डिजिटल मार्केटिंग हे आजच्या व्यवसायाचे मूळ अस्त्र आहे. आणि भारतातल्या एकूण ई-कॉमर्समधला  १७ ते २० टक्के वाटा स्त्री उद्योजिकांचा आहे. त्यामुळे  ‘स्काय इज द लिमिट’ हे तत्त्व अंगीकारून स्त्रियांनी व्यवसाय विस्ताराच्या योजनेत उडी घ्यायला हवी.

जागतिकीकरणानंतर व्यापार व उद्योगाच्या सीमा प्रचंड वाढल्या आहेत व त्याबरोबरच उद्योगाच्या सीमाही विस्तारल्या आहेत. स्त्री-उद्योजकांसाठी व्यवसाय वाढीसाठी हजारो संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपली कल्पकता, कौशल्य, काम करण्याची जिद्द व सातत्य दाखवत या संधीचा पुरेपूर वापर करून स्त्री उद्योजकांनी या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. व्यवसायासाठी ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यानुसार व्यवसाय करण्यात मिळणारी लवचीकता व संधी याचा आपण पुरेपूर वापर करायला आता स्त्रियांनी शिकले पाहिजे. ‘स्काय इज द लिमिट’ हे तत्त्व अंगीकारून जास्तीत जास्त स्त्रियांनी व्यवसाय विस्ताराच्या योजनेत उडी तर घ्यायला हवी.

Netflix target of crores in the Indian market
नेटफ्लिक्सची विक्रमी झेप… भारतीय बाजारपेठेत कोटींचे टार्गेट!
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Loksatta anvyarth Domestic production expansion to increase exports of electronics from India
अन्वयार्थ: भारतीय जीबी, टीबी चीनच्या स्वाधीन
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

डिजिटल मार्केटिंग हे आजच्या व्यवसायाचे मूळ अस्त्र आहे. हे मार्केटिंग अहोरात्र सुरू असते. त्यामुळे तुम्ही झोपलेले असता त्या वेळीही अर्धे जग ऑनलाइन खरेदी करत असते. त्यावर राज्य करायचे असेल तर स्त्रियांना अगणित संधी आहेत. ई-बे, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील अशी असंख्य  विक्रीस्थळांवर आजही हजारो स्त्री विक्रेत्या व्यवसाय करीत आहेत. इंटरनेट व स्मार्ट फोनच्या ग्रामीण, दुर्गम भागात पोहोचलेल्या जाळ्यामुळे भारतातील ई बाजारपेठ २०२० पर्यंत २०० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. इंटरनेटच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातली स्त्री जगाशी जोडली जाऊ  शकते. यासाठी अनेक संस्था व शासनही प्रयत्नशील आहे. महिला व बालकल्याण मंत्रालयाने ‘महिला ई गट’ नावाने महिला व बचतगटाच्या उत्पादनासाठी मोफत पोर्टल सुरु ू केले आहे. त्यावर आपल्या उत्पादनाचे फोटो, किंमत व इतर तपशील टाकता येतो. रेल्वे मंत्रालयाच्या ‘बुक माय मील’ योजनेत बचतगटातील स्त्रियांना वेगवेगळ्या स्टेशनांवर जेवणाचे डबे पुरवता येतील. शेती उत्पादने, फळे, भाज्या, फुले, दागिने, हस्तकला, रेशमी वस्त्र यांच्या खरेदी-विक्रीसाठी अशाच सेवा उपलब्ध आहेत. भारतातल्या एकूण ई-कॉमर्सच्या १७ ते २० टक्के वाटा स्त्री उद्योजिकांचा आहे. त्यावरून या क्षेत्रात किती वाव आहे, हे लक्षात येईल. ही उदाहरणे मोठय़ा कंपन्यांची किंवा पोर्टलची आहेत.

आपला प्रवास, तिकीट, हॉटेल, वाहन बुकिंग, सर्व सुकर करणाऱ्या ‘यात्रा डॉट कॉम’च्या झबिना चोप्रा हे यातलं एक उदाहरण.  सुची मुखर्जीचं ‘लाइमरोड डॉट कॉम’ नावाचे शॉपिंग पोर्टल आहे. बदललेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आता ई-कॉमर्सच्या रूपाने ऑनलाइन खरेदी-विक्री, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग अशा अनेकानेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ई कॉमर्सद्वारा तुम्ही वस्तू, सेवा, जगभर वितरित करू शकता. ग्राहक आणि किरकोळ विक्रेते यांच्यातला दुवा बनू शकता. त्यासाठी दुकानासारखी मोठी खर्चीक गुंतवूणक करण्याची गरज नाही. एका क्लिकवर तुमचे उत्पादन ग्राहकाला घरबसल्या पाहता येऊ  शकेल. त्यांनाही वस्तू पाहण्याची, कधीही ऑर्डर देण्याची, वस्तू पोहोचल्यावर पैसे देण्याची, न आवडल्यास परत करण्याची सवलत या व्यवहारात मिळत असल्याने या क्षेत्राची वाढ दरवर्षी १५ ते ३० टक्के होत आहे. आज बाजारपेठेत स्त्री ग्राहकांना समोर ठेवून अनेक उत्पादने आणली जातात. जर स्त्रियांनीच या बाजारपेठेवर हक्क गाजवला तर आश्चर्य वाटायला नको.

ज्योती पाटील ही ऑनलाइन शिकवण्या घेते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुळात व्यवसायासाठी थोडे जे वेळेचे गणित जमावावे लागते ते तिने जमवले आहे. यात तुम्हाला थोडंस तंत्रज्ञान अवगत करुन घ्यावं लागतं. ना जागेची गुंतवणूक ना खूप मोठय़ा भांडवलाची. माझी एक मैत्रीण संस्कृत विषयाच्या शिकवण्या घेत असे. दरम्यान तिला अभिनयाची संधी मिळाली. अभिनयाची संधी सोडायची नसल्याने तिने दिवसा अभिनय आणि रात्री ऑनलाइन शिकवणी सुरू केली आहे. आमच्या अस्मिता जावडेकर या मैत्रिणीने ‘आत्मन’ नावाने ज्वेलरी ब्रँड तयार केला. मुळात तिच्या आईला दागिन्यांची खूप हौस आणि त्यामुळे खूप जुन्या कारागिरांशी ओळख होती. वेगवेगळ्या ठिकाणचे पारंपरिक, आधुनिक असे दागिने तयार करत त्यांनी हा स्वत:चा ब्रॅण्ड ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून पुढे आणला. आज अतिशय यशस्वीपणे ऑनलाइन मार्केटिंगचा वापर करीत त्यांनी हा ब्रॅण्ड फेसबुकवरून प्रमोशन करत लोकप्रिय केला. आज संपूर्ण जगातून त्यांना ऑर्डर्स मिळत आहेत.

लग्न जुळवणे, लग्नपत्रिका बघणे, विवाहेच्छुकांची पसंती हा प्रकारसुद्धा हल्ली ऑनलाइनच केला जातो. आज जगभरातील स्टार्टअप्स कंपन्यांचे लक्ष भारताकडे आहे. भारताची लोकसंख्या हा भाग कित्येक उत्पादकांना आकर्षित करणारा आहे. लोकसंख्या जास्त तेवढा ग्राहकवर्ग जास्त याची उत्पादकांना भुरळ पडत आहे.

डिजिटल मार्केट ही अलिबाबाची गुहा आहे. या क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण वेबपेज विकसित करणारे तज्ज्ञ, ग्राफिक डिझायनर्स, कटेन्ट रायटर्स आणि विविध प्रकारच्या विक्री व्यवस्था बघणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासते. ऑनलाइन खरेदीची मानसिकता असलेल्या ग्राहकांच्या सतत बदलत्या कलांचा शोध घेऊन त्यानुसार कार्यरत होऊ  शकणाऱ्या व उत्तम संवादकौशल्य असणाऱ्या तरुणींना या क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते. फॅशन विश्वाने तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यापासून या उद्योगाचे अर्थकारण झपाटय़ाने बदलले आहे.

तेव्हा मैत्रिणींनो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही या गोष्टी शिकून घ्या, शिकण्याचे वय कधीही संपत नाही. तुम्ही येत नाही, समजत नाही, जमत नाही या मन:स्थितीतून बाहेर या आणि जगाच्या जवळ जायचा, व्यावसायिक म्हणून मिरवण्याचा हक्क हवा असेल तर आधुनिक कपडय़ांबरोबर, आधुनिक विचारांबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत व्यावसायिक व्हा. उत्तुंग भरारी घ्या व डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन मार्केटिंगशी गट्टी करा. आपल्या व्यवसायाचा, आपल्या ब्रँडच्या ठसा या विश्वात उमटवा.

नेहा खरे neha18.mirror@gmail.com