भारती

‘पथेर दाबी’ ही कादंबरी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. भारती ही ‘पथेर दाबी’ची नायिका आहे.

(संग्रहित छायाचित्र)
 

प्रभा गणोरकर

‘पथेर दाबी’ ही कादंबरी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. भारती ही ‘पथेर दाबी’ची नायिका आहे. शरच्चंद्रांच्या या नायिकेत धर्य आहे, हिंमत आहे. अनाथ, आजारी मुलांची शुश्रूषा ती करते. दरिद्री, वृद्ध, असहाय माणसाला धीर देते. ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेशात राहून क्रांतिकारकांच्या सोबत काम करणारी ही कर्तबगार, लोकविलक्षण स्त्री उभी करताना शरच्चंद्रांच्या मनामध्ये नेताजी सुभाषचंद्रांच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्रियांची प्रतिमा असावी.

‘पथेर दाबी’ ही कादंबरी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. १९२० नंतरच्या काळात ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात क्रांतिकारी विचारसरणीच्या युवकांनी चळवळी सुरू केल्या. त्यांचे चित्रण या कादंबरीत आहे. ही प्रथम १९२६ मध्ये ‘बंगवाणी’तून प्रकाशित झाली. तेव्हाच ती इतकी लोकप्रिय झाली की १९३६ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्यावर तिच्या तीन हजार प्रती हातोहात विकल्या गेल्या.

भारती ही ‘पथेर दाबी’ची नायिका आहे. ‘पथेर दाबी’ हे ब्रह्मदेशात कार्यरत एका संघटनेचे नाव आहे. या संघटनेची अध्यक्ष सुमित्रा असली तरी डॉ. सव्यसाची हा क्रांतिकारक या चळवळीचा प्रणेता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही चळवळ अनेक तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्यापैकी एक आहे भारती!

रंगूनला भारती ज्या इमारतीत राहते आहे त्याच इमारतीत अपूर्वला त्याच्या कंपनीने राहायला जागा दिलेली आहे. कोलकाताला त्याचे वडील डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. अपूर्व एमएस्सी झालेला आहे. त्याचे भाऊ-भावजया आधुनिक वळणाच्या, पण अपूर्व मात्र आईचे ब्राह्मणी संस्कार श्रद्धेने सांभाळत गंगास्नान, संध्या, पूजाअर्चा, सोवळेओवळे, शाकाहार, व्रतवैकल्ये जपणारा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेशात उघडलेल्या एका नव्या कंपनीतली नोकरी तो स्वीकारतो. तेव्हा त्याची आई करुणामयी मुलाच्या काळजीने व्याकूळ होते. घरचे डाळ-तांदूळ, पीठ-मीठ, तेल-तूप, मसाले, बटाटे आणि एक ब्राह्मण आचारी घेऊन जहाजावर चिवडा, संदेश आणि नारळपाणी यावर गुजारा करीत अपूर्व रंगूनला पोचतो. तेव्हा त्याला कळते की ज्या वस्तीत आपल्याला कंपनीने घर दिले आहे, ती देशीविदेशी ख्रिश्चनसाहेब आणि त्यांच्या मडमा यांची आहे. वरच्या मजल्यावरचा मद्रासी साहेब दारुडा, उर्मट आणि भांडखोर आहे. पहिल्या दिवशीच या जोसेफ साहेबाने त्रास द्यायला सुरुवात केली आहे. भारती ही त्याची मुलगी आहे. रोज उठून वेगवेगळ्या प्रकारे सतावत या जोसेफ साहेबाने अपूर्वचे जीवन असह्य़ करून सोडले आहे. आपल्या नोकराच्या चौकस स्वभावामुळे अपूर्वला कळते की भारती ही मुळात राजकुमार भट्टाचार्य यांची कन्या आहे. पण तिचे वडील वारल्यानंतर तिच्या आईने जोसेफसाहेबांशी लग्न केले आणि स्वत:चे नावही बदलून घेतले आणि भारती झाली मिस मेरी भारती जोसेफ.

एके दिवशी अपूर्वच्या घरात चोरी होते, त्या वेळी भारतीच्या चांगुलपणाचा अनुभव तो घेतो. तिने चोरांना पळवून लावलेले असते. आणि नंतर घरातले काय किती चोरीला गेले असेल याचा सारा हिशेबही ती अपूर्वला समजावून सांगते. तिचा प्रेमळ स्वभाव, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य हे सारे अनुभवताना अपूर्व चकित होतो. या चोरीचा रिपोर्ट द्यायला तो पोलीस ठाण्यामध्ये जातो, तेव्हा कोलकात्यातले ओळखीचे पोलीस अधिकारी एका राजद्रोह्य़ाला पकडण्याच्या कामगिरीवर रंगूनला आलेले असतात. त्यांच्याकडून अपूर्वला कळते की जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांत राहून अनेक पदव्या मिळवलेला हा राजद्रोही डॉक्टर आहे. सतत वेशांतरे करून तो देशविदेशात भटकत असतो. या वेळीदेखील तो पोलिसांच्या हातांवर तुरी देतो. त्याच्याविषयीच्या संभाषणातून अपूर्वला त्याच्या देशभक्तीविषयी आदर वाटू लागतो.

कंपनीच्या कामासाठी अपूर्वला अनेक प्रदेशांमध्ये दौऱ्यावर जावे लागते. त्या दरम्यान भारतीचे वडील आणि आईदेखील मरण पावतात. देवीची साथ पसरलेली असते. अपूर्वच्या आचार्यालादेखील देवी निघतात. भारती त्याची सेवा करते व त्याला वाचवते. भारतीचे धर्य, सेवावृत्ती, प्रेमळपणा याचे प्रत्यंतर अपूर्व घेत असतो. तो स्वत: दुबळा, भित्रा असतो. अनेक गोष्टींसाठी भारतीवर विसंबून राहतो. पण आपली ब्राह्मण जात तो विसरत नाही आणि भारती ख्रिश्चन आहे हेही विसरत नाही. तिने विटाळलेले पाणी पिणे दूरच, तिचा स्पर्श जरी झाला तरी कपडे बदलावे लागतात हे तो तिला सरळ सांगतो. त्यामुळे भारती दुखावते आणि अनेक दिवस त्याला भेटत नाही. एके दिवशी तो तिला शोधत नदीकाठच्या वस्तीत जातो, तेव्हा भारतीची शाळा, ‘पथेर दाबी’ या नावाची समिती आणि भारतीचा त्या समितीतला सक्रिय सहभाग हे सारे प्रत्यक्ष पाहतो. माणसाने माणुसकीच्या मार्गावर चालण्यासाठी येतील ते अडथळे पार करीत पुढे मार्गस्थ होण्याचा समितीचा संकल्प सांगत ती अपूर्वला समितीच्या सभेला नेते. डॉ. सव्यसाचींचा परिचय करून देते. अपूर्वला समितीचे सभासदत्व दिले जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीचे जे मार्ग अवलंबिले जात होते, त्यात क्रांतिकारी चळवळीकडे सुरुवातीला तरुण पिढी जास्त आकर्षति होत होती. ब्रिटिशांनी चालवलेले अत्याचार, त्यांनी चालवलेले शोषण, कामगारांचे दारिद्रय़ आणि कंगाल जीवन जवळून पाहत त्यात आमूलाग्र परिवर्तनासाठी काम करणारा जो क्रांतिकारी गट होता त्यात भारती काम करत होती. शरच्चंद्रांच्या या नायिकेत धर्य आहे, हिंमत आहे. फाटक्या वाकळीवर पडलेल्या अनाथ, आजारी मुलांची शुश्रूषा ती करते. दरिद्री, वृद्ध, असहाय माणसाला धीर देते. दारू पीत बसलेल्या स्त्री-पुरुषांच्या समुदायाला ती समितीच्या सभेचे महत्त्व समजावून सांगते. स्वरक्षणासाठी ती पिस्तूलही बाळगते. अपूर्वला अपरिचित असलेले भणंगांचे जीवन प्रत्यक्ष दाखवताना या माणसांना नरकात जीवन घालवावे लागते, कारण इतर माणसांनी त्यांना हे भोगणे भाग पाडले आहे हे ती अपूर्वला पटवून देते. तिचे विचार ऐकून अपूर्वला समाजातील शोषणव्यवस्थेचे भान येते. ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेशात राहून क्रांतिकारकांच्या सोबत काम करणारी ही कर्तबगार तरुण स्त्री अपूर्ववर मनोमन प्रेम करते. त्याच्या सोवळ्याओवळ्याची थट्टा करत असताना आपण त्याच्या जीवनाची जोडीदार होऊ शकणार नाही हेही ती जाणून आहे. ती रोमँटिक, भावविवश, अश्रू ढाळत बसणारी हळवी स्त्री नाही. तर कृतिशील, खंबीर आणि ध्येयनिष्ठ आहे.

सव्यसाचीबद्दल तिला अतीव आदर आहे. पण त्यांच्या रक्तरंजित क्रांतिकारी मार्गाविषयीचा तिचा विरोध, आपले मतभेद ती स्पष्टपणे व्यक्त करते. संपूर्ण जगात इंग्रजांइतका मानवतेचा शत्रू दुसरा कोणीही नाही, स्वार्थासाठी माणसाला अमानुष बनवून टाकणे हाच त्यांचा व्यवसाय आहे आणि तेच त्यांचे भांडवल आहे, हे सव्यसाचीचे मत तिला पटत नाही, कारण ख्रिश्चन धर्मावर तिचा अजूनही विश्वास आहे.

‘पथेर दाबी’ या विद्रोही संघटनेची माहिती कमिशनरला देऊन अपूर्व स्वत:च्या नोकरीचा बचाव करतो, तेव्हा त्याला मृत्युदंड द्यावा असे समितीच्या अनेक सभासदांचे मत असते. पण सव्यसाची अपूर्वला क्षमा करतात. तो किती सामान्य, किती दुबळा, किती तुच्छ माणूस आहे याची भारतीला जाणीव होते. त्याच्याविषयीच्या मोहातून बाहेर पडावे आणि तनमनाने आपण देशाच्या कार्यात सामावून जावे असे तिला वाटते. खाऊनपिऊन सुखी राहू इच्छिणाऱ्या, नोकरीला चिकटून बसणाऱ्या अपूर्वसारख्या तरुणांच्या तुलनेत सव्यसाचीचे कष्टमय जगणे तिला महान वाटते. सर्वाच्या दु:खाने दु:खी होणाऱ्या, स्वत:च्या जीवनाचे महत्त्व बाजूला ठेवणाऱ्या सव्यसाचीबद्दल तिचे मन मायेने भरून आलेले असते.

सव्यसाची तिला बहीण मानतात आणि तिच्या कर्तृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. परंतु ज्यांनी आमची जन्मभूमी बळकावली आहे, आमची माणुसकी, मानमर्यादा, आमच्या भुकेचे अन्न आणि पिण्याचे पाणी, आमचे सर्वस्व ज्यांनी हिसकावून घेतले आहे, त्यांना आमची हत्या करण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला तसा का नसावा असे त्वेषाने उच्चारणाऱ्या सव्यसाचीला, शांतीचा मार्गच श्रेयस्कर आहे, िहसेच्या विरुद्ध िहसा आणि अत्याचाराच्या विरोधात अत्याचार योग्य नाही, एक दिवस असा येईल की ज्या वेळी िहसा आणि विद्वेष यांच्या जागी धर्म, अिहसा आणि शांती यांची पुन:स्थापना  होईल, असे निग्रहपूर्वक ती सांगू शकते. पारतंत्र्याविरुद्ध कधीही न विझणारी आग ज्याच्या मनात पेटलेली आहे, जो शंकाहीन, बुद्धिमान आणि दृढचित्त आहे अशा सव्यसाचीबद्दल तिचे स्त्रीहृदय करुणेने भरून येते.

सव्यसाची ब्रह्मदेश सोडून जाणार असतात. चीन, जपान, पॅसिफिकमधली बेटे आणि नंतर अमेरिका असा त्यांचा पुढचा प्रवास सुरू होणार असतो. ते सर्वाचा निरोप घेतात. तेव्हा ती व्याकूळ होते. आणि दूर अंधकारात, वादळात जाणाऱ्या त्या पांथस्थाकडे एकाग्र दृष्टीने पाहात राहते.

भारती ही अशी लोकविलक्षण स्त्री उभी करताना शरच्चंद्रांच्या मनामध्ये नेताजी सुभाषचंद्रांच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्रियांची प्रतिमा असावी. शरच्चंद्रांच्या कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या भा. वि. वरेरकरांनाही ‘बिजली’सारखी नायिका घडवण्यासाठी भारती प्रेरक ठरली असावी.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about shrchandra chattopadhyay novel pather dabi