लांब सडक ‘घातक’ मोड!

जोपर्यंत ही कडधान्यं डबाबंद आणि कोरडी असतात; तोपर्यंत ती संपूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असतात.

कडधान्यांना मोड

डॉ. मानसी राजाध्यक्ष

आपल्या नेहमीच्या आहारातला एक महत्त्वाचा भाग असतो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशांपैकी काही तृणधान्यांचा आणि मूग, मसूर, मटकी या आणि अशा अनेक कडधान्यांचा! आपण बऱ्याचशा कडधान्यांना मोड काढतो. हल्ली धान्यांना मोड आणण्यासाठी म्हणून काही खास प्रकारचे डबेही मिळतात.

कडधान्यांना मोड येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जोपर्यंत ही कडधान्यं डबाबंद आणि कोरडी असतात; तोपर्यंत ती संपूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असतात. त्यांना अंकुरण्यासाठी काही ठरावीक परिस्थितीची गरज असते. आद्र्रता आणि अंधार हे त्यातले महत्त्वाचे भाग! आपण धान्य पाण्यात भिजत घालतो. धान्याच्या दाण्याच्या मुखाच्या बाजूला असलेल्या एका सूक्ष्म छिद्रातून पाणी दाण्याच्या आत जातं. दाणा निद्रितावस्थेतून हळूहळू बाहेर येतो. मग तीनचार तासाने दाणे पुरेसे फुगले कीआपण भांडय़ातले उरलेले पाणी पूर्णपणे काढून घेतो (कारण नाहीतर ते जास्त पाण्याने कुजण्याची शक्यता असते) आणि मग आपण त्या दमट दाण्यांना अंधारात गाडून ठेवतो. अंकुरण्यासाठी, मातीत गाडावेत तसे!

मग त्यांना अंकुर किंवा मोड फुटतात आणि ते दिसामासी वाढायला लागतात. अंकुर फुटण्याआधी धान्यामध्ये असलेल्या स्टार्चचं रूपांतर हळूहळू प्रथिनांमध्ये होतं; त्याचबरोबर ‘ब’, ‘क’ किंवा कधी ‘ई’ जीवनसत्त्वांचं प्रमाणही वाढायला लागतं. म्हणूनच तर मोड आलेल्या धान्यांची आहारमूल्यही वाढतात. पण मोड आले की आहारमूल्य वाढतात म्हणून आपण कडधान्यांना कितीही लांबीचे मोड येऊ द्यावेत का?

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्त्वाचं प्रमाण जास्त असतं, हे जरी खरं असलं तरी पण हेच मोड जर आणखी जास्त वाढले तर मात्र जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि कधी काही खूप लांब मोड आलेली कडधान्यं आरोग्याला घातकही ठरू शकतात. तेव्हा कुठल्या कडधान्याला किती लांब मोड यावेत याची अगदी नेमकी माहिती आपल्याला नसली तरी; कुठल्याही कडधान्याला थोडेसे मोड फुटले की त्यांचा आहारात वापर करावा हे उत्तम! तसंच मोड कोणत्या परिस्थितीत येतात हेही आपल्याला माहीत असल्यामुळे; त्यासाठी वेगळा डबा खरेदी करण्याची गरजच नाही; नाही का?

manasi.milind@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr manasi rajadhyaksha article on sprouts grow

ताज्या बातम्या