. त्याचप्रमाणे या विशेष मुलांच्या शाळेच्या माजी मुख्याधापिकांनीही आवर्जून हजेरी लावली होती.
काकांनीदेखील साठ वर्षांपेक्षा जास्त काळ या मुलांची सेवा करणाऱ्या मुंबईच्या मुख्याध्यापिकांना बोलावून मुलांच्या पालकांच्या हस्ते त्या मुख्याध्यापिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसंच ‘फेलोशिप ऑफ फिजिकली हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेला काकांनी ‘माझा पुरस्कार’ प्रदान केला. त्या संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून शीतल धनक यांनी तो प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते स्वीकारला.
रंगमंच्यावरचा ‘सलाम सेवेला’ हा बॅनर प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता. त्या रंगमंचावर सुरू झालेल्या कार्यक्रमांनी, सुंदर गाण्यांनी रसिक पालकांचे कान
तृप्त केले.
माझ्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते, आम्ही जे काही करत आहोत ते आमच्या मुलांसाठी, पण ज्यांना स्वत:चे काहीच पाश नाहीत तरीसुद्धा आमच्यासारख्या पालकांच्या तपश्चर्येची फक्त कल्पना करून त्यांनी ही कल्पना केवळ कागदावरच न ठेवता सत्यात उतरवली होती, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या मुळेकाकांनाही आम्हा पालकांचा सलाम! या विचारात असतानाच,

Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
balmaifal, story for kids, story of dog and his names, pet dog, dog names, what is in name, dog love, dog story, marathi article, marathi story, marathi story for kids, loksatta balmaifal,
बालमैफल : नावात काय आहे
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?

रुपेरी पडद्यावरील कलाकार एक एक करून आमच्या समोर विराजमान होत होते. प्रसाद ओक, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी आपल्या उत्स्फूर्त कवितांचं सादरीकरण करून आम्हा पालकांना काही काळासाठी सगळ्या विवंचना विसरायला लावून एका जागी खिळवून ठेवलं.
वैभव मांगले यांनीदेखील ‘जय गंगे भागीरथी’ नाटय़पद ऐकवलं. नवीन जुन्या गीतांची जणू मैफलच रंगली होती. त्यातील संगीताने कान तृप्त झाले होते. मला तर घडाळ्याचे काटे थांबल्यासारखंच वाटत होतं.
सदाबहार संगीताच्या कार्यक्रमानंतर आम्हा पालकांसाठी पक्वान्नांच्या (आमरस-पुरीच्या) भोजनाच्या पंक्तींची तयारी झाली होती. बुफे जेवणाच्या तुलनेत भोजनपंक्ती सगळ्यांच्या मनाला भावल्या, कारण आम्हाला भोजन आग्रह करून करून वाढण्यासाठी स्वत:च्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशीदेखील उपस्थित होते. त्याच बरोबरीने अभिनेते मकरंद अनासपुरे, संजय मोने, आदिती सारंगधर, मेधा मांजरेकर आदी कलाकार वाढण्यासाठी पुढे आले होते. याशिवाय मुक्ता बर्वे, उमेश कामत, सुकन्या कुलकर्णी-मोने, विजय केंकरे, नंदिता धुरी, प्रसाद महाडकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर हेही आवर्जून आले होते. तेव्हा पुन्हा एकदा एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, की ही माणसेदेखील आपल्यासारखीच आहेत, परंतु त्यांच्यातील अवगत कला त्यांनी विकसित करून त्यांनी स्वत:ला एका विशिष्ट स्तरावर नेऊन ठेवलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा अहंभाव न ठेवता ‘सलाम सेवेला’ या शीर्षकाला त्यांनी वाहून घेतल्याचं जाणवत होतं. सामाजिक बांधिलकीचा एक वेगळाच परिपाठ गिरवला जात होता.
मला स्वत:ला या कार्यक्रमांतर्गत, मकरंद अनासपुरे या दिग्गज कलाकाराशी आणि त्याहीपेक्षा त्याच्यातील समाजसेवेचं व्रत घेतलेल्या माणसाशी संवाद साधता आला, याचं खूप जास्त आंतरिक समाधान वाटलं. मनात आलं, समाजातील आमची मुलं असू देत अथवा शेतकऱ्यांसारखे दुर्बल घटक असू देत, यांच्यासारखीही दिग्गज माणसं, या दुर्बल घटकांची फक्त शिडी न करता, आत्मीयतेनं, तळमळीनं एक समाजकार्य, केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून करीत असतात, तेव्हाच यशाची एक एक पायरी सर करून, उत्तुंग शिखराकडे ते भरारी घेत असतात. कारण त्यांच्यापाठी सदैव प्रत्येकाच्या शुभाशीर्वादाची साथ असते. तेथे कुठलाही किंतु परंतु नसतो. कारण त्यांच्या पाठीशी आशीर्वादरूपी ऊर्जा असते.
हा कार्यक्रम सुरू असतानाच काही पालक प्रथमच सारं काही विसरून गेले होते. दु:खांचा, तणावाचा जणू विसर पडला होता. काहीचं लक्ष मात्र घरी लागलं होतं, कारण आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली आमची मुलं, आज काही तासांसाठी प्रथमच आमच्यापासून दूर राहिली होती. परंतु आणखी एका सत्य परिस्थितीची प्रकर्षांने जाणीव झाली ती म्हणजे मुळेकाकांसह ही सगळी नामवंत मंडळी आमच्या भावनांचा विचार करून काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत टाकू शकतात, तर या मुलांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील ही मुलं फक्त याच पालकांची जबाबदारी आहे असं न मानता, काही काळासाठी तरी आपली मानायची तयारी दर्शविली तरी मुळे काकांचा हा ‘सलाम सेवेला’ कार्यक्रम शंभर टक्के सार्थकी लागेल. हा वस्तुपाठच समाजासमोर प्रेरणादायी ठरेल व पालकांना एक प्रकारचा दिलासा मिळून त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल यात शंकाच नाही!
सरते शेवटी, ‘अनाश्रित: कर्मफलम्, करय कर्म करोति य:’, या श्लोकांचं आज प्रत्यक्षात आचरण झालं होतं. घरी परतताना एक वेगळंच समाधान मनात रेंगाळत राहिलं..

– स्मिता लेले-कुलकर्णी
spk200412@gmail.com