मीना वैशंपायन
‘युद्धविषयक ग्रंथनिर्मिती केवळ पुरुषी दृष्टिकोनातून झाली आहे. युद्धेतिहास जाणून घेताना पुरुषांचे शब्द, त्यांची नजर, त्यांच्याच संवेदना! खरं तर दुसऱ्या महायुद्धात प्रथमपासूनच बहुतेक सर्व देशांनी आपापल्या फौजांमध्ये स्त्रियांची भरती केली आणि स्त्रियांनी मोठं शौर्य गाजवलं होतं. मग तोवरच्या इतिहासानं त्याबद्दल मौन का बाळगलं?’ या विचारांनी अस्वस्थ झालेल्या स्वेतलाना जवळजवळ ७-८ वर्ष प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या शेकडो जणींशी बोलत, वाचत, विचार करत, तज्ज्ञांशी चर्चा करत, संदर्भ शोधत होत्या. त्यातूनच जन्माला आलं ते ‘नोबेल’विजेत्या स्वेतलाना अलेक्झिएव्हिच यांचं ‘unwomanly face of war’ हे पुस्तक. आज पुन्हा जागतिक युद्धजन्य परिस्थिती असताना, समाजातील निम्म्या घटकाची, स्त्री संवेदनेची दखल घेणारं हे पुस्तक युद्धाची दुसरी बाजू माहीत करून घेण्यासाठी वाचायलाच हवं.
‘युद्धस्य कथा रम्या’ हे मला लहानपणापासून माहीत होतं. पण मी लहानपणी युद्धविषयक पुस्तकं वाचत नसे! मनात भीती असावी. मी पुस्तकातला किडा असून, माझी मित्रमंडळीही आवडीनं तसं वाचन करत असूनदेखील, मला मात्र तशी पुस्तकं वाचवत नसत. तरीही मला युद्धावर एक पुस्तक लिहावंसं वाटे. आणि आता मी ते लिहिते आहे..माझ्या जन्माच्या वेळी युद्ध नुकतंच संपून सोव्हिएत रशिया विजयी झाला होता. त्याचा आनंद आणि त्यातल्या कथा सर्वत्र होत्या. कुठेही जा, सगळीकडे एकच चर्चा- युद्ध आणि विजय. त्यातले भीतीदायक, न समजणारे किती तरी शब्द ऐकले की माझी चीड आणखीच वाढे. त्याबरोबर खंदकात दिवसेंदिवस राहणं, अंगावरचे जड कपडे, जड बंदुका, यांसारख्या काही गोष्टींचं गूढ, कुतूहल वाटे.. त्याच काळात माझ्या मनात मृत्यूविषयी विचार येत असत. माझ्या कुटुंबातले बहुतेक सारे जण युद्धात मारले गेले होते. अशा घटना प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाबाबतीत घडल्या होत्या. मागे राहिलेली मुलं, स्त्रिया, म्हातारे लोक हे रोगराई, उपासमार, अत्याचार यांचे बळी ठरले होते. आम्हाला युद्धाच्या गोष्टींशिवाय दुसरं जगच राहिलं नव्हतं. गावात तर सगळय़ा विधवाच शिल्लक होत्या. त्या अजूनही आपल्या मुलांची, नवऱ्यांची वाट पाहात होत्या. सगळं वातावरण एका अदृश्य अस्वस्थतेनं वेढल्यासारखं वाटे.
हे गूढ उलगडता येईल? यातील अज्ञात बाबी आपल्याला जाणून घेता येतील का? असं वाटे. पुढे लक्षात येत गेलं, रशिया सतत कोणत्या तरी युद्धाची तयारी करत असतो किंवा प्रत्यक्ष युद्ध करत असतो. मग आणखी प्रश्न पडत गेले..’आपल्या लेखनातून अशा विविध प्रश्नांचा वेध घेत १९८५ मध्ये स्वेतलाना अलेक्झिएव्हिच हिचं पहिलं पुस्तक आलं, ‘The unwomanly face of war.’ २०१५ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारी आणि आजही युक्रेन-रशियाच्या युद्धात रशियाच्या धोरणांवर सडकून टीका करणारी युक्रेन-बेलारूसची ही अभ्यासू, प्रतिभावंत लेखिका व इतिहासकार. आजवर अनेक नामवंतांनी महायुद्धं आणि त्यातला सुष्ट-दुष्ट संघर्ष वेगवेगळय़ा कलामाध्यमांतून हाताळला. इतिहासकारांनी सखोल संशोधनं करून आपले निष्कर्ष जाहीर केले, तरी प्रसिद्ध तत्त्वज्ञ बट्र्राड रसेल म्हणतात तसं, ‘A war does not determine who is right… only who is left याचाच प्रत्यय येतो. हे जाणूनही स्वेतलानाच्या एक गोष्ट लक्षात आली, की युद्धविषयक ग्रंथनिर्मिती केवळ पुरुषी दृष्टिकोनातून झाली आहे. युद्धांचा इतिहास हा पुरुषांनी पुरुषांबद्दलच लिहिलेला आहे. यात स्त्रिया कुठेच नव्हत्या.
आपण पुरुषांनी लिहिलेल्या, त्यांच्या खऱ्या-खोटय़ा शौर्याच्या कथा वाचतो. युद्धेतिहास जाणून घेताना पुरुषांचे शब्द, त्यांची नजर, त्यांच्याच संवेदना! पण समाजातला निम्मा भाग असणाऱ्या स्त्रिया या वेळी काय करत होत्या? तोवरच्या इतिहासानं त्याबद्दल मौन का बाळगलं? मग यात मानवी जीवनाचं संपूर्ण चित्र, सारा इतिहास कसा दिसणार? स्वेतलाना पत्रकारिता करत असताना एकदा टेलिफोन कंपनीत काम करणाऱ्या मरिया इव्हानोवना या ऑपरेटरचा निवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित केला गेला होता. मरिया महायुद्धात नेमबाज (sniper) म्हणून सामील झाली होती आणि तिला अनेक शौर्यपदकं मिळाली होती. तिनं ७५ जर्मन सैनिकांना कंठस्नान घातलं होतं. ते ऐकल्यावर स्वेतलानाच्या मनात आश्चर्यमिश्रित कुतूहल जागं झालं. युद्धातलं मरियाचं विलक्षण काम आणि नंतरची साधी नोकरी यांचा मेळ कसा घालायचा? रशियासाठी महत्त्वाची कामगिरी केलेल्या हिच्यासारख्या अनेक स्त्रिया असतील. मग त्यांच्या शौर्याच्या कथा आपण कशा ऐकल्या नाहीत? स्वेतलानाला वाटलं, या स्त्रिया आपल्या आठवणी, युद्धेतिहास का लिहीत नाहीत? आपण आजवर वाचत आलो, की युद्धासारखी राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा स्त्रिया वैद्यकीय मदत, शुश्रूषा, सैनिकांसाठी स्वयंपाक, घरी राहून मुलं सांभाळणं आदी कामं करतात. पण इथे दिसतंय की दुसऱ्या महायुद्धात काही स्त्रिया सीमेवर गेलेल्या होत्या. मग त्यांचे अनुभव कसे होते? त्यांच्या अनुभवांवर आधारित इतिहासलेखनाला किती वेगळी परिमाणं मिळतील! स्वेतलानाचा शोध सुरू झाला..
जवळजवळ ७-८ वर्ष स्वेतलाना यासंबंधी वाचत, विचार करत, तज्ज्ञांशी चर्चा करत, संदर्भ शोधत होती. दुसऱ्या महायुद्धात स्त्रियांची कामगिरी विलक्षण, अविश्वसनीय होती. प्रथमपासूनच बहुतेक सर्व देशांनी आपापल्या फौजांमध्ये स्त्रियांची भरती केली आणि स्त्रियांनी मोठं शौर्य गाजवलं. सर्वाधिक संख्या सोव्हिएत स्त्रियांची- दहा लाख एवढी होती. रशियन फौजेतल्या या स्त्रियांनी युद्धविषयक अनेक पुरुषी समजली जाणारीदेखील कौशल्यं अगदी कमी वेळात शिकून घेतली. हे सारं लिहिताना स्वेतलाना सांगते, की त्या वेळी एक आकस्मिक नवीच अडचण आली. त्यापूर्वी स्त्रिया साऱ्याच युद्धविषयक भागांमध्ये काम करत नसल्यामुळे त्यांच्यासाठी ते-ते कौशल्य-व्यवसायनिदर्शक स्त्रीवाचक शब्दच उपलब्ध नव्हते. उदा.-इन्फन्ट्रीमॅन, मशीन गनर, टँक ड्रायव्हर इ. त्यामुळे आता हळूहळू तसे स्त्रीवाचक शब्द तयार होत गेले. या साऱ्यांशी बोलून त्यांचे अनुभव जमा करत, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या सोव्हिएत स्त्रियांचं जीवन कसं होतं यासंबंधीचा मौखिक इतिहास आपण लिहावा, असा विचार स्वेतलानानं केला. हे कुणा एकीचे अनुभव नसून या स्त्रियांचं तत्कालीन सामूहिक जीवन ज्ञात व्हावं असा प्रयत्न होता. हा वृंदगानासारखा (कोरस) आविष्कार आहे. या लेखनाला वास्तवाचा पाया आहे आणि कलात्मकतेचा साजही आहे. उपलब्ध आकृतिबंधात न बसणाऱ्या या ललितेतर लेखनाचा, बहुमुखी आवाज असणारा एक वेगळाच आकृतिबंध तिनं निर्माण केला आणि तोच तिच्या पुढच्या पुस्तकांमध्ये तिनं वापरला. नोबेल पुरस्कार समितीनं याचा खास उल्लेख त्यांच्या मानपत्रात केलाय.
अक्षरश: शेकडो स्त्रियांना भेटून त्यांच्याबरोबर अनेक तास घालवत, त्यांच्या भावनिक उद्रेकांना सांभाळत, त्यांचा खासगीपणा जपत, सांत्वनपर बोलत, तिनं त्यांच्या हकिगती रेकॉर्ड केल्या. काही लाख फुटांचं रेकॉर्डिग आणि त्यातून साकारलेली ही बखर. सर्वच हकीगती पुस्तकात समाविष्ट नाहीत. पण ज्यांचे अनुभव आहेत, त्या प्रत्येकीचं नाव, हुद्दा दिलेला आहे. स्वेतलाना त्या काळाचं भानही विसरत नाही. त्यांनी आता चाळीसेक वर्षांनंतर आपल्या स्मृतीची कवाडं खुली केली असल्यानं त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या छटाही मिसळल्या आहेत याची तिला जाणीव आहे. त्यांच्या अनुभवांच्या आधारे प्रकरणांना शीर्षकं दिली आहेत.
तिनं ज्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यात पायलट्स, डॉक्टर्स, नर्सेस, नेमबाज, टँक ड्रायव्हर, विमानहल्ल्यांना थोपवणाऱ्या विरोधी विमानांचे पायलट्स, स्वयंसेवक, टेहळणीबाज, हेर अशी कामं करणाऱ्या स्त्रिया होत्या, तसंच विविध सैन्य तुकडय़ांच्या, विमान तुकडय़ांच्या प्रमुख, सेकंड लेफ्टनंट, कमांडर अशा विविध पदांवर काम केलेल्या स्त्रियांबरोबरच, कपडय़ांची धुलाई, स्वयंपाक करणाऱ्या, इंजिन- ड्रायव्हर्स, टेलिफोन ऑपरेटर्स अशी कामं करणाऱ्या स्त्रियाही होत्या.
सगळय़ा हकिगती वाचताना प्रकर्षांनं काय जाणवत असेल, तर त्यांची स्वदेशप्रीती, जबरदस्त कार्यनिष्ठा आणि जबाबदारीची न विझणारी जाणीव. युद्ध सुरू झालं आणि जर्मन फौजा जसजशा आत आत घुसू लागल्या तसतशा रशियन फौजा मागे हटल्या. रशियात मातृभूमीच्या रक्षणासाठी स्टालिनचा प्रचार, देशासाठी मदतीचं आवाहन केलं जात होतं. त्याला अधिकाधिक प्रतिसाद मिळाला, तो तरुण मुलींकडून. त्या सैन्यात भरती करून घेऊन प्रत्यक्ष सीमेवर जाण्यास उतावळय़ा झाल्या होत्या. अनेक मुली शाळा-कॉलेजातून परस्पर जाऊन भरती होत. सगळय़ांना थेट लढाईत भाग घ्यायचा होता. आवश्यक ते थोडंफार प्रशिक्षण घेऊन त्या कामाला लागत. तरुण वय, वयानुसार असणारा स्वप्नाळूपणा त्यांच्यात होता. प्रत्यक्ष सैन्यात जाऊन कामाला सुरुवात करताना, युद्ध म्हणजे एखादी रोमँटिक गोष्ट नाही, ही जाणीव आणि अपार शारीरिक कष्ट, चिकाटी, धैर्य, प्रसंगावधान, याची कल्पना किंवा मानसिक तयारी त्या वेळी त्या मुलींची होतीच असं नव्हे. पण त्या साऱ्या स्वेच्छेनं सामील झाल्या होत्या. यातल्या एकीनंही आपल्यावर कसली सक्ती झाली असं सांगितलं नाही. परंतु दिवसेंदिवस चालत जाणं, खंदकांतच राहाणं, अनेक तास कामच करत राहाणं याची त्यांना सवय नव्हती. काही जणींनी आपली वयं लपवून प्रवेश घेतला, काही जणी आपली लहान मुलंही घरी ठेवून आल्या. पण प्रत्यक्षात त्यांना अनुभव आला, की युद्ध म्हणजे केवळ शौर्य नाही, तर क्रौर्य आणि हिंसा आहे.
शत्रूशी दोन हात करण्याची त्यांना उत्सुकता होती, मृत्यूची भीती नव्हती, त्याबद्दल त्या आपसांतही बोलत नसत. पण प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा प्रथम बंदुकीचा चाप ओढणं त्यांना कठीण गेलं. उपरोल्लेखित मरिया म्हणते, ‘मला वाटलं, मी कशी कुणाला गोळी घालू? स्त्री तर नव्या जिवाला जन्म देते. मग कुणाचा जीव कसा घेऊ? असे नैतिक पेच पडत. नंतर त्या शत्रूबद्दलचा तिरस्कार मनात साठे. त्यांनीच आमची कित्येक गावं उद्ध्वस्त केली. अडीच वर्ष लेनिनग्राडला वेढय़ात अडकवलं. हिटलर आता मॉस्कोही घेईल अशी भीती वाटत होती. तसं होऊ द्यायचं नाही, असे विचार येत आणि धडाधड गोळय़ा सुटत.’
क्लाव्डिया ग्रिगोरेवना ही फस्र्ट सरजट सांगते, ‘रायफल हातात धरताना फार विचित्र वाटलं. अंदाजच येईना. पहिली गोळी झाडताना हात थरथरला, पण नंतर ते आपलं कर्तव्य आहे, असं वाटलं.’ आणखी एक जण म्हणते, ‘मी प्रथम खंदकात गेले आणि तिथे उंदरांचा किती धुमाकूळ होता ते लक्षात आल्यावर चकित झाले, भ्यायलेही. आमच्या बॅगाही ते कुरतडून खात, कारण तेही आमच्यासारखे उपाशीच होते.’ तर दुसरी एक जण सांगते, ‘खोल खंदकात दबा धरून बसल्यावर बाहेरच्या आवाजांचा अंदाज घ्यावा लागे. एकदा रात्री विचित्र आवाज आला म्हणून बाहेर आले. पाहिलं तर ट्रक-लॉरी जात होत्या आणि मेलेल्या जर्मन सैनिकांची डोकी त्याखाली चिरडली जात होती. नंतर किती तरी दिवस त्या आवाजाची आठवण मनाचा थरकाप उडवी.’ क्लाव्डिया सांगते, ‘एकदा आम्ही पुढे पुढे जात असताना युक्रेनमधल्या एका भागात रस्त्याजवळ एक इमारत पूर्णपणे जळून खाक झालेली दिसली. कुणीच जवळ जायला तयार होईना. मी एका अदृश्य ओढीनं तिथे गेले. त्या काळय़ा राखेत काही मानवी हाडं होती, सैनिकांच्या गणवेशावर असणारे स्टार्सही तुटलेल्या अवस्थेत दिसले. आमच्या जखमी किंवा मृत सैनिकांची जर्मनांनी अशी अवस्था केलेली पाहून असा संताप झाला, की पुढे गोळय़ा झाडताना माझा हात कधीच थरथरला नाही. सतत ‘ते’ आणि ‘आम्ही’ असा विचार येतच असे.’
पण नताल्या सर्जीवा सांगते ते अधिक विचार करण्याजोगं आहे. ‘आम्हाला आमच्याच लोकांशी करावी लागणारी लढाई वेगळीच होती. एकतर आजवर नेहमीच, केवळ पुरुषांनाच शक्य आहे असं मानल्या जाणाऱ्या या संरक्षण वा लष्कर क्षेत्रात आता स्त्रियाही तितक्याच समर्थपणे उतरलेल्या पाहून आपल्या मक्तेदारीला कोणी तरी शह देतंय अशी कल्पना पुरुषांनी करून घेतली. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा कुशल, सक्षम ठरलेल्या या स्त्रिया आपल्या वरिष्ठ होतात. मग त्या आपल्याला हुकूम देतात आणि आपल्याला ते ऐकावे लागतात, हे त्यांना अपमानकारक वाटे. त्यामुळे आपल्या पुरुष सहकाऱ्यांकडून काम करून घेताना आम्हाला संघर्ष करावा लागे.’
नताल्यासारख्या आणखी काही जणींनी सांगितलं, ‘युद्ध संपलं, सर्व बाजूंनी अपरिमित हानी झाली, तरी शेवटी विजयावर आमचं नाव कोरलं गेलं. आम्हाला घरी परतावंसं वाटलं, पण बहुतेक घरं उद्ध्वस्त झालेली, माणसं परागंदा वा मृत्यू पावलेली. त्याहून वाईट म्हणजे आम्ही घरी आल्यावर युद्धाविषयी कुणाशीही बोलण्याची बंदी घातली गेली. त्यातल्या क्लेशकारक बाबी मनातच दडवाव्या लागल्या, कारण आपली मुलगी आघाडीवर गेली याचा आनंद झालेली आईसुद्धा म्हणू लागली, ‘तू युद्धाविषयी बोलू नकोस. तुझं लग्न होणार नाही.’ स्वत: युद्धावर लढलेल्यांनादेखील युद्धावर जाऊन आलेली मुलगी पत्नी म्हणून नको होती. तिच्या चारित्र्याची शंका घेतली जात होती. तिनं किती वेळा जीव धोक्यात घातला किंवा किती जणांचे जीव वाचवले याची कुणाला पर्वा नव्हती. ‘सीमेवर असताना बरोबर काम करणारी स्त्री आम्हाला चालेल, पण मला तशी स्त्री पत्नी म्हणून चालणार नाही. स्त्री ही आम्हाला आई किंवा पत्नी याच रूपात हवी,’ असं स्पष्टपणे सांगणारे अनेक जण भेटले. या संघर्षांला तोंड कसं द्यायचं?’
स्टॅनिस्लावा, व्हेरोनिका, मरीना, अन्टोनिना, एलेना, सैबेरियातून सैन्यात आलेली व्हॅलेन्टिना यांसारख्या अनेक वीरांगनांच्या कहाण्या यात आहेत. प्रत्येकीची कहाणी इतिहासाचा एक लहानसा तुकडा आपल्यापुढे ठेवते. त्यात आपल्या चमूमधल्या तीस जणांचे प्राण वाचावेत म्हणून पाठुंगळी बांधलेल्या, भुकेनं रडणाऱ्या आपल्या लहानग्या बाळाला जलार्पण करणारी आई आहे, तशीच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला ठार मारून त्याच्यावर नांगर फिरवू पाहणाऱ्या जर्मन सैनिकावर गोळी घालणारी कुणी आहे. सीमेवर जाताना घरी सोडलेली लहानगी आता मोठी झाली, पण आपल्या आईला ओळखेनाशी झाली, याची बोच वाटणाऱ्या आहेत. चार वर्षांच्या काळात त्या आपलं स्त्रीत्वच विसरल्या होत्या. तिथल्या जीवनाचा परिणाम म्हणून काही जणींच्या बाबतीत निसर्गनियमही जणू बदलले होते. युद्ध संपल्यावर एकीला बरोबर काम करणाऱ्या सेकंड लेफ्टनंटनं लग्नाची मागणी घातली. ती वैतागून म्हणाली, ‘अरे, माझ्या स्त्रीसुलभ प्रेरणा, भावना आता नाहीशा झाल्यात. त्या मला परत मिळवून दे. माझ्यातलं स्त्रीत्व जागं कर, मग लग्नाचं पाहू.’ आरंभी सैन्यात भरती झाल्यावर सगळे केस कापून पुरुषांसारखे कपडे घालावे लागले तेव्हाही त्या अशाच अस्वस्थ होत्या. अनेकींच्या कथा-व्यथा..
युद्धाची सरकारला त्रासदायक, किळसवाणी, क्रूर बाजूही दाखवली म्हणून सुरुवातीला या पुस्तकाचा बराचसा भाग ‘सेन्सॉर’ करून पुस्तक छापायला परवानगी मिळाली. पाचेक वर्षांपूर्वी काटछाट न करता पूर्ण पुस्तक उपलब्ध झालंय.
आज पुन्हा युद्धजन्य जागतिक परिस्थिती असताना, समाजातील निम्म्या घटकाची, स्त्रीशक्ती, स्त्री संवेदना यांची आवर्जून दखल घेणारं हे पुस्तक वाचकालाही युद्धाची दुसरी बाजू माहीत करून घेण्यासाठी उपयुक्त आहे. सामान्य रशियन स्त्रियांनी, या वीरांगनांनी दाखवलेलं अतुलनीय धैर्य, मिळवलेले सन्मान आणि त्यांचे दृष्टिकोन समजून घेताना आपलीही युद्धविषयक समजूत वाढते हे नक्की!
meenaulhas@gmail.com